खूप वर्षांच्या टुरिंग अनुभवातून सायकल आणि सफर यांचं एक सुंदर नातं जुळल आहे… आणि त्या नात्याने अनेक गोष्टी शिकता आल्या आहेत...
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात लोकलने सायकल घेऊन जाणं म्हणजे जणू एक आव्हानच असते... लगेज तिकीट मिळवण्याची धावपळ, कंडक्टरकडे दंड भरण्याचा वेळेचा अपव्यय आणि गाडी चुकण्याची भीती... या सगळ्यामुळे अनेक वेळा नाईलाजाने लगेज तिकीट न काढता प्रवास करावा लागतो...
लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये सायकल पाठवणं ही देखील एक वेगळीच परीक्षा असते... मेल एक्स्प्रेस गाडीच्या लगेज मध्ये सायकल जमा करणे साठी बरेच पेपर वर्क करावे लागते आणि आपण प्रवास करत असलेल्या गाडीतूनच सायकल येईल याचा सुद्धा भरोसा नसतो...
हल्ली बऱ्याच लांब पल्ल्याच्या गाड्यांचे लगेज प्रायव्हेट झाले असल्यामुळे... त्याचे कॉन्ट्रॅक्टर अव्वाच्या सव्वा पैसे लगेज म्हणून मागतात... तसेच रेल्वे प्राधिकरण मार्फत अथवा खाजगी कंत्राटदार यांच्या मार्फत सायकल पाठविणे म्हणजे उतरताना आपली सायकल कोणत्या परिस्थितीत मिळेल याची काहीच गॅरंटी नसते... बऱ्याच वेळेला मधल्या स्टेशनवर सायकल उतरवणे देखील जिकिरीचे असते...
काश्मीर ते कन्याकुमारी सायकलिंग करताना... आमची तिकीटे माता वैष्णो देवी कटरा पर्यंत होती... पण लगेज बोगी जम्मू तवी पर्यंत असल्यामुळे आम्हाला जबरदस्ती जम्मू तेथे उतरावे लागले होते..
खाजगी कंत्राटदारांची अवास्तव मागणी, सायकलची सुरक्षितता याबद्दलची अनिश्चितता तसेच गाडीतून उतरल्यावर सायकल कोणत्या अवस्थेत मिळेल याची चिंता... हे सगळं अनुभवताना अनेक वेळा सायकलचे नुकसान सहन करावं लागलं...
अरुणाचल प्रदेश येथील तीन सुखिया येथून पाठवलेली सायकल मुंबईत चाक निखळलेल्या अवस्थेत मिळाली होती... रेल्वेने सायकल नेताना बऱ्याच वेळा ब्रेक आणि डीरेलर खराब झालेले आहेत...
मागच्या वेळेला निलगिरी सायकल टूर करताना म्हैसूर वरून सायकल डिस्मेंटल करून आम्ही बसण्याच्या बोगी मध्ये घेतल्या होत्या... पण सायकली गोणीत किंवा बॅग पॅकिंग केल्या नव्हत्या... त्यामुळे आमच्याकडून दंड वसूल करण्यात आला होता...
या सर्व अनुभवांनी एक गोष्ट स्पष्ट झाली होती... सायकल आपल्या सोबत असेल तरच ती सुरक्षित राहते...
आता अरुणाचल प्रदेशात शेला पास आणि तवंग सायकल सफर करतोय... गौहती पर्यंत रेल्वेने जायचे आहे... म्हणून या वेळेस एक ठाम निर्णय घेतला... प्रत्येकाने सायकल डिस्मेंटल करून व्यवस्थित गोणी किंवा बॅगमध्ये पॅक करूनच कुर्ला टर्मिनस स्टेशन येथे यायचे...
जितेंद्र जैन सायकल चालवत लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचला, तर महेंद्र निकमने कुर्ला टर्मिनस येथे ट्रेनने सायकल आणली. स्टेशनवरच सायकल डिस्मेंटल करून सर्वांनी नीट पॅकिंग केलं. माझ्यासह विशांत, नवनीत आणि विकास यांनी आधीच सायकली बॅगमध्ये बंद करून आणल्या होत्या.
2 टायर AC डब्यात सर्व सायकली अत्यंत सुरळीतपणे ऍडजस्ट झाल्या. कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, कोणतीही कुरबुर नाही... अगदी आरामात सीटच्या खाली ठेवल्या... सोबतचं सामानही सहज मावलं.
भुसावळ येथे टीसी बदलला, आणि तेव्हा एक सुंदर क्षण अनुभवायला मिळाला... एस. पी. महाले यांनी “Happy Journey, Happy Cycling!” अशा शुभेच्छा दिल्या, तर बदली आलेल्या टीसी मनीष मिश्रा यांनी हसतमुख स्वागत केलं. या छोट्या गोष्टी प्रवास अधिक आनंददायी करून गेल्या...
या संपूर्ण अनुभवातून एक मौल्यवान शिकवण मिळाली...
आपली सायकल डिस्मेंटल करून व्यवस्थित पॅक करून, ती आपल्या सोबत ठेवून प्रवास करणं हेच सर्वात सुरक्षित, सोयीचं आणि आनंददायी आहे...
सतीश विष्णू जाधव
सायकलिस्ट
7977690693
Awesome Sir.....👌👌❤️❤️
ReplyDeleteYes right sir, Dismental is best option
ReplyDeleteसर खुप सुंदर लिखाण 👏
ReplyDeleteGreat work.
ReplyDeleteGreat efforts, best luck for your exipidition
ReplyDelete