Saturday, October 31, 2020

श्री भीमाशंकर सायकल वारी...दिवस पहिला

श्री भीमाशंकर सायकल वारी
मैत्रीची मांदियाळी.....

27 ते 29 ऑक्टोबर 2020

// दिवस पहिला //


सायकल वरून भारत भ्रमंती केलेल्या रमाकांत महाडीकची ओळख मागच्या जानेवारीमध्ये सायकल कट्टा कार्यक्रमाच्या अनुषंगाने झाली होती. त्यावेळी नुकतेच ते अरुणाचल प्रदेश सायकलिंग करून आले होते. "तुमच्या बरोबर सायकलिंग करायचे आहे" असे त्यांना म्हणालो होतो.

गेल्या आठवड्यात रामकांतचा फोन आला, भीमाशंकर  राईड करायची आहे. त्यांच्या बरोबर राईड करायला मिळणार याचा खूप आनंद झाला. तात्काळ होकार दिला. 

आदल्या दिवशी सोमवारी समर्पयामि शॉपीमध्ये माझ्या सायकलचे ओपन सर्व्हिसिंग होते.  तेव्हा  रमाकांत खास मला भेटायला येऊरला आले होते. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठे असलेले रमाकांत सायकल क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्व आहे.  पूर्वाश्रमीचा ट्रेकर असलेला रमाकांत आता सायकलिस्ट झाला आहे. आम्हा दोघांच्या व्हेव लेंथ एव्हढ्या जुळल्या की अहो रमाकांत, वरून अरे रमाकांत कधी झाले कळलेच नाही.

 सोबत काय काय घ्यायचे, तसेच रात्री सुद्धा राईड करावी लागेल, त्यामुळे वेळेला शाळा, मंदिरात झोपावे लागेल. त्यासाठी मॅट आणि स्लीपिंग बॅग तसेच चांगल्या प्रतीचे लाईट्स घ्यावे लागतील, याची कल्पना रमाकांतने दिली. मनाची तयारी झाली होतीच,  आता सामानाची सुद्धा तयारी केली. 

मंगळवारी, सकाळी साडेतीन वाजता उठून स्वप्नाने दुपारच्या जेवणासाठी भाजी पोळी करून दिली. तासाभरात तयार होऊन साडेचार वाजता घर सोडले. सर्व सामान पॅनियर बॅगेत व्यवस्थित राहिले. पाठपिशवीत पाण्याची पोटली जेवणाचा डबा आणि फळे ठेवली होती. सोबत संगीत बाजा सुद्धा होता. 

परेल वरून पहिली लोकल पकडून सकाळी सहा वाजता कळवा स्टेशनला पोहोचलो. सुहास्य वदनाने रमाकांतने स्वागत केले. डॉ. राजेश आम्हाला चियर अप करण्यासाठी स्टेशन जवळ आला होता. आमच्या सोबत तो कल्याण पर्यंत राईड करणार होता. 

आता सुरू झाली भीमाशंकर राईड... बराच मोठा पल्ला होता... दुर्दम्य इच्छा शक्ती होती... आणि दोस्तांची साथ होती... विशेष म्हणजे सोलो रायडर रमाकांतच्या अनुभवाची जोड मिळणार होती. एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती. 

कळवा ते कल्याण हा पहिला टप्पा होता. कळवा नाक्यावरून आम्ही तिघे पूर्व द्रुतगती मार्गावर आलो. खरेगाव टोल नाका सोडल्यावर जोरदार स्प्रिंट सुरू झाली. खाडीचे वारे वाहत होते. हायवेला वाहनांची वर्दळ होती. आमचा जोश सुद्धा प्रचंड होता. तासाभरातच कल्याण मुरबाड क्रीक ब्रिज ओलांडून दुर्गाडी, कल्याण जंक्शन जवळ पोहोचलो. येथे रमाकांतची सायकलिस्ट मैत्रीण ममता परदेसी आम्हाला चियर अप करायला डोंबिवली वरून आली होती.

 लॉकडाउन अगोदर हीच भीमाशंकर राईड ममताने रमाकांत बरोबर केली होती. त्यावेळच्या गमती जमती भरभरून सांगत होती. कल्याणच्या संतोषीमाता मार्गावर एका टपरीवर चहा प्यायला थांबलो. 

येथे सर्पमित्र दत्ता बोंबेची भेट झाली. मोटारसायकल वरून गावाला निघालेला दत्ता आम्हाला चहा टपरीवर पाहून थांबला. आम्ही भीमाशंकर राईडला निघालोय हे ऐकून एकदम खुश झाला. चहा पिता पिता दत्ता त्याचे ट्रेकिंग, सायकलिंग आणि सर्पांच्या सहवासाने अनुभव सांगू लागला. गम्मत म्हणजे पहिल्या भेटीतच ममता आणि दत्ता माझे खास मित्र झाले होते. ट्रेकर्स, सायकलिस्ट आणि निसर्गप्रेमी यांची जातकुळी एकच असते, याचा प्रत्यय आला.

पुढे शहाड स्टेशन रोड फाट्यावर थांबलो. बगळ्यांच्या स्टॅच्यू जवळ दत्ताने आम्हा चौघांचे फोटो काढले. येथेच योगीधाम मध्ये माझा मित्र भास्कर इसामे राहतो. त्याला आठवणीने फोन केला आणि भीमाशंकर राईड करतोय हे सांगितले. भास्कर म्हणाला,  मुरबाडच्या पुढे शिवळे गावात माझे घर आहे. तेथे आई बाबा आहेत. आईला तुमच्या न्याहारीची व्यवस्था करायला सांगतो. भास्करच्या बोलण्याने खूप आनंद झाला. पुढचा पडाव शिवळे गावात नक्की केला. मुरबाडला  राहणाऱ्या हरीश गगेला सुद्धा फोन केला. तो कामावर जाण्यासाठी कल्याण स्टेशनला पोहोचला होता. त्याने आम्हाला सायकलिंग करताना ओझरते पाहिले होते. राजेश आणि ममताला निरोप देऊन आमची राईड सुरू झाली.

सकाळचे साडेसात वाजले होते. ऊन वाढायला सुरुवात झाली होती. सेंच्युरी रेयॉन कंपनी जवळ रस्त्याचे काम सुरू होते. त्यात डंपर आणि ट्रक यांची रहदारी होती. त्यामुळे खणलेल्या रस्त्यावरूनच राईड सुरू होती. म्हारळ गाव सोडल्यावर मस्त डांबरी रस्ता सुरू झाला. आता मुरबाडच्या दिशेने राईड सुरू झाली. 

माळशेजच्या या रस्त्यावरून माझी चौथी राईड होती. पण या वेळी माझ्या समवेत अतिशय माहितगार आणि सायकलिंग मधील बापमाणूस रमाकांत साथीला होता. तसेच तो रोडिओ सायकल वरून ही राईड करत होता. त्यामुळे त्याच्या बरोबरीने mtb वरून राईड करण्यासाठी माझा कस लागत होता. सरळ रस्त्यावरून त्याच्या बरोबरीने सायकल चालविणे जमत होते. पण चढाला मी मागे पडत होतो. ही कसर उताराला भरून काढत होतो. खरंच या वेळी माझ्या सायकलिंगची सत्व परीक्षा होती. आम्ही दोघेही एकमेकांसाठी नवीन होतो. रमाकांतचे जलद रायडिंग स्तिमित करणारे होते तर माझा आत्मविश्वास सुद्धा प्रचंड होता. त्यामुळे कधी तो पुढे कधी मी पुढे असा लपंडाव सुरू होता. 

वाढते ऊन, हेड विंड आणि वेगवान सायकलिंग ही माझी इंड्यूरन्स टेस्ट होती. आज पट्टीच्या सायकलिस्ट बरोबर मी सायकलिंग करत होतो, हे माझे भाग्यच होते. माझीच परीक्षा मीच घेत होतो. रमाकांतचे सायकल वरील स्पिनींग अतिशय लयदार होते. जुन्या रेल्वेच्या वाफेच्या इंजिनच्या शाफ़्ट प्रमाणे सतत त्याचे पाय पेडलवरून फिरत होते. 

दोन तासात चाळीस किमी अंतर पार करून आम्ही शिवळे गावातील भास्कर इसामेच्या फार्म हाऊसवर गेलो.  दत्ता बोंबे मोटार सायकल वरून शिवाळे गावाच्या मंदिराजवळ आमची वाट पाहत थांबला होता. त्याला सुद्धा भास्करच्या घरी घेऊन गेलो. 

बाबांनी आमचे स्वागत केले. आईने भाकऱ्या आणि कडवे वालाची उसळ अशी फार्मास न्याहारी केली होती.  सोबत उडदाच्या पापड्या होत्या. भरपेट नास्ता केल्यावर आईने गवती चहाची पात घालून केलेला मसालेदार चहा आम्हा तिघांना दिला. श्री भीमाशंकराच्या आधी आई बाबांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. दत्ताने आमचा गृप फोटो काढला.

  बाबांनी माझा फोन नंबर घेतला आणि कधीही या रस्त्याने जाणे झाले तर घरी जरूर या असे आमंत्रण दिले. या पाहुणचाराने आम्ही भारावून गेलो. विशेष म्हणजे दोन तासापूर्वीच ट्रेकर सायकालिस्ट आणि सर्पमित्र दत्ताची ओळख झाली होती. पण तो आता भास्करच्या आई बाबांचा सुद्धा परिचित झाला होता.  ट्रेकर आणि सायकलिस्ट भास्करला भेटण्याची इच्छा त्याने प्रकट केली. 

देवदर्शना अगोदर आई बाबांचे दर्शन घेतले. तसेच त्यांचा आशीर्वाद घेऊन माळशेज घाटाकडे सायकलिंग सुरू केले. दत्तासुद्धा आम्हाला रामराम करून मोटारसायकलने त्याच्या गावी निघाला. आता माळशेज पायथ्यापर्यंत भराभर पोहोचायचे टार्गेट होते.

वाटेतील इंदे गावाजवळ जिव्हाळा प्रतिष्ठानचे फार्म हाऊस आहे. माझा शाळकरी मित्र  संजय कोळवणकर त्याचा तहहयात ट्रस्टी आहे. जानेवारी महिन्यात या फार्म हाऊस वर आम्ही सर्व शाळकरी मित्र सहकुटुंब गेलो होतो. त्याची आठवण झाली. संजयला सरप्राईज द्यायचे म्हणून जिव्हाळा प्रतिष्ठनच्या बोर्ड जवळ थांबून आम्ही फोटो काढत होतो, तेव्हढ्यात फार्म हाऊसचा केअर टेकर लक्ष्मण समोर आला आणि म्हणाला, ' साहेब, ओळखलं तुम्हाला, चला नास्ता चहा घ्यायला' त्याला प्रेमाने भेटून आज बराच मोठा पल्ला आहे सांगून लक्ष्मणचा निरोप घेतला. 

ऊन आणखीनच तापले होते. छोटे मोठे चढ उतार सुरू झाले. मोरोशी जवळ हायड्रेशन ब्रेक घेतला. केळी खाल्ली. समोरच भैरवगड दिसत होता. बरीच ट्रेकर्स मंडळी गाड्यांनी येथे येऊन भैरवगड ट्रेक करतात. दुपारचे ऊन चढले होते. यातच घाट चढायचा होता. पण इच्छा शक्ती दुर्दम्य होती. त्यामुळे सर्व अडचणींना सामोरे जाण्याची प्रचंड तयारी होती.

दुपारी दोन वाजता सावरणे गावात पोहोचलो. त्यातही छोट्या हॉटेलमध्ये स्वप्नाने दिलेल्या चिकन सॉसेजेस भाजी पोळीवर ताव मारला. संत्र आणि सफरचंद फलाहार केला. आता भर उन्हात घाट चढायला सज्ज झालो. येथून  बारा किलोमीटर्सचा माळशेज घाट सुरू होतो. पाण्याचा बाटल्या आणि पोटल्या भरून घेतल्या. 

सुरू झाली माळशेज घाट चढाई. थोड्याच वेळात रमाकांत पुढे सरकला. संपूर्ण घाट दमदारपणे चढण्यासाठी एका विशिष्ठ वेगाने मी पेडलिंग करत होतो. आज संपूर्ण लक्ष सायकलिंगकडे केंद्रित करून स्पिनींग करत होतो. गियर रेशीओ एक तीन लावून घाट चढायचे नक्की केले होते. मध्ये मध्ये अबोली,शतावरी, सोनकी अशी फुलांची नावे दिलेले रेस्ट पॉईंट होते. परंतु जेथे रमाकांत थांबला असेल तेथेच थांबायचे हे मनाने ठरविले. एकदा का मानसिक तयारी झाली की शरीरसुद्धा त्याला सपोर्ट करते. पेडलिंग करतानाच पोटलीतले पाणी पिणे सोपे झाले होते. त्यामुळे न थांबता कासवाच्या पावलाने सायकलिंग सुरू होते. घाटाच्या अर्ध्या रस्त्यात शतावरी रेस्ट पॉईंट जवळ रमाकांत आडवा झाला होता. मला पाहून त्याने चिअर अप केले. मनाबरोबर खेळलेला पहिला डाव जिंकला होता. घाट सुरू झाल्यापासून कुठेही न थांबता अर्धा रस्ता पार केला होता. मस्त पैकी खजूर, संत्र, सफरचंद, कंद आणि ममताने दिलेली चिक्की खाऊन चक्क पंधरा मिनिटांचा हायड्रेशन ब्रेक घेतला. 

पुढची सफर सुरू झाली. माळशेज बोगद्यात पोहोचलो. येथे फोटो साठी अतिशय सुंदर लोकेशन होते. बोगद्यातून आत शिरताना बोगद्यातून येणाऱ्या प्रकाश किरणांच्या बॅकराऊंडवर सायकलिंग करतानाचे फोटो काढले. 

बोगद्याच्या काळ्या कभिन्न दगडावरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाच्या वेगवेगळ्या छटा दिव्यत्वाची प्रचिती देत होत्या. तर रामकांतचा फोटो अंधारातून प्रकाशाकडे जाणारा होता. 

"दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती" ही अनुभूती मन मंदिरात साठवून पुढची सफर सुरू केली. बरोबर पाच वाजता माळशेज घाटाच्या टॉपला पोहोचलो. पायथ्या पासून  mtdc च्या गेट जवळ यायला अडीच तास लागले होते.  होर्डिंग जवळ फोटो काढले आणि पुढे प्रस्थान केले. 

माझा सायकलिस्ट मित्र, खेडच्या अजित गायकवाडला पाच वाजे पर्यंत जुन्नरला येतो असे सांगितले होते. परंतु वेळेचे गणित चुकले होते. 

पुढचा हायड्रेशन ब्रेक करंजळा येथे  शिवशम्भो टी सेंटरकडे घेतला. कोटमाई जलाशयाच्या बाजूलाच  स्वस्तिक बोटींग सेंटर आहे. तेथे टेंटिंगची सुद्धा व्यवस्था आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये माळशेज घाटाच्या पठारावर पसरलेला हा जलाशय पाहणे म्हणजे पर्वणी होती. 

हरिश्चंद्रगडाचा परिसर पाहून, लाला लजपतराय महाविद्यालयात असताना मी आणि शरद पाटील यांनी माझा कॉलेज वर्ग मित्र अरुण सावंत बरोबर १९७५ साली केलेला पहिला ट्रेक आठवला. त्यानंतर मुंबई महापालिकेत नोकरीला लागल्यावर  पहिल्यांदा केलेल्या हरिश्चंद्रगडाच्या आठवणी जागृत झाल्या. माझे ट्रेकिंगचे गुरू शिंदे, गीते आणि मिस्त्री यांची आठवण आली. मनपाच्या नायर रुग्णालयातील माझे सहकारी मित्र विचारे, रहाटे, शानभाग, अरवंदेकर, सावंत हे त्यावेळी साथीला होते. हरिश्चंद्रगड, कोकण कडा, शंकराचे देऊळ, गुहेतील पाण्यात असलेले शिवलिंग साऱ्याचा आठवणीने मन भावविभोर झाले. 

   रमाकांतने कोकणचा मेवा शेंगदाणा लाडू आणले होते. त्यावर ताव मारला फक्कड चहा घेऊन पुढची सफर सुरू केली. करंजाळे वरून वेळ खिंड ओलांडून,  गणेश खिंडीमार्गे जुन्नर एकवीस किमी वर आहे. दोन्ही घाट पार करून जुन्नरला पोहोचायला रात्रीचे आठ वाजणार होते. अजितला फोन करून जुन्नरला पोहोचण्याची वेळ सांगितली.
   
 वेळ घाट सहज पार झाला. गणेश खिंडीच्या पायथ्याला भला मोठा बोर्ड लावला होता. खिंडीत रस्त्याचे काम चालू असल्यामुळे गणेश खिंड बंद आहे, बनकर फाट्यावरून जुन्नरकडे जावे. जवळच काम करत असलेल्या गावकऱ्याकडे विचारणा केली असता कळले, दोन चाकी गाड्या जाऊ शकतील पण रस्ता अतिशय खराब स्थितीत आहे. अंधार पडायला सुरुवात झाली होती. बीमर लाईट लावून घाटाची चढाई सुरू केली. रमाकांत संधीप्रकाशात लाईट न लावता सायकल हाकत होता. खड्डे-खुड्डे, वेडीवाकडी वळणे, काही ठिकाणी खणलेले चर यातून गाडी चालविणे अतिशय जिकरीचे होते. त्यात वरून येणाऱ्या मोटरसायकलींचे प्रखर हेडलॅम्प डोळ्यावर अंधारी आणत होते. सर्व विपरीत परिस्थितीवर मात करून साडेसहा वाजता गणेश खिंडीच्या टॉपला पोहोचलो. बाप्पाचे दर्शन घेतले. बाप्पाला लाडवाचा प्रसाद दाखवून तो भक्षण केला. आता मिट्ट काळोख पसरला होता. 

 येथे रमाकांतने बीमर लाईट सुरू केला. भन्नाट उतारावर आणि खडबडीत रस्त्यावर सायकल माझी सायकल बेभान पळू लागली.  माझ्या mtb सायकलचे टायर २.२ चे असल्यामुळे घसरण्याची शक्यता बिलकुल नव्हती. पण रमाकांतची रोडिओ अतिशय सावधगिरीने गणेश खिंड उतरत होती. रस्त्याचे काम करणारे डंपर प्रचंड धुरळा उडवत होते. त्यामुळे गडद अंधारात बीमर लाईट रोडवर पडत नव्हती. गणेश खिंडीच्या जुन्नर कडच्या उतारावर वळणे कमी आहेत. तसेच मागच्या वेळेस याच बाजूने गणेश खिंड चढल्यामुळे रस्त्याची माहिती झाली होती. एक मोठा वळसा घेऊन पुढील वळणावर असलेल्या, 'क्षणभर विश्रांती' या हॉटेल जवळ रमाकांतची वाट पाहत थांबलो. मागच्या वेळेस या हॉटेलच्या बाहेर सिम्बल म्हणून बैलगाडीची एक चाक होते. रस्त्याचे काम चालू असल्यामुळे, हॉटेल समोरून ते गायब झाले होते.  रमाकांत येताच क्षणभर विश्रांती घेऊन पिंपळगावकडे पुढची राईड सुरू झाली. मागच्या वेळेस लक्ष्मण नवलेच्या पिंपळगावाच्या आत्याच्या घरी भेट दिली होती. त्याची आठवण झाली. 

उतार संपून आता जुन्नरच्या वेशिजवळ आलो आणि चढाला सुरुवात झाली. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला नतमस्तक झालो. अंगात विशेष बळ संचारले आणि चढ सहज पार केला. बरोब्बर आठ वाजता आम्ही जुन्नर एस टी स्टँड जवळ पोहोचलो.  अजित पाहुण्यांसह जुन्नर कडे येत होता. 
आज जुन्नर पर्यंत १३६ किमीचा एक मोठा टप्पा पार केला होता. जोरदार भूक लागली होती, त्यामुळे जेवणाच्या हॉटेलची शोधाशोध चालू होती. तेव्हढ्यात अजित कार घेऊन पाहुण्यांसह प्लॅटिनम हॉटेल जवळ हजर झाला. माझा सायकलिस्ट मित्र अजित गायकवाडने साडूभाऊ श्री  मनोज फदाले साहेब (C R P F अधिकारी ) यांची ओळख करून दिली. सोबत मनोज भाऊंचे एकाच सोसायटीमध्ये राहणारे जिवलग मित्र श्री किरण वळसे यांची ओळख करून दिली. किरण भाऊ कुवेत मध्ये नोकरी करतात. तसेच दुसरे सायकलिस्ट मित्र  श्री  लक्ष्मण नलावडे यांची भेट झाली. 

माझ्या कन्याकुमारी सायकल राईडचे कप्तान सोपानराव नलावडे यांचे चुलत भाऊ लागतात. सर्वांची भेट पहिल्यांदाच होत होती. परंतु प्रथम भेटीतच सर्वजण माझे खास मित्र झाले होते. जसे की खूप जुने मित्र आहेत. प्लॅटिनम हॉटेल मध्ये जेवणाची व्यवस्था नसल्यामुळे पुढे असणाऱ्या म्हणून सद्गुरू हॉटेलमध्ये जेवण घेतले. 

अजितचा आग्रह होता खूप उशीर तसेच अंधार झाल्यामुळे सायकल गाडीत टाकून पुढचा ३६ किमीचा प्रवास गाडीने करावा. परंतु रमाकांत आणि माझी, स्वतःशीच स्पर्धा आणि परीक्षा होती.  तसेच ठरविलेले ध्येय निश्चितपणे गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा ध्यास घेऊनच ह्या सायकलवारीची सुरुवात केली होती. त्यामुळे अजिताच्या या प्रेमाच्या आग्रहाला आव्हेरणे खूप जड गेले. 

रात्री ९ वाजता घोडेगावकडे पुढची राईड सुरू झाली. अजित कारने पुढे होऊन घोडेगाव फाट्याच्या पुढे जवळपास दोन किमी पर्यंत आम्हाला मार्गदर्शन करत होता. आमच्या भेटीसाठी ही मंडळी जेवण न घेता जुन्नरला आले होते. त्यांना पुढे जाण्यास सांगितले. घोडेगावकडे जाणारा रस्ता लहान परंतु सुस्थितीत होता. समोरून येणाऱ्या गाड्यांच्या लाईटला सामोरे जात दमदारपणे आमची राईड सुरू होती. दीड तासात घोडेगावला पोहोचलो. येथून ११ किमी वर स्क्विरल रिसॉर्ट होते. पुढचा चढाचा प्रवास अतिशय खडतर वाटत होता. परंतु जिद्द कायम होती. आम्ही दोघेही काहीही न बोलता जोडीने सायकलिंग करत होतो. शिनोली गावात पोहोचलो आणि अजितला फोन आला. 

येथें अजून दोन किमी पुढे जायचे होते. श्री भिमाशंकरचा मनात जयघोष करून अंतिम चढाईला सुरुवात केली. ही चढाई म्हणजे मनाबरोबर केलेली लढाई होती. थोड्याच वेळात डाव्याबाजूला डोंगरात  चमचमणाऱ्या लाईट्स दिसू लागल्या. सह्याद्रीच्या डोंगरात वसलेले अतिशय आलिशान असे स्क्विरल रिसॉर्ट आमच्या नजरेच्या टप्प्यात आले होते. शेवटचा पाचशे मीटर्सचा खडतर टप्पा पार करून स्क्विरल रिसॉर्ट मध्ये प्रवेश केला. 

या रीसॉर्टचे वैशिष्ठ्य म्हणजे हे पूर्णपणे इको फ्रेंडली आहे. आत मध्ये कोणत्याही वाहनाला प्रवेश नाही. परंतु मनोज भाऊंच्या प्रेमामुळेच आम्हाला सायकलसह प्रवेश मिळाला. बरोबर साडेअकरा वाजता आम्ही रिसॉर्ट मध्ये पोहोचलो होतो.
मनोज, किरण, लक्ष्मण आणि अजित आमची वाट पाहत थांबले होते. सायकलिंगच्या प्रेमाखातर माझ्यावर प्रेम करणारी, माझ्यासाठी एव्हढा वेळ देणारी माणसे निव्वळ श्री भिमाशंकराचा कृपेनेच माझ्या जीवनात आली होती. खरोखर खूप मोठे भाग्य आहे माझे. हॉटेलचे मालक आणि मनोजरावांचा भाचा कोकणे सुद्धा भेटायला आला होता. मुंबईवरून शिनोली पर्यंत  ४९०० फूट  उंची पार करून १७२ किमी सायकलिंग एका दिवसात  करून येणे त्याला अशक्य वाटत होते.  म्हणून तो उशिरापर्यंत जागा राहून  आम्हाला भेटायला आला होता. 

सर्वांसह फोटो काढले. रात्री हळद टाकून गरम दुधाची व्यवस्था झाली. स्क्विरल रिसॉर्टचा अँबियन्स, लोकेशन, सर्व कार्यक्रमासाठी  मध्ये असणारा ओपन लॉन्स, आलिशान रेस्टॉरंट, झाडात चमचमणाऱ्या LED लाईट्स हे सर्व पाहून आम्ही दिपून गेलो. 

आम्हाला दिलेला आलिशान सूट डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. फक्त आणि फक्त मैत्रिखतार अजितने जुन्नर मध्ये जेवणाची आणि स्क्विरल रिसॉर्ट मध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. 

श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातील खालील ओवी मला प्रत्यक्ष रीतीने आज आकळली... 

ती अशी...

वर्षत सकळमंगळीं । सायकल निष्ठांची मांदियाळी।।

अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ।।

सर्व प्रकारच्या मांगल्याचा  वर्षाव करणारे सायकलनिष्ठ मित्र पृथ्वीवर अवतरत जावोत आणि माझ्या सारख्या पामर प्राणिमात्राला भेटत जावोत. 

हे भाष्य आज मी सर्वार्थाने अनुभवले होते.

फ्रेश होऊन जम्बो बेडवर झोपेच्या अधीन कधी झालो ते कळलेच नाही.


सतीश जाधव
आझाद पंछी.....

13 comments:

  1. मित्राचे अभिप्राय !!!

    दिवसाचे 24 तास असतात ,त्यातील 20तास अथक परिश्रमाने रस्त्याच्या सर्व प्रकारच्या बऱ्या वाईट अवस्थेतील स्थितीत,त्रासदायक वातावरणात 172 कि मी सायकलिंग करणे ही चकित करणारी बाब आहे , खूप खडतर परिश्रम आहेतच सोबत मित्रप्रेम ही आहे.ह्या प्रेमाने भारलेल्या अवस्थेत हे साध्य झाले आहे आणि मित्र प्रेमाचे ऋण व्यक्त असलेले हे लिखाण आहे.

    ReplyDelete
  2. अतिशय सुरेख... तुमच्याबरोबर राईड करायची तयारी करतो आहे. मानसिक तयारी झाली आहे. २/३ महिन्यात शारीरिक तयारीसुद्धा‌ होईल

    ReplyDelete
  3. kya baat hai sir...eka diwsat 175 km khadtar ride...manje mansik ani sharirik tayari chi pariksha jee hoti ti tumhi sahaj paar keli..khup inspiring sir...Ramkant sir na maze pranam...kp it up sir

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर लिखाण आहे. प्रत्येक टप्प्याचे अतिशय मार्मिक वर्णन केलं आहे.

    ReplyDelete
  5. सतीश सर एम टी बी वर 175 की मी राईड सलाम सर तुमाला 👍👍👌

    ReplyDelete
  6. नमस्कार सर,
    अतिशय दमदारपणे आणि चिकाटीने, कल्याण-जुन्नर-भिमाशंकर मार्गावर, कल्याण पासून ते कानशी शिनोली पर्यंतचा 172 किमी चा स्वप्नवत वाटणारा सायकल सफरीचा पहिला टप्पा 'सायकलने भारत-भ्रमण'कार रमाकांत सरांच्या साथीने एका दिवसात पूर्ण करून निश्चितच तुम्ही आजून एक मानाचा तुरा मनाच्या गाभा-यात खोवलेला असेल यात शंकाच नाही असे मला वाटते.

    23 फेब्रुवारी 2020 तारखेला मुंबई परतीच्या प्रवासात माझ्या आत्त्याला आपण भेटलो होतो हा उल्लेख करुन माझ्याही आठवणीला नकळत पणे उजाळा दिलात त्याबद्दल धन्यवाद !!!! आणि तीच फोटो रुपातील आठवण पुढे देत आहे.

    सर्व मित्र-परिवाराने केलेले प्रेमपूर्वक आदरातिथ्य खरोखर वाखाणण्याजोगे आहेच. सर्व मित्र-परिवाराचे मी वैयक्क्तीक सुद्धा कौतुक आणि आभार व्यक्त करतो.

    रमाकांत सरांची वैयक्तीक भेट आणि त्यांच्या बरोबर सायकल सफरीचा योग कधी येताय ते पाहुया !!!!

    नेहमीप्रमाणे सहजतेणे खळाळणारे वर्णन आणि वर्णनानुरुप फोटोंची मांडणी छानच !!!!

    सफरीचे पुढील वर्णन वाचायची वाट पाहत आहे.

    पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा !!!!

    ...... लक्ष्मण

    ReplyDelete
  7. शब्द नाहीत साष्टांग नमस्कार

    ReplyDelete
  8. सतीश,
    माझी ओळख आहे की नाही मला माहित नाही। परंतु मीही अरुण सावंत बरोबर एकाच वर्गात होतो, लाला लजपत राय कॉलेज मध्ये। त्या भीमाशंकर ट्रेकला मीही होतो।मी तुला ओळखतो। हल्ली आपली भेट नाही।
    तिथून मी भीमाशंकर वारी सुरू केली। दरवर्षी एकदा किंवा कितीही वेळा जाऊन एक निश्चित केल की जेव्हढे माझे वय तेव्हढ्या वाऱ्या करायच्या असा नेम करून आज 62 वाऱ्या केल्यात,आज माझं वय 62 वर्षे आहे।
    बरे असो, निमित्त तुझ्या "झेप घेरे पाखरा" लेखच, वाचला लेखनातून आणि अनुभवला सुंदर छायाचित्रातून।
    तुमची ही सायकल स्वारी अतिशय आवडली,अगदी मनापासून। रमाकांत तर माझा चांगला मित्र। "सुली टॉप" अजिंक्य शिखर सर आम्हीच एकत्र केले।
    तुझे प्रवास वर्णन फारच छान झालेय।शब्द कमी पडतील इतके।
    प्रवासवर्णन आणि त्यास अनुसरून फोटोंची मांडणी अप्रतिम।
    असा अनुभव घेणाऱ्या सर्वांनी लिखित स्वरूपात मांडले पाहिजे जे अनेक विषयाशी संबंधित तरुण पिढीला प्रेरणादाई होईल।
    खूप खूप धन्यवाद आणि त्रिवार अभिनंदन।
    पुढील सफरीसाठी खूप शुभेच्छा।
    ओळख ठेवून मैत्री वाढविल्यास आवडेल, आनंद द्यावा आनंद घ्यावा ।

    ReplyDelete
  9. सहज म्हणून वाचायला घेतले आणि लेखाचा शेवट कधी आला ते कळलेच नाही, इतका उत्कंठा वर्धक हर लिखाण आहे. आणि नुसते लिखाणाचा नाही तर एक दिवसात 172 kms हा MTB वर केलेला पराक्रमच! माळशेज घाट भर दुपारी चढल्यानंतर एवढं सायकलिंग म्हणजे जिद्द, चिकाटी, निश्चय यांचं मूर्तिमंत उदाहरण. तुम्हा दोघानाही सलाम. --- धनंजय मदन

    ReplyDelete
  10. सायकलवरून केलेल्या प्रवासवर्णन सुरेख आणि भन्नाट.

    ReplyDelete
  11. सायकलिस्ट मित्र अजित गायकवाड चे अभिप्राय...

    खूप छान वाटले सर तुम्हाला भेटून नवीन सायकल प्रेमींसाठी कायमच उत्सुकता असते प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन शिकायला मिळते वेळेचे उत्तम नियोजन निश्चित ठिकाणी पोहोचण्याचे ध्येय उराशी बाळगून घराबाहेर पडलेली वयाने वयस्कर पण विचारांनी तरुण तसेच प्रचंड आशावादी असणाऱ्या माणसांच्या भेटी कायमच स्मरणात राहतात भविष्यातही तुमच्याकडून प्रेरणादायी मार्गदर्शन मिळावे 🙏🚴🚴

    ReplyDelete
  12. खूप छान वर्णन आहे, एका दिवसात १७५ कीमी अबब, जबरदस्त
    बाळाराम पाटील

    ReplyDelete
  13. भाऊ दिलीपचे अभिप्राय !!!

    सतीश अन्ना.

    मस्त172, किलोमीटर सफर छान झाली.

    भिमाशंकर राईड डोळ्यासमोर स्वता मला पण अनुभवायला मिळालीच

    धन्य आहे तुझी.

    अशी च आकाशात उंच झेप घे...

    ReplyDelete