Thursday, March 21, 2024
खोपोली सायकलिंग... दि २१ मार्च २०२४
Friday, February 16, 2024
नॉर्थ ईस्ट... आगरतळा सायकल सफर... तिसरा दिवस दि. १८.११.२३
नॉर्थ ईस्ट... आगरतळा सायकल सफर... तिसरा दिवस... दि. १८.११.२३८"q
केस
त्रिपुरा राज्य १९४९ साली स्वतंत्र भारतात विलीन झाले.... त्यामुळेच त्रिपुराची राजधानी आगरतळा मधील जगन्नाथ मंदिरातून सकाळीच शतपावलीq करायला बाहेर पडलो होतो...
जवळच असलेल्या उज्जयंता पॅलेस परिसरात फिरताना निवृत्त पोलीस कमिशनर अतुल देबबर्मा आणि निवृत्त शिक्षण संचालक के. जमातिया यांची भेट झाली...
अतुल भरभरून बोलत होता... त्रिपुराची माहिती मिळाली. उज्जयंता राजवाड्या समोर खुदीराम बोस यांचा पूर्णाकृती पुतळा आहे...
भारताच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या १८ व्या वर्षी युवा क्रांतिकारी खुदीराम बोस फासावर गेले होते...एव्हढ्या तरुण वयात फासावर जाणारे प्रथम स्वातंत्रवीर होते खुदीराम... अवकाशात पाहणारी त्यांची नजर स्वतंत्र भारताचं स्वप्न पाहत होती... अतुल देबबर्मा मुंबई आणि सातारा येथे राहिला होता. एकत्र चालत असताना छान गाणी गुणगुणत होता. त्याने उद्या पुन्हा भेटायचे आमंत्रण दिले आहे...
अतुलच्या ओळखीमुळे उज्जयंता राजवाड्याच्या प्रांगणात प्रवेश मिळाला... त्यामुळे सकाळच्या प्रकाशात राजवाड्याचे फोटो काढता आले..
सकाळीच देबाशिष मुझुमदार जगन्नाथ मंदिरात आठवणीने भेटायला आला... नॉर्थ ईस्ट सायकलने फिरणार याचे त्याला खूप अप्रूप वाटत होते... त्रिपुरा मधील महत्वाच्या आणि प्रेक्षणीय स्थळांची माहिती देबाशिषने दिली...
पावसाची उघडीप झाली होती... सखी सोबत आज आगरतळा सफर होती... पूर्वांचलच्या निसर्गरम्य भूमीवर सखीची सफर सुरू झाली... २०१६ पासून साथ देणारी सखी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून पूर्व किनाऱ्याला आली होती... तिच्यामुळेच जनमानसात एक वेगळी ओळख मिळाली होती... थोरामोठ्यांच्या गाठीभेटी झाल्या होत्या... अगणित मित्र परिवार जोडला गेला होता... जीवनातील सर्वात मोठी सायकल वारी तिच्या प्रेमाखातर करायची संधी मिळाली होती...
प्रथम रविंद्र भवनला भेट दिली... भव्य पांढरी शुभ्र इमारत आणि प्रवेशालाच रवींद्रनाथ टागोर यांचा सोनेरी पूर्णाकृती पुतळा होता...
अतिशय प्रशस्त सभागृह होते... रविंद्रनाथ टगोर यांचे त्रिपुराच्या महाराजांशी घनिष्ठ मैत्रीचे संबंध होते... रवींद्रनाथांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व तसेच कला, संस्कृती आणि रवींद्र संगीतामुळे प्रत्येक त्रिपुरी व्यक्तीला टागोराबद्दल प्रचंड आस्था आहे. त्याचीच परिणती हे रविंद्र भवन आहे.
तेथून प्रसिद्ध दुर्गावाडी मंदिरात गेलो...
दशभुजा दुर्गेचं हे वात्सल्यमय रूप होते... प्रत्येक हातात शस्त्र असलेली माता चेहऱ्यावरून प्रेमाचे शास्त्र सांगत होती... तिचे दर्शन घेऊन उज्जयांता राजवाड्याकडे आलो...भव्य दिव्य राजवाड्याचे प्रथम दर्शन... त्याच्या समोरील बागीच्यातील पाण्यात पाहण्यातच खरी मजा आहे... पांढरा शुभ्र डोळे दिपवून टाकणारा राजवाडा... त्रिपुराचे वैभव आहे...
त्रिपुरा सचिवालयात गेलो होतो मुख्यमंत्री डॉ.माणिक सहा यांना भेटायचे होते... प्रथम सचिवालयात प्रवेश मिळणे कठीण होते... गेट वरील पोलीस अधिकाऱ्याला त्रिपुरामध्ये येण्याचे प्रयोजन आणि संपूर्ण नॉर्थ ईस्ट सायकल वरून फिरून प्रदूषण मुक्त भारत संकल्पनेचा प्रचार प्रसार करण्याचा उद्देश विषद केला. त्या अधिकाऱ्याने चीफ सेक्रेटरी यांची परवानगी घेतली... आणि आम्हाला गेट पास दिला...
मुख्यमंत्री अहमदाबाद मध्ये उद्याची वर्ल्ड कप फायनल पाहायला गेले होते. त्यामुळे कॅबिनेट मिनिस्टर श्री टिंकू रॉय यांची भेट झाली...
त्यांनी साफा घालून आमचा सन्मान केला... ही बातमी अर्थमंत्री श्री प्रनजित सिन्हा रॉय यांना समजली... त्यांच्याकडे सध्या मुख्यमंत्री पदाचा चार्ज आहे. आम्हाला बोलावून श्री सिन्हा रॉय यांनी पण सन्मान केला आणि त्रिपुरा मध्ये काहीही अडचण आली तर फोन करा असे प्रेमपूर्वक सांगितले...अशा प्रकारे आज त्रिपुरातील महत्वाच्या ठिकाणांसोबत मोठ्या व्यक्तींच्या पण भेटी झाल्या होत्या...निसर्गा समवेत माणसं सुद्धा खूप आवडतात... त्याचीच परिणती आजच्या गाठीभेटी होत्या...
Friday, January 19, 2024
मेघालय मधील व्हिसलिंग गांव काँगथॉंग
मेघालय मधील व्हिसलिंग गांव काँगथॉंग
मेघालयची राजधानी शिलॉंगपासून साठ किमी आणि सोहरा पासून पन्नास किमी अंतरावर वसलेल्या काँगथॉंग या गावाला सखिसह भेट देण्याचा योग आला...
सोहरा (चेरापुंजी) येथून पहाटे साडेपाच वाजता भर थंडीत आणि धुकाळ वातावरणात सायकलिंग सुरू झाली... पहिले पंचवीस किमी चढाचा रस्ता पार करायचा होता... वळणदार आणि बाकदार रस्त्यावर थंडी सोबत हेड विंड सुध्दा शरीराचा आणि मनाचा कस लावत होता... संपूर्ण चढ संपल्यावर मावजरॉंग गाव लागले... आणि सुरू झाला ऑफ रोडींग चढ आणि उतार...
रत्याची कामे चालली असल्यामुळे जवळपास २५ किमीचा ऑफ रोडींग डाऊन हील रस्त्यावर सायकलिंग करताना बोट चालविल्याचे फिलिंग येत होते... अशा वेळी कंबर, पाठ, मणका शाबूत राहण्यासाठी सीट वर न बसता कंबर थोडी वर उचलणे आवश्यक असते... परंतु त्याच वेळी पेडलवरचे पाय जमिनीला समांतर असावे लागतात... अशा ऑफ रोडींग मध्ये वळणावर अतिशय सावध राहावे लागते... डाऊन हील ऑफ रोडींग करायला MTB सायकल आणि हायड्रॉलिक डिस्क ब्रेक शिवाय पर्याय नाही... या ठिकाणी सायकलिंग मधलं सर्व कसब कामाला आले... समर्पयामि मधून घेतलेल्या ट्रेनिंगमुळे या डाऊनहीलचा पुरेपूर आनंद घेतला... आणि आनंदाच्या लाटेवर स्वार होऊन काँगथॉंग गावात पोहोचलो...
भले मोठे भव्य प्रवेशद्वार... त्यावर गावाचे नाव आणि त्याची ओळख लिहिलेली होती... "Kongthong the Vhistling Village"
सातशे लोकसंख्या आणि दिडशे घरांचे हे छोटेसे गाव भारतातील सर्वात मनोरंजक ठिकाणांपैकी एक आहे... नितांत सुंदर निसर्ग सौंदर्यने नटलेले मेघालयातील एक उत्कृष्ट पर्यावरण असलेले पर्यटन स्थळ आहे.
परंतु या गावाची आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे येथील आगळीवेगळी प्राचीन परंपरा. गावातील प्रत्येक रहिवाशाला सांगितीक नाव आहे... तसेच ही विलोभनीय परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे.
मेघालयातील शिट्टी वाजवणारे गाव म्हणून केंद्र शासनाने त्याला "टुरिझम विलेज" चा दर्जा दिला आहे...
प्रवेशद्वारा जवळच मुंबईच्या रवी सबरवालची भेट झाली... मुंबईची माणसं जेव्हा भेटतात तेव्हा घरातील माणूस भेटल्याचा आनंद होतो...
गेटजवळ गावातील गाईड "बाकेन" याने स्वागत केले... गावाची तसेच येथील पूर्वापार चालत आलेल्या परंपरेची ओळख करून दिली... त्याचे विसलींग शॉर्ट नाव आहे "कु कू उई"... आणि मोठे नाव आहे "कुकू कुकू कुऊsss कुकू कुकुकुकू..." आहे ना गंमत...
खासी भाषा बोलणारे गाव त्यांच्या खासी जेवणासाठी आणि घरांसाठी प्रसिद्ध आहे...येथेच टेन्टवाली गाडी घेऊन आलेले दिल्लीचे रम्या आणि शिवम गोयल कुटुंबाची भेट आणि परिचय झाला... गावात गावकऱ्यांनी सहकारी तत्त्वावर खासी परंपरा जपलेली घरे "ट्रॅव्हलर्स नेस्ट" कॉटेजची निर्मिती केली आहे...
स्लीपिंग बॅग बरोबर असल्यामुळे रात्रीची थंडी जाणवली नाही... सकाळचा ब्रेड आम्लेट आणि चहाचा नाष्टा कॉंम्प्लिमेंटरी होता... या कॉटेजेसच्या केअरटेकरचे नाव होते फिडींगस्टार... हे नाव सुद्धा सांगीतिक आहे...
बोलक्या आणि प्रेमळ गोयल कुटुंबासोबत गावात फेरफटका मारला...
खासी पद्धतीच्या जेवणाचा सुद्धा आस्वाद घेता आला... अतिशय तिखट मिरची आणि मसालेदार मोमो खायला मिळाले...
टुरिस्ट कॉटेजचा केअरटेकर "फिडींगस्टार" गावातील एका वयस्क महिलेच्या घरी घेऊन गेला... तिने "खुबलय" म्हणजे नमस्ते म्हटले...
फिडींगस्टारने गावाची खासियत सविस्तर सांगितली...
मेघालय मधील एक आकर्षक आणि मनोरंजक असे हे गाव ... ते त्याच्या आगळ्या वेगळ्या अतिशय पुरातन परंपरेमुळे नावारूपाला आले आहे... या गावातील प्रत्येकाला स्वतःचे एक संगीत नाव आहे...
कोंगथॉन्ग गावात जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा आई मुलासाठी एक आगळीवेगळी सूरमयी शिट्टीची धून तयार करते. ते सुंदर सुरच त्या मुलाचे नाव बनते... लहानपणापासून आई बाळाला या सूरमयी शिट्टीने हाक मारते...साद घालून पुकारते...
ह्या विसलिंग नावाचं संगीत कँपोझिशन बाळाची आई करते... गावातील प्रत्येक व्यक्तीला असे युनिक व्हिसलिंग नाव आहे...
येथील प्रत्येक गावकरी एकमेकांना या अनोख्या सुरांच्या शिट्टीने हाक मारतो... तसेच प्रत्येकाचे नाव एकमेकांना माहीत असते... ते सहजपणे उच्चारतात...
या सुंदर परंपरेला "जिंग्रवाई लॉबेई" म्हणतात... याचा अर्थ आहे... कुळातील पहिल्या स्त्रीचे गाणे...
केवळ माताच आपल्या मुलाला असे अद्वितीय नाव देऊ शकते. मातेचे प्रेम आणि ममत्व या नावासोबत जन्माला येते...
पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा केवळ नाव घेण्यासाठी आहे असे नाही... तर जंगलातील प्राणिमात्र, पक्षी, पर्यावरण यांना त्रास न होता... माणसांना लांब अंतरावर एकमेकांशी संवाद साधण्यास याने मदत होते... व्हीसलने ज्याचे नाव घेतले जाते... तोच त्याला प्रतिसाद देतो...
जंगलात अन्न, कंदमुळं, औषधी झाडपाला आणि जीवनावश्यक वस्तू गोळा करण्यात त्यांचा बहुतांश वेळ जातो... अशा वेळी शिट्टीने एकमेकांना साद घालणे सोपे होते... या अद्वितीय मार्गाने समोरची व्यक्ती काय म्हणत आहे हे सुद्धा समजून येते...
या गावातील प्रत्येक व्यक्तीच्या सूरमयी शिट्टीच्या नावाचे दोन प्रकार असतात... एक मोठे नाव आणि एक लहान... दोन्ही नावे जन्माच्या वेळी दिलेली असतात... लहान नाव सामान्यतः घरी वापरले जाते... तर मोठे नाव जंगलात वापरले जाते... मोठ्या नावाचे स्वर सुद्धा वरच्या पट्टीत असतात...
कोंबडा या गावाचा ग्रामीण पक्षी आहे... कोबड्याच्या बांगे सारखीच ही नावे असतात... त्यामुळे यांच्या नावात 'क' ची बाराखडी सापडते...
सूरमयी सांगीतिक नाव ही या गावातील खासी जमातीच्या आदिवासींची प्राचीन परंपरा आहे आणि ती त्यांनी अजूनही जपली आहे... भारत सरकारने या परंपरेची नोंद घेऊन... या गावाला टुरिझम व्हिलेज म्हणून मान्यता दिली आहे... त्यामुळेच येथील घरे आता होम स्टे मध्ये बदलत आहेत... रस्ते सुधारण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे...
मेघालय मधील एक प्रेक्षणीय गाव म्हणून काँगथॉंग उदयाला आले आहे... विशेष म्हणजे येथे खासी जेवणाचा स्वाद घेता येतो... पर्यटन गावाचा दर्जा मिळाल्यामुळे या गावात प्रवेश करताना ५० रुपये पर्यटन कर भरावा लागतो...
रात्र झाल्यावर चांगलीच थंडी जाणवू लागली होती... रात्री आठ वाजताच जेवणाची शिट्टी वाजली... उघड्या माळरानात टेबलावर जेवणे शक्य नव्हते म्हणून शेजारच्या किचन कॉटेज मध्ये आम्ही तिघे जेवायला बसलो... हुडहुडत गरमागरम सूप प्यायलो आणि जरा बरे वाटले... भाजी, कालवण आणि भातावर ताव मारला... दोन खासी चटण्या आणि पापड फस्त केले... त्यानंतर बराच वेळ शेकोटी जवळ बसून गप्पांचा फड रंगविला... दोघेही वकील आणि ट्रेकर असलेले गोयल कुटुंब... सायकलिंगच्या गमतीजमती मध्ये मस्त रमून गेले होते...
आकाशात सजलेले तारांगण... पानांची सळसळ... रातकिड्यांचा किर्र किर्र आवाज... आणि थंड वाऱ्याचा येणारा झोत... या सर्व निसर्ग संगीतासह टेन्टमध्ये सूरमयी गावाचे गुण गुणगुणत कधी निद्राधीन झालो ते कळलेच नाही...
पहाटे चार वाजता जाग आली... ती कोंबड्याच्या "कुकूsss च कू" आवाजानेच...
मित्रांनो... खाली व्हिडिओ लिंक दिली आहे... संगीतमय नावे ऐकण्यासाठी...मंगल हो...!!!
Tuesday, January 2, 2024
सखिची शिकवण... तीन सुखिया ते तेजू दरम्यान...
सखिची शिकवण... तीन सुखिया ते तेजू दरम्यान...
कालच गाडीने आजारी सखीला तीनसूकियाला आणले होते...
सखीचा एक पाय आणि पायाची हाडे पूर्ण निकामी झाली होती... मेजर ऑपरेशन होते... मॅकेनिक डॉ. राजू संपूर्ण दिवस ऑपरेशन करत होता आणि सायंकाळी सखीची सर्जरी पूर्ण झाली होती...
रीकव्हारी वॉर्ड मध्ये आणल्यावर... थोडा वेळ तिच्या हाताला धरून फिरवून आणले... अजूनही मागच्या पायातून खुडखुड आवाज येत होता... डॉ. राजुने पुन्हा एक मायनर सर्जरी केली... आता सखी तयार झाली होती... कीबीतूला सफर करत जायला...
पण त्या आधी प्लेन रस्त्यावर तिला टेस्ट राईड द्यावी लागणार होती... मग ठरले तीनसुकिया ते तेझू ही १३४ किमीची सफर सखीने बारा तासात पूर्ण करायची... तरच ती किबीतू साठी क्वलिफाय होणार होती...
सकाळी सहा वाजता विवेकानंद केंद्र तीनसुखिया येथून सखीची टेस्ट राईड सुरू झाली... सकाळीच विवेकानंद केंद्र शाळेचा काही स्टाफ हजर होता...
सखिबरोबर फोटो काढायला... तो गेटवरचा शिपाई सुद्धा फोटो काढायला पुढे होता... केवढा सन्मान सखीचा...
पहिला पडाव तीस किमीवरचे डुमडूमा गाव होते... त्याच्या पाच किमी अलीकडेच डुमडूमाचे सायकलिस्ट राजेंद्र आणि अनिल कुमार यांची भेट झाली...
थोड्याच वेळात डुमडूमा गाठले... पावणे दोन तासात हा पडाव आरामात पार झाला होता ... तेथे राजेंद्रने नाष्टा खाऊ घातला...नंतर अनिलने फुलाबारी पर्यंत... तर राजेंद्रने काकोपठार पर्यंत सायकल साथ दिली... पुन्हा राजेंद्रने काकोपठार येथे नाश्त्याची ट्रीट दिली... सोबत खूप फोटो काढले...
पुढे काकोपठारच्या अभिरुची क्लबने आसामी गमचा देऊन सन्मान केला... खर तर हा सखीचा सन्मान होता...
कारण आज ती पुन्हा जोमाने तयार झाली होती किबीतू साठी...अरुणाचल चेक पोष्टवर पोलिसांनी आगळा वेगळा सन्मान केला... केळ्याचा घड आणि किलोभर संत्री... आणि पाण्याच्या तीन बाटल्या दिल्या...
पुढे नामसाई येथील विवेकानंद शाळेत सखीचे स्वागत झाले... तिला पाहायला शाळेतील सर्व मुले गोळा झाली होती...
अलुबारी पुलावर येऊन निसर्गात रमली सखी... लोहित ब्रह्मपुत्र नदीवर असलेल्या या पुलावर थोडा वेळ विसावली...
अंधार पडायच्या आत पोहोचायचे होते तेजूला... सखीला सांगितले मला थोडी विश्रांती देशील काय... सखी गालात हसली... चौखम येथे मला केक आणि चहा पाजला...
आता शेवटचे ३४ किमी पार करायचे होते... अडीच वाजले होते... आणि अंधार व्हायच्या आधी तेजू गाठायचे होते... सखीचा वेग वाढला... एका दमात वीस किमी पार केले... शेवटच्या १४ किमी पॅच मध्ये जंगल लागले... चार वाजले होते... निबीड जंगलामुळे रस्ता अंधुकला झाला होता... थंडी वाढू लागली होती... मागची लाल ब्लिंकर लाईट चालू केली... अंगाशी थंड वारे झोंबी करत होते... हिरवे विंड चीटर घट्ट बंद केले... पुढची पांढरी लाईट चालू केली... सखीचा वेग मंदावला होता... जंगल पार झाले... भूक लागल्यामुळे जवळच्या टपरीवर चहा आणि बिस्किटांवर ताव मारला...
शेवटचे पाच किमी राहिले होते... चहापान करून साडेपाच वाजता शेवटच्या पाच किमीची राईड सुरू केली... या पॅच मध्ये सतत स्पीड ब्रेकर होते... त्यावर मागचे कॅरियर डुगडूगू लागले आहे याची जाणीव झाली... त्यामुळे हॅण्डल सुद्धा डुचमळू लागले... सखीचे काही स्क्रू ढिले झाले आहेत काय याची तपासणी करणे तसेच तुटलेले कॅरियर रिपेअर करणे आवश्यक होते...
तेजुमध्ये प्रवेश केला... पाठीवरच्या छोट्या बॅगेचा चेन रनर खराब झाला होता... तो सुद्धा बदलून घेतला...
घड्याळ टॉवर चौकात किबितूच्या राईडसाठी खाऊ घ्यायला थांबलो... तेथे रायडर आयुष साहूची भेट झाली...
सहा वाजता रमत गमत सखी विवेकानंद केंद्र शाळेत पोहोचली... आणि म्हणाली "मला उद्या विश्रांती हवी आहे... माझे सर्व ढिले झालेले स्क्रू आणि कॅरीयर उद्या दुरुस्त करून परवा सकाळी किबीतू राईड सुरू करूया"...
तिच्या आदेशाला मान देण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता...
"आज सखिने १३४ किमी पूर्ण केले होते आणि आजच्या टेस्ट ड्राइव्ह मध्ये शंभर पैकी शंभर गुणांनी पास झाली होती... सलाम तिच्या जिद्दीला"...
सखी कडून सतत काहीतरी शिकतो आहे... हेच आजच्या राईडचे फलित होते...
मंगल हो... !!!