मुंबई ते पुणे आणि गाणगापूर ते मुंबई रेल्वेने सायकलचा प्रवास...
IAS च्या पुणे ते पंढरपूर या 250 किमी सायकल वारीसाठी पुण्याला रेल्वेने जायचे ठरले... लगेजमध्ये सायकल ठेवणे सोपे जावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पुणे स्टेशन असे रेल्वे बुकिंग केले होते...
सायकल लगेज मध्ये लोड करताना किमान दोन तास आधी स्टेशनवर पोहोचणे आवश्यक असते. तसेच आधारकार्डच्या दोन झेरॉक्स आणि सायकलच्या सीटला तांदळाच्या गोणीने बांधणे आवश्यक असते... हेच काम स्टेशनवरच्या अटेंडंटला सांगितले तर तो किमान शंभर रुपये मागतो... सायकल फ्रेम सुद्धा थर्मो शिटने बांधली असेल तर सायकल फ्रेमला ओरखडे पडत नाहीत... लगेज फॉर्मवर नाव पत्ता आधार कार्डाचा नंबर तिकिटांचा pnr नंबर तसेच मोबाईल नंबर लिहावा लागतो... तसेच जुनी वापरलेली सायकल असे सुद्धा लिहावे लागते...
पुण्याला जाणारे बारा सायकलिस्ट असल्यामुळे सर्व सायकलचे एकत्र बुकिंग करून एकाच गाडीत पाठविण्यासाठी बुकिंग क्लार्कने असमर्थता दर्शवली...
एकत्र बारा सायकल लगेज मध्ये जाणे शक्य नसल्यामुळे फक्त आठ सायकलचे लगेज बुकिंग केले तर उर्वरित सायकल त्याच रेल्वेने बोगीतून नेण्याचे नक्की केले... ज्या बोगीत बुकिंग होते त्या बोगीच्या दोन डब्यांच्या शंटिंग मध्ये सायकल ठेवण्याचे आयोजन होते...
आठ सायकल स्टेशनवरील बोगी पर्यंत पोहोचविण्याचे काम प्रत्येक सायकलिस्टने केले तर आपल्या डोळ्यासमोर सायकल व्यवस्थितरित्या बोगिमध्ये लोड करण्यात येतात... अन्यथा आपल्या अपरोक्ष लोडींग अनलोडींग करताना सायकलचे नुकसान होऊ शकते...
बुकिंग क्लार्कला काही तरी मिळेल असे अपेक्षित होते... परंतु त्याच्या बोलण्याच्या पद्धती वरून अडवणूकीचे धोरण लक्षात येत होते... एका आधार कार्डवर आठ सायकलचे बुकिंग होते... तरीसुद्धा त्याला प्रत्येकाचे आधार कार्ड हवे होते... हा अनुभव नवा होता...
एक्स्प्रेस ट्रेन फलाटावर लागल्यावर प्रत्येकाने आपल्या सायकलसह लगेज बोगिकडे प्रस्थान केले... सायकल व्यवस्थित लगेज डब्यात लोड केल्या... तो पर्यंत उर्वरित चार सायकल ज्या बोगीत आरक्षण होते त्या बोगीच्य शंटिंग मध्ये फक्त हॅण्डल सरळ करून लावण्यात आल्या...
पुण्याला सर्व सायकल व्यवस्थित उतरवून घेतल्या... पुण्यात त्या गाडीचा दोन मिनिटांचा थांबा होता... परंतु सायकल आणि इतर लगेज उतरविण्यासाठी गाडी दहा मिनिटे पुणे स्टेशन मध्ये थांबली होती...
एखाद्या स्टेशन वर गाडी दोन मिनिटे थांबत असली तरी एकदा का रेल्वेचे लगेज बुकिंग झाले की सायकल त्या स्टेशनवर उतरवून घेण्याचे काम गार्डचे असते... मग त्यासाठी गाडीतील सामान उतरवून घेई पर्यंत जास्त वेळ स्टेशनवर गाडी उभी राहते...
पंढरपूर वारी सुफळ संपूर्ण झाल्यावर आम्ही पाच जणांच्या गृपने पुढील दोन दिवसात अक्कलकोट आणि गाणगापूर वारी पूर्ण केली...
मुंबईला येताना गाणगापूर रेल्वे स्टेशनवर लगेज बोगी उघडत नसल्यामुळे लगेज बुकिंग करता आले नाही... त्यामुळे चार सायकल दोन डब्यांच्या शंटिंगमध्ये आणि एक रोडी सायकल दोन्ही चाके काढून सीट खाली ठेवण्यात आली...
परंतु आमची स्लीपर S2 बोगी अनरिझर्व्ह डब्याला लागून होती... रात्री अनरिझर्व्ह डब्याजवळील शंटिंग दरवाजे बंद करण्यात आले... त्यामुळे तेथे लावलेल्या दोन सायकल काढून... आम्ही बसलेल्या कंपार्टमेंटमध्ये चाके वर करून उभ्या स्थितीत लावाव्या लागल्या...... तसेच त्या हलू नयेत म्हणून बंजी कॉर्डने व्यवस्थित बांधल्या... आणि मुंबई गाठली...
लांब पल्ल्याच्या गाडीतून सायकल कशी न्यावी हे जुगाड... निव्वळ सोबत असलेला सायकलिस्ट मित्र शिवम खरात याच्या हरहुन्नरीपणामुळे सर्वांना शिकायला मिळाले...
टुरिंग सायकलिंगसाठी हा धडा फार उपयुक्त होता...
जय जय राम कृष्ण हरी...
No comments:
Post a Comment