Thursday, May 13, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस अकरावा) विमलेश्वर (रत्नसागर) ते भरुच०८.०१.२०२१

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस अकरावा)
  विमलेश्वर  (रत्नसागर) ते भरुच

०८.०१.२०२१

विमलेश्वर तिर्थधाम... याला मैय्येचे चरण स्थल म्हणतात... रावणाने येथे घोर तपश्चर्या केली होती. दक्षिण तटावरील शेवटचे आणि अतिशय महत्वाचे आध्यत्मिक स्थळ... मनात एक अनामिक हुरहूर होती. हे समुद्र (रत्नसागर) आणि नर्मदा मैया यांच्या संगमाचे हे पवित्र ठिकाण आहे.

कोणत्याही नदीचा जेव्हा सागराशी संगम होतो तेव्हा सागर नदीच्या पात्रात घुसून खाडी प्रदेश तयार होतो. येथे नदीचे पाणी खारट होते. येथील नर्मदा मैया आणि सागर संगमा मध्ये वेगळी गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे नर्मदा मैय्या सागरात जवळपास २४ किमी आता घुसली आहे. त्यामुळे नर्मदा पारिक्रमेचा हा टप्पा  पार करताना नावाडी बाजूच्या खाडीतून थेट समुद्रात खोलपर्यंत नाव घेऊन जातो...एका रोमांचकारी अनुभवला आम्ही सामोरे जाणार होतो.

आजची नावेतील पारिक्रमा दक्षिण तटावरील विमलेश्वर ते उत्तर तटावरील मिठी तलाई अशी होती.

पहाटे दोन वाजल्या पासून वर्दळ सुरू झाली. पहाटे उठून सर्व तयारी झाली. विशेष म्हणजे येथे आलेल्या प्रत्येक मूर्तिकडे खाली अंथरायला कॅरीमॅट होते. पहाटे शाळीग्राम महाराजांकडून  बालभोग चहासुद्धा मिळाला. गेली सात वर्षे शाळीग्राम महाराज नर्मदा पारिक्रमावासीयांची मनोभावे सेवा करीत आहेत. मैयेची पूजा करून पहाटे  पाच वाजता जय्यत तयारीनिशी खाडी ताटाकडे जायला सज्ज झालो. बसने, मोटरसायकलने आणि पायी परिक्रमा करणारे सर्व जत्थे;  नर्मदे हर... ओम नमः शिवाय... जय सियाराम... जयघोष करीत खाडीकडे प्रस्थान करू लागले. सायकल बोटीच्या वर टाकून, तिची सुद्धा नर्मदा पारिक्रमा घडणार होती.

खाडी किनारी प्रचंड जनसागर लोटला होता... सागराचा एक पाट त्या खाडीत आला होता. अजून भरती सुरू न झाल्यामुळे त्या पाटात सागराचे पाणी आले नव्हते... वातावरणात गारवा होता. संजय आलेल्या पारिक्रमावासीयांशी चर्चा करण्यात मग्न झाला. बसने आलेल्या पारिक्रमावासीयांमध्ये महिला वर्ग मोठ्या प्रमाणात होता.

त्यांचे सामूहिक भजन सुरू होते. भक्तिमय वातावरणाने आसमंत भरून गेला होता. सागर किनारचा सूर्योदय अनुभवत होतो.  आजचा सूर्य चंद्रासारखा पांढराफेक दिसत होता. त्याची आसमंतात  पसरलेली सुवर्णप्रभा म्हणजे नेत्रसुखाचा परमावधी होता. बरेच परिक्रमावासी कुतूहलाने आमची सुद्धा विचारपूस करीत होते. आठ वाजता खाडीचे पाणी वाढायला लागले. त्या बरोबर एक-एक नाव किनाऱ्यावर येऊ लागली.

एकूण पाच नाव आल्या. दोन छप्परवाल्या आणि तीन उघड्या होत्या. नावाड्याने अतिशय दाटीवाटीने सर्व पारिक्रमावासींना अक्षरशः कोंबले. सायकल छप्परवाल्या नावेच्या टपावर बांधल्या.

पाच नावेमध्ये साधारण चारशे मूर्ती असाव्यात... नर्मदा मैय्येवर असलेल्या गाढ श्रद्धेमुळे हा खडतर प्रवास अतिशय आनंदात आणि प्रचंड ऊर्जेत सुरू झाला. सकाळी समुद्राकडून वारे वाहत होते. विशेष म्हणजे नावेत जागा नसल्यामुळे माझी टपावर बसण्याची सोय झाली होती.

चारही बाजूला वर्तुळाकार क्षितिज पसरले होते. एका बाजूला कांदळवनाचे अर्धवर्तुळाकार जंगल तर दुसऱ्या बाजूला खाडी आणि समुद्राचे अर्ध वर्तुळाकार क्षितिज; पृथ्वीची गोलाई दाखवत होता.   बोचरे वारे अंगावर घेत नावेतून सफर सुरू झाली. प्रत्येक नावेतून "नर्मदे हर" चा जयघोष सुरू होता. समुद्राच्या भरतीमुळे नाव बरेच हेलकावे खात होती. तासाभराच्या नावेतील सफरी नंतर खाली बसलेले सदस्य टपावर येण्यासाठी चुळबुळ करू लागले. परंतु नावाडी सुरक्षेच्या कारणास्तव कोणालाही टपावर सोडत नव्हता. फोटो काढण्याच्या निमित्ताने संजय हळूच वर आला. हवेशीर टपावर चणे, शेंगदाणे आणि चिक्की खाणे म्हणजे स्वर्गसुखाचा आनंद होता.

तट परिवर्तन करताना सर्व जबाबदारी नावड्याची असते. आपली जीवन नैय्या सुखरूप पार करण्यासाठी नावाड्याला भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. काही पारिक्रमावासी कपड्यांच्या भेटवस्तू कोणी रोख रक्कम, तर जे गृपमध्ये आले होते ती मंडळी एकत्रीत भेटवस्तू देत होते.

भर समुद्रात बोट गेल्यावर; समोर एक टापू दिसतो. त्या टापूजवळ नावेने  उजव्या बाजूला वळण घेतले आणि मिठीतलाई किनाऱ्यावर जाऊ लागली.

जवळपास चार तास ही नावेतील रोमांचकारी सफर सुरू होती. मिठीतलाई किनाऱ्यावर उतरून सर्वांनी "नर्मदे हर" चा जोरदार जयघोष केला. सायकल ताब्यात घेऊन पुढची सफर सुरू झाली.

आसपासचा परिसर गुजरात मधील दहेजचा इंडस्ट्रियल पट्टा होता. उन्हे वाढली होती. भूकपण लागली होती. चार किमी अंतरावरील भांगेरा येथील चंद्रमौलेश्वर महादेव मंदिराच्या कृष्णानंद आश्रमात पोहोचलो. तेथील बाबाजी म्हणाले, येथे सदाव्रत मिळेल.  कोणताही आडोसा किंवा घर नसल्यामुळे पुढे जायचे ठरले. रिलायन्स नोसिल कंपनीच्या समोर असलेल्या एका टपरीवर भोजनप्रसादी म्हणून केळी खाल्ली. तेथून पुढील पारिक्रमा सुरू झाली.

हायवेला येऊन भर उन्हात सायकलिंग सुरू झाले. दहा किमी पुढे गेल्यावर पाठपिशवी  केळ्याच्या टपरीवर राहिल्याचे लक्षात आले. संजयला तेथेच थांबवून ऑटोरिक्षा करून नोसिल जवळील टपरीवर गेलो. केळीवाल्या पंडितजींनी पाठपिशवी सांभाळून ठेवली होती. किंबहुना माझ्या पिशवीतील पारिक्रमा वहीवर असलेल्या मोबाईलवर बरेच फोन सुद्धा केले होते. पण फोन लागला नाही. केळीवाल्याचे पोटभर आभार मानून तसेच मागे फिरलो. यामुळे एक गोष्ट लक्षात आली. आपल्या प्रत्येक बॅगेत दोघा-तिघांच्या फोन नंबरचे कागद ठेवणे अतिशय गरजेचे आहे.

भोजनप्रसादीची वेळ टाळून गेली होती. जवळच चहाच्या टपरीवर कुरमुरे आणि चहा घेतला. येथून भरुच ५० किमी अंतरावर होते.  अंधार पडायच्या आत भरुच गाठायचे होते. हायवेवरील अतिशय हेवी ट्राफिक आणि हेडविंड अंगावर घेऊन भर उन्हात सायकल चालवणे ही परीक्षाच होती.

सपाट रस्त्यावर लो गियर ठेऊन सुद्धा पेडलिंग करणे जिकरीचे झाले होते. दीड तासात जेमतेम वीस किमी सफर झाली. भेेेलसली  गावात एका छोट्या टपरीवर हायड्रेशन ब्रेक घेतला. ब्रेड पकोडे भजी सोबत चटकदार मिरची आणि चहा घेऊन पुढे प्रस्थान केले.

तासाभरात भरुच उपनगर भागात पोहोचलो. भरुच बांबखाना येथील कोळीवाड्यात गुलाबभाई यांनी थांबविले. त्यांच्या मारुती गाडीच्या मागे माँ नर्मदा लिहिलेले होते. हायवेला रस्त्यात गाडी उभी करून आमच्या पुढ्यात हात जोडून गुलाबभाई उभा राहिला. तुमच्या रूपाने आमच्या दारी नर्मदा मैय्या आली आहे. तेव्हा तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी द्या. सायंकाळ झाली आहे, आज  चहापान भोजनप्रसादी घेऊन येथेच रहा, असे त्याने विनवले.

पुढे दहा किमी अंतरावरील भरुच मधील प्रसिद्ध निलकंठेश्वर  महादेव मंदिरात आज विश्राम करणार होतो. त्यामुळे गुलाबभाई यांच्या घरात चहा बिस्कीट घेतली. गुलाबभाई आणि त्याचा मोठाभाऊ नर्मदा प्रकल्पग्रस्त बचाव आंदोलनात मेधा पाटकर यांच्या समवेत काम करतात.

त्यांच्यासह फोटो काढले आणि आभार मानून पुढची सफर भरुच शहरातून सुरू झाली.

भरुचचे शेंगदाणे जगप्रसिद्ध आहेत.   सायंकाळ झाल्यामुळे रस्त्यावर रहदारी वाढली होती. भरुच शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या निळकंठ महादेव मंदिरात पोहोचायला सायंकाळचे सात वाजले.

त्यामुळे मंदिराचे दरवाजे बंद झाले होते. बाजूच्या दुकानात चौकशी करता. पारिक्रमावासीयांना साडेसहा पर्यंत आत प्रवेश देतात;  हे समजले. बराच वेळ थांबल्यावर एक बाबाजी आले त्यांनी आम्हाला मंदिरात प्रवेश दिला. ताबडतोब भोजनप्रसादी घेण्याची विनंती केली.

आज बोटीची सफर आणि ६० किमी सायकलिंग असा मोठा पल्ला मारला होता. ताटात भोजनप्रसादी आणून मंदिराच्या एका बाजूला असलेल्या शेड जवळ झाकून ठेवला. जवळच असलेल्या न्हाणीघरात स्नानसंध्या आटपून मैयेची पूजा केली. त्या नंतर भोजनप्रसादी सेवन केली.

नर्मदे किनारी असलेल्या प्राचीन निळकंठ महादेवाचे सुंदर मंदिर, अतिशय विशाल प्रांगण आणि नितांत स्वच्छ परिसर पाहून सर्व शीण नाहीसा झाला. अंधार पडल्यामुळे सकाळी देवदर्शन करायचे ठरविले.

जेवणखाण आटपल्यावर मंदिराजवळच्या नर्मदा घाटावर जाऊन आम्ही निवांतपणे बसलो. चमचमणाऱ्या चांदण्यात नर्मदा मैय्येचे शांतपणे वाहणे मनावर गारुड करून गेले. त्या निरव शांततेशी साधलेला संवाद वेगळी अनुभूती देऊन गेला.


पहाटे चार वाजल्यापासून सुरू झालेला आजचा अतिशय महत्वाचा दिवस मैय्येच्या घाटावर येऊन विसावला होता....

सतीश जाधव
मुक्त पाखरे....

4 comments:

  1. परिक्रमेचे वर्णन वाचून एकदातरी परिक्रमा करावीच असे दृढ मत झालेले आहे.
    गुरुजी तुम्ही ग्रेट आहेत!
    सॅल्युट! सॅल्युट!! सॅल्युट!!!

    ReplyDelete
  2. आपण खूप सुंदर लिहीता वाचून आपण केलेली परिक्रमा परत ताजीतवानी झाली. आपण जे क्षण नर्मदापरिक्रमेत अनुभवले ते अवर्णनीय होते, असेच लिहीत रहा व आम्हाला पाठवत रहा

    ReplyDelete
  3. अक्षयचे अभिप्राय...

    वाचताना, नावेतील परिक्रमा स्वतः केल्याची अनुभूती मिळाली...
    प्रत्येक घटनेचे बारीक सारीक तपशिलवार वर्णन नेमक्या शब्दात केले असल्याने ह्या परिक्रमा करण्याच्या आनंदाचा अनुभव येतो ,आणि पुन्हा पुन्हा वाचण्याचा मोह होऊन तो द्विगुणित ही होतो...

    चमचमणाऱ्या चांदण्यात नर्मदा मैय्येच्या घाटावर शांततेशी साधलेला संवादाने दिवसभराच्या खडतर प्रवासाने तनाला शांत करत मनालाही सुशांत केले हे वाचून खूपच आनंद झाला.,...
    त्या मैय्येच्या दर्शनाची ओढ लागली....🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  4. सुंदर वर्णन. परिक्रमेची पुन्हा अनुभूती येतेय. आभार

    ReplyDelete