लिओपोल्ड कॅफे… जिथे कॉफीच्या सुगंधात आजही २६/११ च्या भयानक आठवणी दडल्या आहेत… दि. ०३ सप्टेंबर २०२६
आज मुंबईच्या ऐतिहासिक Leopold Cafe ला भेट दिली...
१८७१ साली सुरू झालेले, आज तब्बल १५५ वर्षांचा इतिहास जपणारे Leopold Cafe…
काळ बदलला, पिढ्या बदलल्या, मुंबई बदलली; पण या कॅफेच्या भिंती आजही इतिहास, आठवणी आणि २६/११ च्या जखमा जपून उभ्या आहेत.
पण या आनंदी वातावरणात नजर भिंतींकडे गेली… आणि क्षणभर मन सुन्न झाले...
कारण तिथे आजही दिसतात त्या २६ नोव्हेंबर २००८ च्या गोळीबाराच्या खुणा…
त्या भिंतीवर उमटलेल्या खुणा आज मुंबईच्या अदम्य धैर्याच्या, जिद्दीच्या आणि पुन्हा उभे राहण्याच्या सामर्थ्याच्या साक्षीदार आहेत. त्या मुंबईने अनुभवलेल्या एका काळ्याकुट्ट दिवसाच्या साक्षीदार आहेत.
याच दरम्यान मालक नोझर यांची भेट झाली...
बोलता बोलता विषय २६/११ वर आला… आणि त्यांच्या आवाजाचा सूरच बदलला...
नोझरने त्या दिवसाची आठवण सांगितली... त्या दिवशी भारत इंग्लंडचा यांचा डे नाईट ODI क्रिकेट सामना सुरू होता. कटकच्या बाराबती स्टेडियमवर झालेल्या त्या सामन्यात वीरेंद्र सेहवाग तुफानी ९० धावा वर खेळत होता...
त्याचे शतक पाहण्यासाठी नोझर खालच्या काउंटर वरून वरच्या मजल्यावर गेला... वरचा बार लोकांनी खचाखच भरलेला होता … प्रत्येक जण सेहवागच्या शतकाची वाट पहात होता.
आणि अचानक खाली...
धाड… धाड… धाड…
सुरुवातीला कुणालाच नेमके काय घडते आहे ते समजले नाही.
पण खाली उतरून पाहिल्यावर समोरचे दृश्य पाहून काळीज गोठले…
हॉटेलमध्ये सर्वत्र रक्त… जखमी माणसे… काही निष्प्राण देह…
आणि काही क्षणांपूर्वी आनंदाने गजबजलेले Leopold अचानक मृत्यूच्या सावलीत गेले होते. यातून नोझर सुदैवाने वाचला होता...
ते अतिरेकी वरच्या मजल्यावर आले असते, तर किती मोठी मनुष्यहानी झाली असती याची कल्पनाही करवत नाही…
हे सांगताना नोझरचा आवाज एकदम हळवा झाला होता.
१८७१ मध्ये सुरू झालेले हे ऐतिहासिक Leopold त्या रात्री मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या लक्ष्यांपैकी एक ठरले होते...
आजही तिथे जुन्या काळातील पंखे डौलाने फिरताना दिसतात. त्या हल्ल्यात गोळीबाराने एक पंखाही जबरदस्त नुकसानग्रस्त झाला होता, अशी आठवण त्यांनी सांगितली. तो मोठ्या प्रयत्नाने पुन्हा दुरुस्त करण्यात आला…
आणि आजही ते पंखे फिरत आहेत…
जणू सांगत आहेत...
गोळ्या झाडता येतील…
भिंतींना जखमा देता येतील…
पण मुंबईची जिद्द थांबवता येणार नाही...
Leopold ने त्या गोळ्यांच्या अनेक खुणा पुसून टाकल्या नाहीत...त्या खुणांमध्ये जपलेल्या आहेत स्मृती, धैर्य आणि मुंबईची अदम्य जिद्द… म्हणून आजची कॉफी आणखी खास वाटली... प्रत्येक घोटाबरोबर Leopoldचा १५५ वर्षांचा इतिहास, त्या स्मृती आणि मुंबईची जिद्द अनुभवत होतो.
२६/११ मध्ये प्राण गमावलेल्या प्रत्येक निरपराध नागरिकांना आणि देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आपल्या वीरांना विनम्र अभिवादन.
मुंबई थांबली होती क्षणभर…
पण हरली कधीच नाही...
सतीश विष्णू जाधव