Showing posts with label नॉर्थ ईस्ट सायकल वारी. Show all posts
Showing posts with label नॉर्थ ईस्ट सायकल वारी. Show all posts

Friday, February 16, 2024

नॉर्थ ईस्ट... आगरतळा सायकल सफर... तिसरा दिवस दि. १८.११.२३


नॉर्थ ईस्ट... आगरतळा सायकल सफर... तिसरा दिवस... दि. १८.११.२३८"q

केस

त्रिपुरा राज्य १९४९ साली स्वतंत्र भारतात विलीन झाले.... त्यामुळेच त्रिपुराची राजधानी आगरतळा मधील जगन्नाथ मंदिरातून  सकाळीच शतपावलीq करायला बाहेर पडलो होतो...

जवळच असलेल्या उज्जयंता पॅलेस परिसरात फिरताना निवृत्त पोलीस कमिशनर  अतुल देबबर्मा  आणि निवृत्त शिक्षण संचालक के. जमातिया यांची भेट झाली... 

अतुल भरभरून बोलत होता... त्रिपुराची माहिती मिळाली.  उज्जयंता राजवाड्या समोर खुदीराम बोस यांचा पूर्णाकृती पुतळा आहे...

भारताच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या १८ व्या वर्षी युवा क्रांतिकारी खुदीराम बोस फासावर गेले होते...एव्हढ्या तरुण वयात फासावर जाणारे प्रथम स्वातंत्रवीर  होते खुदीराम... अवकाशात पाहणारी त्यांची नजर स्वतंत्र भारताचं स्वप्न पाहत होती...

  अतुल देबबर्मा मुंबई आणि सातारा येथे राहिला होता. एकत्र चालत असताना  छान गाणी गुणगुणत होता. त्याने उद्या पुन्हा भेटायचे आमंत्रण दिले आहे...

अतुलच्या ओळखीमुळे उज्जयंता राजवाड्याच्या प्रांगणात प्रवेश मिळाला... त्यामुळे सकाळच्या प्रकाशात राजवाड्याचे फोटो काढता आले..

सकाळीच  देबाशिष मुझुमदार  जगन्नाथ मंदिरात आठवणीने भेटायला आला... नॉर्थ ईस्ट सायकलने फिरणार याचे त्याला खूप अप्रूप वाटत होते... त्रिपुरा मधील महत्वाच्या आणि प्रेक्षणीय स्थळांची माहिती देबाशिषने दिली... 

पावसाची उघडीप झाली होती... सखी सोबत आज आगरतळा सफर होती...  पूर्वांचलच्या निसर्गरम्य भूमीवर सखीची सफर सुरू झाली... २०१६ पासून साथ देणारी सखी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून पूर्व किनाऱ्याला आली होती... तिच्यामुळेच जनमानसात एक वेगळी ओळख मिळाली होती... थोरामोठ्यांच्या गाठीभेटी झाल्या होत्या... अगणित मित्र परिवार जोडला गेला होता... जीवनातील सर्वात मोठी सायकल वारी तिच्या प्रेमाखातर  करायची संधी मिळाली होती... 

प्रथम रविंद्र भवनला भेट दिली... भव्य पांढरी शुभ्र इमारत आणि  प्रवेशालाच रवींद्रनाथ टागोर यांचा सोनेरी पूर्णाकृती पुतळा होता...

अतिशय प्रशस्त सभागृह होते... रविंद्रनाथ टगोर यांचे त्रिपुराच्या महाराजांशी घनिष्ठ मैत्रीचे संबंध होते... रवींद्रनाथांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व तसेच कला, संस्कृती आणि रवींद्र संगीतामुळे प्रत्येक त्रिपुरी व्यक्तीला  टागोराबद्दल प्रचंड आस्था आहे. त्याचीच परिणती हे रविंद्र भवन आहे. 

तेथून प्रसिद्ध दुर्गावाडी मंदिरात गेलो...

दशभुजा दुर्गेचं हे वात्सल्यमय रूप होते... प्रत्येक हातात शस्त्र असलेली माता चेहऱ्यावरून प्रेमाचे शास्त्र सांगत होती... तिचे दर्शन घेऊन उज्जयांता राजवाड्याकडे आलो...

भव्य दिव्य राजवाड्याचे प्रथम दर्शन... त्याच्या समोरील बागीच्यातील पाण्यात पाहण्यातच खरी मजा आहे... पांढरा शुभ्र डोळे दिपवून टाकणारा राजवाडा... त्रिपुराचे वैभव आहे...

त्रिपुरा सचिवालयात गेलो होतो मुख्यमंत्री डॉ.माणिक सहा यांना भेटायचे होते... प्रथम सचिवालयात प्रवेश मिळणे कठीण होते... गेट वरील पोलीस अधिकाऱ्याला त्रिपुरामध्ये येण्याचे प्रयोजन आणि संपूर्ण नॉर्थ ईस्ट सायकल वरून फिरून प्रदूषण मुक्त भारत संकल्पनेचा प्रचार प्रसार करण्याचा उद्देश विषद केला. त्या अधिकाऱ्याने चीफ सेक्रेटरी यांची परवानगी घेतली... आणि आम्हाला गेट पास दिला...

 मुख्यमंत्री अहमदाबाद मध्ये उद्याची वर्ल्ड कप फायनल पाहायला गेले होते. त्यामुळे कॅबिनेट मिनिस्टर श्री टिंकू रॉय यांची भेट झाली...

त्यांनी साफा घालून आमचा सन्मान केला... ही बातमी अर्थमंत्री श्री प्रनजित सिन्हा रॉय यांना समजली... त्यांच्याकडे सध्या मुख्यमंत्री पदाचा चार्ज आहे. आम्हाला बोलावून श्री सिन्हा रॉय यांनी पण सन्मान केला आणि  त्रिपुरा मध्ये काहीही अडचण आली तर  फोन करा असे प्रेमपूर्वक सांगितले...अशा प्रकारे आज त्रिपुरातील महत्वाच्या ठिकाणांसोबत मोठ्या व्यक्तींच्या पण भेटी झाल्या होत्या...

निसर्गा समवेत माणसं सुद्धा खूप आवडतात... त्याचीच परिणती आजच्या गाठीभेटी होत्या...