Wednesday, September 23, 2020

रामपूर गुहागर सायकल राईड

रामपूर गुहागर सायकल राईड

२ सप्टेंबर, २०२०

सकाळी सव्वा सहा वाजता राईड सुरू झाली. खेर्डी मधून  चिपळूण शहरात प्रवेश केला. मुख्य बाजारपेठ एकदम शांत भासली. दूध विक्रीची दुकाने उघडी होती. हे शहर वाशिष्ठी नदीच्या किनारी वसलेले आहे. चिपळूण वरून गुहागर ४३ किमी आहे तर हेदवी गणेश मंदिर ५२ किमी आहे. 

नगर परिषदेची हद्द संपली आणि मिरजोळी गावातून सफर सुरू झाली. गावाच्या प्रवेशालाच तंटामुक्त ग्रामपंचायत हा फलक लावलेला होता. जुन्या काळातील एक चित्रपट आठवला.  'एक गाव बारा भानगडी' चे तंटामुक्ती मध्ये रूपांतर झालेले पाहून खूप आनंद झाला. गुहागरकडे जाणारा रस्ता राज्य महामार्ग आहे. त्यामुळे रस्त्याच्या मध्ये, तसेच दोन्ही किनाऱ्याला पांढरे पट्टे होते. हे पट्टे वाहतूक नियमनासाठी अतिशय उपयुक्त असतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ पसरली होती. वातावरणात गारवा होता. 

आजचा पल्ला लांबचा असल्यामुळे सुनील धीम्या गतीने सायकल चालवीत होता. वाटेत कोंढे गाव लागले. त्यानंतर रेहेळ गाव लागले, तेथील कालीश्री देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. 

रोहेल पाखाडी गावाजवळ एक छानपैकी धबधबा लागला. हिरव्या रानातून वाहणारे दुधासारखे पांढरे फेसळणारे धबधब्याचे पाणी अंगावर घेतले. उसळणारे पाणी सृष्टीच्या नवोन्मेषाचे दर्शन घडवीत होते. तो धबधबा कॅमेराबद्ध करून पुढची राईड सुरू झाली. 

पुढे पाचाड गावच्या वेशीवर वाघजाई देवस्थान लागले. या वेशीवरच प्रचंड मोठं जांभळाच झाड लागले. 

पाचाड गावाच्या बाजारपेठेत पोहोचलो येथे सुकाई देवीचे मंदिर आहे. बाजूलाच लोहाराची भट्टी दिसली. लोहार, तापून लालबुंद झालेल्या सळीवर जोरदार घणाचे प्रहार करीत होता. एका लयीत घणाचा  खण... खण... आवाज येत होता.  उडणाऱ्या ठिणग्या पाहिल्या आणि "ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे" गाणे आठवले. खरंच... असे दृश्य पाहायला गावाकडेच जायला हवे. 

 चढाचा रस्ता सुरू झाला. सुनील एका विशिष्ट गतीने सायकलिंग करत होता. दहा मिनिटातच चढ पार करून गणेश खिंडीत पोहोचलो. आतापर्यंत तासभर राईड झाली होती. या खिंडीतूनच एक रस्ता सावर्डे गावाकडे, आणि दुसरा मालदोली गावाकडे जातो. नाकासमोर सरळ जाणारा रस्ता गुहागरकडे जातो. पाच मिनिटे हायड्रेशन ब्रेक घेऊन उतारावरून सायकलिंग सुरू केले. सायकलींनी आता वेग पकडला होता. परंतु रहदारी वाढल्यामुळे वळणावर सावधगिरी बाळगावी लागत होती. 
 
पाच मिनिटातच मालघर गावात पोहोचलो. येथून शृंगारतळी गावाचा फाटा लागला. शृंगारतळी हे गावचे नाव वाचून श्रीकृष्णाच्या "यमुनाजळी खेळ खेळू कन्हय्या" ह्या गोपिकाबरोबर केलेल्या रासक्रीडेची आठवण आली.

वाटेत मालघर धरणाचा पाणलोट परिसर लागला. खूप दूरवर पसरलेला पाण्याचा तलाव आणि त्यात पडलेले आकाशाचे प्रतिबिंब मनात गहिरे तरंग निर्माण करीत होते.  वाऱ्याचा प्रवाह थांबल्यामुळे पाण्यावरच्या लहरी सुद्धा निशब्द झाल्या होत्या. अथांगता आणि निरागस शांतता यांचा विहंगम संगम पहात असताना मन भावविभोर झाले.

रामपूरकडे सायकलिंग सुरू केले. रामपूरची चढाची घाटी सुरू झाली. सुनील एक - दोन गियर सेट करून धिम्या गतीने परंतु अतिशय मजेत सायकलिंग करीत होता. वातावरणात धुक्याची चादर पसरली होती.  थोड्याच वेळात सुर्यनारायणाचे दर्शन झाले आणि धुक्याची चादर लयास गेली.

पुढे निर्वाळ गावातून जाताना रस्त्याच्या एका बाजूला दाटीने उभी असलेली झाडे रस्त्यावर शीतल छाया देत होते. तर दुसऱ्या बाजूला पसरलेली शेते डोळ्याला हिरवळीचा आस्वाद देत होती. 

रामपूरला पोहोचलो, येथून वीस किमीवर गुहागर होते. परंतु पुढे राईड करायची सुनीलची इच्छा नव्हती. जवळच्या हॉटेलमध्ये हायड्रेशन ब्रेक घेतला.

 पूजा हॉटेलचा मालक केरळी अण्णा होता.  गेली पंचवीस वर्ष रामपूरमध्ये व्यवसाय करत असल्यामुळे मराठी झाला होता. त्याचे कुटुंब मराठी होते. परंतु साऊथचा इडली, मेंदूवडा त्याने कोकणात फेमस करून आपली संस्कृती जपली होती. अण्णाकडे मिसळ मागताच, त्याने सांबार मध्ये फरसाण टाकलेली मिसळ दिली. अतिशय महान कॉम्बिनेशन होते मिसळ पावचे.  

लॉकडाउन काळात अण्णाचा मराठी मुलगा आणि मुलीने सर्व पंचक्रोशीत इडली आणि मेंदूवडा पार्सल सर्व्हिस दिली होती. त्याच्याशी मराठीत गप्पा मारताना एक जाणवले, मराठी मातीशी तो एकरूप झाला होता.  हाफ पॅन्ट आणि बनियन घातलेला अण्णा मला पुलंचा अंतू बर्वा भासला. कोकणच्या मातीचा विशेष गुण प्रकर्षाने जाणवला. जो कोकणात येतो, तो या मातीत मिसळून जातो. 

रामपूर वरून परतीची राईड सुरू केली दीड तासात चिपळूण शहरात पोहोचलो. चिपळूण बाजारपेठ उघडली होती. आजच एका बेकरीचे ओपनिंग झाले होते. तेथे मावा केक घेऊन घर गाठले. आज ५० किमी राईड झाली होती.

कोकणच्या टवटवीत निसर्गासोबत येथील माणसे आकळणे  आणि जनजीवन फार जवळून पाहणे माझ्यासाठी पर्वणी होती.


सतीश जाधव
आझाद पंछी...

8 comments:

  1. कोंकणातील सुंदर सफर वर्णन चांगले लिहिले आहे. मस्त वाचताना मजा येते.

    ReplyDelete
  2. मित्राचे अभिप्राय !!!

    लिखाण नेहमी प्रमाणेच ओघावतं,

    ताजं टवटवीत!! पावसाळ्यातल्या निसर्गासारखे सदाहरित !!

    वारा वाहताना आकाशीच्या मेघांच्या हातात हात गुंफून त्यांनाही सोबत नेतो आणि जलाशयातील पाण्यालाही
    गुजगोष्टी सांगत आनंदित करतो,

    पाण्यावरील तरंग हेच तर सांगतात .,

    तद्वतच सायकल सफरीत वेगाने भ्रमण करताना टिपलेल्या निसर्गाचे सौंदर्य,गावाचे तपशीलवार वर्णन वाचताना वाचकाचे मनोरथ ही सोबत प्रवास करतात आणि असीम आनंदाचे क्षण उपभोगतात.

    ReplyDelete
  3. सर... खरंच तुम्हाला पाहून आताच retirement यावी आणि स्वछंद जीवनाचा आनंद घ्यायला तुम्हीच आमचे प्रेरणा स्थान..... mast... enjoy

    ReplyDelete
  4. हॉटेल पूजा रामपूर,
    तुमचं लिखाण वाचून खूप मस्त वाटलं, चिपळूण ते रामपूर पर्यंत जे वर्णन केलं आहे हे खूपच सुंदर आहे.
    मी हे घरी सर्वांना ऐकवलं.
    सर्वानाच खूप आवडलं.
    हॉटेल च वर्णन केलं तेव्हा त्यांना एक कुतूहल निर्माण झाली.

    September 24, 2020 at 7:13 AM

    ReplyDelete