Monday, May 12, 2025

दापोली सायक्लोथॉन... सीजन ७... एक सुखद आणि विलक्षण अनुभव... दि. ११ मे २०२५

दापोली सायक्लोथॉन... सीजन ७... एक सुखद आणि विलक्षण  अनुभव... 

दि. ११ मे २०२५

आनंद हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा पैलू आहे... परंतु सायकलिंगचा कल आजच्या काळात रेसिंगकडे वळलेला दिसतो...  रेस म्हटली की स्पर्धा आली त्यामुळे हेच आनंदी वातावरण दूषित होते... 

सायकलिंगचा  मूळ उद्देश आहे.. फिटनेससह निसर्गाचा आनंद  घेणे... आणि गवसलेला आनंद  भरभरून वाटणे... याच संकल्पेवर आधारित आजची दापोली सिनिक सायक्लोथॉन होती...

दापोली सायकल क्लबने महाराष्ट्रातील प्रथितयश टुरिंग सायकलिस्टना  आमंत्रित  केले होते...  ते याच कारणासाठी... दापोली परिसरातील निसर्गरम्य वातावरणाचा या सायकलिस्टनी  आस्वाद घ्यावा आणि त्यांच्या जीवनात सायकलिंग मुळे निर्माण झालेला आनंद  सर्वांना दिलखुलासपणे वाटावा... सर्व आमंत्रित रजिस्टर करून या निसर्गरम्य सायकल वारीत सामील झाले होते...

या राईड मध्ये पुण्याहून डॉ सुभाष कोकणे, निरुपमा भावे, जुगल राठी, राजू औटी, जयश्री जाधव, विजय हिंगे, रेखा राव आणि विद्याधर पालकर यांनी भाग घेतला होता... यातील सुभाष, राजू आणि विजय पुण्याहून सायकल चालवत दापोलीला पोहोचले होते... तर मुंबई ठाण्यातून  जयप्रकाश परब, विठ्ठल चव्हाण आणि महेंद्र निकम सहभागी झाले होते... महेंद्र सुद्धा ठाण्याहून सायकलिंग करत आला होता...

दापोली सायकल क्लबच्या मदतीसाठी नयन, नारायण आणि अक्षय हे मुंबईचे प्रतिथयश सायकलिस्ट एक दिवस आधीच दापोलीत आले होते...

दापोली सायकल क्लबचे सर्व सदस्य पाहुण्यांच्या सुखसोईची आस्थेनं काळजी घेत होते... स्वतः अंबरीश गुरव सर्व आघाड्यांवर पुढे होता...  परंतु प्रसिद्धी पासून लांब राहणारा अंबरीश पडद्यामागचा महान कलाकार होता...

सकाळी पाच वाजता निरुपमा आणि सुभाष यांनी या निसर्गरम्य वारीला झेंडा दाखवला... सुरुवातीला दापोली वरून हर्णे बंदराकडे उतरणारा रस्ता पहाटेच्या संधिप्रकाशात पार झाला आणि निसर्ग हॉटेल कडून वेडीवाकडी वळणे असणारा घाटाचा रस्ता सुरू झाला... घाट पार केल्यावर सिव्ह्यू पॉईंट लागला... तेथे निवांत फोटोग्राफी झाली... 

 त्या टेकडी वरून हर्णे गाव आणि विस्तीर्ण समुद्र किनारा डोळ्याचे पारणे फेडत होता... 

सकाळच्या सूर्य किरणांनी न्हाऊन निघालेला समुद्र सुवर्णमय होऊन चमचमत होता... पुढे पंचतारांकित हॉटेल जवळील अगस्त्य ऋषीच्या (देव-दानव  युद्धाच्या वेळी देवांशी वैर धरलेले कालकेय दानव हे समुद्राच्या तळाशी जाऊन लपल्यावर अगस्ती महर्षींनी अख्खा समुद्र ओंजळीत घेऊन पिऊन टाकला आणि कालकेयांना ठार मारले त्यामुळे देवांवरील संकट निवारले) भव्य पुतळ्यासमोर सुद्धा फोटोग्राफी झाली...


पुढचा भन्नाट उतार उतरताना कस लागत होता... दोन अतिशय शार्प टर्न वर मुंगीच्या गतीने सायकल उतरविणे भाग होते...  

पुढे आंजर्ले पुलावर पोहोचलो... हा तर अतिशय निसर्गरम्य फोटो पॉईंट होता...  अडखळ आणि आंजर्ले मधून वाहणाऱ्या आणि सागराला मिळणाऱ्या  जोग नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर विसावलेल्या बोटी... आणि त्या वर फडफडणारे रंगीबेरंगी झेंडे उत्साहाची साक्ष देत होते...

जोरदार वाऱ्यामुळे उसळणाऱ्या पांढऱ्या लाटांवर बोटी डोलत होत्या... जणुकाही निसर्ग संगीताला साथ देत होत्या... दाटीवाटीने उभ्या असलेल्या बोटी समुद्र सफरीसाठी खुणावत होत्या... येथे सुद्धा भरपूर फोटो काढले...

आंजर्ले खाडी पुलाकडून परतीची सफर सुरू झाली...  वाटेत प्रत्येक ठिकाणी हायड्रेशनची चोख सोय होती...

 समुद्रकिनारी असणाऱ्या पाजपांढरी गावातील सुप्रसिद्ध राम मंदिराचे दर्शन घेऊन थेट हर्णे बंदरात आलो... समोर दिसणारा सुवर्णदुर्ग किल्ला छत्रपतींच्या पदाचिन्हांची आठवण करून देत होता... हर्णे बंदराच्या टोकाला ७७ वर्षीय जुगल राठीने मोठ्या दगडावर चढून अशा काही पोज दिल्या की तो हवेतच विहार करतोय...  या वयात सुद्धा त्याच्याकडे असणारी सळसळती ऊर्जा मन मोहून गेली...

 त्या नंतर हर्णे बंदरातील मासे बाजाराला भेट दिली... पंचक्रोशीतील जनतेने तुडुंब गर्दी केली होती या समुद्र किनाऱ्यावरील बाजारात... माशांची विक्री लिलाव पद्धतीने सुरू होती...

बाजारातून बाहेर पडून परतीची सफर सुरू झाली... आता दापोलीचा सहा किमीचा घाट चढायचा होता... वरिष्ठ तरुण निरुपमा आणि जुगल तो घाट आरामात चढले... राईडचा शेवटचा टप्पा पार केल्याबद्दल जुगलने सर्वांना कॉफी बिस्किटची ट्रीट दिली... आज जुगल भयंकर खुश होता...

तर निरुपमा समवेत प्रत्येक सायकलिस्ट फोटो काढायला धडपडत होता... 

डॉ सुभाष,जयश्री, हेमा, राजू  आणि विजय आंजर्ले येथील कड्यावरच्या गणपतीचे दर्शन घ्यायला गेले होते... 

सायकल वारी शेवटच्या टप्प्यात आली पण पन्नास किमी पूर्ण झाले नव्हते म्हणून जुगल बरोबर दोन आंजर्ले सिटी लूप मारले... आणि पन्नास किमी अंतर पूर्ण झाले...

सर्वांना मेडल बरोबर सर्टीफिकेट मिळाली... तसेच साठ वर्षांवरील सर्व निमंत्रितांना सन्मानचिन्ह देण्यात आले... 

कांदापोहे आणि बटाटावडा पाव हा नाश्ता श्रम परिहारासाठी पुरेसा होता...

या सायकल वारीत ७ वर्षाच्या विद्यार्थ्यांपासून ७७ वर्षाच्या वरिष्ठ तरुणांपर्यंत जवळपास शंभर सायकलिस्टचा सहभाग होता... शॉर्ट सिटी लूप मारणाऱ्या... सात वर्षाच्या श्वेत तांबेने सर्वांचे लक्ष आकर्षित केले होते...

 सिनिक कोस्टल रूट  सर्वांनी एन्जॉय करणे... हा दापोली सायकल क्लबचा... सायकल सफर भरविण्यामागचा मुख्य उद्देश होता... सर्वांना कोकणाच्या निसर्गरम्य परिसराची माहिती करून देणे... आणि निसर्ग पर्यटनासोबत सायकलिंग वाढविणे  हा उद्देश पूर्णपणे सफल झाला होता... 

सायकलिंग करताना निसर्गाचा परिपूर्ण आनंद घेणे तसेच  चोखायचा आंबा, पांढरे जाम, लुसलुशीत घावणे, उकडीचे मोदक, कोकम सरबत यांचा आस्वाद घेण्याबरोबरच, निवांत फोटोग्राफी करणे हा लाभ सर्व सायकलिस्ट ना मिळाला...

दापोली सायकल क्लब तर्फे शॉर्ट सिटी लूप आणि फन राईड अशा  प्रकारात सुद्धा  सायकल सफर ठेवली होती...  जवळपास २५० लहानथोर सायकलिस्टनी यात भाग घेतला होता... पाच किमी साठी रजिस्टर केलेल्या कित्येक मुलांनी चाळीस किमी सायकलिंग पूर्ण केले होते... याचे त्यांच्या पालकांना खूप आश्चर्य वाटत होते... मुलांना रोख रक्कम बक्षीस मिळाल्यामुळे ते जाम खुश होते...

दापोली सायकल क्लबने भरविलेल्या तीनही प्रकाराच्या सायकल सफरीला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे  स्थानिकांमध्ये  सायकल प्रेम वाढविणे आणि मुलांची अफाट ऊर्जा पालकांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश सफल झाला होता... 

जय श्री राम

सतीश जाधव

7977690993





Sunday, April 27, 2025

मुंबई ते पुणे आणि गाणगापूर ते मुंबई रेल्वेने सायकलचा प्रवास...

मुंबई ते पुणे आणि गाणगापूर ते मुंबई रेल्वेने सायकलचा  प्रवास...

IAS च्या पुणे ते पंढरपूर या 250 किमी सायकल वारीसाठी पुण्याला रेल्वेने जायचे ठरले... लगेजमध्ये सायकल ठेवणे सोपे जावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पुणे स्टेशन असे रेल्वे बुकिंग केले होते...

सायकल लगेज मध्ये लोड करताना किमान दोन तास आधी स्टेशनवर पोहोचणे आवश्यक असते. तसेच आधारकार्डच्या दोन झेरॉक्स आणि सायकलच्या  सीटला तांदळाच्या गोणीने बांधणे आवश्यक असते... हेच काम स्टेशनवरच्या अटेंडंटला सांगितले तर तो किमान शंभर रुपये मागतो... सायकल फ्रेम सुद्धा थर्मो शिटने बांधली असेल तर सायकल फ्रेमला ओरखडे पडत नाहीत... लगेज फॉर्मवर नाव पत्ता  आधार कार्डाचा नंबर तिकिटांचा pnr नंबर तसेच मोबाईल नंबर लिहावा लागतो... तसेच जुनी वापरलेली सायकल असे सुद्धा लिहावे लागते...

पुण्याला जाणारे बारा सायकलिस्ट असल्यामुळे सर्व सायकलचे एकत्र बुकिंग करून एकाच गाडीत पाठविण्यासाठी बुकिंग क्लार्कने असमर्थता दर्शवली...

एकत्र बारा सायकल लगेज मध्ये जाणे शक्य नसल्यामुळे फक्त आठ सायकलचे लगेज बुकिंग केले तर उर्वरित सायकल  त्याच रेल्वेने बोगीतून नेण्याचे नक्की केले... ज्या बोगीत बुकिंग होते त्या बोगीच्या दोन डब्यांच्या शंटिंग मध्ये सायकल ठेवण्याचे आयोजन होते...

आठ सायकल स्टेशनवरील बोगी पर्यंत पोहोचविण्याचे काम प्रत्येक सायकलिस्टने केले तर आपल्या डोळ्यासमोर  सायकल व्यवस्थितरित्या बोगिमध्ये लोड करण्यात येतात... अन्यथा आपल्या अपरोक्ष लोडींग अनलोडींग करताना सायकलचे नुकसान होऊ शकते...

  बुकिंग क्लार्कला काही तरी मिळेल असे अपेक्षित होते... परंतु त्याच्या बोलण्याच्या पद्धती वरून अडवणूकीचे धोरण लक्षात येत होते... एका आधार कार्डवर आठ सायकलचे बुकिंग होते... तरीसुद्धा त्याला प्रत्येकाचे आधार कार्ड हवे होते... हा अनुभव नवा होता...

एक्स्प्रेस ट्रेन फलाटावर लागल्यावर प्रत्येकाने आपल्या सायकलसह लगेज बोगिकडे प्रस्थान केले... सायकल व्यवस्थित लगेज डब्यात लोड केल्या...  तो पर्यंत उर्वरित चार सायकल ज्या बोगीत आरक्षण होते त्या बोगीच्य शंटिंग मध्ये फक्त हॅण्डल सरळ करून लावण्यात आल्या... 

पुण्याला सर्व सायकल व्यवस्थित उतरवून घेतल्या... पुण्यात त्या गाडीचा दोन मिनिटांचा थांबा होता... परंतु सायकल आणि इतर लगेज उतरविण्यासाठी गाडी दहा मिनिटे पुणे स्टेशन मध्ये थांबली होती...

एखाद्या स्टेशन वर गाडी दोन मिनिटे थांबत असली तरी एकदा का रेल्वेचे लगेज बुकिंग झाले की सायकल त्या स्टेशनवर उतरवून घेण्याचे काम गार्डचे असते... मग त्यासाठी गाडीतील  सामान उतरवून घेई पर्यंत जास्त वेळ स्टेशनवर गाडी उभी राहते...

पंढरपूर वारी सुफळ संपूर्ण झाल्यावर आम्ही पाच जणांच्या गृपने पुढील दोन दिवसात अक्कलकोट आणि गाणगापूर वारी पूर्ण केली...

मुंबईला येताना गाणगापूर रेल्वे स्टेशनवर लगेज बोगी उघडत नसल्यामुळे लगेज बुकिंग करता आले नाही... त्यामुळे चार सायकल दोन डब्यांच्या शंटिंगमध्ये आणि एक रोडी सायकल दोन्ही चाके काढून सीट खाली ठेवण्यात आली... 

परंतु आमची स्लीपर S2 बोगी अनरिझर्व्ह डब्याला लागून होती...  रात्री अनरिझर्व्ह डब्याजवळील शंटिंग दरवाजे बंद करण्यात आले... त्यामुळे तेथे लावलेल्या दोन सायकल काढून... आम्ही बसलेल्या कंपार्टमेंटमध्ये चाके वर करून उभ्या स्थितीत लावाव्या लागल्या...... तसेच त्या हलू नयेत म्हणून बंजी कॉर्डने व्यवस्थित बांधल्या... आणि मुंबई गाठली... 

लांब पल्ल्याच्या गाडीतून सायकल कशी न्यावी हे जुगाड...  निव्वळ सोबत असलेला सायकलिस्ट मित्र शिवम खरात याच्या हरहुन्नरीपणामुळे सर्वांना शिकायला मिळाले...

टुरिंग सायकलिंगसाठी हा धडा फार उपयुक्त होता...

जय जय राम कृष्ण हरी...


Saturday, April 26, 2025

अलिबाग राईड आणि आदरतिथ्य ८.०२.२५

अलिबाग राईड आणि आदरातिथ्य... रवी, रिद्धी आणि राम जोशी... दि.. ०८.०२.२५

रिद्धीला अनाहुत पत्र...

तुझी आणि रवीची... माझे सर्व सायकलिस्ट मित्र तोडभरून तारीफ करत होते... 

रवी काल रात्री... राम जोशींना घेऊन कार्ले खिंडीत आला... आणि आमचा सन्मान केला... 

तसेच तुझ्यामुळे आमची राहण्याची अतिशय फर्मास व्यवस्था झाली...

मुंबई ते अलिबाग अशी जवळपास 142 किमी सायकलिंग केल्यामुळे आम्ही दमलेलो होतो... अशा वेळी तुम्ही दोघांनी केलेली सर्व सोय आणि बडदास्त आमच्यासाठी संजीवनी होती...

आणि भोजन सुद्धा अतिशय अप्रतिम होते... पनीर बिर्याणी आणि गुलाबजाम खाल्ल्यावर तृप्तीची निवांत झोप झाली... सकाळी ताजेतवाने होऊन आज  95 किमी राईड सुद्धा झाली... 

तू तर घरी पाहुणे आले असताना सुद्धा आवर्जून आम्हाला भेटायला आली होतीस... 

रवी तर सकाळी आमच्या सोबत रेवदंड्या पर्यंत राईड पण करायला आला होता...

एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ... या तुकाराम महाराजांच्या उक्ती प्रमाणे... जीवनातील छोटे छोटे आनंद आपण एकमेकांना देतो तेव्हा जीवन अतिशय सुकर होते... आणि एक सामाजिक काम केल्याचा आनंद मिळतो...

हा आदरभाव आणि प्रेम हेच जीवनाचे चिरंतन मूल्य आहे...

यालाच म्हणतात आदरातिथ्य... 

तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि अनंत आशीर्वाद... 

जय श्री राम... 


सतीश जाधव सायकलीस्ट 

 7977690693