Wednesday, September 2, 2020

नाणार खनिज तेलशुद्धीकरण प्रकल्प राईड

नाणार खनिज तेलशुद्धीकरण प्रकल्प राईड

३० ऑगस्ट, २०२०

सकाळीच वाल्ये पूर्ववाडी वरून सायकल राईड सुरू झाली. गावाशेजारून वाहणाऱ्या नाल्यावरील पूल ओलांडला आणि एक नयनमनोहर धबधब्याचे दर्शन झाले. 

छोटीशी घाटी चढल्यावर वाल्ये पश्चिम वाडी लागली. येथे पवनादेवीचे मंदिर आहे. या वाल्ये गावात ज्या ज्या घरात गणपती येतो, त्या घरात गौरी पण येते. त्या शिवाय तीन ग्रामदेवता आहेत.  ज्या घराचा मान आहे, त्या घरात या ग्रामदेवीला मंदिरातून आणून गौराई बरोबर स्थापित करतात. त्यातील एक पवनादेवी, दुसरी निनादेवी आणि तिसरी भराडीदेवी होय. या देवी ज्या घरात असतात, त्या घरात जाऊन गावातील प्रत्येक कुटुंब ग्रामदेवीची ओटी भरतात. गौरी विसर्जना दिवशी रात्री वाजत गाजत या तीनही देवता पुन्हा मंदिरात प्रस्थापित करतात.  किती सुंदर परंपरा आहे ही... या निमित्ताने प्रत्येक कुटुंब एकमेकांच्या घरी जाऊन घरातील वयस्क व्यक्तींना भेटत असतात. 

घाटी चढत असताना एक व्हाळ (छोटा नाला) लागला. पावसाच्या दिवसात या व्हाळातील मासे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वरवर चढत असतात.

 एक विहंगम दृश्य दिसले... व्हाळातून वर चढणाऱ्या एका गलेलठ्ठ माशाला छोट्या खंड्या पक्षाने (किंग फिशर) सूर मारून चोचीत पकडले. माशाचा आकार खंड्याच्या आकारापेक्षा मोठा होता. त्या माशाच्या वजनामुळे खंड्याला उडताना सुद्धा खूप जोर काढावा लागत होता. परंतु आकांताने तो उडत होता. माशाला चोचीत धरून तो खंड्या झाडात गडप झाला. आपल्या पिलांसाठी हे पक्षी काय काय करू शकतात याचे जिवंत उदाहरण पहायला मिळाले होते. निसर्गाच्या ह्या गोष्टी  बघण्यात किती आनंद आहे. "जीवे जीवस्य जीवनम्" हा तर निसर्ग नियमच आहे.
 
 जैतापकर वाडी वरून पुढे गेलो आणि एक गमतीदार पोष्टर दिसले. " बांदिवडे गाव चव्हाटा" एखादी गोष्ट चव्हाट्यावर आली की ती सर्वदूर पसरते. परंतु हा चव्हाटा सर्वांनी एकत्र येऊन बसने दूरवर जाण्यासाठी होता. बंदीवडे गावातील भराडी देवी मंदिर लागले. या मंदिराला रंगरंगोटी करून अतिशय सुंदर बनविले होते.

त्यानंतर प्रिंदावन टेंबवडी नाका लागला. प्रिंदावन हे गावचे नाव वृन्दावन वरून ठेवले असावे काय? प्रिंदावनमधील एक ओढा लागला. यावरील पुलाच्या अलीकडे थांबलो. या ओढ्यावर काही महिला कपडे धुत होत्या, तर लहान मुले त्या ओढ्यात उड्या मारत होते. लहानपणची आठवण झाली. मामाच्या गावाला गेल्यावर तेथील विहिरीत अशाच उड्या मारत असू. 

 प्रिंदावन पहिली वाडी वरून उपळे गावाकडे प्रस्थान केले. मागच्या वेळी उपळे गावातून वरचा चढ चढल्यावर सड्यावर गेलो होतो.  या वेळेला वाघोटन खाडी किनाऱ्याने मार्गक्रमण करायचे ठरविले होते. त्यामुळे डाव्या बाजूला वळसा घेऊन खाडीकडे निघालो. 
 
छोटी घाटी चढत असतानाच पावसाला सुरुवात झाली. कोकणातील गेल्या सहा दिवसाचा अनुभव अतिशय मनोहारी होता. चढ लागला की पावसाची सुरुवात... जसे की माझे मनोगत वरुण राजाला समजत असावे. 

पुढे हेडेश्वर मंदिर लागले. अतिशय रम्य वातावरण होते. काही वयस्क महिला डोक्यावर टोपली घेऊन बाजारात निघाल्या होत्या. सोबत असलेले पुरुष मंडळी त्या टोपलीवर छत्री धरून पावसापासून महिलेचे आणि टोपलीचे रक्षण करीत होते.  पण स्वतः मात्र भिजत होते.  काय असावे बरे या टोपलीत?  सर्व मंडळी चार किमीवर असलेल्या तळेखाजन गावातील बाजारात चालले होते. 

उपळे गावातील महालक्ष्मी मंदिर लागले. मंदिराबाहेर दोन दगडी स्तूप होते. मंदिराच्या आसपासचा परिसर हिरवाईने नटलेला होता. कोकणचे एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक गावात एक तरी मंदिर असणारच.


 जवळच एक पाण्याचा पाट वाहत होता. तो बंधारा घालून अडविला होता. त्याच्यावरून ओव्हर फ्लो होणारे पाणी धबधब्याचे फिलिंग देत होते. अतिशय मस्त धबधबा होता. असे अडविलेले पाणी पावसाळ्यानंतर गावच्या कामाला येते. 
 

आता चढाव सुरू झाला. कोकणच्या गावागावातून जाणारे छोटेखानी रस्ते वळणावळणाचे असतातच पण त्याच्या बरोबर त्याच्या दोन्ही बाजूला हिरव्यागार वनस्पतीची झालेली वाढ, डोळ्याला अतिशय सुखकारक वाटते. जणूकाही झाडांच्या गुंफेतूनच सायकलची सफर सुरू आहे. 
तारळ गावात प्रवेश केला आणि वेशीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झाले. खूप मस्त वाटले.
या पंचक्रोशीतील मोठे गाव कुंभवडे लागले. गावातील एक छोट्या कँटीनमध्ये चहासाठी थांबलो. समोरच भास्कर देसाई कनिष्ठ महाविद्यालय होते. विशेष म्हणजे हे महाविद्यालय कुंभवडे ग्राम विकास मंडळातर्फे संचालित होते. 
पुढे देसाई वाडीतून होडीतून वाघोटनची खाडी ओलांडली की तळेरे विजयदुर्ग रस्ता लागतो. ही माहिती कँटीनमधल्या ग्रामस्थाने दिली. 

खाडीकिनारी गेल्यावर बोट बंद असल्याचे कळले, त्यामुळे कुंभवडे घाट चढण्यास सुरुवात केली. ऑफ रोडिंग रस्ता आणि खडी चढाई यामुळे अतिशय धीम्या गतीने घाट चढून वर सड्यावर आलो. 
पाऊस पडत होता. भिजतच राईड सुरू होती. अथांग पसरलेली सपाट आणि मोकळी जमीन पाहून पाचगणी सारखा, कोकणातील टेबलटॉप प्रदेश  वाटला.   सड्यावर हिरवळ पसरली होती. छोटी छोटी तळी पावसामुळे निर्माण झाली होती. विशेष म्हणजे लाव्हा, खंड्या, सुतार पक्षी या तळ्यांत  बुडक्या मारत होते. 
एका तळ्याजवळ गेल्यावर लक्षात आले, तळ्यात छोटे छोटे मळे मासे आहेत. प्रश्न पडला, एव्हढ्या उंचावर हे मासे कसे आले असावेत? सृष्टीची ही किमयाच होती.
सड्यावरील राणे यांच्या कँटीनमध्ये हायड्रेशन ब्रेक घेतला. हेच नाणार गाव आहे, हे ऐकल्यावर आश्चर्य वाटले. राणे म्हणाले, 'नाणार गावातील घरे विखुरलेली आहेत'. 

खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे प्रसिद्ध झालेले हेच ते नाणार गाव. येथून पडेल कॅन्टीन १७ किमी आहे तर हातीवले जैतापूर फाटा ६ किमी वर आहे. 
नाणार प्रकल्प मानचित्र

आशिया खंडातील सर्वांत मोठी रिफायनरी अर्थात तेल शुद्धीकरण प्रकल्प कोकणात उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरील राजापूर तालुक्यातील नाणार येथे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या प्रमुख तेल कंपन्या एकत्र येणार आहेत. या प्रकल्पात तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, सुमारे एक लाख रोजगार निर्माण होण्याचा दावा केंद्र सरकारतर्फे करण्यात आला आहे. 

या भल्यामोठ्या प्रकल्पासाठी कोकणातील १५ हजार एकर जमिनीची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे सुमारे आठ हजार शेतकऱ्यांना आपल्या जमिनी गमवाव्या लागण्याची शक्यता आहे. प्रकल्पाच्या महाकायतेमुळे तीन हजारहून अधिक कुटुंबे विस्थापित होण्याची भीती आहे. 

या सर्व कारणांमुळे स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. संपादित जमिनीवर मोठ्या प्रमाणात आंब्याच्या, नारळी-पोफळीच्या बागा असून, येथील आंब्याला जगभरातून मागणी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. शिवाय हा प्रकल्प कोकण किनारपट्टीवर उभारण्यात येत असल्याने हजारो मच्छिमाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होणार असल्याचीही भीती आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रदूषणामुळे कोकणचे सौंदर्य नष्ट होईल,  या मुळेच नाणार खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. परंतु हा प्रकल्प राज्यात झाला नाही तर, तो गुजरातला जाण्याची दाट शक्यता आहे.  सध्याच्या राज्य सरकारच्या विरोधामुळे नाणार प्रकल्पाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

ही सर्व माहिती मिळाल्यावर एकच प्रश्न मनात आला, कोकणच्या निसर्गाचा बळी देऊन विकास साधू शकतो काय?  वरील सर्व बाबींमुळे सध्या हा प्रकल्प "जैसे थे" परिस्थितीत आहे. 

कोकणची प्रगती, स्थानिकांना रोजगार आणि निसर्गाचा समतोल साधून कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचे  प्रयत्न होणे आवश्यक आहे. 

नाणारच्या निसर्गातून सायकलिंग सुरू होती. आता जैतापूर फाट्याकडे जायचे नक्की केले. खरोखरच मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण नाणार प्रकल्प अजून कार्यान्वीत झाला नसल्यामुळेच येथील नितांत सुंदर निसर्ग मला पहायला मिळाला.

जैतापूर हातीवले फाट्यावर आलो. येथून सरळ राजापूर १२ किमी अंतरावर आहे, तर उजव्या बाजूच्या  फाट्यावरून हातीवले गाव सुद्धा १२ किमी अंतरावर आहे. विशेष म्हणजे घड्याळात सुद्धा दुपारचे १२ वाजले होते. 

पाऊण तासात हातीवले नाक्यावर पोहोचलो. तेथे उदयच्या कँटीन मध्ये आलो. आज जान्हवी वहिनीने अंडे हाफ फ्राईड बनवून दिले. त्यांनी आज पहिल्यांदाच हाफ फ्राईड बनविले होते. दोन पाव आणि अंडे खाऊन त्यावर मसाले चहा पिऊन, घराकडे राईड सुरू झाली. 


आज झालेल्या ८० किमी राईडने  नाणार,  कुंभवडे परिसराचा अद्भुत निसर्ग  दाखविला.  तसेच कोकणचा विकास आणि  भूमीपुत्रांच्या कथा सुद्धा समजून घेता आल्या.

सतीश जाधव
आझाद पंछी...

8 comments:

  1. कोकण निसर्गाचे अतिशय सुंदर प्रवासवर्णन आणि यातून आमच्यासारख्या वाचकांना विस्तृत माहितीचा खजिना प्राप्त होत आहे.
    ----स्वप्निल नागरे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद स्वप्नील...
      कोकणचे अद्भुत सौंदर्य पाहताना भान हरपून जाते.

      Delete
  2. रसिका भुरणSeptember 3, 2020 at 9:02 AM

    खूपच अप्रतिम वर्णन केलं आहे मामा... वाचतच राहावंस वाटत..❤️

    ReplyDelete
  3. रसिका...

    खूप खूप धन्यवाद...

    अभिप्रायाबद्दल...

    ReplyDelete
  4. दिवसेदिवस तुमच्या लिखाणात अजून सुंदर निसर्ग दिसून येतो. राहवत नाही म्हणून सांगते कोकणाला कोकणच राहुद्या. त्याची सुंदरता अफाट आहे. निसर्गाचा वरदहस्त आहे कोकणावर. सगळीकडे नको माणसाची प्रगती, तसंही आम्ही कोंकणी ताक भात आणि मासा चो कालवण यातच आमचो स्वर्ग असता ,☺️

    ReplyDelete
  5. किशोरी...

    खूप सुंदर अभिप्राय...

    आज कोकणातला तरुण नोकरी, व्यवसायानिमित्त कोकणच्या बाहेर गेलाय. त्याला पुन्हा कोकणात आणायला हवे.

    कोकणातली खूप घर बंद दिसली किंवा फक्त वयस्क मंडळी राहतात. त्यामुळेच संधीसाधू लोकांचे फावते.

    या साठीच माझा प्रयत्न आहे. कोकणच्या निसर्गाची जाणीव तरुणांना करून देणे. व्यवसायाचे खूप पर्याय उपलब्ध आहेत कोकणात, फक्त चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी हवी.

    कोकणला निसर्गसंपन्न कोकण ठेवण्यासठी तरुणांनी कोकणात जाणे आवश्यक आहे.

    धन्यवाद किशोरी तुझ्या मनोगताबद्दल...

    ReplyDelete
  6. तुमच्या वर्णना मधुन निसर्ग दिसुन येतो.

    ReplyDelete
  7. 🙏🏼 मित्राचे अभिप्राय...

    डोळसपणे केलेले बहारदार निसर्गाचे वर्णन...

    गावागावातील परंपरा आजही जपल्या जातात हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे , या परंपरा सामाजिक भान जपणाऱ्या आहेत हेही जाणवते ,खूप छान रित्या हे मांडले आहे ....

    निसर्गाची जपणूक आणि मानवाची प्रगती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत .यात समतोल साधत प्रगतीपथावर मार्गक्रमण करणे आवश्यक आहे..

    प्रगतीची फळे सर्वांना चाखायला हवी असतात., मग निसर्गाचा होणारा र्हास त्याची भरपाई करूनच केला पाहिजे.

    तरुणांना आपले गाव,घरदार सोडून पोटापाण्यासाठी शहरांकडे धाव घ्यावी लागते , वाढत्या लोकसंख्येमुळे शहरांच्या पायाभूत सुविधांवर ताण पडतो.

    निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकण प्रांतात होणारी रोजगार निर्मिती स्वागतार्ह बाब नक्कीच असेल जेव्हा निसर्गाची तसेच तेथील विस्थापितांना योग्य ती भरपाई देऊन केली असेल तरच....

    आहे त्यात समाधानी राहणं खचितच मानवी मनाला रुचणा रे नाही त्यामुळे प्रगतीचा मार्ग चोखाळणे भाग आहे....

    ReplyDelete