Monday, January 25, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस पाचवा) पिपरीकुंड ते तोरणमाळ

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस पाचवा)  पिपरीकुंड ते तोरणमाळ

०२.०१.२०२१

सकाळी मैयेची पूजा केली.   रेवसिंगला पुन्हा भेटण्याचे आश्वासन दिले. चहा बिस्कीट घेऊन रेवसिंग कुटुंबाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे त्याने काहीही पैसे घेतले नाहीत. अतिशय प्रेमाने सेवा देण्याची वृत्ती खरोखरच रेवसिंगकडून शिकावी. ही माणसं पाहिली की आपण किती छोट्या जगात जगतो आहोत याची अनुभूती झाली.

ग्रामीण जीवन किती सुंदर आहे याची जाणीव झाली... अतिशय कमी गरजा आहेत त्यांच्या...
खरोखरच रेवसिंगची आनंदी झोपडी खूप भावली...

डोंगराच्या आडून सुर्योदय झाला होता.  रस्ता दिसू लागला होता. पुढचा रस्ता ऑफ रोडिंग, दगड धोंड्यांचा आणि घाटीचा होता. काही ठिकाणी सायकल सामानासह ढकलावी लागली. रस्ता अतिशय निसरडा आणि धुळीचा होता. पायी परिक्रमा करणाऱ्यांना सुद्धा अवघड अशी ही वाट...

सायकलिंगवाल्यांसाठी तर अतिशय बिकट होती. तीन किलो मीटरचा झरार गावाकडे नेणारा रस्ता... प्रचंड दमछाक करणारा होता. दम खात... थांबत... झरार गावात पोहोचलो. रस्त्यावर एकमेव दुकान होते. गावातली सर्व घरे वरच्या उंच टेकाडावर होती. सकाळीच... दोघेही घामाने थबथबलो होतो. 

रस्त्यावरील त्या एकमेव दुकानात चहा बनवायला सांगितले. 'हाऊ' दुकानातील बाबाजींचा होकार आला. अतिशय छोटेखानी घर, त्यात दुकान आणि गाईचा गोठा होता. चुलीजवळ काम करणाऱ्या मैय्येने चहा आणला.  काळया चहा सोबत बिस्कीटे खाल्ली. दुकानदाराने फक्त बिस्किटाचे पैसे घेतले. अतिशय कमी गरजांमध्ये ही माणसे गुजराण करीत असून सुद्धा प्रेमाने देण्याची दानत आणि सेवाभाव विशेष जाणवला.

झरार गावाचा अतिशय विहंगम परिसर... वातावरण आल्हाददायक आणि प्राणवायूने ओतप्रोत भरलेले...

येथेच मध्यप्रदेशचा वनरक्षक नाका आहे. पुढे दोन किमी वर महाराष्ट्राची हद्द सुरू होते. तेथून सोळा किमीवर तोरणमाळ आहे. अजूनही खडकाळ रस्ता संपला नव्हता. मध्येच सायकल ढकलावी लागत होती. महाराष्ट्र चेकपोष्ट आले. कोणीही नव्हते तेथे.

महाराष्ट्रात शिरलो तरीही रस्त्याची स्थिती सुधारली नव्हती. आता तर अवघड चढ उतार होते. सामानासह सायकल चढविणे... एक-एक  गियरवर सुद्धा कठीण होते. काही ठिकाणी सायकल चढविताना गावकऱ्यांची मदत घ्यावी लागली.

तोरणमाळ पर्वतरांगांच्या  शिखरावर पोहोचलो... शिखराच्या वरच्या बाजूला एक बुरुजबंद भिंत लागली. म्हणून सायकल खाली ठेऊन टेकाड चढून गेलो. दगडी भिंतीच्या पुढे गुंफा लागली.

जालंधरनाथ महाराजांची गुंफा होती... तेथे आता बमबम लहरीनाथ बाबांचे वास्तव्य आहे.  अन्नधान्य आणण्यासाठी बाबाजी शहादा गावाच्या बाजारात गेले होते.

येथे नाथ संप्रदायाचे संत जालंधरनाथ यांनी  घोर तपस्या केली होती. आता परिक्रमावासीयांची येथे सेवा केली जाते. अतिशय अवघड ठिकाणी वसलेले हे मंदिर आणि तेथे दिली जाणारी सेवा पाहून स्तिमित झालो. दोन किमी खाली जाऊन पाणी आणावे लागते. थकला भागलेला पारिक्रमवासी जेव्हा येथे पोहोचतो... तेव्हा येथे मिळणारी सेवा त्याला प्रचंड बळ देते. आपल्या बाळाची काळजी घेणाऱ्या नर्मदा मैयेच्या अपार प्रेमाची जाणीव येथे होते...

भोजन प्रसादीची व्यवस्था झाली..  तेथे असलेल्या मैयेने वांग्याची भाजी आणि रोटी भोजनप्रसादी दिली.

तेथे आलेले परिक्रमा करणारे हटयोगी बाबा नर्मदानाथ बैरागी आमच्या बरोबर भोजनाला बसले... संपूर्ण अंगाला भस्म लावलेले, कानाच्या मधल्या भागात मोठी तांब्याची बिकबाळी आणि काळी कफनी घातलेले बाबा खूप प्रेमाने बोलत होते. सायकल घेऊन या मार्गाने आल्या बद्दल त्यांना खूप अप्रूप वाटले आणि आनंद ही झाला...

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश चेक पोष्ट जवळ आलो. तेथे कोणीही नव्हते. वरच्या टेकाडावर एक मजली पांढरी इमारत दिसली. तेथे फोटो काढून महाराष्ट्रात पाय ठेवला.

महाराष्ट्रातील पहिल्यांदा लागलेले गाव बुरुमपाड्यात आलो.

नंदुरबार जिल्ह्यातील हे टोकाकडचे गाव. सामूहिक वन संवर्धन प्रकल्प येथे राबविला जातो आहे.   येथील गावे म्हणजे आदिवासी पाडे आहेत.  याला नवे तोरणमाळ सुद्धा म्हणतात. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आल्याबद्दल खूप आनंद झाला.  महाराष्ट्रात याच शूलपाणी जंगलातून नर्मदा मैय्या वाहते, त्याचा सुद्धा आनंद होता. या बुरुमपाड्यात सुद्धा चहा देऊन सेवा मिळाली.

पुढे तोरणमाळच्या विव्ह पॉईंटवर आलो.

येथून खालच्या दरीत वसलेली अनेक गावे, हिरवेगार जंगल परिसर आणि शेतांचे चौकोन  दिसत होते. एका पाठी एक पसरलेल्या तोरणमाळच्या पर्वतरांगा दिसत होत्या.  नंदुरबार, शहादा फाट्यावर आलो. तेथे गावांच्या नावाचा बोर्ड मराठीत लावलेला होता.
येथून तोरणमाळ, नर्मदा तलाव आणि मुख्य गाव चार किमी अंतरावर आहे.

वर-खाली चढ उताराच्या रस्त्याने तोरणमाळचे मुख्य आकर्षण नर्मदा तलावाजवळ पोहोचलो.

त्याच्या बाजूलाच बाबा गोरखनाथांचा भव्य आश्रम आहे. हे नाथ परंपरांचे सर्वात मोठे सिद्धपीठ आहे. गोरखनाथ बाबा येथे साक्षात विराजमान आहेत. बाबा गोरखनाथांच्या तपश्चर्येने येथे नर्मदा मैय्या पाताळातून प्रकट झाली आहे. म्हणूनच परिक्रमावासी तोरणमाळला आवर्जून भेट देतात. येथील जंगलाला शूलपाणी जंगल म्हणतात.

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ आहे. येथे महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात यांच्या सीमा आहेत.  पावसाळ्यात सर्व ठिकाणी धबधबे पाहायला मिळतात, तसेच सकाळी आणि संध्याकाळी धुक्याचे साम्राज्य असते.

गुरू गोरखनाथच्या मंदिरात विश्रांतीची व्यवस्था झाली. तेथून 'सीता खाई' पाहायला गेलो. खाली खोल दरी दिसत होती.

सीता मैय्या येथेच भूमातेमध्ये विलीन झाली होती. हा एको पॉईंट सुद्धा आहे. येथून मध्य प्रदेशाचा भूभाग दिसतो.

प्रचंड वारे सुटले होते. वाटेत आदिवासी पाडे लागले. तेथील लहान लहान मुले "नर्मदे हर" म्हणत आमच्या मागे धावत होती. एक टपरीवजा दुकान लागले. सायकल थांबवून सर्व मुलांना चॉकलेट वाटले. तेथेच संजयने माझे नामकरण केले, "चॉकलेट बाबा".

समोरच्या झाडातून सूर्यास्ताचे मनोहारी दर्शन झाले. काळया ढगांतून डोकावणारे सोनेरी कवडसे निसर्गाचे संगीत गात होते.

मंदिराच्या मागे असलेल्या नर्मदा तलावाच्या काठावर  निवांत बसलो...  सर्व भावना आणि विचार विरहित अवस्थेत या ठिकाणी तल्लीन झालो. वातावरण थंड व्हायला लागले होते.

गोरखनाथ सिध्द पिठाचे मुख्य महंत योगी संजूनाथजी यांनी भोजन प्रसादीची सर्व व्यवस्था केली. मंदिराच्या खालीच विश्रामाची व्यवस्था होती.

ग्रामीण जीवन आणि सेवा भाव यांची फार जवळून ओळख झाली...

मनाचा... मुंबईच्या छोट्या जगातून गावाकडच्या विशाल विश्वात प्रवेश झाला होता.

नर्मदे हर...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

Wednesday, January 13, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस चौथा)बावन्नगजा ते पिपलाकुंड ०१.०१.२०२१

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस चौथा)

बावन्नगजा ते पिपलाकुंड

०१.०१.२०२१

सकाळी बालभोग घेऊन बावन्नगजाजी येथील जैन  तीर्थांकर आदिनाथ भगवान यांच्या भव्य मूर्ती असलेल्या स्थानाला भेट दिली.

या सिद्धक्षेत्रात नवीन वर्षानिमित्त जैन समुदयातर्फे मोठी पूजा अर्चना सुरू होती. डोंगरात कोरलेली ही विशाल मूर्ती पाहून डोळ्याचे पारणे फिटले. "श्री आदिनाथ जीनेंद्राय" याचा अर्थ ज्याने मन, वचन आणि काया यावर ताबा मिळवला आहे आणि केवलज्ञान प्राप्त केले आहे.

काल  दर्शनी असणाऱ्या भगवान श्री आदिनाथ मंदिराला भेट दिली होती. सायंकाळच्या सूर्यप्रकाशात हे मंदिर सुर्यप्रभेमुळे सुवर्ण किरणांनीं उजळले होते.

श्री आदिनाथ भगवान यांच्या या पवित्र क्षेत्रास चुलगिरी म्हणतात. चारही बाजूला सातपुड्याच्या पर्वत रांगा आहेत. एका पर्वताच्या माथ्यावर सती मंदोदरीचे (रावणाची पत्नी) मंदिर आहे.

अन्नक्षेत्राचे बाबाजी, स्वामी ज्ञानानंदजी यांचा निरोप घेऊन चुलगिरी घाट चढायला सुरुवात केली. वातावरणात सुखद गारवा होता. तसेच आम्ही सुद्धा जोशात होतो. त्यामुळे घाटमाथ्यावर थोड्या वेळातच पोहोचलो. येथे नितांत सुंदर विव्ह पॉईंट होता. याचे नाव सुद्धा अतिशय सुखदायक होते, "पर्यावरण चेतना केंद्र".

येथिल बगिच्यात सगळीकडे बोगनवेल फुलल्या होत्या. येथील वॉच पॉईंट वर गेलो. संपूर्ण सातपुड्याच्या पर्वतरांगा चारही बाजूला दिसत होत्या. या ठिकाणी मोबाईल रेंज सुद्धा चांगली मिळाली. या नितांत सुंदर ठिकाणावरून प्रिय व्यक्तींना फोन केले. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नववर्षाच्या पहिल्या दिवसाचा थोडा वेळ येथे व्यतीत करून, पुढे मार्गक्रमण सुरू केले.

दोन तासात पाटी गावात पोहोचलो. गावाच्या सुरुवातीलाच चहाच्या दुकानात बरेच परिक्रमावासी बसले होते.

परिक्रमावासींसाठी  चहाची व्यवस्था येथे होती. मुसफिर व्यास आणि जाट साहेब यांची ओळख झाली. जाट शायर आहेत तर व्यास शिक्षक आहेत. दोन मित्र परिक्रमा करतायत... आपल्या क्षेत्रांत उन्नत होण्यासाठी... व्यासांचा मोबाईल डेटा जास्त झाल्या मुळे हँग झाला होता. तो डेटा मेमरी कार्ड मध्ये ट्रान्सफर करून दिला. व्यास महाशय प्रचंड खुश झाले... नर्मदा  मैय्या सेवा करण्याची सुद्धा संधी देते... त्यांच्या चेहऱ्यावरचा  आनंद बघून नर्मदा मैयाचे आभार मानले. व्यासजी आता माझे जिगरी दोस्त झाले आहेत.

दोन मोटरसायकालिस्ट मुकेश रावल आणि श्रीकांत कलमकर पाटी गावात भेटले. आम्हाला चहा पाजण्यासाठी थांबले होते. चहा सोबत आलू वडा आणि मिरची भजी त्यांनी दिली.

मुकेश हॉटेलवाल्याला बिल द्यायला गेला, तर हॉटेल मालक यादवजी बिल घेईना... का... तर परिक्रमावासी सोबत तुम्ही सुद्धा आमचे पाहुणे आहात... काय म्हणावं बरं या औदार्याला...

युथ हॉस्टेलशी मुकेश आणि श्रीकांत निगडित आहेत. निसर्गाच्या जवळ असणाऱ्या व्यक्तीची चटकन दोस्ती होते... याचा प्रत्यय आला.

पाटी वरून बोकराटोकडे जाणारा रस्ता सतत चढाचा होता. त्यात हेडविंड सुरू होती... दमछाक करणारी... दहा किमी  अंतर कापायला सव्वा तास लागला... वाटेत सवरियापानी गावाच्या जवळ हँड पंप होता. थोडी विश्रांती घेऊन... हँड पंपचे पाणी प्यायलो. एकदम तरतरी आली.

वाटेत टापर गाव लागले... बरेच पारिक्रमवासी रस्त्याच्या कडेला मोकळ्या मैदानात बसले होते. येथे सुद्धा सेवा म्हणून चहा मिळाला. या दुकानात सोरट पाहायला मिळाली. त्याला येथे इलम म्हणतात. लहानपणी प्रभादेवीच्या जत्रेत सोरट पाहायला मिळायची. चिठ्ठी काढायची आणि त्यात जो नंबर येईल त्या नंबर वरची वस्तू मिळायची...

इथे तर चक्क पैसेच नंबरवर चिटकवले होते.

बोकराटोला पोहोचलो. आज बोकाराटा मध्ये आठवड्याचा बाजार होता... रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. त्यामुळे सायकल ढकलत तोरणमाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर न्यावी लागली.  तोरणमाळ येथून तीस किमी अंतरावर आहे.

आता ऑफ रोडिंग रस्ता सुरू झाला.अतिशय खडबडीत आणि रस्त्यावरचे डांबर निघून गेल्यामुळे सायकल दगड गोट्यातून चालली होती. इलेक्ट्रिक करंटचा झटका लागतो, त्याप्रमाणे हादरे बसत होते. अक्षरशः ब्रेक डान्स सुरू होता.

तेव्हढ्यात बाजूने जीप पास झाली. जीपच्या आत खच्चून माणसे कोंबली होती. तिच्या टपावर, दरवाजाला लटकलेली, पुढच्या बोनेट वर बसलेली जवळपास पन्नास माणसे असावीत त्या जीपमध्ये.

पिपरकुंडच्या वेशीवर पोहोचलो. येथे बोकराटो वरून येणाऱ्या खचाखच भरलेल्या जीप खाली होत होत्या.  येथे मुंबई महापालिकेत काम करणारा रामलाल भेटला. तो पहाडावरच्या आमली गावातला आहे. येथील आदिवासी बायका गळ्यात चांदीचा मोठा तोडा घालतात.

त्याला आदिवासींच्या पावरी भाषेत आहाडी म्हणतात. इतर गावकरी निमाडी भाषा बोलतात.
जीप स्टँड कडून पिपरकुंड गाव सुरू झाला.  वर गावाकडे जाणारा अवघड घाट सुरू झाला. रस्त्याची दुर्दशा त्यात चढाचा आणि वळणावळणाचा रस्ता; या मुळे काही ठिकाणी सायकल ढकलण्या शिवाय पर्याय नव्हता. तीन किमी चढायला एक तास लागला. प्रचंड दमछाक झाली होती. मुख्य गावात पोहोचायला चार वाजले. आणखी सायकलिंग करायची इच्छा नव्हती. म्हणून तेथेच तळ टाकायचा ठरले.

रेवसिंगचे छोटे दुकान असलेले घर लागले.  दुकानाजवळ पोहोचताच रेवसिंगने हसतमुखाने स्वागत केले. दहा मिनिटात चहा आला. मग संजयने हळूच त्याला विचारले, 'हम यहा रह सकते है क्या' तो म्हणाला, 'हाऊ' (म्हणजे हो). आम्हाला हायसे वाटले. बाहेरच असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्यात सायकल लॉक केल्या आणि समान घेऊन त्याच्या घरात आलो.

शेणाने मस्त सारवलेल घर... घरात टीव्ही.. आणि त्याचे हसतमुख कुटुंब... रेवसिंगच्या बाबाचे नाव कनसिंग. घर एकत्र कुटुंब पद्धतीचे होते. त्याला आठ मुले आणि वीस नात-नातू ... एकूण चाळीस जणांचा मोठा परिवार... रस्त्यावर दुकान आणि वर टेकडीवर त्याचे चौसोपी घर होते. आळीपाळीने त्याची सर्व मुले आणि सुना भेटून गेले.

रेवसिंग बोलायला अतिशय चटपटीत होता. थोड्याच वेळात त्याच्याशी एकदम गट्टी झाली. पिपरकुंड मधील आदिवासी जमातीचा तो प्रमुख होता. सरकारी योजनांचा लाभ घेऊन त्याने दुकान बांधले होते. सायंकाळी आठ वाजताच जेवण आले. शेव खाटो, टमाटर खाटो आणि त्याच्या बरोबर रोटलो जेवण आले.

अतिशय चमचमीत बनविले होते जेवण त्याच्या लाडोने (बायकोने)... त्यानंतर ताक आले.
ताकाला "मोहे किंवा साह" म्हणतात.

जेवल्यावर गप्पांचा सिलसिला सुरू झाला. त्याने पहाडी लोकसंगीत ऐकविले. त्याची वडिलोपार्जित खानदानी तलवार दाखविली. स्वतः तलवारीसह आदिवासी नृत्य करून दाखविले. संजयने पण तसेच नृत्य केले. त्या भारदस्त तलवारीसह फोटो काढले.

रेवसिंगचे शिक्षण झालेले नाही. ही आदिवासी कुटुंब खूप खडतर जीवन जगत असतात.  पावसात नाले भरून वाहतात तेव्हा गावांचा संपर्क तुटतो. एकदा तर त्याने ओढ्याच्या पुरात वाहून जाणाऱ्या स्वतःच्या मुलीला वाचविले... सर्व खडतर आणि विपरीत परिस्थितीत सुद्धा ही माणसे मदत करायला तत्पर आणि सदा हसतमुख असतात याचे खूप अप्रूप वाटले...

एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली... माणसाच्या गरजा कमी असतील तर दुःख त्याच्या जवळपास सुद्धा फिरकत नाही...

शेणाने सारवलेल्या घरातील जमिनीवर निवांत झोप लागली...

आदिवासी कुटुंबासमवेत काढलेली ती सायंकाळ आणि रात्र ... जीवनाच्या अनुभवत प्रचंड भर टाकून गेली.

नर्मदे हर

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

Thursday, January 7, 2021

नर्मदा परिक्रमा... दवाना ते बावन्नगजाजी (परिक्रमेचा दिवस तिसरा)

नर्मदा परिक्रमा...

दवाना ते बावन्नगजाजी (परिक्रमेचा दिवस तिसरा)

३१.१२.२०२०

पहाटे पाचला जाग आली. महंत तवरदासजी रामाचे दोहे गात होते. वातावरण खूपच गारवा होता, म्हणून सुस्वर दोहे अंथरुणातच बसून ऐकण्यात तल्लीन झालो.8

तासाभरात तयार होऊन या आ in poli Ii NM 7 konihi KJश्रमाची महती सांगण्याची तवरदासजींना विनंती केली.

भौसिंग बाबांनी संजीवन समाधी दवाना येथे घेतली. तेथेच त्यांचे समाधी मंदिर आहे. बाबाजीच्या समाधीवर छिद्र आहेत. भौसिंग बाबा अजूनही संजीवन  आहेत असे भक्तगण मानतात.  भौसिंग बाबा श्री कृष्णाचे निस्सीम भक्त होते. गेली जवळपास ऐशी वर्ष परिक्रमावासीयांची या आश्रमातर्फे सेवा केली जाते.

सकाळी महंत तवरदासजींनी चहा दिला. त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढील परिक्रमा सुरू झाली.

आजचा पहिला पडाव लोहारा येथील कपिलेश्वर  महादेव मंदिर होते. दवाना येथून दिड तासात कपिलेश्वर महादेव मंदिराजवळ पोहोचलो. गावातील रस्ता ऑफ रोडिंग होता. गावाच्या टोकाला नर्मदेच्या किनारी हे मंदिर आहे. 

 या मंदिराच्या बाजूनेच नर्मदा मैय्या वाहते. सरदार सरोवर प्रकल्पामुळे येथील घाटाचा बराचसा भाग पाण्याखाली गेला आहे.  येथे नर्मदेच्या पाण्याला सागरासारख्या लाटा उसळत होत्या. मैयेच्या जलात डुबकी मारली. स्नान करताना सुद्धा लाटा अंगावर कोसळत होत्या. समोर असलेल्या अंबामातेच्या मंदिरात सोबतच्या मैयेची पूजा केली.

  येथे नर्मदेच्या किनारी कपिलेश्वर महादेव मंदिर स्थापित आहे. अतिशय पुरातन आहे हे मंदिर.

कपिलमुनींनी येथे घोर तपस्या केली होती आणि येथेच कपिलमुनी विराजमान झाले आहेत. पुजारी पंडित शिवप्रसाद म्हणतात, 'हे मंदिर सत्ययुगातील आहे. कपिला गायीच्या खुरातून निर्माण झालेल्या कपिला नदीचा येथेच नर्मदेबरोबर संगम होतो. कपिल मुनींकडे असलेली ही कपिला गाय साक्षात अन्नपूर्णा होती.

आसपासचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. नर्मदेच्या किनारी दोघेही निवांत बसलो होतो... अगदी निशब्द... शांततेचा आवाज ऐकत होतो...

तासाभराने मंदिरातून निघालो आणि थोड्याच वेळात मुख्य रस्त्यावर आलो. येथे दबंग दुनिया वर्तमानपत्राचे वार्ताहर भेटले. त्यांनी संजयची मुलाखत घेतली. 'प्रदूषण मुक्त नर्मदा' हा संदेश घेऊन आम्ही परिक्रमा करतोय, हे संजयने सांगितले.

येथून चकेरी गावात पोहोचलो. रामारोटी म्हणून पोळी भाजी आणि वरणभात मिळाले. येथे इंजिनियर बाबाजी कल्पेश महाराज आहेत.

गुजरात मध्ये इंजिनियर असलेले कल्पेश बाबाजी मागच्या एक वर्षांपासून चकेरी येथे परिक्रमवासींना रामरोटी देत आहेत. एक वर्षापूर्वी परिक्रमा उठविलेले हे बाबाजी बडवानी वरून आलेल्या गुरुजीच्या आदेशाने अन्नसेवा देत आहेत. 'मैंयेजिके मनमे जब आयेगा तब मेरी परिक्रमा शुरू होगी, लेकीन परिक्रमा पुरी करकेही घर लौटुंगा". आपल्या जीवनाची नैया; मैयेच्या ताब्यात देणाऱ्या इंजिनियर बाबांची भेट अंतरंगात स्नेहाचे तरंग उठवून गेली. अशा व्यक्ती जीवनात येणे आमचे अहोभाग्यच होते.…

अंजार गावाजवळ  सायकलच्या कॅरियरचा स्क्रू ढिला झाल्यामुळे पॅनियर बॅग मागच्या मागे धाडकन पडली. बॅगेची शिलाई उसवली होती. गावात एक टेलरींग करणारे आजोबा मिळाले.

बॅग शिवल्यावर पैसे विचारले असता, 'आपके दिलको अच्छा लगे इतने देना' आजोबा म्हणाले, 'नर्मदा मैयेमुळेच तुमची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले आहे, आणखी मला काय हवे'...  निरपेक्ष सेवा हा सद्गुण मैयेच्या सान्निध्यामुळेच मनात दृढ होतो... याची प्रचिती आली...

बडवानी शहरात प्रवेश केला... येथील पशु महाविद्यालया जवळील चहावाल्याकडे थांबलो. चहावाला म्हणाला 'साब आपके लिये स्पेशल चाय बनाता हूँ', त्यांची मसालेयुक्त चहा खुप आवडली म्हणून आणखी एक कप चहा प्यायलो... आता कमालच झाली. तो चहावाला पैसे घेईना...

'बडवानी मध्ये मैय्या आपली बडदास्त  ठेवते आहे' संजय म्हणाला.

तेथेच बडवानीच्या पी जी कॉलेजचे प्राध्यापक श्री उपाध्याय भेटले.

ते म्हणाले, 'आपको मिलके मुझे बहोत खुशी हुई और ये मेरा सौभाग्य है... क्या मैं आपके साथ फोटो ले सकता हूँ'... आप नर्मदा स्वच्छता अभियान का बहोत बडा काम कर रहे हो...  मेरे कॉलेज के छात्रोको आपकी फोटो दिखाके उन्हे भी प्रोत्साहित करुंगा'... श्री उपाध्याय यांच्या बोलण्याने अंगावर मूठभर मास चढले.

परिक्रमा करणाऱ्यांना मैय्या दर्शन, दृष्टांत देते म्हणतात... मला तर मैंयेचा रूपानेच वरील सर्व व्यक्ती भेटल्या होत्या... जगणे काय असते हे शिकविणाऱ्या...

बडवानी पासून पाच किमी अंतरावर असलेल्या राजघाटकडे पोहोचलो. जेथे-जेथे महात्मा गांधीजींच्या अस्थी विसर्जन केल्या त्या सर्व ठिकाणांना राजघाट म्हणतात.

नर्मदेवरील नवागाव प्रकल्पच्या  धरणाची उंची वाढविल्यामुळे राजघाट परिसर आणि जवळच असणारे दत्त मंदिर आता पाण्याखाली गेले आहे.

परिक्रमा करणारी मंडळी आता नर्मदा मैयेच्या दर्शनाला येथे येतात. तेथे पूजा-अर्चना करतात... त्यात काही खायच्या वस्तू, नारळ, पैैसे शोधणारी मुले पहिली.

त्यांना बॅगेत असलेले पेरू खायला दिले. त्यांचे खुललेले चेहरे पाहून  खूप आनंद झाला.

पुढचा १५ किमीचा सातपुडा पर्वताचा रस्ता चढ-उताराचा आणि शेवटी ४ किमी घाटाचा होता. घाट चढताना सूर्याचे विहंगम दर्शन झाले.

दमछाक झाली होती. पण नेटाने पेडलिंग सुरू होते. दीड तासात बावन्नगजा येथील मां नर्मदा अन्नपूर्णा अन्नक्षेत्र येथे पोहोचलो.

येथील प्रमुख स्वामी ज्ञानानंद बाबा (भोलेबाबा) आमची वाट पाहत होते. दवानावरून त्यांना आमची वर्दी मिळाली होते. आल्या आल्या गरमागरम मसाले चहा आणि टोस्ट मिळाले. सर्व थकवा नाहीसा झाला...  मला तर युथ होस्टेलच्या ट्रेकिंगची आठवण झाली.

येथून साधारण एक किमी अंतरावर जैन सिद्धक्षेत्र आहे. श्री आदिनाथजींची बावन्न गज म्हणजे १५६ फूट डोंगरात कोरलेली उभी मूर्ती या ठिकाणी स्थित आहे. सातपुडा पर्वतरांगेतील हे प्रसिद्ध  शूलपाणी जंगल आहे.

सायकलवरील सर्व सामान समोरील शाळेत ठेऊन आम्ही बावन्नगजाजीच्या मुख्य सभा मंडपाकडे गेलो. तेथील केअरटेकर यांनी आज येथे महापर्व आहे आणि १३ जैन दिगंबर साधू येथे आले आहेत, त्यांचे दर्शन घ्या. ही माहिती दिली. या सर्व साधूंची प्रत्यक्ष भेट झाली.


मुख्य साधू श्री विनम्र सागराजी महाराज यांना नर्मदा परिक्रमा सायकल वरून करतोय हे  सांगितल्यावर, 'मला सुद्धा नर्मदा मैयेची परिक्रमा करायची आहे, बघू केव्हा मैय्या बोलावते आहे', हे त्यांचे उद्गार ऐकून धन्य झालो. त्यांनी दिलेला आशीर्वाद म्हणजे मैंयेचा प्रसाद होता.

२०२१ या नववर्षाच्या पूर्वसंध्येला १३ दिगंबर जैन साधूंचे दर्शन झाले. त्यांच्याशी बोलता आले. सर्वांचे आशीर्वाद मिळाले. हे खरोखरच खूप भाग्याचे होते. असा योग खूप दुर्मिळ आहे आणि तो जुळून आला. हा आमच्या जीवनातील सुवर्णकांचन योग होता.

अन्नक्षेत्रात आज रामतोटी खाऊन तृप्त मनाने झोपेच्या अधीन झालो.

आजच्या परिक्रमेत मैयेच्या किनारी "शांततेचा आवाज ऐकला"

ही नवीन वर्षासाठी मिळालेली अलौकिक भेट होती...

नर्मदे हर !!!


सतीश जाधव

मुक्त पाखरे