Sunday, August 11, 2024

न्योमा ते रोंगो सायकल वारी... दि. २२ जुलै २०२४

न्योमा ते रोंगो सायकल वारी...
दि. २२ जुलै २०२४ 

पहाटे चार वाजताच जाग आली... प्रातर्विधी आटपून तासभर ध्यानधारणा केली...

परेश सुद्धा लवकर उठला... काल ठरविल्याप्रमाणे पुढच्या सायकल सफरीत न लागणारे कपडे आणि इतर गोष्टी न्योमा येथेच ठेवायचे होते...  

दोघांच्या मिळून तीन छोट्या पिशव्या झाल्या होत्या... त्या एका प्लॅस्टिक पिशवीत भरून पांडेजीच्या  बेकरीत ठेवल्या... 

आज वातावरणात प्राणवायूची विरळता मोठ्या प्रमाणात होती... होमस्टेच्या शिडी वरून वर चढताना सुद्धा  जोरात श्वास घ्यावा लागत होता... पांडे आज तापामुळे आजारी झाला होता... त्याला तातडीने डॉक्टरकडे जाण्यास सांगितले... आम्हा दोघांचे खोली भाडे फक्त आठशे रुपये घेतले  पांडेजीने...  

बाजूच्या दिल्ली ढाबा मध्ये आलू पराठा आणि आम्लेट खाण्याच्या निमित्ताने वायफाय मिळाले... त्यामुळे तुम्हाला कालचे इतिवृत्त पोष्ट करता आले...

समोरच्या किराणा दुकानातून नारळपाणी बाटली घेतली होती... हानले पर्यंत वाटेत पाण्याची कमतरता पडू नये म्हणून...

आजचे टारगेट न्योमा ते हानले होते... सकाळी सव्वा नऊ वाजता सायकल वारी सुरू झाली... ती प्रथम पांडेजी बरोबर फोटो काढून..

वातावरणात विरळता आहे हे पहिल्या दोन किमी मध्येच लक्षात आले... सोबतीला समोरून हेडविंड सुद्धा होते... हळू हळू चढाचा रस्ता होता... त्यामुळे अतिशय धीम्या गतीने मार्गक्रमण सुरू होते... दहा दहा मिनिटांनी पाणी पीत होतो... सायकलवरचे सामान कमी केले आहे... याची जाणीवच होत नव्हती...


    सिंधू नदीच्या किनाऱ्याने सफर करताना नदीच्या जलात स्वतःला निरखून पाहणारा अल्लड मेघ  वाऱ्याच्या लहरीवर पुढे पुढे सरकत मला साथ देत होता... त्याची साथ मनाला गाढ तंद्रीत घेऊन गेली... आणि अलगद " मैं जिंदगी का साथ निभाता चला गया" हे गाणे ओठावर तरळले...

निसर्गावर स्वार झालेली सर्ली आनंदाच्या भरात पुढे पळत होती... पण भानावर येऊन... पुन्हा मागे येऊन परेशला बॅकअप देत होतो...  परेशने व्यवस्थितरित्या उमलिंगला पादाक्रांत करणे... हेच माझे ध्येय होते... 

पहिल्या तासाभरात आठ किमी सायकलिंग झाली होती... त्यात ऊन सुद्धा वाढले होते... 

वाटेत सर्वात उंचावराचा पेट्रोल पंप आणि सर्वात उंचावराचे हॉस्पिटल लागले... हॉस्पिटलचे नाव होते हाय्येस्ट हिलरस्...

दहा मिनिटात रॉकेट रेजिमेंटच्या कॅन्टीनमध्ये पोहोचलो...  त्याचे नाव होते... तंबिज कॅफे... सायंकाळी केरळी पद्धतीचे मासे जेवण येथे मिळते...  आर्मी जवान सर्वसामान्य जनतेला जेवूखाऊ घालण्याचे काम अतिशय प्रेमाने करत होते... वायफाय मागितले की सहज उपलब्ध करून देत होते... 

आजच्या राईडची गंमत अशी होती की तासाभरात पोटातले सर्व संपले होते... आणि भुकेची जाणिव झाली होती... तंबीज कॅफेमध्ये ब्रेड अमालेट आणि मॅगी मिळाली. एक चहा दोघात प्यायलो... वायफाय मिळाल्यामुळे काही फोटो आणि मेसेज शेअर केले...

   कॅफेच्या बाहेर आलो आणि धुळीची वावटळ उठली... सर्ली होलपटली... मी स्वतःला सावरू सुद्धा शकलो नाही... नाकातोंडात वाळूचे कण शिरले... गोल गोल फिरणारे... ते वादळ बाजूला सरकले नसते तर... मला सुद्धा गोल फिरवले असते...
स्वतःला सावरुन भर उन्हात पुढची राईड सुरू झाली... वाटेतील सिंधूच्या लोकेशनवर परेशची फोटोग्राफी सुरू होती... दमवणारे चढ सुरु झाले की परेशच्या मागे राहत होतो... त्यामुळे त्याचा रिदम अबाधित राहत होता... 


लोमा पर्यंतचे पुढील दहा किमी अंतर पार करायला सुद्धा दिड तास लागला... परिस्थिती तीच... पुन्हा भूक लागली होती... नेमकी आर्मीची दुसरी कॅन्टीन लागली... तेथील खानसमा जवान मराठी होता... त्याने चिकन मोमो खाऊ घातले... एका प्लेट मध्ये दहा मोमो आणि किंमत पन्नास रुपये... मोमो एव्हढे फर्मास होते की आणखी एक प्लेट मागवली... त्या नंतर आली गरमागरम जिलेबी... ती पण वीस रुपयात...

दुपारचे दोन वाजले होते... पुढे पाच किमी वर रोंगो गाव होते... त्यानंतर ४५ किमीवर हानले गाव होते... आजच्या एकंदरीत सायकलिंग वरून पाच वाजे पर्यंत हानलेला पोहोचणे शक्य नव्हते... 

रोंगो गावात पोहोचायला दुपारचे तीन वाजले होते... मुख्य गाव नदी पलीकडे होते... गावात जाऊन होमस्टे शोधण्या ऐवजी मुख्य रस्त्यावर होमस्टेचा शोध घेतला... दोन घरे बंद सापडली...  शेवटी नुकतच चालू झालेलं... कुंझंग होमस्टे सापडलं... जेवून खाऊन दर माणशी हजार रुपये... त्यात सेल्फ कंटेन रूम... होमस्टे आवडला... 

घर मालकिणीने चहा आणून दिला...  ऊन असे पर्यंत थंड पाण्याने आंघोळ करणे सुसह्य होतं... दोघेही तयार झालो... आणि वायफायच्या शोधात गावात फेरफटका मारला...


गावातील जुनी घरे पडून आता नव्या घरांचे बांधकाम जागोजागी पाहायला मिळाले... या गावातील वयस्क महिला लोकरीचे कार्पेट बनविण्याचे काम अतिशय तन्मयतेने करताना पाहिल्या... 


येथे कुठे वेफर्स, फरसाण मिळेल काय याची चौकशी करता... एका महिलेने किराणा दुकान दाखवले... हे दुकान घराच्या आतमध्ये होतं... शेंगदाणे, वेफर्स, बिस्कीट घेतले... लडाखी गुडगुड चहा विचारताच त्या दुकान मालकीणीने आम्हाला डायनिंग रूम मध्ये बसविले आणि मस्का चहा पाजला... चहाचे पैसे घ्यायला त्या महिलेने नकार दिला... अनाहुत लोकांना चहा पाजण्याची  निरपेक्ष वृत्ती पाहून... मनात विचार आला... आपल्या दारावर किराणा सामान, दूध, सिलेंडर, पोस्टमन, अथवा ऑन लाईन ऑर्डर घेऊन येणाऱ्या किती जणांना आपण पाणी तरी विचारतो... एका छोट्या गावातून मोठी शिकवण मिळाली होती...

जीवनावरचे उत्कट प्रेम हा तर सगळ्या आयुष्याचा मूलाधार आहे... त्या प्रेमातूनच सर्वांबाबतीत दया, करुणा, मुदिता मनात सतत तेवत राहते आणि त्यातूनच परोपकाराची भावना प्रवसते...

वृत्तीच्या या निरामय प्रसन्नतेचे, मनाच्या या स्थिर समधातपणाचे मोल वय वाढल्यावर  आणि जीवनाशी अधिक परिचय झाल्यावर कळाले... ते निव्वळ सायकलिंग मुळेच...


गावात नवीन झालेली मॉनेस्ट्री , मोठे सभागृह, तसेच नवीन घरे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे बदलाचे जोरदार वारे वाहत आहेत...

या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे... गावकऱ्यांचा मदत करण्याचा स्वभाव... आणि आस्थेने चौकशी करणे.... तसेच सतत कार्यरत राहणे... मानवी जीवनाचे विविध पैलू एका छोट्या गावात पाहायला मिळाले... शहरात फक्त मुखवटे दिसतात...

आजची राईड खऱ्या अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण होती...  ठरवले होते हानलेला पोहोचायचं... पण निसर्गापुढे काहीच चालत नाही.... चढाचा रस्ता, वादळवारे, प्राणवायूची कमतरता, हेड विंड या सगळ्या गोष्टी राईडवर परिणाम करतात... म्हणूनच अधिक दिवस हाती असणे महत्त्वाचे ठरते... आणि राईड फ्रिलांस असल्यामुळे लडाखी गावांचे जनजीवन अतिशय जवळून पाहता आले...

लडाख मध्ये किती किमी सायकल चालविली... यापेक्षा या वातावरणात तुम्ही स्वतःला किती टिकवून ठेवता... हे महत्त्वाचे ठरते... त्यामुळे स्वतःची मानसिक कणखरता पडतळता येते...

जय श्री राम...🚩🚩