Saturday, May 15, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस बारावा) भरुच (निलकंठेश्वर मंदिर) ते नारेश्वर रंगावधुत स्वामी महाराज मंदिर ते अनसूया माता मंदिर (अंजाली निवास) ०९.०१.२०२१

 नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस बारावा)
   भरुच (निलकंठेश्वर मंदिर) ते नारेश्वर रंगावधुत स्वामी महाराज मंदिर ते अनसूया माता मंदिर (अंजाली निवास)

०९.०१.२०२१

भरुच जवळच्या झाडेश्वर गावातील निलकंठेश्वर महादेव मंदिरा बाहेरच्या पडवीत आमचा विश्राम होता. आज पहाटे तीन वाजताच जाग आली. नर्मदा मैय्येची साद कानात गुंजत होती. थंड वारे मंदगतीने वाहत होते.  निरभ्र आकाशात चांदण्या चमचमत होत्या. आज सफला एकादशी होती. झाडांची सळसळ ऐकत नर्मदेच्या किनारी आलो. येथे नर्मदा शांत रुपात वाहते. 

घाटावर थांबून आकाश दर्शन केले. उत्तरेकडे स्थित ध्रुव तारा एकटक माझ्याकडे पहात होता. नर्मदे किनारी  एका रांगेत लावलेली पाम झाडे चांदण्याच्या प्रकाशने न्हाऊन निघाली होती.
थोडावेळ पहाटेच्या निसर्गात रममाण होऊन पुन्हा पडवीत आलो आणि ध्यानमग्न झालो. 

पुन्हा सकाळी सहा वाजता अंथरूणाबाहेर आलो. प्रातर्विधी आटपले आणि नर्मदा पूजन करून निलकंठेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. बाजूलाच असलेल्या संकटमोचन हनुमानाचे दर्शन घेतले.

   नारळ, पिंपळ, चिंचेच्या झाडांनी  अच्छादलेला मंदिराचा भव्य परिसर...  मंदिराला केलेली लाल आणि पिवळ्या रंगांची रंगसंगती प्रांगणाची शोभा वाढवीत होती.   आ... हा... हा... हा... नर्मदा मैय्येचे अतिशय विहंगम स्वरूप पहायला मिळाले. अद्भुत चुंबकीय क्षेत्राची जाणीव या परिसरात झाली. मिठी तलाईच्या नर्मदेच्या उत्तर तटावर आल्यावर कालचा नर्मदा तिरावरचा पहिलाच मुक्काम होता. प्रत्येक पारिक्रमावासी या मंदिराला भेट देतात.

थोड्याच वेळात हायवेला पोहोचलो. हायवेच्या चौरस्त्यावर रांगेत खाण्याच्या टपऱ्या लागल्या होत्या. येथे बऱ्याच बस सुद्धा उभ्या होत्या.भरुचचे प्रसिद्ध शेंगदाणे आणि चणे पाकिटे घेतली. कालच संजयने कांदापोहे खायची इच्छा प्रकट केली होती आणि आज जवळच्या टपरीवर कांदापोहे आणि चहा बालभोग मिळाला. मैय्या मनातल्या इच्छा सहज पूर्ण करते. मंदिर परिसरातून एकदम हायवेवर आल्यामुळे शांतते मधून कोलाहलात प्रवेश झाला होता.

पुढची परिक्रमा सुरू झाली आणि भव्य स्वामींनारायण मंदिराचे दर्शन झाले.

अतिशय अप्रतिम असे हे मंदिर... राधा-कृष्ण, सितामैय्या पुरुषोत्तम रामजी... वृषभदेव यांची मंदिरे... हा मनमोहक आणि भव्यदिव्य मंदिर परिसर पाहून मन प्रसन्न झाले.  हे मंदिर अप्रतिम कलाकृतीचा नमुना आहे. स्वच्छता आणि शांतता यांचा संगम आढळला. घनश्यामजी महाराज, शिवपार्वती आणि लक्ष्मीनारायण यांचे सुद्धा दर्शन झाले. मंदिराच्या पवित्र वातावरणात थोडा वेळ व्यतीत केला. परिक्रमेत पाहायला मिळालेले नितांत सुंदर मंदिर म्हणून या स्वामींनारायण मंदिराचा उल्लेख करावा लागेल.

पुढे भनोदकडे जाणाऱ्या मार्गाने श्री रंगावधुत महाराजांच्या मठाकडे प्रस्थान केले. हायवे वरून उजव्या बाजूला वळल्यावर थोड्याच वेळात कॅनॉलच्या बाजूने जाणारा रस्ता सुरू झाला.

जागोजागी या कॅनलची साफसफाई सुरू होती. जेसीबी लावून पाण्यात जमलेले शेवाळ, रानटी झाडे झुडपे, वाहत येणारा केरकचरा नाल्या बाहेर काढला जात होता. या रस्त्यावर गाड्यांची वर्दळ नसल्यामुळे सायकल निवांत पळत होत्या.

बरोबर साडेबारा वाजता नारेश्वर येथील श्री रंगावधुत स्वामी महाराजांच्या आश्रमात पोहोचलो.

श्री पांडुरंग विठ्ठल उर्फ श्रीरंग अवधूत महाराजांनी गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामींच्या आदेशाने गुजरातेत दत्तभक्ती परंपरा वाढीस लावली. " दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" भजनाने अवघा गुजरात दत्तभक्तीच्या सुगंधाने दरवळू लागला. धन, मान, कीर्ती या पलीकडे आनंददायी विश्व आहे याची जाणीव अखिल जगाताला झाली.

"धाव धाव दत्ता किती वाहू आता । चैन नसे चित्ता येई वेगीं" ।। या आर्त स्वरांनी श्रीरंग अवधूत स्वामींनी चाळीस वर्षे नारेश्वराच्या लिंबाच्या वृक्षाखाली कठोर तपश्चर्या केली. स्वामींच्या तपोबलामुळे त्या लिंबाने आपला कडूपणा सोडून मधुर झाला आणि खाली झुकून धरणीला स्पर्श केला. येथेच रंगावधुत स्वामींना श्री दत्त गुरूंचा साक्षात्कार झाला.
श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी गुरूंच्या आदेशान्वये श्री दत्त पुराणाच्या १०८ पारायणांचे अनुष्ठान श्री रंगावधुत स्वामींनी पूर्ण केले. त्याच्या उद्यापना प्रित्यर्थ रंगावधुत स्वामींनी नर्मदामैयेची पायी पारिक्रमा १०८ दिवसात  केली.

श्री रंगावधुत स्वामी उच्च कोटीचे सिद्ध संत असून सुद्धा मातेच्या आज्ञेनेच सर्व कामे करीत. मातेच्या स्मृती प्रित्यर्थ "मातृस्मृतीशैल" स्मारकाची स्थापना नारेश्वर येथे केली.

श्री रंगावधुत स्वामी संस्कृतचे प्रकांड पंडित होते. रंगहृदयम् या ग्रंथात अनेक देवदेवतांच्या प्रार्थना, स्तोत्रे आणि संकीर्तने त्यांनी संस्कृतात रचल्या. स्वामींनी बावन्न ओळींची दत्त स्तुती रचली... तेच *दत्तबावनी स्तोत्र समस्त मानव जातीस संकटविमोचन स्तोत्र म्हणून फलदायी ठरले आहे.
 
अशा या पवित्र भूमीत पाऊल ठेवताना मन उचंबळून आले. दुपारी बारा वाजता मंदिर बंद झाले होते. बाजूच्या भोजनगृहात अन्नप्रसादीची व्यवस्था सुरू झाली होती. आमटी-भात, बटाटा-वांग्याची भाजी, शिरा अशी सुग्रास भोजनप्रसादी होती. भोजनगृहाला चारही बाजूने लोखंडी जाळ्या लावल्या होत्या. चौकशी करता कळले, या परिसरात माकडांचा खूपच सुळसुळाट आहे. आल्या आल्या, 'बॅगा आणि सायकलवरील सर्व वस्तू सांभाळा' ह्या सूचना मिळाल्या.

अडीच वाजता रंगावधुत स्वामींचे मंदिर उघडणार होते. हे त्यामुळे बाहेरील व्हरांड्यात थोडावेळ पथारी मांडली.

मंदिराचे प्रवेशद्वार मोराच्या सप्तरंगी पिसाऱ्याच्या कलाकृतीने बनविले होते. श्री रंगावधुत स्वामींच्या मंदिरात प्रवेश केला. शांतता हे मंदिराचे मुख्य अंग होते. स्वामींची अतिशय प्रसन्न आणि हसतमुख मूर्ती मनाचा ठाव घेऊन गेली. श्री अवधूत दुःख क्लेशाचे विनोदात रूपांतर करतात. श्री अवधुतांचे मौन हेच उत्तम प्रवचन आहे. "परस्पर देवो भव" हे स्वामीजींचे ब्रीद आहे. काही काळ मंदिरात ध्यानमग्न झालो.

खरं तर या आश्रमात थांबून मंदिराची महती समजून घ्यावी, येथील स्पंदनांची अनुभूती घ्यावी आणि  श्री स्वामीजींच्या चरणी लीन व्हावे ही इच्छा होती. परंतु आजचा मुक्काम अनसूया मातेच्या मंदिरात होता त्यामुळे पुढे प्रस्थान केले. येथुन अनसूया मातेचे मंदिर साधारण ४५ किमी अंतरावर होते.

दिड तासात सेगवा चौकडी येथे पोहोचलो. दुपार असल्यामुळे सायकलचा वेग कमी झाला होता. हायड्रेशन ब्रेक घेतला. रस्ता छोटा असला तरी रहदारी कमी होती. बारा किमी अंतर अजून जायचे होते
पुढचा रस्ता ऑफ रोडिंग होता वाटेत कॅनॉल लागत होते त्यामुळे तेथेच गोल गोल फिरतो आहे असेच भासत होते. मॅप रीडिंगचे काम संजय उत्कृष्ट पद्धतीने करत होता.
पावणे सहाच्या दरम्यात अंजाली गावातील अनसूया मातेच्या मंदिरात पोहोचलो.

मातेची आरती सुरू होती. दत्त दिगंबरांची आई महासती अनसूया माता... भव्य मंदिर आणि सुंदर परिसर...

बाजूच्या धर्मशाळेत अगोदरच दहा-बारा पारिक्रमावासी आले होते. एक माताजी जोरजोरात फोनवर कोणाशी तरी वाद घालत होत्या. माताजींना हात जोडले... इतक्यात बाजूला असलेल्या दुकानदाराने आम्हास बोलावले. दोघांना  बिस्कीटचे पुडे तसेच फरसाण पाकिटे बालभोग म्हणून दिली. मातेच्या एका भक्ताने मोठा मोदक आणि दहा रुपये दिले. या परिक्रमेत नव्या नव्या अनुभवांची शिदोरी गाठीला येत होती.

नर्मदा मातेची पूजा झाल्यावर मंदिराचे पुजारी श्री अमित जोशींनी भोजनप्रसादीसाठी भोजनगृहात बोलावले.

भोजनानंतर अमित गुरुजींनी महासती  अनसूया मातेची महती कथन केली.

गुरुजी म्हणाले,  "परिक्रमेत येणाऱ्या साधकाने प्रत्येक स्थळाचे  महत्व समजून घ्यावे, तेथील देवदेवतांचे  दर्शन करावे, त्या तपोभूमीची स्पंदने अनुभवावी, साधुसंतांच्या सहवासाचा लाभ घ्यावा; तसेच आलेले अनुभव, मिळालेले ज्ञान सर्वांना वाटावे;  तेव्हाच सर्वार्थाने परिक्रमा पूर्णत्वाला जाते. जेव्हा अशा प्रकारे पारिक्रमा पूर्णत्वाला जाते तेव्हा सर्व अनुभूतींचा साक्षात्कार तेथेच होईल."

त्यानंतर परिक्रमेबाबत बरीच मंडळी आपला सल्ला घ्यायला येतील. त्यांना योग्य मार्गदर्शन हा परिक्रमेचाच एक भाग आहे. अमित गुरुजींनी परिक्रमेबाबत केलेले विश्लेषण मनाला एकदम पटले.

     अंजाली हे स्थान अनसूया मातेची तपोस्थळी आहे.  तर मूळ स्थान उत्तरप्रदेशातील मंदाकिनी नदी किनारी चित्रकूट आहे. आई देवहूती माँ आणि पिता कर्दम ऋषी होय. अनसूया मातेचा विवाह अत्री ऋषी बरोबर झाला. अत्रिऋषी सप्तर्षी मधील एक होय. ते भूत, भविष्य आणि वर्तमान यांचे ज्ञानी होते. माता अनसूयेने देवप्रजा निर्माण करण्याचा संकल्प केला होता. हा संकल्प पूर्ण करण्यासठी अत्री मुनींनी ध्यान लावले. तेव्हा  नर्मदा मैयेच्या उत्तर तटावरील अंजली ह्या स्थानाचा दृष्टांत झाला. समोर असलेल्या दरीला एरंडी खाई म्हणतात. या स्थानला एरंडी संगम म्हणतात. या संगमावर स्नान केले असता सर्व कातडीचे रोग नष्ट होतात.  येथे सती अनसूयेने तपश्चर्या सुरु केली. हे तप करताना मातेचे दोन नियम होते. एक पतिव्रत आणि दुसरे अतिथी सन्मान होय.

थंडीत ओल्या वस्त्रनिशी... पावसात उघड्यावर भर पावसात.... उन्हात अग्निवलयात... तप साधना करणे ही तर  अतिशय कठोर आणि उग्र तपश्चर्या होती.  तसेच दारात आलेल्या साधुसंत मुनिवर यांना भोजनादी देणे आणि पतिसेवेत तत्पर असणे.

अशा अहोरात्र आणि वर्षानुवर्षे केलेल्या साधनेमुळे या तपाचा ताप स्वर्गलोकांपर्यंत पोहोचला. इंद्रासन डोलू लागले. नारदाने सांगितले देवराज आपल्या आसनाला बिलकुल धोका नाही.

हीच गोष्ट नारदाने पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती यांना सांगितली. भूलोकावर तपसाधनेस बसलेल्या  अनसूया मातेमूळे देवलोकामध्ये ताप उत्पन्न झाला आहे.  या घटनेमूळे तीनही शक्तीमध्ये ईर्षा उत्पन्न झाली.  तीनही देवतांनी आपल्या पतींना अनसूया मातेचे तप भंग करण्यास सांगितले. ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांनी समजूत काढून सुद्धा तीन देवता  ऐकेनात.

त्रिदेव साधूंच्या वेशात अनसूया मातेच्या आश्रमात भिक्षा मागू लागले. पण ही भिक्षा मातेने विवस्त्र होऊन द्यावी अशी अट घातली. अनसूया मातेने तपोबालाने  ओळखले हे तीनही साधू सृष्टीचे पालनकर्ता आहेत. मातेने हातात जल घेऊन संकल्प केला,' जर  मी मन, वाचा आणि कर्माने पतिव्रत सेवा केली असले आणि अतिथी सन्मान केला असेल तर दारात साधूरुपात आलेले सृष्टीचे रचयिता त्रिदेव एकाच स्वरुपात तीन बालक बनतील.  त्या साधूंवर  जल शिंपडताच तीनही देव एकाच रूपाचे तीन बालक झाले, जेणे करून त्यांची भिक्षेची इच्छा मातेला पूर्ण करता आली.

ही तीळी सारखीच दिसणारी बालके तब्बल सहा महिने अनसूया मातेचे स्तनपान करीत होते. विशेष म्हणजे ब्रम्हा विष्णू महेश यांना माता नाही.     परब्रम्ह ओंकारातून शंकराचा जन्म झाला. महेशच्या हृदयातून महाविष्णू अवतीर्ण झाले. तर विष्णूच्या नाभीमधून ब्रह्माचा उदय झाला. हे त्रिदेव अजन्मा आहेत. परंतु अनसूया मैयेच्या तपोबलामुळे त्यांना विवश होऊन बालक स्वरूपात मैयेच्या मातृकृपाछत्राखाली रहावे लागले. अशा रितीने ह्या तीनही देवांची मातेच्या ममत्वाची इच्छा सुद्धा पूर्ण झाली होती.

आता तीनही आदिशक्ती पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती यांना संकट पडले. आपले पती अजून का येत नाहीत त्या बद्दल....

तीनही देवता अनसूया मातेकडे येऊन आपल्या पतींची चौकशी करू लागल्या. माता म्हणाली गेल्या सहा महिन्यांपासून तुमचे पती बालक रुपात माझ्याकडे आहेत. तुमच्या पतींना ओळखून घेऊन जा !  हुबेहूब सारखीच दिसणारी तीन बालके पाहून तीनही देवता अचंबित झाल्या. यातील आपला पती कोण हे ओळखू शकल्या नाहीत. त्यांचे गर्वहरण झाले आणि त्या अनसूया मातेला शरण गेल्या.

आम्ही तुमची परीक्षा घ्यायला पतीदेवांना पाठविले परंतु आमचीच परीक्षा झाली. आम्हाला क्षमा करा.  आमच्या पतींना आपण पुत्र बनविलेत, त्यामुळे आम्ही तुमच्या सुना आहोत. त्यामुळे तुम्हीच आमचे पती द्यावेत. येथे अनसूया मातेचा देवप्रजा निर्मिती करण्याचा संकल्प पूर्ण झाला. तीनही देवांवर संकल्प जल शिंपडताच, ब्रम्हा, विष्णू, महेश आपल्या मूळ रुपात प्रकट झाले. तीनही आदिशक्तींनी अनसूया मातेला महासतीचे वरदान दिले तर तीनही देवांनी अनसूया मातेला आपला सदैव सहवास राहील असा वर दिला.

तीनही देवांमधून  दिव्य तेज प्रकट झाले. ब्रम्हाजीच्या तेजातून चंद्रमा, विष्णुजींच्या तेजातून श्री दत्तात्रय आणि महेशांच्या तेजातून दुर्वास ऋषींचा जन्म झाला आणि हे तीनही देव अनसुया मातेसह बालस्वरूपात येथे विराजमान आहेत. भक्तांनी सद्भावनेने अनसूया मैय्याकडे व्यक्त केलेली इच्छा पूर्ण करण्याचे काम सृष्टीचे रचयिता त्रिदेव पूर्णत्वाला नेतात.  इच्छा पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा अनसूया मातेचे दर्शन घेऊन भक्तगण तिचे आशीर्वाद  प्राप्त करतात.

महासती अनसूया मातेची महती तीनही देवांच्या दिव्यत्वाची अनुभूती आणि नर्मदा मैयेची प्रचिती असा त्रिवेणी संगम स्थानाच्या सहवासाचे परमभाग्य आमच्या पदरी आले.

काय हवे असते माणसाचे जीवन जगण्याला !!!

नारेश्वरचे श्री रंगावधुत स्वामी मंदिर, मातृस्मृतीशैल मातृमंदिर आणि अंजलीचे महासती अनसूया माता मंदिर ही पवित्र स्थाने सांसारिक जीवनाला वेगळ्या उंचीवर घेऊन गेली.

सतीश जाधव
मुक्त पाखरे.....

4 comments:

  1. सात्त्विक विचाराने भारलेले लेखन आणि अनुभव कथन आहे. 🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. विजय कांबळेMay 15, 2021 at 9:45 PM

    *"दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा"*
    देव हा शब्द आपण अनेकदा ऐकतो घरात, बाहेर, शाळेत, अनेकदा लहान- थोर व्यक्ती, मित्र-मैत्रिणी, आई-वडील, आजी- आजोबा, भाऊ- बहीण या साऱ्यांच्या तोंडून आपण हा शब्द ऐकतो. सणावारी या देवाची आपण पूजा करतो आणि सकाळी किंवा संध्याकाळी घरी किंवा देवळा- राऊळात त्याची प्रार्थनाही म्हणतो. पण हा देव कधी आपल्याला दिसत नाही. आपण त्याला कधी पाहूही शकत नाही. पण तरीही तो आपण कुठेतरी आहे असं मानतो. कारण तशी आपली श्रद्धा असते. पण हा कधीही न दिसणारा देव पाहायचा असेल तर तो संत- सत्पुरुषांच्या ठिकाणी नक्की दिसतो. कारण संत- सत्पुरुष हे चालते बोलते देव असतात. ते माणसाला सुख-दुःखात धीर देतात. जगायचं बळ देतात. आपण कसेही असलो तरी आपल्यावर प्रेम करतात. काहीही न मागता ते जगाला भरभरून आनंद देतात. खरं तर संत म्हणजे आपल्यावर शितल सावली धरणारे महावृक्ष असतात.
    संत असा माणसाच्या जगण्याचा पलीकडचा अनुभव जगतात. म्हणून त्यांना माणूसपणी देवपण लाभतं. मग ते माणसालाही देवपणाकडे घेऊन जातात. माणूसपणाला देवपणाकडे नेणारे देवदूत होऊन जातात. ते तुम्हा-आम्हाला जेवढे स्वच्छपणे पाहातात तितक्याच स्वच्छ- निर्मळपणे देवालाही बघू शकतात. म्हणून अशा संतांना आपण चालते-बोलते देवच म्हणतो.
    या संतासी भेटता/ सरे संसाराची व्यथा/
    पुढतां पुढती माथां/ अखंडित ठेवीन//

    ReplyDelete
  3. साहेब ..अतिशय सुरेख व छान धार्मिक माहिती सहज व सोप्या शब्दामध्ये वर्णन करून उपलब्ध करून दिल्याने आमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल.
    - स्वप्निल नागरे

    ReplyDelete
  4. खुप सुंदर लिहिले आहे, साक्षात जाऊन आल्याचा भास होतो.? सुंदर

    ReplyDelete