पराशर ऋषीं मंदिर... मनाली...
दिनांक १६.०७.२०२६
आज पराशर ऋषींच्या पावन भूमीत... मिळाला एक अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव...
मनाली लेह खारदुंगला सायकल मोहिमेच्या परतीच्या वारीत आज आमच्या संपूर्ण टीमला हिमाचल प्रदेशातील अतिशय पवित्र आणि निसर्गरम्य पराशर ऋषी मंदिर तसेच पराशर सरोवर पाहण्याचा योग आला...
मनालीपासून सुमारे ५५ किलोमीटर अंतरावर आणि समुद्रसपाटीपासून २,७३० मीटर (९०९० फूट) उंचीवर वसलेले हे ठिकाण म्हणजे निसर्ग आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम आहे.
या मंदिरात प्रवेश करताच मनाला एक विलक्षण शांतता लाभली. सभोवताली हिरव्यागार पर्वतरांगा, समोर नितळ पराशर सरोवर आणि त्या सरोवराच्या मध्यभागी तरंगणारे छोटेसे बेट... हे दृश्य शब्दांत मांडणे खरोखरच कठीण आहे...
हे बेट वाऱ्याच्या दिशेनुसार सरोवरात सतत आपले स्थान बदलत राहते आणि ही निसर्गाची अद्भुत किमया पाहण्यासाठी दूरदूरून भाविक आणि पर्यटक येथे येतात.
या पवित्र स्थळाचा संबंध महान वैदिक ऋषी महर्षी पराशर यांच्याशी आहे... महर्षी पराशर हे वेदव्यासांचे वडील होते... महर्षी पराशर यांनी याच परिसरात दीर्घकाळ कठोर तपश्चर्या केली आणि त्यामुळे हे स्थान सिद्धपीठ म्हणून ओळखले जाते...
आजही येथे ध्यान, जप आणि साधना केल्याने मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते...
या पवित्र स्थळाचा उल्लेख महाभारतात आहे... जेव्हा पांडव स्वर्गारोहणासाठी हिमालयाकडे जात होते... तेव्हा भीम या परिसरात आले. त्यांच्या पावलाच्या प्रचंड आघाताने येथे मोठा खड्डा निर्माण झाला आणि त्यातूनच पराशर सरोवराची निर्मिती झाली. हा इतिहास आणि श्रद्धा यांचा हा संगम प्रत्येक आध्यात्मिक साधकाला भारावून टाकतो.
तेराव्या शतकात बांधलेले हे मंदिर हिमाचलच्या पारंपरिक 'काठकुनी' शैलीतील लाकडी वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे. मंदिरातील प्रत्येक लाकडी नक्षीकाम, त्याची रचना आणि परिसरातील प्रसन्न वातावरण पाहताना भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळाली...
आजच्या या पराशर मंदिर भेटीत आमच्या मनाली लेह खारदुंगला सायकल मोहिमेची सांगता जणू एका आध्यात्मिक आशीर्वादाने होते आहे... अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली.
कठीण हिमालयीन सायकल वारीच्या पूर्णत्वाला पराशर ऋषींच्या चरणी नतमस्तक होऊन पुढील मोहिमेसाठी शक्ती, धैर्य आणि यशाची प्रार्थना करण्याचे भाग्य लाभले, ही आमच्यासाठी अविस्मरणीय आठवण आहे...
आमची हिमालयन सायकल वारी संस्कृती, श्रद्धा आणि आत्मशांतीचा शोध होता. पराशर ऋषींच्या पावन भूमीत आज त्या शोधाची सुंदर अनुभूती मिळाली...
आध्यात्मिक शांतता, निसर्गसौंदर्य आणि भारतीय संस्कृतीचा दिव्य संगम अनुभवण्यासाठी प्रत्येक सायकलप्रेमीने पराशर ऋषींच्या या पवित्र मंदिराला आयुष्यात एकदा तरी अवश्य भेट द्यावी.
ओम नमः शिवाय...