Wednesday, January 13, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस चौथा)बावन्नगजा ते पिपलाकुंड ०१.०१.२०२१

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस चौथा)

बावन्नगजा ते पिपलाकुंड

०१.०१.२०२१

सकाळी बालभोग घेऊन बावन्नगजाजी येथील जैन  तीर्थांकर आदिनाथ भगवान यांच्या भव्य मूर्ती असलेल्या स्थानाला भेट दिली.

या सिद्धक्षेत्रात नवीन वर्षानिमित्त जैन समुदयातर्फे मोठी पूजा अर्चना सुरू होती. डोंगरात कोरलेली ही विशाल मूर्ती पाहून डोळ्याचे पारणे फिटले. "श्री आदिनाथ जीनेंद्राय" याचा अर्थ ज्याने मन, वचन आणि काया यावर ताबा मिळवला आहे आणि केवलज्ञान प्राप्त केले आहे.

काल  दर्शनी असणाऱ्या भगवान श्री आदिनाथ मंदिराला भेट दिली होती. सायंकाळच्या सूर्यप्रकाशात हे मंदिर सुर्यप्रभेमुळे सुवर्ण किरणांनीं उजळले होते.

श्री आदिनाथ भगवान यांच्या या पवित्र क्षेत्रास चुलगिरी म्हणतात. चारही बाजूला सातपुड्याच्या पर्वत रांगा आहेत. एका पर्वताच्या माथ्यावर सती मंदोदरीचे (रावणाची पत्नी) मंदिर आहे.

अन्नक्षेत्राचे बाबाजी, स्वामी ज्ञानानंदजी यांचा निरोप घेऊन चुलगिरी घाट चढायला सुरुवात केली. वातावरणात सुखद गारवा होता. तसेच आम्ही सुद्धा जोशात होतो. त्यामुळे घाटमाथ्यावर थोड्या वेळातच पोहोचलो. येथे नितांत सुंदर विव्ह पॉईंट होता. याचे नाव सुद्धा अतिशय सुखदायक होते, "पर्यावरण चेतना केंद्र".

येथिल बगिच्यात सगळीकडे बोगनवेल फुलल्या होत्या. येथील वॉच पॉईंट वर गेलो. संपूर्ण सातपुड्याच्या पर्वतरांगा चारही बाजूला दिसत होत्या. या ठिकाणी मोबाईल रेंज सुद्धा चांगली मिळाली. या नितांत सुंदर ठिकाणावरून प्रिय व्यक्तींना फोन केले. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नववर्षाच्या पहिल्या दिवसाचा थोडा वेळ येथे व्यतीत करून, पुढे मार्गक्रमण सुरू केले.

दोन तासात पाटी गावात पोहोचलो. गावाच्या सुरुवातीलाच चहाच्या दुकानात बरेच परिक्रमावासी बसले होते.

परिक्रमावासींसाठी  चहाची व्यवस्था येथे होती. मुसफिर व्यास आणि जाट साहेब यांची ओळख झाली. जाट शायर आहेत तर व्यास शिक्षक आहेत. दोन मित्र परिक्रमा करतायत... आपल्या क्षेत्रांत उन्नत होण्यासाठी... व्यासांचा मोबाईल डेटा जास्त झाल्या मुळे हँग झाला होता. तो डेटा मेमरी कार्ड मध्ये ट्रान्सफर करून दिला. व्यास महाशय प्रचंड खुश झाले... नर्मदा  मैय्या सेवा करण्याची सुद्धा संधी देते... त्यांच्या चेहऱ्यावरचा  आनंद बघून नर्मदा मैयाचे आभार मानले. व्यासजी आता माझे जिगरी दोस्त झाले आहेत.

दोन मोटरसायकालिस्ट मुकेश रावल आणि श्रीकांत कलमकर पाटी गावात भेटले. आम्हाला चहा पाजण्यासाठी थांबले होते. चहा सोबत आलू वडा आणि मिरची भजी त्यांनी दिली.

मुकेश हॉटेलवाल्याला बिल द्यायला गेला, तर हॉटेल मालक यादवजी बिल घेईना... का... तर परिक्रमावासी सोबत तुम्ही सुद्धा आमचे पाहुणे आहात... काय म्हणावं बरं या औदार्याला...

युथ हॉस्टेलशी मुकेश आणि श्रीकांत निगडित आहेत. निसर्गाच्या जवळ असणाऱ्या व्यक्तीची चटकन दोस्ती होते... याचा प्रत्यय आला.

पाटी वरून बोकराटोकडे जाणारा रस्ता सतत चढाचा होता. त्यात हेडविंड सुरू होती... दमछाक करणारी... दहा किमी  अंतर कापायला सव्वा तास लागला... वाटेत सवरियापानी गावाच्या जवळ हँड पंप होता. थोडी विश्रांती घेऊन... हँड पंपचे पाणी प्यायलो. एकदम तरतरी आली.

वाटेत टापर गाव लागले... बरेच पारिक्रमवासी रस्त्याच्या कडेला मोकळ्या मैदानात बसले होते. येथे सुद्धा सेवा म्हणून चहा मिळाला. या दुकानात सोरट पाहायला मिळाली. त्याला येथे इलम म्हणतात. लहानपणी प्रभादेवीच्या जत्रेत सोरट पाहायला मिळायची. चिठ्ठी काढायची आणि त्यात जो नंबर येईल त्या नंबर वरची वस्तू मिळायची...

इथे तर चक्क पैसेच नंबरवर चिटकवले होते.

बोकराटोला पोहोचलो. आज बोकाराटा मध्ये आठवड्याचा बाजार होता... रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. त्यामुळे सायकल ढकलत तोरणमाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर न्यावी लागली.  तोरणमाळ येथून तीस किमी अंतरावर आहे.

आता ऑफ रोडिंग रस्ता सुरू झाला.अतिशय खडबडीत आणि रस्त्यावरचे डांबर निघून गेल्यामुळे सायकल दगड गोट्यातून चालली होती. इलेक्ट्रिक करंटचा झटका लागतो, त्याप्रमाणे हादरे बसत होते. अक्षरशः ब्रेक डान्स सुरू होता.

तेव्हढ्यात बाजूने जीप पास झाली. जीपच्या आत खच्चून माणसे कोंबली होती. तिच्या टपावर, दरवाजाला लटकलेली, पुढच्या बोनेट वर बसलेली जवळपास पन्नास माणसे असावीत त्या जीपमध्ये.

पिपरकुंडच्या वेशीवर पोहोचलो. येथे बोकराटो वरून येणाऱ्या खचाखच भरलेल्या जीप खाली होत होत्या.  येथे मुंबई महापालिकेत काम करणारा रामलाल भेटला. तो पहाडावरच्या आमली गावातला आहे. येथील आदिवासी बायका गळ्यात चांदीचा मोठा तोडा घालतात.

त्याला आदिवासींच्या पावरी भाषेत आहाडी म्हणतात. इतर गावकरी निमाडी भाषा बोलतात.
जीप स्टँड कडून पिपरकुंड गाव सुरू झाला.  वर गावाकडे जाणारा अवघड घाट सुरू झाला. रस्त्याची दुर्दशा त्यात चढाचा आणि वळणावळणाचा रस्ता; या मुळे काही ठिकाणी सायकल ढकलण्या शिवाय पर्याय नव्हता. तीन किमी चढायला एक तास लागला. प्रचंड दमछाक झाली होती. मुख्य गावात पोहोचायला चार वाजले. आणखी सायकलिंग करायची इच्छा नव्हती. म्हणून तेथेच तळ टाकायचा ठरले.

रेवसिंगचे छोटे दुकान असलेले घर लागले.  दुकानाजवळ पोहोचताच रेवसिंगने हसतमुखाने स्वागत केले. दहा मिनिटात चहा आला. मग संजयने हळूच त्याला विचारले, 'हम यहा रह सकते है क्या' तो म्हणाला, 'हाऊ' (म्हणजे हो). आम्हाला हायसे वाटले. बाहेरच असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्यात सायकल लॉक केल्या आणि समान घेऊन त्याच्या घरात आलो.

शेणाने मस्त सारवलेल घर... घरात टीव्ही.. आणि त्याचे हसतमुख कुटुंब... रेवसिंगच्या बाबाचे नाव कनसिंग. घर एकत्र कुटुंब पद्धतीचे होते. त्याला आठ मुले आणि वीस नात-नातू ... एकूण चाळीस जणांचा मोठा परिवार... रस्त्यावर दुकान आणि वर टेकडीवर त्याचे चौसोपी घर होते. आळीपाळीने त्याची सर्व मुले आणि सुना भेटून गेले.

रेवसिंग बोलायला अतिशय चटपटीत होता. थोड्याच वेळात त्याच्याशी एकदम गट्टी झाली. पिपरकुंड मधील आदिवासी जमातीचा तो प्रमुख होता. सरकारी योजनांचा लाभ घेऊन त्याने दुकान बांधले होते. सायंकाळी आठ वाजताच जेवण आले. शेव खाटो, टमाटर खाटो आणि त्याच्या बरोबर रोटलो जेवण आले.

अतिशय चमचमीत बनविले होते जेवण त्याच्या लाडोने (बायकोने)... त्यानंतर ताक आले.
ताकाला "मोहे किंवा साह" म्हणतात.

जेवल्यावर गप्पांचा सिलसिला सुरू झाला. त्याने पहाडी लोकसंगीत ऐकविले. त्याची वडिलोपार्जित खानदानी तलवार दाखविली. स्वतः तलवारीसह आदिवासी नृत्य करून दाखविले. संजयने पण तसेच नृत्य केले. त्या भारदस्त तलवारीसह फोटो काढले.

रेवसिंगचे शिक्षण झालेले नाही. ही आदिवासी कुटुंब खूप खडतर जीवन जगत असतात.  पावसात नाले भरून वाहतात तेव्हा गावांचा संपर्क तुटतो. एकदा तर त्याने ओढ्याच्या पुरात वाहून जाणाऱ्या स्वतःच्या मुलीला वाचविले... सर्व खडतर आणि विपरीत परिस्थितीत सुद्धा ही माणसे मदत करायला तत्पर आणि सदा हसतमुख असतात याचे खूप अप्रूप वाटले...

एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली... माणसाच्या गरजा कमी असतील तर दुःख त्याच्या जवळपास सुद्धा फिरकत नाही...

शेणाने सारवलेल्या घरातील जमिनीवर निवांत झोप लागली...

आदिवासी कुटुंबासमवेत काढलेली ती सायंकाळ आणि रात्र ... जीवनाच्या अनुभवत प्रचंड भर टाकून गेली.

नर्मदे हर

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

8 comments:

  1. ज्या ठिकाणी जाता तिथलं सामाजिक, शैक्षणिक, व सामाजिक स्थिती काय याच वर्णन असावं

    ReplyDelete
  2. Chan.vegvegli manse jee bhetat tyancha tumhi chan varnan kartat sir.

    ReplyDelete
  3. बहुत आनंद आयआ पढकर अच्छा लगा आपसे मिलकर आगे का वर्णन भी मिलेगा।

    ReplyDelete
  4. व्वा! खूप सुंदर लिखाण . आपणास वेगवेगळ्या व्यक्ती भेटतात त्यामुळे आपल्या अनुभवात भर तर पडतेच शिवाय आपणास आनंदही मिळतो. वाचून बरेवाटले . नर्मदेहर🙏

    ReplyDelete
  5. वेगवेगळ्या व्यक्तींचे सुंदर वर्णन वाचताना असे वाटलेकी या माणसाची निरीक्षण शक्ती किती प्रगल्भ आहे

    ReplyDelete
  6. नर्मदे हर. मैय्याचे विद्यापीठ किती समृध्द आहे.इथे खूप काही बघायला व शिकायला मिळते. आपण या विद्यापीठाच्या परिक्षेत यशस्वी होणारच. सुंदर निरिक्षण व वर्णन आहे.

    ReplyDelete
  7. नर्मदे हर**सुंदर लिखाण आहे.फोटो सुद्धा उत्तम काढता, वेगवेगळ्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर येतात, तुम्ही पहात असलेली ठिकाणे सुद्धा आपण स्वतः जाऊन पहावीत असे वाटते.
    तुमचा दिवसांचा एकंदर कार्यक्रम कसा असतो?
    एका दिवसात किती किलोमीटर सायकलिंग करता तेही सविस्तर कळविलेत तर उत्तम होईल, आणि ज्यांना सायकल वरून परिक्रमा करावी असे वाटते त्यांना ही मार्गदर्शन होईल.
    धन्यवाद.🙏🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. सुरुवातीला दररोज साधारण शंभर किमी सायकलिंग करायचे ठरविले होते. परंतु नंतर प्रत्येक आश्रम, साधू संत महंत यांनी साधना केलेल्या ठिकाणांना पण भेटी द्यायचे ठरले. त्यामुळे कच्च्या , दगड धोंड्यांचा रस्त्यावरुन आणि नर्मदा मैय्येच्या किनाऱ्यावरून सायकलिंग करत आहोत. या मुळेच साधारण दिवसाला साठ ते ऐशी किमी सायकलिंग होते. तसेच सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजे पर्यंत सायकलिंग करीत आहोत.

      Delete