Friday, August 28, 2026

डॉ चितळे यांच्याशी झालेला १२ ऑगस्टचा संवाद...

डॉ चितळे यांच्याशी झालेला १२ ऑगस्टचा संवाद...

१२ ऑगस्टचा तो संवाद आज पुन्हा पुन्हा कानात घुमतोय…

“Don’t worry… Cycling कर...” म्हणणारे डॉ. चितळे, तुम्ही सुखरूप परत या… आम्ही वाट पाहतोय...

काही फोन कॉल्स आपण सहज करतो… काही संवाद आठवणीत राहतात… आणि काही संवादांना काळ अचानक असा अर्थ देतो, की त्यातील प्रत्येक शब्द पुन्हा पुन्हा ऐकताना मन भरून येतं...

(एक आठवण… जी आज मनाला अधिकच स्पर्शून जाते…माझ्या Kashmir to Kanyakumari (K2K) World Record सन्मान सोहळ्यात डॉ. मिलिंद चितळे यांच्यासोबतचा हा जिव्हाळ्याचा क्षण. १२ ऑगस्टला फोनवर त्यांच्याशी झालेला संवाद आज पुन्हा पुन्हा आठवतोय… त्यांचा आश्वासक आवाज, मित्रत्वाचा जिव्हाळा आणि दिलेली सकारात्मक ऊर्जा अजूनही मनात ताजी आहे.आज एकच प्रार्थना... डॉ. चितळे आणि त्यांची पत्नी सुखरूप परत यावेत.)

१२ ऑगस्ट २०२६.

त्या दिवशी माझे मित्र डॉ. मिलिंद चितळे यांच्याशी मोबाईलवर बोलणे झाले होते. सुदैवाने तो संवाद माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवला गेला.

आज तो संवाद ऐकताना त्यांच्या आवाजातील आत्मविश्वास, आपुलकी, सकारात्मकता आणि माझ्याविषयीची काळजी मनाला अक्षरशः हेलावून जाते...

माझ्या अपघातानंतर पाठीच्या मणक्याला झालेल्या दुखापतीबद्दल आमचे बोलणे सुरू होते...

त्यांना सांगितले की डॉ. दळवी यांनी तपासणी करून मला धीर दिला आहे. हळूहळू सायकलिंग सुरू करायला सांगितले आहे आणि महिन्यानंतर पुन्हा एक्स-रे करून पुढची दिशा ठरवायची आहे.

डॉ. चितळे प्रत्येक गोष्ट शांतपणे ऐकत होते. आणि मग त्यांनी मला जे सांगितले, ते आजही कानात घुमत आहेत...

“काही प्रॉब्लेम नाहीये… Don’t worry. Cycling कर..."

त्यांच्या आवाजात वैद्यकीय सल्ल्यासोबतच आपुलकीचा ओलावा होता. एका ट्रेकरचा, एका माउंटेनिअरचा, एका साहसप्रेमी माणसाचा दुसऱ्या साहसप्रेमी मित्रासाठी जिव्हाळा त्या शब्दांत होता...

ते म्हणाले, “ज्यांना सायकलिंगची किंवा ट्रेकिंगची आवड असते, त्यांना ‘हे करू नको, ते बंद कर’ असं सांगितलं की त्यांचा जीव गुदमरतो. त्यांना सांगायला हवं... तू हे सगळं कर… पण योग्य काळजी घेऊन कर.”

किती सुंदर विचार...

माझ्यासारख्या सायकलप्रेमी माणसाच्या मनाची अवस्था त्यांनी अगदी अचूक ओळखली होती.

माझ्या दुखापतीनंतर काही दिवस सायकलपासून दूर राहण्याची वेळ आली होती. मी त्यांना हसतच म्हणालो, “एकदम दहा दिवस असंच झालं ना माझं!”

आणि आमच्या दोघांच्याही बोलण्यात सहज हास्य उमटलं. त्यांनी मला पुढे Core Muscle Strengthening करण्याचा सल्ला दिला. अक्षरशः शब्दही समजावून सांगितला...

“C-O-R-E… Core Muscle...”

आज हा छोटासा तपशीलसुद्धा आठवताना डोळे भरून येतात.

कारण त्या संवादात डॉक्टरांच्या भूमिकेसोबतच एक जिवलग मित्र होता… एक विश्वास देणारा मार्गदर्शक होता… आणि प्रत्येक शब्दातून नवी उमेद, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा देणारा माणूस होता.

एक साहसवेडा माणूस दुसऱ्या साहसवेड्या माणसाला पुन्हा उभं राहायला सांगत होता.

संवाद पुढे जात असताना त्यांना म्हटलं,

“आता एकदा  तुम्हाला भेटायला यायचंय. जितेंद्र म्हणत होता आपण जाऊया, जरा गप्पा मारू डॉक्टर चितळेंशी.”

डॉ. चितळे आपल्या नेहमीच्या उत्साही शैलीत म्हणाले, “Yes, yes… चालेल, चालेल!”

मी म्हटलं, “तुमचा वेळ घेऊन मग येईन!”

आज हे वाक्य मनाला सर्वाधिक चटका लावतं.

कारण त्यानंतर त्यांनी सहज सांगितलं...

“मी चाललोय आता कैलासला २३ तारखेला.”

मी विचारलं, “कैलास मानसरोवरला?”

त्यांचे उत्तर आले  “हो.”

आणि मग पुढचा संवाद त्यांच्या अफाट अनुभवाची साक्ष देणारा होता... ते यावेळी तब्बल ७० जणांचा समूह घेऊन जाणार होते.

नेपाळमार्गे, तिबेटमधून कैलास मानसरोवर यात्रा.

आणि त्यांनी सहज सांगितलं... “आता माझी २९वी कैलास मानसरोवरची  ट्रिप आहे ही!”

मी उत्स्फूर्तपणे म्हणालो, “क्या बात है! क्या बात है!”

त्या क्षणी मला कुठे कल्पना होती की हा संवाद काही दिवसांनी माझ्यासाठी इतका अमूल्य ठरेल!

मी त्यांना विचारलं, “जाणार कधी आणि येणार कधी?”

त्यांनी सांगितलं, “२३ ऑगस्टला जाऊन ६ सप्टेंबरला परत येणार” 

 त्यांना शुभेच्छा दिल्या  “All the best!”

आणि शेवटी सहज म्हटलं, “भेटूया मग… यात्रेवरून आल्या नंतरच भेटू आपण.”

त्यांनीही नेहमीच्या प्रसन्न आवाजात उत्तर दिलं...

“Yes, yes… OK.”

फोन ठेवताना पुन्हा एकदा मी म्हटलं..

“All the best! Thank you.”

संवाद संपला.

पण आज वाटतं… तो संवाद संपलेला नाही.

त्यातील प्रत्येक शब्द अजून माझ्याशी बोलतो आहे.

त्यांचा आवाज अजूनही सांगतो आहे 

“Don’t worry…”

 डॉक्टर… आता हेच शब्द आम्ही तुम्हाला सांगतोय...

प्रिय डॉ. चितळे,

त्या दिवशी तुम्ही मला धीर दिलात... माझ्या मनातील भीती दूर केलीत... मला पुन्हा सायकलकडे जाण्याचा आत्मविश्वास दिलात...

आज मात्र परिस्थितीने भूमिका बदलल्या आहेत.

आज आम्ही सर्वजण तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत.

आज  तुम्हाला सांगायचं आहे...

डॉक्टर… Don’t worry!... तुम्ही पर्वतांचे माणूस आहात... कठीण वाटा पार करणं तुम्हाला माहीत आहे... हिमालयाच्या असंख्य वाटांनी तुमची पावलं अनुभवली आहेत... कैलासाच्या मार्गाशी तुमचं नातं तब्बल २९ यात्रांचं आहे... तुमची जिद्द, तुमचा अनुभव आणि लाखो शुभेच्छांची ताकद तुमच्यासोबत आहे.

आमच्या मनात एकच प्रार्थना आहे 

“डॉ. मिलिंद चितळे सुखरूप परत यावेत.” 

१२ ऑगस्टला मी तुम्हाला म्हटलं होतं... “भेटूया मग यात्रेवरून आल्या नंतर…”

डॉक्टर… ती भेट अजून बाकी आहे... जितेंद्रसोबत तुमच्याकडे यायचं अजून बाकी आहे... तुमच्यासोबत निवांत गप्पा मारायच्या अजून बाकी आहेत... तुमच्या २९व्या कैलास यात्रेच्या कथा ऐकायच्या अजून बाकी आहेत.

आणि माझी सायकल पुन्हा लांबच्या सफरीवर निघाल्यावर तुम्हाला सांगायचं आहे... “डॉक्टर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे Cycling चालू आहे!”

म्हणून…

परमेश्वरा, आमची ही एकच प्रार्थना स्वीकार.

डॉ. मिलिंद चितळे यांना सुरक्षित ठेव.

त्यांच्या प्रत्येक पावलाला संरक्षण दे.

संकटातून त्यांना सुखरूप बाहेर काढ.

आणि त्यांना त्यांच्या कुटुंबीयांमध्ये, मित्रांमध्ये आणि आप्तेष्टांमध्ये सुरक्षित परत आण.

आम्हाला पुन्हा एकदा त्यांचा तो प्रसन्न आवाज ऐकू दे ... “Yes, yes… चालेल, चालेल!”

डॉक्टर… तुम्ही सुखरूप परत या... आम्ही तुमची वाट पाहतोय... 

१२ ऑगस्टचा तो फोन अजून संपलेला नाही… त्याचा शेवट आपल्या प्रत्यक्ष भेटीनेच व्हायचा आहे.



सतीश विष्णू जाधव

सायकलिस्ट

Tuesday, August 18, 2026

*भेट झाली महात्म्यांची...*

भेट झाली महात्म्यांची...

लोकल ट्रेनने मित्राला भेटायला निघालो होतो. प्रवासात एक गृहस्थ भेटले. संपूर्ण अंगावर चंदेरी रंग, गोल चष्मा, हातात काठी... अगदी महात्मा गांधींचा वेश!

गप्पा सुरू झाल्या. विचारलं, "कुठे निघालात?" हसत म्हणाले, "चर्चगेटला... एका प्रदर्शनात तीन तास महात्मा बनून उभं राहायचं आहे."

"मानधन किती?" "हजार रुपये."

पुन्हा विचारलं, "आणि हा रंग?" म्हणाले, "पाचशे रुपयांचा... त्यात त्वचेची ॲलर्जी झाली तर ती वेगळीच."

क्षणभर मनात विचार आला... महात्मा बनण्याचा आजकालचा पॅकेज रेट हजार रुपये; त्यात निम्मा खर्च रंगाचा! पण माणूस म्हणून मोठं होण्यासाठी अजूनही कोणताही पॅकेज रेट निघालेला नाही...

सतीश टंकसाळे उर्फ बाबा मित्राला भेटलो... वय वर्षे ७८. पण उत्साह मात्र पंचविशीचा... शुभा मुदगलचा कार्यक्रम असला की आवर्जून मुंबईत उपस्थिती... पुण्यावरून मुंबईत आला की मित्रांना भेटल्याशिवाय परत नाही... गप्पा, हास्य, आठवणी... आणि मनात कायमचं घर करून जाणारा स्वभाव...

आज दोन महात्मे भेटले...

एकाला महात्मा दिसण्यासाठी चंदेरी रंग लावावा लागला... दुसऱ्याला महात्मा वाटण्यासाठी फक्त माणुसकी पुरेशी होती...

पहिल्याला टाळ्या मिळतील... दुसऱ्याला मित्र मिळाले आहेत...

रंग धुतला की पहिला महात्मा पुन्हा सामान्य माणूस होईल... पण दुसऱ्या महात्म्याची ओळख चेहऱ्यावर नाही, ती स्वभावात आहे...

म्हणूनच काही महात्मे प्रदर्शनात दिसतात... आणि काही आयुष्यभर मनात राहतात...

खरा महात्मा अंगावरच्या रंगाने नव्हे, तर मनावर उमटलेल्या रंगांच्या अंगाने  ओळखला जातो... 


सतीश जाधव

Monday, August 17, 2026

जान्हवी फूड्स... हातच्या चवीपासून विश्वासाच्या ब्रँडकडे... दिनांक १७ ऑगस्ट २०२६

जान्हवी फूड्स... हातच्या चवीपासून विश्वासाच्या ब्रँडकडे... दिनांक १७ ऑगस्ट २०२६

जान्हवी ताई… 

हाताची चव आता एका नव्या प्रवासाला निघायला हवी...

काही व्यवसाय पैशातून उभे राहतात…
काही जाहिरातींमधून मोठे होतात…

पण काही व्यवसाय असे असतात की त्यांचा पाया असतो... मेहनत, प्रामाणिकपणा, गुणवत्ता आणि हाताची चव यातून...

प्रो. सौ. जान्हवी भारत राऊत... जान्हवी फूड्स प्रॉडक्ट्स, जालगाव-दापोली... हे मला असंच एक नाव वाटतं...

माझी त्यांच्याशी ओळख एखाद्या मोठ्या व्यावसायिक व्यवहारातून झाली नाही.
ती झाली एका साध्या लाडूमधून...

त्यांचे मेथीचे लाडू माझ्याकडे आले. लाडू खाल्ला आणि चवीबरोबर त्यामागची मेहनतही जाणवली. म्हणून मी त्यांना फोन केला. पुढे त्यांच्या इतर पदार्थांविषयी माहिती घेतली. ड्रायफ्रूट लाडूंबद्दल विचारलं आणि माझ्या आगामी पंढरपूर ते पंजाब सुमारे २,५०० किलोमीटर सायकलवारीसाठी एक किलो लाडूंची ऑर्डरही दिली...

गंमतीने मी त्यांना लिहिलं होतं...

“जान्हवी ताईंचा एक ड्रायफ्रूट लाडू + सतीशची सायकल = पुढचे ४० किमी फुल्ल एनर्जी!” 

पण त्या गंमतीच्या वाक्यामागे पुढे मला एक गंभीर विचार सापडला...

जान्हवीचा भाऊ संजय गवाणकर यांच्याशी काल माझं बोलणं झालं.

गप्पांच्या ओघात त्यांनी जान्हवी ताईंच्या कामाचा दिनक्रम सांगितला आणि क्षणभर मी विचारात पडलो...

ऑर्डर आली की पहाटे पाच वाजता काम सुरू…

कच्चा माल निवडायचा…
भाजायचा…
तळायचा…
मिश्रण तयार करायचं…
लाडू वळायचे…
चकल्या करायच्या…
पॅकिंग करायचं…
ऑर्डर तयार ठेवायची…

आणि हे सगळं करता करता अनेकदा रात्रीचे अकरा वाजतात...

म्हणजे जवळजवळ अठरा तासांची धावपळ...

शाळेत शिक्षक असलेले पती भरत स्वतःची नोकरी सांभाळून मदतीला उभे राहतात... संसार, नोकरी, व्यवसाय आणि ऑर्डरींची धावपळ… दोघं मिळून शक्य तेवढं करत राहतात...

हे ऐकल्यावर माझ्या मनात एकच प्रश्न आला...

व्यवसाय वाढतो आहे याचा आनंद मानायचा… की व्यवसायाच्या वाढत्या ओझ्याखाली जान्हवी ताई थकत आहेत याचा विचार करायचा...

कारण मेहनत ही व्यवसायाची ताकद असते;
पण व्यवसायाची प्रत्येक गोष्ट मालकाने स्वतःच केली पाहिजे, असा नियम कुठे आहे?

एक दिवस पाच किलोची ऑर्डर असेल…
उद्या पंधरा किलोची होईल…
परवा पन्नास किलोची झाली तर?

जान्हवी ताईंच्या दिवसाला मात्र तेच चोवीस तास राहणार!

म्हणून मला वाटतं, आता त्यांच्या प्रवासात एक छोटासा पण फार महत्त्वाचा बदल व्हायला हवा...

“मी आणखी किती काम करू शकते?”

याऐवजी...

“माझ्यासोबतची व्यवस्था किती काम करू शकते?”

हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

गावातील दोन-तीन विश्वासू महिलांना सोबत घ्यावं...

कोणीतरी कच्चा माल निवडेल आणि प्राथमिक तयारी करेल…

कोणीतरी भाजणी, चकली किंवा लाडू वळण्याचं काम करेल…

कोणीतरी वजन, पॅकिंग आणि ऑर्डर तयार ठेवेल…

आणि जान्हवी ताई?

त्या प्रत्येक कामात दिवसभर हात अडकवून न घेता गुणवत्तेची सूत्रं आपल्या हातात ठेवतील...

हीच खरी श्रमविभागणी...

श्रमविभागणी म्हणजे आपलं कौशल्य दुसऱ्याच्या हातात देऊन मोकळं होणं नव्हे...

ती म्हणजे...

योग्य काम योग्य माणसाकडे देऊन स्वतः अधिक महत्त्वाचं काम करण्यासाठी वेळ निर्माण करणं...


आज जान्हवी ताईंची सर्वात मोठी संपत्ती कोणती?

यंत्रसामग्री नाही…
मोठं दुकान नाही…
मोठी जाहिरातही नाही…

त्यांची सर्वात मोठी संपत्ती आहे...

त्यांच्या हाताच्या चवीवर ग्राहकांचा असलेला विश्वास...

आता तो विश्वास एका व्यक्तीपुरता न राहता एका पद्धतीत उतरायला हवा...

त्यासाठी प्रत्येक पदार्थाची ठरलेली पद्धत असावी...

किती प्रमाणात साहित्य…
किती वेळ भाजायचं…
कधी मिश्रण तयार करायचं…
किती वजनाचा लाडू…
कसा पोत…
कशी चव…
कसं पॅकिंग…

आज हे सगळं जान्हवी ताईंच्या हातात आणि मनात आहे...

उद्या ते व्यवस्थित लिहून, शिकवून आणि तपासून घेतलं तर...

“जान्हवी ताईंच्या हातची चव”
हळूहळू
“जान्हवी फूड्सची खात्रीशीर चव” बनेल...

आणि तिथूनच जन्म घेतो ब्रँड...

ब्रँड म्हणजे लोगो तर आहेच पण त्याच बरोबर...

ब्रँड म्हणजे ग्राहकाने पाकीट हातात घेतल्यावर निर्माण होणारा विश्वास...

“हा पदार्थ चांगलाच असणार…”

ही भावना म्हणजे ब्रँड...

ग्राहकाने दुकानात किंवा फोनवर...

“ड्रायफ्रूट लाडू द्या”

असं न म्हणता...

“जान्हवी ताईंचे ड्रायफ्रूट लाडू पाठवा…”

असं म्हटलं…

तर समजा ब्रँड तयार झाला!...

जान्हवी ताईंना एक स्वाभाविक भीती वाटते...

“मी एखाद्या महिलेला सगळं शिकवलं आणि उद्या तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर?”

प्रश्न रास्त आहे...

पण माझ्या मते व्यवसाय फक्त रेसिपीवर उभा राहत नाही...

एखाद्या व्यक्तीला लाडू बनवता येतील…

पण जान्हवी फूड्स बनवण्यासाठी लागतो अनेक वर्षांनी तयार झालेला विश्वास...

चव लागते…
सातत्य लागतं…
प्रामाणिकपणा लागतो…
स्वच्छता लागते…
गुणवत्तेबद्दलचा हट्ट लागतो…
ग्राहकाची काळजी घ्यावी लागते…

आणि सर्वांत महत्त्वाचं...

आपल्या नावाशी जोडलेली जबाबदारी स्वीकारावी लागते...

म्हणून एखाद्याने काम शिकून स्वतंत्र व्यवसाय केला तरी त्याला स्पर्धक म्हणूनच पाहण्याची गरज नाही...

जान्हवी ताईंच्या हातून एखादी महिला शिकली…

तिच्या हातात चार पैसे आले…
तिच्या संसाराला हातभार लागला…
तिच्या मुलांच्या शिक्षणाला मदत झाली…
तिचा आत्मविश्वास वाढला…

तर त्या महिलेच्या घरातून मिळणारे आशीर्वाद कोणत्याही बँकेच्या खात्यात दिसणार नाहीत...

पण तेच आशीर्वाद जान्हवी ताईंच्या आयुष्यातील सर्वात मोठं व्याज असेल.

माझ्या डोळ्यांसमोर एक चित्र येतं…

काही वर्षांनी जालगाव-दापोलीत एक स्वच्छ, नीटनेटका छोटासा जान्हवी प्रॉडक्टचा उत्पादन विभाग आहे...

आठ-दहा महिला आनंदाने काम करत आहेत...

कोणीतरी भाजतंय…
कोणीतरी लाडू वळतंय…
कोणीतरी चकल्या तयार करतंय…
कोणीतरी वजन आणि पॅकिंग करतंय…

आणि त्या सगळ्यांच्या मध्यभागी जान्हवी ताई प्रत्येक लाडू स्वतः वळत बसलेल्या नाहीत...

त्या चव तपासत आहेत…
नवीन पदार्थाचा प्रयोग करत आहेत…
काम शिकवत आहेत…
गुणवत्ता पाहत आहेत…

आणि व्यवसायाच्या पुढच्या पायरीचा विचार करत आहेत...

काम करणाऱ्या जान्हवी ताईंपासून...
काम निर्माण करणाऱ्या उद्योजिका जान्हवी... ताईंपर्यंतचा प्रवास…

मला हाच पाहायचा आहे...

कारण स्वतः दिवसभर राबून शंभर लाडू बनवणं ही मेहनत आहे…

पण दहा महिलांना योग्य काम देऊन, त्याच दर्जाचे हजार लाडू ग्राहकांपर्यंत पोहोचवणं...

ही उद्योजकता आहे!...

जान्हवी ताई…

तुमच्याकडे शिक्षण आहे.
कष्ट करण्याची तयारी आहे.
उत्कृष्ट उत्पादनं आहेत.
ग्राहकांचा विश्वास आहे.
आणि भरतसारखा जोडीदार खंबीरपणे सोबत आहे...

आता गरज आहे ती स्वतःवरचा कामाचा भार थोडा कमी करून व्यवस्थेला मजबूत करण्याची...

तुमचा व्यवसाय केवळ तुमच्यासाठी मोठा व्हावा, एवढीच माझी इच्छा नाही...

तो मोठा होताना तुमच्या गावातील काही महिलांच्या हातात काम द्यावं…

त्यांच्या संसारात आनंद यावा…

आणि उद्या कोणी अभिमानाने म्हणावं...

“माझ्या घराला आधार देणारं काम मला जान्हवी ताईंनी शिकवलं!”

यापेक्षा एका उद्योजिकेच्या यशाची मोठी पावती दुसरी कोणती?

आणि शेवटी माझं तेच आवडतं वाक्य—

लाडू ड्रायफ्रूटचा असो की मेथीचा…
पण खरी ओळख कायम जान्हवी ताईंच्या हातच्या चवीची!”

जान्हवी फूड्स प्रॉडक्ट्स... जालगाव, दापोली
हाताची चव… ग्राहकांचा विश्वास… आणि अनेक महिलांच्या हाताला उद्याचं काम देण्याची ताकद!...

सतीश जाधव, मुंबई
सायकलिस्ट आणि एक समाधानी ग्राहक… तसेच “जान्हवी फूड्स”च्या पुढच्या मोठ्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छुक... 

Sunday, August 16, 2026

*खेकडे आले… गप्पा रंगल्या… आणि पैसे राहिले! दि. १६ ऑगस्ट २०२६

🦀 खेकडे आले… गप्पा रंगल्या… आणि पैसे राहिले! 😄 दि. १६ ऑगस्ट २०२६

परवा सायकलिस्ट मित्र विकास खेकडे घेऊन आला...

ट्रॉम्बेच्या विद्या ताईंनी खास त्याच्याकडे खेकडे सुपूर्द केले होते... मानखुर्द स्टेशनवरून विकासने ते घेतले आणि पठ्ठ्या तडक घरी पोहोचला...

खेकडे फ्रीजमध्ये गेले… आणि आम्ही गप्पांमध्ये मश्गूल झालो...

मग काय… गप्पांची अशी काही मैफल रंगली की खेकड्यांचे पैसे द्यायचे आहेत, ही अत्यंत महत्त्वाची आर्थिक बाब माझ्या लक्षातून अलगद निसटली...

काल फ्रीज उघडून खेकड्यांकडे नीट पाहिलं आणि लक्षात आलं...

अरेच्चा! हे तर डोलीचे खेकडे आहेत... आणि पैसे नाही दिले... आत लाख भरलेलं… म्हणजे खेकड्यांच्या दुनियेतले एकदम VIP...

आता खेकडा खाणं ही कला असेल, तर खेकडा साफ करणं ही तर पदवी परीक्षा होती...

खेकड्याचे दोन भाग करायचे, व्यवस्थित साफ करायचे आणि हे सगळं करताना त्याचे टोकदार दाते हाताला लागू द्यायचे नाहीत...

म्हणजे समोरचा खेकडा मेलेला असला, तरी त्याला हाताळताना आपल्याला जिवंत असल्यासारखीच सावधगिरी बाळगायची...

रात्रीच सर्व खेकडे मस्त साफ करून ठेवले...

आज रविवार…

आणि सकाळपासूनच स्वयंपाकघरातून येणाऱ्या वासाने जाहीर करून टाकलं होतं...

“आज घरात काहीतरी मोठं घडणार आहे!” 

बायकोने रस्सेदार, झणझणीत, चमचमीत खेकड्यांचं कालवण बनवलं...

दुपारच्या ताटात गरमागरम चपाती… सुवासिक इंद्रायणी भात… आणि सोबतीला लालभडक चमचमीत खेकड्यांचं कालवण... म्हणजे पर्वणीच होती...

पहिला घास घेतला… आणि रविवार सार्थकी लागल्याचे समाधान झाले...

खेकडे खाण्याची गंमतच काही वेगळी असते...

इथे काटा-चमचा या उच्चभ्रू मंडळींचा काही उपयोग नाही... दोन्ही हात मैदानात उतरवावे लागतात...

एका हातात खेकड्याचा डेंगा…  दुसऱ्या हातात नांगी… ओठांवर रस्सा… बोटांवर कालवण… आणि काही वेळात दाढी-मिशीसुद्धा त्या जेवणात अधिकृतरीत्या सहभागी झालेल्या...

खेकडा खाताना माणूस कितीही सुसंस्कृत असला, तरी पाच मिनिटांत त्याच्यातला आदिमानव जागा होतो...

पण खरी गंमत पुढेच…

एखादा मस्त भरलेला तुकडा तोंडात गेला की डोळे आपोआप मिटतात…

आणि क्षणभर वाटतं...

आपण डायनिंग टेबलावर नाहीच…
आनंदाच्या ढगावर बसून विहार करतोय...

अशा वेळी पोट म्हणतं,
“बस झालं!”

पण मन म्हणतं...

“अरे, खेकडा शिल्लक आहे… दोन घास अजून होऊ दे!” 

आणि म्हणूनच खेकड्यांच्या जेवणात दोन घास जास्त जाणं हा दोष नसून… तो खेकड्यांचा अंगभूत गुणधर्म आहे...

आजच्या या रविवारच्या खेकडा-महोत्सवाचे तीन खरे मानकरी...

विद्या ताई... खेकड्यांसाठी...

विकास... ते सुखरूप घरपोच आणण्यासाठी...

आणि बायको  स्वप्ना...  त्या खेकड्यांना चमचमीत कालवणाचं स्वर्गीय रूप देण्यासाठी...

तिघांनाही मनापासून धन्यवाद...


आणि हो विकास…

गप्पांच्या नादात खेकड्यांचे पैसे राहिले आहेत हे खेकडे खाल्ल्यावर पुन्हा आठवलंय...

विद्या ताईंना विचारून किती द्यायचे ते सांग बाबा…

“नाहीतर पुढच्या वेळी खेकडे ट्रॉम्बेलाच
 थांबतील… आणि घरचा पत्ता विसरतील...


सतीश कुसुम विष्णू जाधव...
खवय्या...

Monday, August 10, 2026

पुन्हा एकदा सायकलच्या साथीने… नव्या उत्साहाने सायकल वारी सुरू... दिनांक १०.०८.२६

पुन्हा एकदा सायकलच्या साथीने… नव्या उत्साहाने सायकलवारी सुरू... दिनांक १०.०८.२०२६

गेल्या काही दिवसांपासून मनाच्या कोपऱ्यात एकच प्रश्न सतत घुटमळत होता... पुन्हा सायकलवर कधी बसता येईल?

सायकलच्या दोन चाकांबरोबर माझ्या आयुष्याची एक मोठी सफर जोडलेली आहे. 

रस्त्यांवरून हजारो किलोमीटर फिरताना मिळालेला आनंद, डोंगर चढताना घेतलेला प्रत्येक श्वास, चेहऱ्यावर येणारा वारा आणि क्षितिजाला गवसणी घालण्याची प्रत्येक नवी उमेद… या सगळ्यामुळे सायकलिंग ही आवड आणि छंद याचबरोबर जगण्याचा एक अविभाज्य भाग बनली आहे.

मात्र २९ जुलैच्या अपघातानंतर सायकल काही दिवसांसाठी बाजूला ठेवावी लागली आणि शरीराला विश्रांती देणे भाग पडले. मन मात्र सतत पुन्हा त्या सायकलच्या साथीची वाट पाहत होते.

आज ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये स्पाईन सर्जन डॉ. समीर दळवी यांची भेट घेतली. DEXA, MRI आणि X-Ray चे सर्व रिपोर्ट त्यांच्यासमोर ठेवले. त्यांनी प्रत्येक रिपोर्ट बारकाईने पाहिला आणि पाठीच्या मणक्यांची प्रत्यक्ष तपासणी केली. आवश्यक न्यूरोलॉजिकल तपासणीही केली. सध्या पाठीच्या विशिष्ट भागात केवळ सुमारे १० टक्के वेदना जाणवत असल्याचे मी सांगितले.

रिपोर्ट आणि तपासणीचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर डॉक्टरांनी दिलेली माहिती मनाला मोठा दिलासा देणारी होती. 

T12 आणि L2 या दोन मणक्यांना फ्रॅक्चर झाले असले तरी त्यामध्ये कोणताही collapse झालेला नाही आणि सध्याची परिस्थिती समाधानकारक आहे. पुढील उपचार औषधोपचार, योग्य काळजी आणि शरीराला आवश्यक वेळ देण्यावर आधारित आहेत.

DEXA स्कॅनमध्ये हाडांची घनता कमी असल्याचे, T-score सुमारे -3 असल्याचे लक्षात घेऊन हाडांची मजबुती वाढवण्यासाठीही उपचार सुरू करण्यात आले आहेत. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसार Tayo 60K आठवड्यातून एकदा सहा आठवडे, तसेच Calcium supplement दररोज तीन महिने घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वेदना जाणवल्यास Etoricoxib (Etoshine) घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

एक महिना नियमित उपचार आणि आवश्यक काळजी घेतल्यानंतर पुढील तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर Standing Lumbosacral/Dorsolumbar Spine X-Ray – lateral view करून फ्रॅक्चरची स्थिती तपासली जाणार आहे. तसेच डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले आहे की लांब पल्ल्याची Touring Cycling आणखी चार आठवडे टाळायची आहे.

आणि मग आले ते शब्द… ज्यांची गेल्या काही दिवसांपासून मन आतुरतेने वाट पाहत होते!

“छोटे, रूटीन सायकलिंग सुरू करण्यास हरकत नाही.”

बस्स!

हे काही शब्द ऐकले आणि जणू मनावर ठेवलेला मोठा दगडच बाजूला झाला. चेहऱ्यावर नकळत हास्य उमटलं. कारण सायकल काही दिवसांपासून स्थिर होती; पण सायकलवारीची स्वप्नं मात्र कुठेच थांबली नव्हती.

त्याहून मोठा दिलासा म्हणजे पाठीचा पट्टा लावण्याची गरज नाही, इंजेक्शनची आवश्यकता नाही आणि ऑपरेशनची तर अजिबातच गरज नाही. योग्य औषधोपचार, काळजी आणि वेळ देऊन शरीराला सावरण्याची संधी द्यायची आहे.

ब्रिच कँडी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना पावलांमध्ये पुन्हा एकदा वेग जाणवत होता. शरीरावरची दुखापत अजून पूर्णपणे विसरलेली नाही; मात्र मनात पुन्हा एकदा सायकलच्या चाकांचा आवाज घुमू लागला होता.

या संपूर्ण प्रसंगाने एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली... अपघातामुळे आलेलं गंडांतर आयुष्याचा वेग काही काळ कमी करू शकते; पण ध्येयावरचा विश्वास थांबवू शकत नाहीत.

या कठीण काळात औषधोपचार आणि डॉक्टरांचे कौशल्य लाभलेच; पण त्याचबरोबर कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी आणि असंख्य स्नेहीजनांनी दिलेल्या प्रेमळ शुभेच्छा, प्रार्थना आणि आशीर्वादांची ऊब सतत सोबत होती. फोनवरून विचारपूस करणारे, संदेश पाठवणारे, प्रत्यक्ष भेटून धीर देणारे आणि मनापासून प्रार्थना करणारे प्रत्येक जण या सायकल वारीचा एक भाग बनले होते...

त्या प्रत्येक प्रेमासाठी, प्रत्येक शुभेच्छेसाठी आणि प्रत्येक आशीर्वादासाठी मनःपूर्वक कृतज्ञता! 

आता पुन्हा एकदा सुरुवात होत आहे…

मोठ्या राईडची घाई नाही… पण लांब पल्ल्याच्या प्रवासाची स्वप्नं मात्र पूर्वीसारखीच जिवंत आहेत…

आता शरीराची साथ घेत, प्रत्येक पेडलसोबत पुन्हा एक नवा प्रवास घडवायचा आहे! 

आधी छोट्या राईड्स…

मग शरीराची साथ पाहत हळूहळू वाढणारे अंतर…

डॉक्टरांचा सल्ला आणि शरीराचे संकेत यांचा आदर करत पुन्हा वाढणारा आत्मविश्वास…

आणि चार आठवड्यांनंतर, परिस्थिती समाधानकारक राहिली तर, पुन्हा एकदा त्या लांब पल्ल्याच्या Touring Cycling च्या रस्त्यांकडे वाटचाल!

उद्या सकाळी पुन्हा सायकलची घंटी वाजेल…

पेडलवर पाय पडेल…

चाकं हळूहळू फिरू लागतील…

रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी निसर्ग धावत जाईल…

वारा पुन्हा चेहऱ्यावर येईल…

आणि क्षितिजाकडे पाहताना मन पुन्हा एकदा म्हणेल

“चला… सायकलवारी पुन्हा सुरू झाली!” 

कारण सायकलिंग ही आवड आहे, ती उत्कटता आहे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ती जगण्याची ऊर्जा आहे!

या पुनरागमनाच्या प्रवासात साथ देणारे डॉ. समीर दळवी आणि संपूर्ण वैद्यकीय टीम यांचे मनःपूर्वक आभार. 

सायकल थांबली होती…

पण स्वप्नांची  सफर कधीच थांबली नव्हती...

जय श्री राम! 


सतीश कुसुम विष्णू जाधव

सायकलवारी… अविरत वारी…!



Monday, August 3, 2026

दुसऱ्या अपघाताची… दुसरी गंमत...गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडलेली घटना २९ जुलै २०२६...

दुसऱ्या अपघाताची… दुसरी गंमत...
गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडलेली घटना २९ जुलै २०२६...

जीवनात काही घटना अशा घडतात की त्या क्षणी त्या दुःखद वाटतात; पण काळ थोडासा पुढे सरकला की लक्षात येतं... अरे, ही तर आयुष्याने दिलेली एक सुंदर भेट होती... माझ्यासाठी २९ जुलैचा गुरुपौर्णिमेचा दिवस अगदी असाच ठरला...


सकाळी साडेसात वाजता मुलुंड ऐरोली नाक्यावर सायकलिंग मित्रांची भेट ठरली होती... डॉ. राजेश कांबळे, लक्ष्मण नवले, अतुल ओझा, संजय सावंत आणि मी... सगळे एकत्र येणार होतो गुरुपौर्णिमेनिमित्तानं... त्यामुळे सकाळी सहा वाजता लोअर परळहून सायकल घेऊन निघालो...

बाहेर रिमझिम पाऊस सुरू होता. रस्ता ओला होता. म्हणून नेहमीपेक्षा जरा जास्तच सावधपणे सायकल चालवत होतो... पुढची लाईट सुरू, मागचा ब्लिंकर सुरू... "सुरक्षित सायकलिंग"ची सगळी नियमावली पाळत होतो...

टिळक ब्रिजजवळ पोहोचलो तर सकाळचा भाजीबाजार रंगात आला होता. कोथिंबिर, मेथीची भाजी यांचा सुगंध, मिरच्यांच्या टोपल्या, विक्रेत्यांची लगबग, ग्राहकांची गर्दी… त्या सगळ्यातून हळूहळू वाट काढत पुढे निघालो. दादर, माटुंगा, सायन, चुनाभट्टी ओलांडत प्रियदर्शिनीजवळ आलो...

कुर्ल्याकडे जाणाऱ्या छोट्याशा फ्लायओव्हरवर चढत होतो. पावसाचं पाणी उताराने वाहत होतं. म्हणून अजूनच सावकाश सायकल चालवत होतो...

आणि अचानक...

"धाड!"

एवढाच आवाज झाला... आणि पुढच्या क्षणी मी सायकलवर नव्हतो...

मागून आलेल्या बर्फाच्या ट्रकने माझ्या सायकलच्या मागच्या चाकाला जोरदार धडक दिली होती... मी हवेत उडालो आणि दोन तीन फूट दूर जाऊन पडलो. पाठीत इतकी जोरदार कळ उठली की काही क्षण काय घडलं हेच समजेनासं झालं... डोक्यात हेल्मेट असल्यामुळे हेड इन्ज्युरी झाली नाही...

पण खरी गोष्ट इथूनच सुरू झाली...

ट्रकचा चालक अक्षरशः धावत खाली आला. त्याच्या चेहऱ्यावर भीती होती. त्याने मला उचलून बसवलं आणि घाबरलेल्या आवाजात विचारलं...

"सरजी... ज्यादा तो नहीं लगा?"

मी कसाबसा म्हणालो, "सायकल चालवणं तर शक्य नाही... पाठीत खूप दुखतंय."

तो म्हणाला, बाजूवाले बसने कट मारा... मैने ब्रेक दबाया... लेकीन टायर स्लिप हुवा और आपको धक्का लगा... "चलिए... पहले आपको सुरक्षित जगह ले चलते हैं."

त्याच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो... क्लिनरने सायकल ट्रकमध्ये टाकली..

जवळच त्याची बर्फाची फॅक्टरी होती. मला तिथे नेलं. फॅक्टरीतील बर्फ घेऊन पाठीला शेक दिला...

 मालकाला फोन केला. काही मिनिटांत मालक स्वतः आला. त्यांनी परिस्थिती ऐकून घेतली आणि एका क्षणाचाही विचार न करता म्हणाला,

"पहले आपको आपके दोस्तों के पास छोड़ते हैं."

मोठ्या xuv गाडीत माझी सायकल चढवली, मला पुढे बसवलं आणि थेट मुलुंड ऐरोली नाक्यावर आणून सोडलं... 

तिकडे सर्व मित्र माझी वाटच पाहत होते.

डॉ. राजेश कांबळे यांने जागेवरच तपासणी केली. पाय हलवायला सांगितले, हातांची हालचाल करून घेतली आणि हसत म्हणाला, "अरे, तू अजून आमच्याशी मस्त गप्पा मारतोयस म्हणजे परिस्थिती नियंत्रणात आहे... पण काळजी घ्यायला हवी."

दुखत तर होतंच... पण मित्रांच्या सहवासात वेदनांचाही विसर पडतो... मग आम्ही टाटा कॉलनीजवळच्या मनीजमध्ये नाश्त्यासाठी गेलो... खरं तर त्या दिवशी नाश्त्या ऐवजी मित्रांच्या मायेने, आपुलकीने आणि धीर देणाऱ्या शब्दांनीच मन आणि पोट दोन्ही भरून गेलं होतं...


थोड्याच वेळात बर्फ फॅक्टरीचा मालक अमनदीप सिंग म्हणाला, "आता काळजी करू नका... मी स्वतः तुम्हाला सायकलसह सुरक्षितपणे घरी सोडतो." 

त्या क्षणी जाणवले... अमनदीपने काळजीपूर्वक मदतीचा हात तर दिलाच होता तसेच तो आपत्कालीन परिस्थितीत जवळ आलेला माणुसकीचा दूतच भासला...

खूप ट्रॅफिक असल्यामुळे मुलुंड ते लोअर परळ हा पावणे दोन तासांचा प्रवास झाला... त्या सफरीत गप्पा रंगल्या. अमनदीप सांगत होता, "तीन वर्षांपूर्वी माझं वजन ११९ किलो होतं. आज ७२ किलो आहे. आता लोकांना फिटनेस आणि हेल्दी लाईफबद्दल मार्गदर्शन करतो." गप्पांमुळे पाठीच्या दुखण्याचा विसर पडला होता...

त्याच्या बोलण्यात मोठेपणा नव्हता; माणुसकी होती. व्यवसाय, हॉटेल्स, जिम... सगळं असूनही स्वभाव मात्र अगदी अतिशय साधा... डाउन टू अर्थ...

घरी पोहोचलो. त्याने स्वतः माझी सायकल घरात आणून ठेवली. जाताना माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला...

"सरजी, दवाके लिए या सायकलके लिए कुछ भी खर्च आये... मुझे जरूर बताइये. मैं तैयार हूँ."

त्या एका वाक्याने मन भरून आलं.

आजच्या काळात माणसं पैशाने श्रीमंत असतात; पण मनाने श्रीमंत असणारी माणसं फार क्वचित भेटतात. मला ती एका... अपघातामुळे भेटली...

मारू हॉस्पिटलमध्ये तपासणी झाली. सुरुवातीला फारसं गंभीर वाटलं नाही... पण एक्सरेमध्ये L2 मणक्याला छोटासा Hairline Fracture आणि Spondylosis असल्याचं समोर आलं. औषधं सुरू झाली. आता MRI होणार आहे...

पहिल्या दिवशी तर अंथरुणावर वळणंसुद्धा मोठं आव्हान होतं...

आज चौथा दिवस आहे...

आणि शरीर मला सांगतंय... "घाबरू नकोस, आपण पुन्हा उभे राहतोय...

आधीपेक्षा जवळपास सत्तर टक्के बरं वाटत आहे...

 औषधांचा परिणाम आहेच.. पण त्याहून मोठं औषध म्हणजे मित्रांचे फोन, भेटी, कुटुंबीयांची काळजी आणि असंख्य शुभेच्छा...

डॉक्टर म्हणाले, 'थोडे दिवस आराम करा.' मी म्हटलं, 'ठीक आहे डॉक्टर, सायकलला सांगतो... थोडे दिवस माझी वाट पहा... लवकरच येतो तुझ्यावर स्वार व्हायला...

या अपघाताने मला एक गोष्ट पुन्हा शिकवली...

रस्त्यावर पडणं हा अपघात असतो... पण पडल्यावर पुन्हा उभं राहणं हीच खरी जिद्द असते...

सायकल पडली म्हणून स्वप्न पडत नाहीत...

मणक्याला किरकोळ दुखापत झाली म्हणून मनाचा कणा कधीच मोडत नाही...

उलट प्रत्येक अपघात मला आणखी मजबूत करून जातोयं...

कोणी विचारतं, "आता सायकलिंग थांबवणार ना?"

मी फक्त हसतो...

अहो, सायकलिंग हा माझा छंद तर आहेच पण त्या पेक्षा तो माझा श्वास आहे...

काही दिवस विश्रांती घेईन... डॉक्टरांचं ऐकेन... MRI करेन. उपचार पूर्ण करेन...

पण पुन्हा हेल्मेट डोक्यावर असेल... पाय पॅडलवर असतील... आणि नजरा पुढच्या रस्त्यावरच असतील...

कारण पुढचं लक्ष्य आधीच ठरलं आहे... आग्रा ते राजगड सायकलवारी...

छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यातून सुटकेच्या पराक्रमाची गाथा सायकलवरून भारतभर पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे...

 मला खात्री आहे... शिवछत्रपतींचे आशीर्वाद, मित्रांचे प्रेम आणि तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेत...

अरुणाचल प्रदेशात अपघात झाला तेव्हा  "एका अपघाताची गंमत" लिहिली होती...

आणि आता...

ही आहे...

"दुसऱ्या अपघाताची... दुसरी गंमत!"

गुरु पौर्णिमेच्या दिवशी ट्रकने धडक दिली खरी...

पण नियतीने त्याच वेळी माझ्या आयुष्यात अमनदीपसारखा एक चांगला मित्रही आणून उभा केला...

म्हणून आज त्या अपघाताकडे रागाने नाही, तर हसतच पाहतो...

कारण काही अपघात वेदना देतात...

आणि काही अपघात आयुष्यभर जपावी अशी माणसं देऊन जातात...

जखमा थोड्या आहेत... पण जिद्द अजूनही कणखर आहे...

सायकल काही दिवस थांबली आहे... पण प्रवास अजिबात थांबलेला नाही...

कारण... शंभर वर्षांपर्यंत सायकल चालवायची आहे...

जय शिवराय...

सतीश कुसुम विष्णू जाधव
सायकल वेडा...