Wednesday, November 4, 2020

श्री भीमाशंकर सायकल वारी... दिवस दुसरा

श्री भीमाशंकर सायकल वारी

27 ते 29 ऑक्टोबर 2020
 
// दिवस दुसरा //


     आज सकाळी सहा वाजता जाग आली. तासाभरात दोघेही तयार झालो, पुढच्या राईड साठी. सकाळी फाईव्ह स्टार नाश्त्याची व्यवस्था होती, पण त्यासाठी आठ वाजेपर्यंत थांबावे लागणार होते. आजची राईड सुद्धा बरीच मोठी होती आणि वेळेचं गणित जमावयाचे असल्यामुळे रमाकांतने आणलेला प्रोटीन शेक प्यालो.

 सकाळी स्क्विरल रिसॉर्टचा नजारा  वेगळा आणि विहंगम दिसत होता. डोंगराच्या कुशीत वसलेले हे रिसॉर्ट अतिशय कल्पकतेने घडविले होते. गावापासून दूर असल्यामुळे वर्दळ आणि रहदारी पासून मुक्त होते. आसपासचा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला होता. रिसॉर्ट मधील बाकदार वळणावळणाचा रस्ता शेवटी रेस्टॉरंटपर्यंत जात होता. खरं तर या रिसोर्टमध्ये संपूर्ण दिवस राहून येथील अँबियन्स एन्जॉय करायला हवा होता. श्री भिमाशंकरच्या पायथ्याला बांधलेल्या या रिसॉर्टमुळे येथील जनजीवनाची सुबत्ता प्रतीत होत होती.

रिसॉर्टमधूनच अजितला फोन केला आणि पुढील सफरीला निघालोय याची माहिती दिली. तसेच जुन्नरकरांबरोबर हा संपूर्ण परिसर सायकलने पुन्हा एकदा फिरण्याचा मानस व्यक्त केला. रिसॉर्टच्या बाहेर पडल्यावर चहाची टपरी लागली. तेथे चहा सोबत भूकलाडू खाऊन पाण्याच्या बाटल्या आणि पोटल्या भरून घेतल्या. आता चढाची सफर सुरू झाली. येथून श्री भीमाशंकर मंदिर ३६ किमी आहे. 

पुढचे वळण घेतल्यावर  डिंभे धरणाची प्रचंड मोठी भिंत दिसू लागली. रमाकांत म्हणाला, 'हा घाट थोडा वर चढून गेल्यावर तेथून डिंभे धरण आणि संपूर्ण पाणलोट क्षेत्राचा नजारा अतिशय विहंगम दिसतो'. रमाकांतने सांगितलेले 'थोडे' वर चढायला अर्धा तास लागला. घाट रस्त्याचे अंतर थोडे असले तरी दमछाक करणारे असते. सकाळचे आठ वाजून गेल्यामुळे ऊन चढायला सुरुवात झाली होती. 


घाटाच्या एका पॉईंट वरून डिंभे धरण दिसू लागले. हे धरण घोड नदीवर बांधलेले असून येथे पाच मेगा वॅट क्षमतेचे वीज केंद्र आहे. 
आसपासच्या १९ गावांची जवळपास ३४ हजार एकर जमीन जलसिंचनाखाली आणली आहे. या धरणामुळे आंबेगाव तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे.

धरणाच्या लोकेशनवर फोटो काढले. शेंगदाणा लाडू खाऊन पुढे प्रस्थान केले. रस्त्याची परिस्थिती गंभीर होती. त्यामुळे रोडिओ चालविणारा रमाकांत तीक्ष्ण नजरेने पेडलिंग करत होता. रोडिओला शॉक ऑबसॉरर्बर नसल्यामुळे खांद्यावर खूप प्रेशर येते. परंतु सर्व आघात सहन करण्याची प्रचंड मानसिक ताकद रमाकांतकडे होती. तसेच मध्ये मध्ये येणारे चढ आणि अडथळे याची माहिती रमाकांत सतत मला देत होता.  सायकल नुकतीच सर्व्हिस केल्यामुळे माझी सायकलिंग निवांतपणे सुरू होती. उत्तम प्रतीच्या सायकलमुळे शारीरिक इजा होण्याचे प्रमाण अतिशय नगण्य असते. 

तळेघर पर्यंत वेडीवाकडी वळणे आणि चढ याच्याशी जुळवून घेत दोघांचेही पेडलिंग सुरू होते. बराच पुढे गेल्यावर रमाकांत माझ्यासाठी थांबत होता. आम्हा दोघांना एकमेकांच्या कुवतीचा अंदाज आल्यामुळे सहजतेने सायकलिंग होत होते. तळेघर पर्यंतचे २३ किमी अंतर पार करायला तब्बल अडीच तास लागले. आजच्या राईडचा पहिला टप्पा आम्ही पार  केला होता. ह्या टप्प्याचे एक वैशिट्य जाणवले, ते म्हणजे वाटेत लागणाऱ्या हॉटेल्सची नावे देवदेवतांची होती. हॉटेल भीमाशंकर, हॉटेल वैष्णवधाम, हॉटेल शिवशंकर, हॉटेल साई  इत्यादी. हिंदु देवदेवतांची नावे हॉटेलला देऊन नक्की काय सांगायचे असेल?  इतर धर्मियांच्या देवतांची किंवा प्रेषितांची नावे हॉटेलला दिलेली माझ्या पाहण्यात अजूनपर्यंत आली नाहीत. 

तळेघरच्या हॉटेल आनंद मध्ये मस्त ताकाची कढी वडा मिळतो, तसेच वर भरपूर कढी मिळते, असे रमाकांत म्हणाला. आज कढी वडा बनविला नव्हता. हॉटेलात मटकी आणि वाटाणा मिसळ तयार होती. तर्रीच्या वासानेच भूक खवळली.  चमचमीत मिसळ पावाबरोबर कवडेदार दही आले. मिसळीच्या तर्रीचा आस्वाद घेत,  दोन पावासोबत दोन बाऊल रस्सा ओरपला. त्यानंतर मसाले चहाने तोंडाची भगभग शमविली. 

येथून श्री भीमाशंकर देऊळ १२ किमी आहे. सगळा चढाचा रस्ता होता. देवदर्शन घेऊन पुन्हा तळेघरला यायला दोन तास लागणार होते म्हणून रमाकांतने दुपारच्या जेवणाची चौकशी सुरू केली. आनंद हॉटेलच्या मालकाने असमर्थता दर्शविली. सध्याच्या परिस्थितीमुळे जेवणासाठी वाटेत कुठेही हॉटेल उपलब्ध नाहीत हे कळले. आमच्या समोरच तोंडाचा मास्क खाली करून  एक सद्गृहस्थ मिसळ खात होते. ते हसून म्हणाले, 'चला, जेथे मी जेवतो तेथे तुमची व्यवस्था होईल'.  हॉटेल समोर असलेल्या आरोग्य केंद्रात श्री भंडारे, फार्मासिस्ट म्हणून काम करत होते. आम्ही मुंबई वरून सायकलिंग करत येथपर्यंत आलो आहोत आणि आज देवदर्शन करून तळेगावला जाणार , हे ऐकून ते आश्चर्यचकित झाले. काही गोळ्या औषध हवे काय याची त्यांनी विचारणा केली. जवळच एका घरात आम्हाला घेऊन गेले. सूर्यवंशी ताईंच्या खानावळीत  जेवणासाठी ऑर्डर दिली.  भंडारे साहेबांचे आभार मानून आम्ही श्री भिमाशंकरकडे प्रस्थान केले. 

तीन किमीवरील राजपुर पर्यंत चढाचा रस्ता असून वेडीवाकडी वळणे कमी होती. त्यानंतर भीमाशंकर वन्यजीवन अभयारण्य सुरू झाले.  निबीड अरण्य असल्यामुळे झाडांच्या गुहेतून आमची सफर सुरू झाली. उन्हाचा लवलेश रस्त्यावर नव्हता. वातावरणात थंडी होती. मोरांचे केकारव आणि दिवसा रातकिड्यांचा किर्रर्र किर्रर्र आवाज हे निसर्ग संगीत ऐकतांना "निसर्गाच्या शांततेचा आवाज" क्षणभर थांबून मनाच्या अंतरंगात साठवू लागलो. इतक्यात चीक.. चीक.. फुरर... आवाज आला. वेगळाच आवाज होता. समोरच्या झाडावर निरखून पाहिले, तर "शेकरू" माझ्याकडे टक लावून पाहत होता. तांबूस राखाडी रंगाचा लांबसडक झुबकेदार शेपूट असणारा, खारी सारखा दिसणारा परंतु खारीच्या चारपट मोठा असणारा शेकरू मी पहिल्यांदा पहिला होता.

 स्तिमित होऊन भान हरपून  त्याच्याकडे पाहत होतो. हा शेकरु उंच झाडाच्या फांदीवरून हवेत झेप घेऊन दुसऱ्या झाडावर आकाशात तरंगत जातो, हे पुस्तकात वाचले होते. त्याला पाहण्याचा दुर्मिळ योग आज या सायकल सफरीने घडवून आणला होता. सायकलिस्ट म्हणजे निसर्गसंरक्षक म्हणूनच शेकरूने दर्शन दिले असावे. डोळ्यांचे पारणे फिटले.

त्या धुंदीतच ती अवघड वेडीवाकडी वळणे सहज चढून गेलो. भिमाशंकरच्या प्रवेशदाराजवळ पोलिसांनी अडवले आणि पुन्हा वास्तवात आलो. 'पूढे जाता येणार नाही, येथूनच परत फिरायचे' हवालदार साहेबांचे फर्मान आले. त्यांना नमस्कार केला आणि सायकल बाजूला लावली. 'किती जण आहात तुम्ही',  'साहेब दोघेजण', एक जण पुढे गेलाय ! पाच मिनिटे काहीही न बोलता चौकीजवळ थांबलो. "कुठून आलात',  'साहेब, 'मुंबईवरून आलोय', 'करोना लवकर संपवा म्हणून साकडं घालायला आलोय". हवालदार साहेबांना काय वाटलं कोणास ठाऊक, मला म्हणाले, जा ! जाऊन या मंदिरापर्यंत! जास्त वेळ नका थांबू !!! पडत्या फळाची आज्ञा मिळताच सायकलवर तातडीने स्वार झालो आणि मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ पोहोचलो. रमाकांत माझी वाट पाहत होता. घडलेला वृत्तांत सांगितला. रमाकांत म्हणाला, ' मी आलो तेव्हा चौकीमध्ये कोणीही नव्हते. मंदिराकडे उतरणाऱ्या पायऱ्यासमोरच लोखंडी बॅरिकेट्स लावून रस्ता बंद केला होता. श्री भीमाशंकर कमानीचे दर्शन घेऊन दोघांचे फोटो सेशन झाले.

 येथे सुद्धा लाडवाचा प्रसाद भक्षण केला. मुंबईत  भीमाशंकर सायकल वारीचा संकल्प केला होता. त्याची पूर्तता आज झाली होती. 

वीस वर्षांपूर्वी थंडीच्या दिवसात भीमाशंकरला भोरगिरी वरून रात्री ट्रेकिंग करत आलो होतो. त्यावेळी  समोरील रस्त्यावर छोटी छोटी हॉटेल्स होती. सकाळीच एका हॉटेलमध्ये  मोड फोडलेल्या मटकीची वाफाळलेली तर्रीबाज मिसळ खाल्ली होती. वीस वर्षांपूर्वीची चव अजूनही तोंडात घोळतेय. या पट्ट्यातील मसालाच लाजवाब आहे. बाजूचा सरबतवाला सुद्धा आठवतोय. गोटी सोडा, लिंबू सरबत म्हणजे ग्रामीण जीवनाची ओळख होती. रमाकांत काही महिन्यांपूर्वी येथे आला होता तेव्हा मंदिर परिसर भाविकांनी गजबजलेला होता. परंतु आज संपूर्ण परिसर सामसूम होता. 

जुन्या आनंददायी आठवणींना उजाळा देत परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. पोलीस चेकपोष्ट जवळ हवालदार साहेबांना नमस्कार केला आणि अभयारण्यात शिरलो. आता उताराचा रस्ता होता, परंतु वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवावे लागत होते. अर्ध्या तासात तळेघरला खानावळीत पोहोचलो. 

आमच्या पुढे दोन व्यक्ती होत्या. आमची चौकशी केल्यावर ही खानावळ तुम्हाला कशी सापडली याची विचारणा झाली, आरोग्य केंद्रातील भांडारे यांचे घेताच, त्यांना आनंद झाला.  त्याच आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ रमाकांत आणि डॉ चेतन यांनी आपली ओळख सांगितली. त्यांच्याशी चर्चा करताना, सायकलिंगचा उद्देश सुदृढ शरीर ठेऊन डॉक्टरांपासून चार हात लांब राहणे, तसेच  पर्यावरण  प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी हातभार लावणे आणि निसर्गभ्रमंती हा आहे. या सर्व बाबींसाठी जनमानसांना सायकलिंग करण्यास उद्युक्त करणे यासाठीच आमचे प्रयत्न आहेत. डॉ चेतन म्हणले सायकलिंगद्वारे मधुमेह सुद्धा दूर ठेवता येतो. डॉ रमाकांत, कोणती सायकल घेऊ याची विचारणा करू लागले.

  दोन्ही डॉक्टरांनी आरोग्यकेंद्राला भेट देण्याची विनंती केली. आज सुद्धा बराच मोठा पल्ला गाठायचा असल्यामुळे, पुढच्या वेळेस त्यांच्या केंद्रास भेट देण्याचे आश्वासन देऊन त्यांचा निरोप  घेतला. 

दहा मिनिटात जेवण पुढ्यात आले. वरण, भात, पोळी, पांढऱ्या भोपळ्याची भाजी, मटकीचे कालवण आणि घरचे लोणचे असे सुग्रास जेवण जेवताना घरची आठवण झाली. . मायेच्या ओलाव्यात ८० रुपयात  मिळालेले  जेवण  पंचतारांकित हॉटेलच्या जेवणाला सुद्धा भारी होते. तृप्त मनाने सूर्यवंशी ताईंचे आभार मानले आणि पुढील सायकलिंगला सुरुवात केली.

चांगले काम,  चिकाटी आणि परिश्रमपूर्वक करत असलो की प्रत्येक व्यक्ती आणि निसर्ग तुम्हाला साथ देतो याची पुन्हा एकदा प्रचिती आली. 

तळेघर कडून घोडेगावला जाणार रस्ता बायपास करून उजवीकडे राजगुरूनगर, भोरगिरीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळलो. बायपासकडे येताच रमाकांत म्हणाला, 'एकदम जपून, अतिशय तीव्र उतार आहे'. खरोखरच ४५ अंशामध्ये खाली उतरणारा रस्ता पोटात गोळा आणणारा होता. रमाकांतची रोडिओ असल्यामुळे त्याला आणखीनच सावधगिरी बाळगावी लागत होती. उतारासह वेडीवाकडी वळणे सुद्धा सायकलचे कसब पणाला लावत होत्या. अशा उतारावर जर बारीक राळ किंवा खडी आली की सायकल कंट्रोल करणे अतिशय कठीण काम होते. हायड्रॉलीक ब्रेक असून सुद्धा हात दुखू लागले. रमाकांतच्या ब्रेक मधून तर करर्  करर् आवाज येत होता. 

शेवटी भोरगिरी राजगुरूनगर बायपास जवळील शिरगाव गावात  पोहोचलो. समोर असणाऱ्या चहाच्या टपरीवर सायकल थांबविली. त्या टपरीचे नाव होते भीमाशंकर हॉटेल. पुन्हा थोडे हसू आले. 

 हाताला प्रचंड रग लागली होती. ग्लोव्हज आणि स्किनर काढून मनगटाची आणि बोटांची कसरत केली तेव्हा कुठे रग शांत झाली. चहा पितापिता मालकाला तळेगाव दाभाडेकडे जाणारा रस्ता विचारला. रस्ता आता भीमा नदीच्या कडेकडेने चालला होता. पुढे उजव्या बाजूला वळून पूल ओलांडून भीमा नदी ओलांडली. 

आता अंगावर येणारा घाट सुरू झाला. छोटा रस्ता आणि सरळसोट चढाचा घाट जणू आमची परीक्षाच पाहत होता. त्यात खडबडीत रस्ते म्हणजे कठीण परीक्षा पेपर होता. अशा बऱ्याच परीक्षा रमाकांत चांगल्या मार्कने पास झाला होता. पण माझी पहिलीच  वेळ होती. चारवेळेला केलेली दिंडीगड सायकलिंग येथे उपयोगाला आली. त्यामुळे काठावर का होईना परंतु परीक्षा पास झालो होतो. 

धामणगावचा अवघड घाट चढून गेलो. पुन्हा  थोड्यावेळात उतार सुरू झाला. पुन्हा घाट सुरू. अशी वरखाली दमविणारी कसरत चालू होती.  आजूबाजूला शेतात काम करणारी मंडळी कुठे चाललात असे विचारायची, तळेगाव म्हटल्यावर त्यांचे चेहरे प्रश्नर्थक व्हायचे . तुम्ही राजगुरू नगर मार्गे जायला हवे होते.या मार्गाने सर्व घाटच घाट आहेत. येथील घाटाचा अनुभव घ्यायचाय आणि तुम्हाला भेटायचं होतं म्हणूनच या मार्गाने आलो. लोकांचे हसतमुख आशीर्वाद घेऊन आमचे सायकलिंग सुरू होते. आतापर्यंत पाच घाट चढून उतरलो होतो.

समोरच्या डोंगर माथ्यावर पवनचक्यांच्या रांगा पसरल्या होत्या. डोंगरावरून वाहणाऱ्या वाऱ्याचा उपयोग विद्युत निर्मिती साठी करण्यात आला होता. 

वाढत्या उन्हामुळे घाटाच्या चढावर प्रचंड दमछाक होत होती. दुपारच्या जेवणामुळे सुद्धा रिफ्लेक्सेस कमी झाले होते. दोन तासात घोटेवाडी येथे पोहोचलो. येथील चढावर प्रचंड खराब रस्ता होता. मी जोर लावून कसाबसा चढून गेलो 
रमाकांत चढ चढत असताना शेतातून एक वयस्क माणूस धावत आला आणि म्हणाला, ' थांबा साहेब थांबा.., मी दळवी, तुम्हाला ओळखलं मी, तुम्ही मागच्या वेळेस आलात तेव्हा बराच वेळ आपण बोलत होतो. माझी मुलगी सुद्धा तुमच्या इथे ठाण्याला राहते, आता शेतीच्या कामासाठी इकडे आलीय. रमाकांत चढावर असल्यामुळे  सायकल ढकलण्या शिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता.

 पुढच्या गावात रमाकांतची ओळख निघाली. शिंदे ताईंनी गुळाचा चहा आणि मारी बिस्किटे दिली. परंतु पैसे घ्यायला तयार होईनात. बळेच त्यांच्या हातात पैसे कोंबले. 

घोटावाडी गाव सोडले आणि पाठोपाठ दोन घाट लागले. त्यानंतर कुडे गावापर्यंत सरळ रस्ता होता. गावातील शंकराच्या मंदिरासमोर सभामंडप होता. थोड्या विश्रांतीसाठी थांबलो. गावातील  माणसे आणि लहान मुले पुढे आली. आमची चौकशी करू लागली. 'प्रदूषण मुक्त भारत' ही संकल्पना घेऊन आम्ही फिरतोय हे सांगितले.

गावातून बाहेर पडल्यावर संधीप्रकाश सुरू झाला.  वाटेत येथे गुराखी मुले भेटली. त्यांना गियरवाल्या सायकलचे खूप अप्रूप वाटत होते. पुढे काकूबाई मंदिर लागले. येथे बीमर लाईट सुरू केले. वाटेत समोरच्या महादेवाच्या डोंगरावर बऱ्याच पवनचक्क्या लावलेल्या होत्या. या महादेवाच्या डोंगराला वळसा मारून डोंगराच्या कडेकडेने पुढे मार्गक्रमण सुरू झाले.येथून चढ उतार चढ उतार असाच रास्ता होता.  जवळपास १७ किमी राईड झाली, त्या साठी तब्बल दोन तास लागले होते
आता अंधार पडायला सुरुवात झाली होती त्यामुळे बीमर लाईट लावून पेडलिंग सुरू केले. पुढचा रस्ता घाट माथ्यावरून पुढे पुढे सरकत होता. भामा असखेड धरणाचा पाणलोट परिसर आजूबाजूच्या गावाच्या लाईट्स मुळे चमचमत होता. पालू गावात जेवणाबाबत चौकशी केली असता पाईट गावात व्यवस्था होईल हे समजले. सर्व रस्ता घाटमाथ्यावरून असल्यामुळे बराचसा थंडावा जाणवू लागला. हेदृज गावानंतर उतार सुरू झाला. थोड्या वेळातच पाईट गावात प्रवेश केला.
गावातील कुंडेश्वर धाब्यावर पोहोचलो. आता रात्रीचे  आठ वाजले होते. चरचरून भूक लागली होती. सामिष भोजनाची ऑर्डर दिली. ढाबा अतिशय स्वच्छ आणि टापटीप होता. मालक अरुण अहेरकर याने आमची चौकशी केली. त्याला खूप आनंद झाला,  आम्ही मुंबईवरून सायकलिंग करत त्याच्या धाब्यावर आलो याचा. 
प्रथम सूप नंतर सागुती, उकडलेले अंडे, भाकरी आणि स्वादिष्ट  इंद्रायणी भात खाऊन मन तृप्त झाले.

 स्वीट डिश बाबत विचारणा केली असता, मोमो मोदक विशेष भेट म्हणून खायला मिळाले. अरुण म्हणाला येथून चार किमी वर डोंगरात प्राचीन कुंडेश्वर महादेव मंदिर आहे. पुढच्या वेळेस जरूर त्या मंदिरास भेट देऊ असे आश्वासन अरुणला दिले.  मुंबईच्या स्टार कलाकारांसारखी आमची खातीरदारी झाली. आमच्या बरोबर खूप फोटो अरुण आणि त्याच्या सहकाऱ्यांनी काढले. 
रात्रीचे नऊ वाजले होते आणि तळेगाव पर्यंत आणखी ३० किमी राईड करायची होती. तसेच दोन घाट पण चढायचे होते. सुग्रास जेवणामुळे नाईट राईड करायला दोघेही सज्ज झालो होतो. 

रस्त्यात मोटार सायकलने जाणारी मुले भेटली. मुंबई वरून सायकलिंग करत आलो आहोत, हे कळल्यावर त्यांना खूप अप्रूप वाटले. त्यांना सायकलिंग आणि प्रदूषणमुक्त पर्यावरण याची माहिती दिली. या तरुणांना आम्ही सर्व घाट चढून आलोय, हे  खरे वाटेना.  त्यामुळे पुढे जाऊन काकूबाई मंदिरा जवळील घाटात टॉपला उभे राहून आम्ही रात्रीच्या अंधारात कशाप्रकारे घाट चढतो आहोत, हे पाहात होते. हा घाट अतिशय कठीण होता. गियर रेशुओ एक एक लावून सुद्धा सायकल झिक झाक करावी लागत होती. हा घाट सायकल वरून न उतरता चढल्यावर सर्व मुले आम्हाला शेक हॅन्ड करून मागे फिरली. 

धामणी फाट्या नंतर आता बऱ्यापैकी मोठा आणि दोन पदरी रस्ता सुरू झाला. घाटात ग्रॅज्युअल चढ होता.  घाट संपवून तळेगाव midc मध्ये प्रवेश केला.

 अतिशय प्रशस्त आणि काँक्रीटच्या रस्त्यावरून सायकल चालवायला खूप कमी प्रयास लागतात. त्यामुळे गाणे गुणगुणत तळेगाव दाभाडेकडे प्रवास सुरु झाला. इंद्रायणी नदी ओलांडून  यशवंत नगर मध्ये पोहोचायला रात्रीचे साडेअकरा वाजले होते.

रमाकांतचा मित्र, अमितच्या घरी आमचा रात्रीचा मुक्काम होता. अमित घरी नव्हता. घराची चावी शेजाऱ्यांकडे दिली होती. त्यांना रात्रीचे उठवून चावी घेणे, रमाकांतला अडचणीचे वाटत होते. म्हणून रमाकांतने अमितला फोन केला. अमितने शेजाऱ्याला फोन करावा अशी त्याची अपेक्षा होती. 
 परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे रमाकांतचा मित्र अमित मोने आम्हाला रिसिव्ह करायला मुख्य रस्त्यावर उभा होता. इंद्रायणी नदीपासून कार ने अमित आम्हाला फॉलो करत होता. आमच्या नकळत त्याने आमचे फोटो सुद्धा काढले होते. 
 
त्याच्या मागोमाग आम्ही कल्पक सोसायटीत प्रवेश केला आणि थेट दुसऱ्या मजल्यावरील अमितच्या फ्लॅटमध्ये सायकल विसावल्या. अमित भेटल्यामुळे आमचा आजच्या सायकल सफरीची सांगता सुखरूप झाली होती
 
अतिशय उस्फुर्त आणि बोलका अमित प्रथम भेटीतच भावला. फ्रेश होऊन रात्री एक वाजेपर्यंत त्याच्याबरोबर गप्पा मारत होतो. गिरगावच्या ब्राम्हण अळीत राहणारा अमित,  करोना काळात बऱ्याच वेळा तळेगावला एकटाच येऊन राहतो. एकांत शांतता आणि निसर्ग त्याला प्रिय आहे.

आज ३८८० फूट चढाई करून १२० किमी अंतर पार केले होते. तसेच सकाळी साडेसात ते रात्री साडेअकरा अशी १६ तासांची राईड झाली होती. 

रात्री झोपताना रमाकांत म्हणाला, सतीश खूप दमला असशील ना !, मी हसून म्हणालो, ' 'रमाकांत, आता नाईट राईड करून मुंबई गाठूया काय!'. हे वाक्य ऐकताच रमाकांत डाराडूर झोपी गेला.

आजच्या राईडने एक गोष्ट लक्षात आली, ध्येय कितीही कठीण असले तरी, जबरदस्त मानसिक तयारी, दुर्दम्य आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला इप्सित साध्य करून देते. 

माझ्या भारत भ्रमणाची ही मुहूर्तमेढ होती ....


सतीश जाधव
आझाद पंछी.....

11 comments:

  1. Sir आता तुमच्या बरोबर मनाने भीमाशंकर ride झाली. पण आता प्रत्यक्ष ride करायचे वेध लागले. नक्कीच ही खुपच कसं काढणारी ride आहे, आता तिच्या साठी तयारी सुरू.

    ReplyDelete
  2. सर्पमित्र दत्ता बोंबे याचे अभिप्राय,

    सतीश मित्रा सायकल राईड बद्दल छान लेखन केले आहे भीमाशंकर राईड पूर्ण केल्याबद्दल तुमच्या दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन

    ReplyDelete
  3. लेख वाचत असताना प्रत्येक्षात आपल्या बरोबर फिरल्याचा देखील भास झाला खूप सुंदर लेख आहे सर

    ReplyDelete
  4. Great.. Congratulations & best wishes

    Anil

    ReplyDelete
  5. खूप छान वर्णन आहे

    ReplyDelete
  6. "रात्री झोपताना रमाकांत म्हणाला, सतीश खूप दमला असशील ना !, मी हसून म्हणालो, ' 'रमाकांत, आता नाईट राईड करून मुंबई गाठूया काय!'. हे वाक्य ऐकताच रमाकांत डाराडूर झोपी गेला." ...... This is just like sixer at the last ball.

    भारत भ्रमण साठी मी तुमच्या बरोबर असणार.

    ReplyDelete
  7. लेका मानलं राव लई भारी सफर मारली म्हाराजांना कळीवतो
    लोह पुरुषांनो नमस्कार

    ReplyDelete
  8. एकदम छान लेखन केलेत ,सायकल सफरीचा आनंद घेतला वाचता ना

    ReplyDelete
  9. मित्राचे अभिप्राय !!!

    आदल्या दिवशी २० तास आणि १७२ किमी ची खडतर सायकल सफर करून, श्री भीमाशंकर दर्शनासाठी १२० किमी अंतरासाठी ३८८० फुटांची चढाई करत १६ तास सायकलिंग !!

    देवदर्शनासोबतच सायकलिंग करताना ज्ञात असलेले अनुभव,तज्ञांचे मार्गदर्शन सल्ले आणि त्याचा वापर करून काळजीपूर्वक केलेल्या सायकलिंगची माहिती मिळते. तसेच निसर्गातील विविध प्रकारचे वृक्ष, प्राणी, जलाशय, धरण यांचे यथार्थ वर्णन वाचून आनंद मिळतो .

    निरनिराळ्या कार्य क्षेत्रांत कार्यरत असणारे, रस्त्यावरील इतर प्रवासी, शेतकरी ,
    हॉटेल मालक इत्यादी लोकांशी झालेल्या भेटींमुळे मनुष्य स्वभावाच्या विविध पैलूंचे दर्शनही लेख वाचताना होते.

    प्रवासादरम्यान क्षुधाशांती साठी असणारी हॉटेल्स पुरवत असलेले खाद्यपदार्थ आणि त्यांची असलेली देवदेवतांची नावे यांचे मनाला बोचणारे शल्य ही वाचताना अधोरेखित होते.

    सजग मनाने, निसर्गाचा आनंद लुटत,मनुष्य स्वभावाच्या भावभावनांचा आदर करत, संपूर्ण भारत दर्शनाची मुहूर्त मेढ श्री भीमाशंकर दर्शनाने रोवली ह्याचा खूप आनंद झाला.

    आपल्या आनंददायी सायकल प्रवासासाठी...

    खूप खूप शुभेच्छा !!

    ReplyDelete
  10. कोरोना काळात आपण निसर्ग भ्रमंती करीत आहात याबद्दल खूप आनंद वाटतो आणि त्याबाबतचे प्रवासवर्णन वाचून मन अतिशय प्रसन्न झाले.
    -स्वप्निल नागरे

    ReplyDelete