Monday, January 4, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस दुसरा) बकावां ते दवाना

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस दुसरा) बकावां ते दवाना
३०.१२.२०२०

पहाटे चार वाजता बाजूच्या राम मंदिरातील रामधून कानावर पडली. सीताराम बाबांनी सकाळी साडेचार वाजता मंदिरात काकड आरतीला बोलावले होते. तयार होऊन दोघेही राम मंदिरात पोहोचलो. आरतीला सुरुवात झाली आणि आम्हा दोघांना घंटा वाजविण्याची कामगिरी मिळाली. मंदिराच्या खिडकीतून नर्मदा मैंयेची सुद्धा काकड पूजा झाली. बाबाजींनी सकाळीच चहा पाजला. तसेच पायी परिक्रमा करणाऱ्यांसाठी शूलपाणी जंगलातून जाणारा परिक्रमा मार्गाचा चार्ट दिला.

सकाळीच गावातील मुले आमच्या भोवती जमा होऊन 'नर्मदे हर' म्हणत पाया पडू लागली. सुनील केवट या मुलाने घरी येऊन कृपाप्रसादी म्हणून चहा पिण्याचा आग्रह धरला.

त्याच्या घरी जाताना, वाटेत शिवलिंग कारखान्यांना भेटी दिल्या. बारवां गाव शिवलिंग बनविण्याच्या कुटीरोद्योहासाठी जगप्रसिद्ध आहे.   एक इंचापासून २२  फुटापर्यंत शिवलिंग येथे बनविले जातात.

बारवां गावातून वाहणाऱ्या नर्मदा मैयेच्या पात्रात एक टापू आहे. तेथील पत्थर आणून त्यातून शिवलिंगाची निर्मिती केली जाते. ही शिवलिंग भारतात आणि भारताबाहेर विक्री केली जातात. नर्मदा मैयेच्या पत्रातील प्रत्येक कंकर हा शंकर असतो, याची प्रचिती आली.

सुनीलच्या घरात वडील पत्थर घेऊन येतात आणि  आई शिवलिंग तयार करते. केवट आणि माझी समाजाच्या लोकांचा हा पिढीजात व्यवसाय आहे. सुनील गावात येणाऱ्या प्रत्येक परिक्रमवासींना आपल्या घरी येण्याचा आग्रह करतो. त्याची आई म्हणते, 'आप लोग जब घर आते हो, तो नर्मदा मैय्याकी कृपा हमपर रहती है'... अतिशय श्रद्धा पूर्वक आणि हसतमुखाने, लोकसेवा करण्याचे काम बकावांचे गावकरी करीत होते.

गावाच्या सुरुवातीलाच गोपालकृष्णाचे भव्य मंदिर आहे. विशेष म्हणजे गावातील सर्व महिला या मंदिरात पूजा अर्चना करीत होत्या. गावचे मुखीया म्हणाले,  'या गावाला आणि आमच्या अन्नछत्रामध्ये पुन्हा जरूर या'.

  बेडगी मिरची, गहू, कापूस, चणे या प्रदेशात पिकविले जातात.

तसेच विटांचे कारखाने सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. या गावाला सहकुटुंब भेट देण्याचे ठरवून निरोप घेतला. येथून तेली भटीयाण येथील सियाराम बाबांचा आश्रम १४ किमी अंतरावर आहे.

नगावा गावात गीता बहेन आहेत. त्या सर्व परिक्रमावासींना चहा बिस्कीट देऊन त्याची सेवा करतात.

येथे मुले छोटी चक्री चालवत होते. चक्रीला येथे टका म्हणतात. एक मुलगा टका पळवत सायकल बरोबर स्पर्धा करत होता. या गावात आरंडी (एरंडेल) ची मोठ्या प्रमाणात शेती आहे.

साडेनऊ वाजता तेली भटीयाण गावातील सीयाराम बाबांच्या आश्रमात पोहोचलो. बाबांचे दर्शन घेतले.


बाबा भेट देणाऱ्या  प्रत्येक भक्ताला चहा पाजतात. त्यांचे विशेष म्हणजे कोणी त्यांना दान दिले तर फक्त दहा रुपयेच घेतात. पाचशेची नोट दिली तर चारशे नव्वद परत करतात. 

आश्रमाबाजूलाच नर्मदा मैय्या आहे. 

 मैयेच्या पाण्यात डुबकी मारून तेथेच पूजा केली आणि बाबांच्या भोजन प्रसादीचा लाभ घेतला. आज दालबाटीचे भोजन होते.

बाबांच्या आश्रमातून  जवळच असलेल्या निमाड अभ्युदय संचालित भारतीताई ठाकूर यांच्या नर्मदालायला भेट दिली. येथे ताईंची भेट झाली नाही. तेथून लेपा पुनर्वास येथील नर्मदालायला भेट दिली. भारती ताईंची भेट झाली.

येथे आजूबाजूच्या गावातील जवळपास ९०० मुले शिक्षण घेत आहेत. मुले व्यवसायभिमुख प्रशिक्षण घेतात. गवंडीकाम, सुतार, वेल्डींग, फॅब्रिकेशन या कामाचे प्रशिक्षण येथे घेतलेली खूप मुले आता स्वतःचा व्यवसाय करीत आहेत. मुलांनी सोलार ड्रायर आणि सोलर कुकर बनविला आहे.

भारती ताई नर्मदा परिक्रमा करीत असताना, गावातील मुलांची शिक्षणाबाबत दयनीय परिस्थिती पहिली.  परिक्रमापूर्ण झाल्यावर येथील मुलांसाठी काहीतरी करायचे या भावनेतून भारतीताई नोकरी सोडून लेपा येथे स्थायिक झाल्या.  आज त्या नऊशे मुलांच्या आई आहेत. नर्मदा मैयेच्या सहवासामुळे काय चमत्कार होऊ शकतो... हे भारतीताईच्या या कार्यामुळे लक्षात येते.
एका मुलीने जखमी झालेला पाणबगळा (पॉन्ड हेरॉन) भारतीताईंकडे आणला. त्याला आईच्या मायेने भारतीताई कुरवाळत होत्या.

त्याच्या पंखाला इजा झाली होती, त्यावर आता औषोधोपचार केले जाणार आहेत. शाळेतील मुलांनी संपूर्ण शाळा आम्हाला दाखविली. पहिल्या माळ्यावर तयार होणाऱ्या वर्गाचे लोखंडी दरवाजे शाळेतील मुलांनीच बनविले आहेत. संगीत कक्ष, शिवण वर्ग  पाहिले. तीन वर्षांपूर्वी यशोधन तर्फे बांधण्यात आलेल्या हॉलला सुद्धा भेट दिली. ताईच्या कार्यालय कक्षात लावलेली नर्मदा मैयेची फोटो फ्रेम खूपच भावली. ताईच्या या कार्यासाठी यथाशक्ती देणगी दिली. सायकल परिक्रमेसाठी भारती ताईंचे आशीर्वाद  घेतले. मुलांसोबत फोटो काढून नर्मदालायचा निरोप घेतला.
आता आम्हाला खलघाट मार्गे दवाना येथे जायचे होते. वाटेत आग्रा मुंबई रस्ता लागला. खलघाट गावात जवळ वेदा नदी लागली. पुढे जाऊन ती नर्मदेला मिळते. नंतर ठिकरी गाव लागले. तेथील गोकुळ स्वीट दुकानातील बलराम यांनी नमकीन आणि सुप्रसिद्ध गजक मिठाई तसेच चहा पाजली.
नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांची सेवा करणे हे बलरामने घेतलेले व्रत आहे.

रस्ते अतिशय टकाटक होते. त्यामुळे आमची राईड राजेशाही पद्धतीने सुरू होती. दवाना येथील भौसिंग बाबांच्या आश्रमात साडेसहा वाजता पोहोचलो. वातावरण थंड झाले होते. आश्रमाचे महंत तवरदासजी काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांचे सेवक आमची जातीने चौकशी करून... काय हवे ते विचारात होते. 

रात्री भोजन प्रसादी म्हणून मसाले भात आणि ताक होते. तृप्त मनाने झोपेच्या अधीन झालो.

नर्मदा मैयेच्या कृपेने आज "बाबांची छाया आणि आईची माया" ह्यांचा लाभ झाला.

नर्मदे हर !!!

सतीश जाधव
मुक्त पाखरे…..

  

8 comments:

  1. नर्मदे हर
    सतिश महाराज की जय
    तुझे लिखाणही नर्मदेमैय्या सारखे विशाल होत आहे
    या वाचनामुळे आम्हलाही नर्मदेचे स्पर्श झाल्यासारखे वाटते
    नर्मदे हर
    सावंत सर्वांगीण नमस्कार

    ReplyDelete
  2. नर्मदे हर. तुमची सायकल पाहून मलाही सायकलवर परिक्रमा करावीशी वाटू लागले. लोक म्हणतात करशील बाई तू. काही भरंवसा नाही. पण वाचताना परत मानसिक परिक्रमा तर होते आहे. सुंदर लिखाण. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.... सौ. यशश्री तावसे.

    ReplyDelete
  3. फारच सुंदर लिखाण. वाचतांना आम्ही तुमच्या बरोबरच आहोत असे वाटते. उर्वरित परिक्रमेसाठी शुभेच्छा.
    ।।नर्मदे हर।।

    ReplyDelete
  4. सतिशजी मी प्रतिभा दाते.मी यशोधन बरोबरच नर्मदा परिक्रमा केली होती.तुमचे अनुभवी लेखन वाचून पुन:परिक्रमेचा आनंद मिळत आहे.आपले लिखाण अप्रतिम आहे.प्रकाशजी सुद्धा सुंदर च लिहीणार.तुम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण करुन याल तेंव्हा मैय्याच्या कृपेने तुम्ही लेखक म्हणूनच नावा रूपाला याल.मैयेला आणि तुम्हाला नमस्कार.

    ReplyDelete
  5. व्वा! आपले लिखाण खूपसुदर आहे. जणू डोळ्यापुढे सर्वं उभ रहाते व मी सुद्धा परिक्रमा करत आहे असा आनंद मिळवत आहे. असेच लिहत रहा व आम्हाला आनद देत रहा . अशी नर्मदा मैयेचरणी प्रार्थना . नर्मदे हर .🙏

    ReplyDelete
  6. खूप सुंदर लेखन त्यामुळे परत एकदा नर्मदा परिक्रमेची अनुभूती आली. मैय्या तुमच्याकडून परिक्रमा तर पूर्ण करून घेईलच व त्याबरोबर आध्यात्मिक उन्नती आणि मय्यांची अखंड कृपा याचा अनुभवही येईल.

    ReplyDelete
  7. मी आनंद पंडित आणि यशोधन बरोबर नर्मदा परिक्रमा क्र.22 केली असून गेल्यावर्षी चितलेमैय्याच्या आश्रमात सेवेचा लाभ झाला जेणेकरून नर्मदामय्यांच्या सहवास मिळणं हेच अहोभाग्य. ।। नर्मदे हर ।।

    ReplyDelete
  8. सर आमच्या साठी गाईड लाईन दिपक अभिजित मी व बाबा
    ,👍👍🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete