Monday, September 28, 2020

श्री हरिहरेश्वर सायकल राईड दिवस १

श्री हरिहरेश्वर सायकलिंग दिवस १

२६ सप्टेंबर, २०२०

आज विजयला ऑफिस मधून लवकर सुट्टी मिळाली, त्यामुळे दुपारी बारा वाजता भाऊच्या धक्क्याकडे सायकल राईड सुरू झाली. साडेबारा वाजता धक्क्याला पोहोचलो आणि मांडव्याला जाणारी रो रो बोट डोळ्यासमोरून पसार झाली.

 विजय रेवस बोटीची तिकीट काढायला गेला. तर रेवस मार्ग बंद होता. मोरा लॉन्च सर्व्हिस सुरू होती. परंतु मोरा लॉन्च न पकडता, मांडावा लॉन्च पकडण्यासाठी भाऊच्या धक्क्यावरून गेट वे ऑफ इंडियाला गेलो. पण तेथील बोट सर्व्हिस सुद्धा बंद होती. म्हणून पुन्हा भाऊच्या धक्क्यावर सायकलिंग करत आलो. 
 
 अडीच वाजता मोरा साठी लॉन्च होती. तासाभरात मोरा जेट्टीवर पोहोचलो. तेथून दहा किमी ऑफ रोडिंग सायकलिंग करत कारंजा बंदरावर आलो. 

तेथून लॉन्चने रेवस बंदरावर आलो. साडेचार वाजले होते. अलिबाग ला राहणारा शाळकरी मित्र कुणालला फोन करून उशीर झाल्याची माहिती दिली. मान गावाच्या फाट्याजवळील कुणालचा औदुंबर बंगला रेवस वरून वीस किमी अंतरावर आहे. रेवस ते अलिबाग सुद्धा ऑफ रोडिंग सायकलिंग होती. 

आता जोरदार राईड सुरू केली आणि तासाभरातच कुणालच्या बंगल्यावर पोहोचलो. गेट जवळच गार्गीची  भेट झाली. कुणाल स्वागताला पुढे आला. तेवढ्यात मुलगा शुभम सुद्धा हसत हसत भेटायला आला. बंगल्यातून संध्या आली. विजय आणि माझे थाटात स्वागत झाले.

संध्याच्या हातच्या खुसखुशीत इडल्याचा नास्ता आला. फक्कड कॉफी आणि शुभमने बनविलेला झकास ब्राऊनी केक सुद्धा आला.  सर्वांबरोबर गप्पा मारत मारत सर्व नास्ता फस्त केला. 

कुणाल आम्हा दोघांना कार मधून थळच्या टेकडी वरील दत्त मंदिरात  घेऊन गेला. अतिशय निसर्गरम्य वातावरणात  संध्याकाळ अवतीर्ण झाली होती. थळ RCF चा संपूर्ण परिसर आणि मोठेमोठे प्लांट लाईटमध्ये चकाकत होते.  तेथील शांतता आणि निवांतपणामुळे सायकलिंगचा शिण कुठल्या कुठे पळाला. 

कुणाल...,  रेडिओ ऑफिसर म्हणून मर्चंट नेव्हीच्या नोकरी निमित्ताने संपूर्ण जग फिरला असल्यामुळे त्याच्याकडे माहितीचा खजिना आहे. तो कोणत्याही विषयावर सहज बोलू शकतो.  सकारात्मक विचार करणारा कुणाल सतत काहींना काही काम करीत असतो. तोच वसा मुलगा, शुभमने घेतला आहे. 

शुभम गाड्या पार्किंगसाठी नजाकतदार गॅरेज बनवितो आहे. विविध विषयात त्याची मास्टरी आहे. मुलगी गार्गी सुद्धा पी एच डी करून संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे.

रात्री संध्या आणि गार्गीने बनविलेल्या शाकाहारी जेवणाची लज्जत काही औरच होती. पोळ्या, चवळीची भाजी, वरण, भात, घरगुती लोणचे आणि लवंग, वेलची घालून बनविलेला आमरस, सर्व एकदम फार्मास !!!

असे हे चाकोनी कुटुंब गेली सात महिने मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापासून अलिप्त होऊन, अलिबागला राहतंय. कुणालच्या औदुंबर या बंगल्याच्या परिसरात आंबा, फणस, चिकू, नारळ पोफळीची झाडे आहेत. तसेच परसदारात असलेले सोनटक्का फुलांचे झाड मंद आणि आल्हाददायक सुवास पसरवीत होते. रात्री व्हऱ्यांड्यात गप्पा मारायला बसल्यावर पारिजातकाच्या सुवासाने मनाला वेगळी ऊर्जा मिळाली. 

कुणालच्या गावचे नाव सुद्धा वैशिट्यपूर्ण आहे "मान तर्फे झिराट". उद्या पहाटे पाच वाजता सायकल सफर सुरू करायची असल्यामुळे, फार कमी कालावधी मिळाला या कुटुंबासोबत गप्पा मागण्यासाठी.

या कुटुंबाबाबत  एक मात्र जाणलं... "आजचा दिवस माझ्या उर्वरित जीवनातील पहिला दिवस आहे" अशा उस्फुर्त आणि आश्वासक पद्धतीने हे कुटुंब जीवन जगत आहे.

आजची ३५ किमी सायकलिंग ऑफ रोडिंग, दोन दोन लॉन्च सफरीने नटलेली, विविधरंगी होती. तसेच माझा शाळकरी मित्र कुणाल आणि त्याच्या कुटूंबाची  नव्याने झालेली ओळख  मनात एक सुखद कप्पा निर्माण करून गेली. ही ओळख माझ्या मर्म बंधातली ठेव झाली आहे.

आणखी एक गोष्टींची प्रचिती आली... आपलं ध्येय निश्चित झाले असेल तर,  कितीही अडचणी आल्या तरी ध्येय पूर्तीसाठी मनापासून सतत प्रयत्नशील राहिले की निसर्ग सुद्धा तुम्हाला साथ देतो. 

सतीश जाधव
आझाद पंछी .....

Wednesday, September 23, 2020

रामपूर गुहागर सायकल राईड

रामपूर गुहागर सायकल राईड

२ सप्टेंबर, २०२०

सकाळी सव्वा सहा वाजता राईड सुरू झाली. खेर्डी मधून  चिपळूण शहरात प्रवेश केला. मुख्य बाजारपेठ एकदम शांत भासली. दूध विक्रीची दुकाने उघडी होती. हे शहर वाशिष्ठी नदीच्या किनारी वसलेले आहे. चिपळूण वरून गुहागर ४३ किमी आहे तर हेदवी गणेश मंदिर ५२ किमी आहे. 

नगर परिषदेची हद्द संपली आणि मिरजोळी गावातून सफर सुरू झाली. गावाच्या प्रवेशालाच तंटामुक्त ग्रामपंचायत हा फलक लावलेला होता. जुन्या काळातील एक चित्रपट आठवला.  'एक गाव बारा भानगडी' चे तंटामुक्ती मध्ये रूपांतर झालेले पाहून खूप आनंद झाला. गुहागरकडे जाणारा रस्ता राज्य महामार्ग आहे. त्यामुळे रस्त्याच्या मध्ये, तसेच दोन्ही किनाऱ्याला पांढरे पट्टे होते. हे पट्टे वाहतूक नियमनासाठी अतिशय उपयुक्त असतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ पसरली होती. वातावरणात गारवा होता. 

आजचा पल्ला लांबचा असल्यामुळे सुनील धीम्या गतीने सायकल चालवीत होता. वाटेत कोंढे गाव लागले. त्यानंतर रेहेळ गाव लागले, तेथील कालीश्री देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. 

रोहेल पाखाडी गावाजवळ एक छानपैकी धबधबा लागला. हिरव्या रानातून वाहणारे दुधासारखे पांढरे फेसळणारे धबधब्याचे पाणी अंगावर घेतले. उसळणारे पाणी सृष्टीच्या नवोन्मेषाचे दर्शन घडवीत होते. तो धबधबा कॅमेराबद्ध करून पुढची राईड सुरू झाली. 

पुढे पाचाड गावच्या वेशीवर वाघजाई देवस्थान लागले. या वेशीवरच प्रचंड मोठं जांभळाच झाड लागले. 

पाचाड गावाच्या बाजारपेठेत पोहोचलो येथे सुकाई देवीचे मंदिर आहे. बाजूलाच लोहाराची भट्टी दिसली. लोहार, तापून लालबुंद झालेल्या सळीवर जोरदार घणाचे प्रहार करीत होता. एका लयीत घणाचा  खण... खण... आवाज येत होता.  उडणाऱ्या ठिणग्या पाहिल्या आणि "ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे" गाणे आठवले. खरंच... असे दृश्य पाहायला गावाकडेच जायला हवे. 

 चढाचा रस्ता सुरू झाला. सुनील एका विशिष्ट गतीने सायकलिंग करत होता. दहा मिनिटातच चढ पार करून गणेश खिंडीत पोहोचलो. आतापर्यंत तासभर राईड झाली होती. या खिंडीतूनच एक रस्ता सावर्डे गावाकडे, आणि दुसरा मालदोली गावाकडे जातो. नाकासमोर सरळ जाणारा रस्ता गुहागरकडे जातो. पाच मिनिटे हायड्रेशन ब्रेक घेऊन उतारावरून सायकलिंग सुरू केले. सायकलींनी आता वेग पकडला होता. परंतु रहदारी वाढल्यामुळे वळणावर सावधगिरी बाळगावी लागत होती. 
 
पाच मिनिटातच मालघर गावात पोहोचलो. येथून शृंगारतळी गावाचा फाटा लागला. शृंगारतळी हे गावचे नाव वाचून श्रीकृष्णाच्या "यमुनाजळी खेळ खेळू कन्हय्या" ह्या गोपिकाबरोबर केलेल्या रासक्रीडेची आठवण आली.

वाटेत मालघर धरणाचा पाणलोट परिसर लागला. खूप दूरवर पसरलेला पाण्याचा तलाव आणि त्यात पडलेले आकाशाचे प्रतिबिंब मनात गहिरे तरंग निर्माण करीत होते.  वाऱ्याचा प्रवाह थांबल्यामुळे पाण्यावरच्या लहरी सुद्धा निशब्द झाल्या होत्या. अथांगता आणि निरागस शांतता यांचा विहंगम संगम पहात असताना मन भावविभोर झाले.

रामपूरकडे सायकलिंग सुरू केले. रामपूरची चढाची घाटी सुरू झाली. सुनील एक - दोन गियर सेट करून धिम्या गतीने परंतु अतिशय मजेत सायकलिंग करीत होता. वातावरणात धुक्याची चादर पसरली होती.  थोड्याच वेळात सुर्यनारायणाचे दर्शन झाले आणि धुक्याची चादर लयास गेली.

पुढे निर्वाळ गावातून जाताना रस्त्याच्या एका बाजूला दाटीने उभी असलेली झाडे रस्त्यावर शीतल छाया देत होते. तर दुसऱ्या बाजूला पसरलेली शेते डोळ्याला हिरवळीचा आस्वाद देत होती. 

रामपूरला पोहोचलो, येथून वीस किमीवर गुहागर होते. परंतु पुढे राईड करायची सुनीलची इच्छा नव्हती. जवळच्या हॉटेलमध्ये हायड्रेशन ब्रेक घेतला.

 पूजा हॉटेलचा मालक केरळी अण्णा होता.  गेली पंचवीस वर्ष रामपूरमध्ये व्यवसाय करत असल्यामुळे मराठी झाला होता. त्याचे कुटुंब मराठी होते. परंतु साऊथचा इडली, मेंदूवडा त्याने कोकणात फेमस करून आपली संस्कृती जपली होती. अण्णाकडे मिसळ मागताच, त्याने सांबार मध्ये फरसाण टाकलेली मिसळ दिली. अतिशय महान कॉम्बिनेशन होते मिसळ पावचे.  

लॉकडाउन काळात अण्णाचा मराठी मुलगा आणि मुलीने सर्व पंचक्रोशीत इडली आणि मेंदूवडा पार्सल सर्व्हिस दिली होती. त्याच्याशी मराठीत गप्पा मारताना एक जाणवले, मराठी मातीशी तो एकरूप झाला होता.  हाफ पॅन्ट आणि बनियन घातलेला अण्णा मला पुलंचा अंतू बर्वा भासला. कोकणच्या मातीचा विशेष गुण प्रकर्षाने जाणवला. जो कोकणात येतो, तो या मातीत मिसळून जातो. 

रामपूर वरून परतीची राईड सुरू केली दीड तासात चिपळूण शहरात पोहोचलो. चिपळूण बाजारपेठ उघडली होती. आजच एका बेकरीचे ओपनिंग झाले होते. तेथे मावा केक घेऊन घर गाठले. आज ५० किमी राईड झाली होती.

कोकणच्या टवटवीत निसर्गासोबत येथील माणसे आकळणे  आणि जनजीवन फार जवळून पाहणे माझ्यासाठी पर्वणी होती.


सतीश जाधव
आझाद पंछी...

Monday, September 7, 2020

कुंभार्ली घाट सायकल राईड

कुंभार्ली घाट सायकल राईड

०१ सप्टेंबर, २०२०

गणपती विसर्जन झाल्यावर, राजापूरवरून सायकल्स कारला लावून चिपळूण जवळील खेर्डी येथे भाची मनीषाकडे प्रस्थान केले. 

खेर्डीला पोहोचल्यावर दोन्ही सायकल असेंबल करून राईडसाठी तयार केल्या. जावई सुनील सुद्धा माझ्याबरोबर सायकलिंग करायला तयार झाला.

सकाळी साडेसहा वाजता खेर्डी वरून राईड सुरू झाली. चिपळूण वरून कराडला जाणार हा राज्य महामार्ग आहे. सकाळची वेळ आणि सध्याची परिस्थिती यामुळे रस्त्याला तुरळक रहदारी होती. सुनील मागाहून सायकलिंग करत येणार होता. 

 रम्य सकाळ... धुंद वातावरण... बाजूने वाहणारी वाशिष्ठी नदी... झाडांचा मंद सुगंध.. यात पक्षांचा किलबिलाट... त्यांचे उठणारे प्रतिध्वनी.. याने मन निसर्गात रममाण झाले. ढगांच्या आडून होणारा सूर्योदय नवन्मेशाचे गीत गात होता. 
 

थोड्याच वेळात कोळकेवाडी- एलोरे फाटा लागला. या रस्त्याचे द्विपदरीकरण सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी वेगात तर काही ठिकाणी ऑफ रोडिंग सायकलिंग सुरू होते. 

छोटीशी घाटी लागली, रस्ता खड्या खुड्ड्याचा असल्यामुळे सावधगिरीने आणि सावकाश घाटी चढत होतो. उंचावर आल्यावर बाजूच्या डोंगराकडे नजर गेली. आ हा हा.. डोंगराच्या पायथ्याला ढग दाटून थांबले होते. माथ्यावर हिरवेगार जंगल आणि पायथ्याला धुक्याच्या थरांची पांढरी शुभ्र दुलई ओढून झाडे निवांत पहुडली होती. वाटेत मुंढे गाव लागले.

शिरगाव गावाजवळ सायकलिस्ट डॉ. स्वप्नील दाभोळकरची भेट झाली. अतिशय उमदे व्यक्तिमत्व,  नखशिखांत काळा सायकलिंग ड्रेस, सर्व सेफ्टी गियरसह त्याची सायकलिंग सुरू होती. चिपळूनमध्येच प्रॅक्टिस करतोय आणि गेल्या जानेवारी पासून सायकलिंगला सुरुवात करून आतापर्यंत मस्त वजन कमी केले आहे.
 पोफळी फाट्यापर्यंत आम्ही एकत्र सायकलिंग केले. स्वप्नीलला लवकर परत जायचे असल्यामुळे कुंभार्ली घाटाचा चढ लागताच जोरात सायकलिंग सुरू करून स्वप्नील पुढे गेला.
 
 कुंभार्ली घाट पूर्ण चढून जायचे असल्यामुळे दोन- पाच गियर सेट करून पेडलिंग सुरू झाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी... लांबवर दिसणारे विहंगम धबधबे झाडांच्या कुशीत लपलेले पोफळी गाव, या सर्व नजाऱ्याचा आस्वाद घेत अतिशय दमदार राईड सुरू होती. पोफळी गावातून तसेच जलविद्युत केंद्राकडून येणारा एक रस्ता घाटात मिळाला. त्याला 'पोफळी ऐनाचे तळे' नाव होते.
 एकाबाजूला दिसणारे सह्याद्रीचे उंच उंच कडे आणि दुसऱ्या बाजूला पोफळी परिसराचे खोरे आणि त्यातून वर चढत जाणारी वाट पूर्णपणे हिरवाईने नटलेली होती. 
साधारण दोन किमी घाट पार केल्यावर परत येणाऱ्या स्वप्नीलची पुन्हा भेट झाली. त्याच्यासह फोटो काढले, त्याने मोबाईल नंबर शेअर केला. पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन स्वप्नीलला निरोप दिला. 
आता पावसाला सुरुवात झाली होती. ओलसर रस्त्यावर ढग उतरू लागले होते. गारवा सुद्धा वाढला होता.  त्यामुळे चढावर लागणारी दमछाक एकदम कमी झाली. ऊन पावसाचा खेळ सुरू झाला. ढगाआडून येणारे उन्हाचे कवडसे पावसाच्या थेंबांवर पडून सप्तरंगी इफेक्ट देत होते. 
शाळेत विज्ञानाच्या तासाला सप्तरंगी तबकडी गोलगोल फिरविली की पांढरा रंग दिसत असे आणि थांबली की पुन्हा सात रंग दिसत याची आठवण झाली.  या दवबिंदूतून दिसणारे सप्तरंग धवल रंगाचेच भाग आहेत. ज्याच्या मध्ये सर्व रंग सामावलेले आहेत अशी ती हिरण्मयी, शुभ्रधवल सृष्टी माझ्या समोर अवतीर्ण झाली होती. 
तासाभरात कुंभार्ली घाटाच्या टॉपला पोहोचलो. समोर चेक पोष्ट होते. पोलीस हवालदार भिकाजी लोंढे यांची ओळख झाली. बाजूच्या सह्याद्री हॉटेलच्या प्रांगणात फेरफटका मारला. हॉटेल बंद होते. 
कुंभार्ली चेक पोष्टच्या पुढे सातारा जिल्ह्याची हद्द सुरू होते. या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा ओलांडणाऱ्या गाड्यांना अडवत नव्हते, परंतु जिल्ह्यात येणाऱ्या गाड्यांची नोंदणी सुरू होती. कुंभार्ली टॉप संपूर्ण धुक्यात बुडून गेला होता. जवळील कॅन्टीनमध्ये चहा बिस्किटे खाऊन परतीचा सफर सुरू करणार इतक्यात सुनीलचा फोन आला. सुनील सायकलसह पोफळी नाक्यावर पोहोचला होता. 
हवालदार लोंढेचा निरोप घेऊन धुक्यातच परतीची सफर सुरु झाली. भन्नाट वेगात नागमोडी वळणे घेत सायकलिंग सुरू होती. वळणावर अतिशय सावधगिरी बाळगत, वेगावर नियंत्रण ठेवत घाट उतरताना हेल्मेट मध्ये शिरणार वारा भु र र र.... आवाज करीत होता. जणूकाही पंख लावून पक्षासारखा हवेत तरंगत होतो. घाट चढायला तास लागला होता पण अवघ्या पंधरा मिनिटात घाट उतरून पोफळी फाट्यावत पोहोचलो.
सुनीलसह, पंचायत समिती सदस्य बाबू साळवी यांची भेट झाली. सुनील पहिल्यांदाच एव्हढी मोठी राईड करत होता. वाटेत चिपळूण विधानसभा क्षेत्राध्यक्ष श्री. दादा साळवी यांची भेट झाली.

तेथून अलोरेला आलो. संतोषच्या  टपरी वर  गरम भजीपाव आणि वडा तसेच स्पेशल चहा घेतला.  तेथून आमचे लोअर परेलचे आमदार सुनीलभाऊ शिंदे यांच्या  पेडाम्बे गावात आलो. जवळच काडसिद्धेश्वर महाराज यांचा मठ आहे. त्याच्या मागे जावई सुनीलचा मित्र प्रमोद शिंदेचे घर आहे.  त्यांच्या घराच्या पहिल्या माळ्याच्या शेडच्या कामाचे इंस्पेक्षन सुनीलने केले तसेच मातोश्रीनां भेट दिली. आईनी कोकम सरबतची ट्रीट दिली. 

मठाजवळच शिवसेना, चिपळूण तालुका अध्यक्ष आणि महाराष्ट्र कब्बडी असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रतापराव शिंदे यांची  भेट झाली. तसेच महाराष्ट्र  कब्बडी टीमचे कर्णधार श्री स्वप्नील शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. 

तेथून माझे मित्र महेश घाग यांच्या गजमल पिंपळी गावातील कृष्णकमल बंगल्याला भेट दिली. याच  पिंपळी गावात स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचे माहेर आहे. 

आजची चिपळूण मधील  ६० किमीची पहिली राईड अतिशय अविस्मरणीय होती. विविध क्षेत्रातील व्यक्तीच्या ओळखी झाल्या. तसेच  सकाळच्या अरुणोदया पासून कुंभार्ली घाटाच्या माथ्यापर्यंत निसर्गाने, पंचमहाभूतांनी दाखविलेली  दिव्य, भव्य, मोहक, अफाट रूपे किती सुंदर आणि उदात्त आहेत याची प्रचिती आली.

अशा या भावविभोर सायकल सफरीसाठी मनातील भावना शब्दरूपाने प्रकट झाल्या. 

आकाशी सिंहासनाची सजली मेघडंबरी 
अरुणोदय नभीचा देतसे हळू ललकारी 

 तेजस्वी नारायणस्वारी दरबारी प्रवेशीली
 सकळजनांनी आनंदाने मानवंदना दिली
 
 किलबिल पक्षी रव अन् वासरांचे हंबरणे
 घरघर जात्याची अन् कंठातले मंजुळ गाणे
 
 सुहास्य वदना ललनांची लगबग ही अंगणी
 सडासंमार्जन होता  रेखियली  सुबक कणी 
 
 आसमंत दरवळे  उमलता वेलींवरची फुले
 मोद  भरला अवकाशी प्रसन्नचित्त झाले
 
 गाभारी मंद समया तबकी निरांजने उजळती
 सुगंधी धुपदाण्या अन् उजळते ही कापुरार्ती 
 
 सनई चौघडे देवा द्वारी मंगल वाद्य कानी सुस्वर 
 नवतेजाने नटली अवनी निघून जाता घोर तीमिर
 

सतीश जाधव
आझाद पंछी.....

Wednesday, September 2, 2020

नाणार खनिज तेलशुद्धीकरण प्रकल्प राईड

नाणार खनिज तेलशुद्धीकरण प्रकल्प राईड

३० ऑगस्ट, २०२०

सकाळीच वाल्ये पूर्ववाडी वरून सायकल राईड सुरू झाली. गावाशेजारून वाहणाऱ्या नाल्यावरील पूल ओलांडला आणि एक नयनमनोहर धबधब्याचे दर्शन झाले. 

छोटीशी घाटी चढल्यावर वाल्ये पश्चिम वाडी लागली. येथे पवनादेवीचे मंदिर आहे. या वाल्ये गावात ज्या ज्या घरात गणपती येतो, त्या घरात गौरी पण येते. त्या शिवाय तीन ग्रामदेवता आहेत.  ज्या घराचा मान आहे, त्या घरात या ग्रामदेवीला मंदिरातून आणून गौराई बरोबर स्थापित करतात. त्यातील एक पवनादेवी, दुसरी निनादेवी आणि तिसरी भराडीदेवी होय. या देवी ज्या घरात असतात, त्या घरात जाऊन गावातील प्रत्येक कुटुंब ग्रामदेवीची ओटी भरतात. गौरी विसर्जना दिवशी रात्री वाजत गाजत या तीनही देवता पुन्हा मंदिरात प्रस्थापित करतात.  किती सुंदर परंपरा आहे ही... या निमित्ताने प्रत्येक कुटुंब एकमेकांच्या घरी जाऊन घरातील वयस्क व्यक्तींना भेटत असतात. 

घाटी चढत असताना एक व्हाळ (छोटा नाला) लागला. पावसाच्या दिवसात या व्हाळातील मासे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वरवर चढत असतात.

 एक विहंगम दृश्य दिसले... व्हाळातून वर चढणाऱ्या एका गलेलठ्ठ माशाला छोट्या खंड्या पक्षाने (किंग फिशर) सूर मारून चोचीत पकडले. माशाचा आकार खंड्याच्या आकारापेक्षा मोठा होता. त्या माशाच्या वजनामुळे खंड्याला उडताना सुद्धा खूप जोर काढावा लागत होता. परंतु आकांताने तो उडत होता. माशाला चोचीत धरून तो खंड्या झाडात गडप झाला. आपल्या पिलांसाठी हे पक्षी काय काय करू शकतात याचे जिवंत उदाहरण पहायला मिळाले होते. निसर्गाच्या ह्या गोष्टी  बघण्यात किती आनंद आहे. "जीवे जीवस्य जीवनम्" हा तर निसर्ग नियमच आहे.
 
 जैतापकर वाडी वरून पुढे गेलो आणि एक गमतीदार पोष्टर दिसले. " बांदिवडे गाव चव्हाटा" एखादी गोष्ट चव्हाट्यावर आली की ती सर्वदूर पसरते. परंतु हा चव्हाटा सर्वांनी एकत्र येऊन बसने दूरवर जाण्यासाठी होता. बंदीवडे गावातील भराडी देवी मंदिर लागले. या मंदिराला रंगरंगोटी करून अतिशय सुंदर बनविले होते.

त्यानंतर प्रिंदावन टेंबवडी नाका लागला. प्रिंदावन हे गावचे नाव वृन्दावन वरून ठेवले असावे काय? प्रिंदावनमधील एक ओढा लागला. यावरील पुलाच्या अलीकडे थांबलो. या ओढ्यावर काही महिला कपडे धुत होत्या, तर लहान मुले त्या ओढ्यात उड्या मारत होते. लहानपणची आठवण झाली. मामाच्या गावाला गेल्यावर तेथील विहिरीत अशाच उड्या मारत असू. 

 प्रिंदावन पहिली वाडी वरून उपळे गावाकडे प्रस्थान केले. मागच्या वेळी उपळे गावातून वरचा चढ चढल्यावर सड्यावर गेलो होतो.  या वेळेला वाघोटन खाडी किनाऱ्याने मार्गक्रमण करायचे ठरविले होते. त्यामुळे डाव्या बाजूला वळसा घेऊन खाडीकडे निघालो. 
 
छोटी घाटी चढत असतानाच पावसाला सुरुवात झाली. कोकणातील गेल्या सहा दिवसाचा अनुभव अतिशय मनोहारी होता. चढ लागला की पावसाची सुरुवात... जसे की माझे मनोगत वरुण राजाला समजत असावे. 

पुढे हेडेश्वर मंदिर लागले. अतिशय रम्य वातावरण होते. काही वयस्क महिला डोक्यावर टोपली घेऊन बाजारात निघाल्या होत्या. सोबत असलेले पुरुष मंडळी त्या टोपलीवर छत्री धरून पावसापासून महिलेचे आणि टोपलीचे रक्षण करीत होते.  पण स्वतः मात्र भिजत होते.  काय असावे बरे या टोपलीत?  सर्व मंडळी चार किमीवर असलेल्या तळेखाजन गावातील बाजारात चालले होते. 

उपळे गावातील महालक्ष्मी मंदिर लागले. मंदिराबाहेर दोन दगडी स्तूप होते. मंदिराच्या आसपासचा परिसर हिरवाईने नटलेला होता. कोकणचे एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक गावात एक तरी मंदिर असणारच.


 जवळच एक पाण्याचा पाट वाहत होता. तो बंधारा घालून अडविला होता. त्याच्यावरून ओव्हर फ्लो होणारे पाणी धबधब्याचे फिलिंग देत होते. अतिशय मस्त धबधबा होता. असे अडविलेले पाणी पावसाळ्यानंतर गावच्या कामाला येते. 
 

आता चढाव सुरू झाला. कोकणच्या गावागावातून जाणारे छोटेखानी रस्ते वळणावळणाचे असतातच पण त्याच्या बरोबर त्याच्या दोन्ही बाजूला हिरव्यागार वनस्पतीची झालेली वाढ, डोळ्याला अतिशय सुखकारक वाटते. जणूकाही झाडांच्या गुंफेतूनच सायकलची सफर सुरू आहे. 
तारळ गावात प्रवेश केला आणि वेशीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झाले. खूप मस्त वाटले.
या पंचक्रोशीतील मोठे गाव कुंभवडे लागले. गावातील एक छोट्या कँटीनमध्ये चहासाठी थांबलो. समोरच भास्कर देसाई कनिष्ठ महाविद्यालय होते. विशेष म्हणजे हे महाविद्यालय कुंभवडे ग्राम विकास मंडळातर्फे संचालित होते. 
पुढे देसाई वाडीतून होडीतून वाघोटनची खाडी ओलांडली की तळेरे विजयदुर्ग रस्ता लागतो. ही माहिती कँटीनमधल्या ग्रामस्थाने दिली. 

खाडीकिनारी गेल्यावर बोट बंद असल्याचे कळले, त्यामुळे कुंभवडे घाट चढण्यास सुरुवात केली. ऑफ रोडिंग रस्ता आणि खडी चढाई यामुळे अतिशय धीम्या गतीने घाट चढून वर सड्यावर आलो. 
पाऊस पडत होता. भिजतच राईड सुरू होती. अथांग पसरलेली सपाट आणि मोकळी जमीन पाहून पाचगणी सारखा, कोकणातील टेबलटॉप प्रदेश  वाटला.   सड्यावर हिरवळ पसरली होती. छोटी छोटी तळी पावसामुळे निर्माण झाली होती. विशेष म्हणजे लाव्हा, खंड्या, सुतार पक्षी या तळ्यांत  बुडक्या मारत होते. 
एका तळ्याजवळ गेल्यावर लक्षात आले, तळ्यात छोटे छोटे मळे मासे आहेत. प्रश्न पडला, एव्हढ्या उंचावर हे मासे कसे आले असावेत? सृष्टीची ही किमयाच होती.
सड्यावरील राणे यांच्या कँटीनमध्ये हायड्रेशन ब्रेक घेतला. हेच नाणार गाव आहे, हे ऐकल्यावर आश्चर्य वाटले. राणे म्हणाले, 'नाणार गावातील घरे विखुरलेली आहेत'. 

खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे प्रसिद्ध झालेले हेच ते नाणार गाव. येथून पडेल कॅन्टीन १७ किमी आहे तर हातीवले जैतापूर फाटा ६ किमी वर आहे. 
नाणार प्रकल्प मानचित्र

आशिया खंडातील सर्वांत मोठी रिफायनरी अर्थात तेल शुद्धीकरण प्रकल्प कोकणात उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरील राजापूर तालुक्यातील नाणार येथे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या प्रमुख तेल कंपन्या एकत्र येणार आहेत. या प्रकल्पात तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, सुमारे एक लाख रोजगार निर्माण होण्याचा दावा केंद्र सरकारतर्फे करण्यात आला आहे. 

या भल्यामोठ्या प्रकल्पासाठी कोकणातील १५ हजार एकर जमिनीची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे सुमारे आठ हजार शेतकऱ्यांना आपल्या जमिनी गमवाव्या लागण्याची शक्यता आहे. प्रकल्पाच्या महाकायतेमुळे तीन हजारहून अधिक कुटुंबे विस्थापित होण्याची भीती आहे. 

या सर्व कारणांमुळे स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. संपादित जमिनीवर मोठ्या प्रमाणात आंब्याच्या, नारळी-पोफळीच्या बागा असून, येथील आंब्याला जगभरातून मागणी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. शिवाय हा प्रकल्प कोकण किनारपट्टीवर उभारण्यात येत असल्याने हजारो मच्छिमाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होणार असल्याचीही भीती आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रदूषणामुळे कोकणचे सौंदर्य नष्ट होईल,  या मुळेच नाणार खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. परंतु हा प्रकल्प राज्यात झाला नाही तर, तो गुजरातला जाण्याची दाट शक्यता आहे.  सध्याच्या राज्य सरकारच्या विरोधामुळे नाणार प्रकल्पाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

ही सर्व माहिती मिळाल्यावर एकच प्रश्न मनात आला, कोकणच्या निसर्गाचा बळी देऊन विकास साधू शकतो काय?  वरील सर्व बाबींमुळे सध्या हा प्रकल्प "जैसे थे" परिस्थितीत आहे. 

कोकणची प्रगती, स्थानिकांना रोजगार आणि निसर्गाचा समतोल साधून कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचे  प्रयत्न होणे आवश्यक आहे. 

नाणारच्या निसर्गातून सायकलिंग सुरू होती. आता जैतापूर फाट्याकडे जायचे नक्की केले. खरोखरच मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण नाणार प्रकल्प अजून कार्यान्वीत झाला नसल्यामुळेच येथील नितांत सुंदर निसर्ग मला पहायला मिळाला.

जैतापूर हातीवले फाट्यावर आलो. येथून सरळ राजापूर १२ किमी अंतरावर आहे, तर उजव्या बाजूच्या  फाट्यावरून हातीवले गाव सुद्धा १२ किमी अंतरावर आहे. विशेष म्हणजे घड्याळात सुद्धा दुपारचे १२ वाजले होते. 

पाऊण तासात हातीवले नाक्यावर पोहोचलो. तेथे उदयच्या कँटीन मध्ये आलो. आज जान्हवी वहिनीने अंडे हाफ फ्राईड बनवून दिले. त्यांनी आज पहिल्यांदाच हाफ फ्राईड बनविले होते. दोन पाव आणि अंडे खाऊन त्यावर मसाले चहा पिऊन, घराकडे राईड सुरू झाली. 


आज झालेल्या ८० किमी राईडने  नाणार,  कुंभवडे परिसराचा अद्भुत निसर्ग  दाखविला.  तसेच कोकणचा विकास आणि  भूमीपुत्रांच्या कथा सुद्धा समजून घेता आल्या.

सतीश जाधव
आझाद पंछी...