Wednesday, May 19, 2021

नर्मदा परिक्रमा (दिवस तेरावा) अनसूया माता मंदिर (अंजाली) ते शेष नारायण मंदिर (चांदोद नर्मदा घाट), कुबेर भंडारी (मांडवा), तिलकवाडा, गरुडेश्वर १०.०१.२०२१

 नर्मदा परिक्रमा (दिवस तेरावा)


  अनसूया माता मंदिर (अंजाली) ते शेष नारायण मंदिर (चांदोद नर्मदा घाट), कुबेर भंडारी (मांडवा), तिलकवाडा, गरुडेश्वर

१०.०१.२०२१

सकाळी सहा वाजता जाग आली. उदय होणाऱ्या भास्कराच्या  प्रथम दर्शनाने मन एकदम प्रसन्न झाले.

  पायी चालणारे बरेच परिक्रमवासी निघण्याच्या तयारीत होते. आन्हिके  आटोपून मैंय्येचे पूजन केले. महासती अनसूया मातेचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात आलो. अनसूया मातेचे स्वयंभू दर्शन पाषाण रुपात आहे.अंगावर भरजरी शालू आणि मुखकमलावरील हळदी वस्त्रातून मातेचे दयाद्र नेत्र दर्शन झाले.
परिक्रमा करणारे एक बाबाजी एरंडी खाईत घेऊन गेले. तेथील गंगा मातेचे उगम स्थळ दाखविले.

अंजाली गावात कोरडा दुष्काळ असताना, तप साधना पूर्ण झाल्यावर पती अत्री ऋषीना तहान लागली. पतिव्रता अनसूया मातेने तेव्हा गंगा मैयाला प्रकट व्हायचे आवाहन केले. गंगा मैय्येने अनसूया मातेकडे पतिव्रत आणि अतिथी सत्काराचे एक वर्षाचे तपफल आणि पुण्य मागितले. अनसूया मातेने एक वर्षाचे तपफल देऊन गंगा मातेला येथे स्थापित केले आहे. त्यामुळे या गावात गंगा मातेचे जल सर्वांना मिळते. दोन युगे उलटून गेल्यावर सुद्धा ज्या स्थानावर अनसूया मातेने तप केले आहे तेथील माती अंगाला लावताच त्वचेच्या सर्व व्याधी आजही नाहीश्या होतात. या एरंडी खाई मधून वाहणारी गंगा मैय्या पुढे नर्मदा मातेशी संगम पावते.
या संपूर्ण पुण्यक्षेत्राचे दर्शन घेतले.  थोडावेळ ध्यानमग्न होऊन आम्ही मातेच्या चरणी लीन झालो. बालभोग म्हणून शेव भुरभुरलेले कांदापोहे आणि चहा मिळाला. अनसूया मैयेच्या या पवित्र भूमीतून निघताना... थोडी हुरहूर लागली... मैयेचा सहवास आणखी मिळावा हीच कामना ठेऊन... साष्टांग नमस्कार करून मंदिरातून पुढची पारिक्रमा सुरू केली.

पुढील नर्मदा मैयेची भेट घ्यायचे ठिकाण चांदोद घाट होता. जवळपास २० किमी अंतर पार करून सव्वा तासात चांदोद गावात  पोहोचलो. मकर संक्रात जवळ आल्यामुळे गावाच्या बाजारात पंतगांची आरास दिसली.

चांदोद हे नर्मदा नदीच्या काठावर वसलेले अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे.  नर्मदा मैय्या किनारी श्री महादेवाची अनंत मंदिरे आहेत, पण हे महाविष्णू श्री शेष नारायण मंदिर सुद्धा नर्मदा किनारी आहे.  नारायणालासुद्धा नर्मदा मैय्येच्या किनारी यावे लागले आहे. 

वैष्णव जन तसेच प्रत्येक परिक्रमवासी या मंदिराला आवर्जून भेट देतात.

चांदोद येथील अतिशय विस्तीर्ण घाट आणि संथपणे वाहणारी नर्मदा मैय्या मनाचा ठाव घेत होती.

  भूत किंवा भविष्यात भरकटणाऱ्या मनाला वर्तमानात आणून आनंदमय करणारी मैय्या... तिला तिचाच जलाभिषेक करून अर्ध्य दिले...

मन करा रे प्रसन्‍न ।   सर्व सिद्धीचें कारण ।

मोक्ष अथवा बंधन ।   सुख समाधान इच्छा ते ॥

ही तुकाराम महाराजांची ओवी आठवली.

खूप सुंदर परिसर एकदम भावला ...मन विरक्तीच्या मार्गाने निघाल्याची जाणीव झाली.

बरेच भक्तगण, पर्यटक पूजा आणि दिपदान आदी विधी करीत होते. काही पर्यटक नावेतून सफर करीत होते. या घाटावर दशक्रिया, तर्पण इत्यादी विधी सुद्धा सुरू होते. थोडी उसंत घेऊन पुढील सफर सुरू झाली.

तासाभरात जुना मांडवा गावात पोहोचलो. हमरस्त्यावरच गावकऱ्यांनी पारिक्रमावासीयांसाठी बालभोगची व्यवस्था केली होती.

चहा बिस्किटे आणि कंदापोहे प्रत्येक परिक्रमावासींना थांबवून थांबवून प्रेमाने खाऊ घालत होते. हा बालभोग म्हणजे दुपारची भोजनप्रसादीच होती. येथून दोन किमी अंतरावर कुबेर भंडारीचे मंदिर होते.

कुबेर भंडारी मंदिराकडे पोहोचलो. कुबेर म्हणजे अगणित संपत्ती असणारा देव. हिरे मोती सोन्याने मढविलेले हे कुबेराचे स्थान...

कुबेराची गरज कोणाला लागत नाही... संपत्ती तर प्रत्येकाला हवी असते...  संपत्ती हे जीवन जगण्यासाठी साधन आहे पण जीवनाचे साध्य होऊ शकत नाही... पैसे हे साध्य नाही असेच कुबेर सांगत असावा काय?

या ठिकाणी खूप मोठा भक्तसमुदाय कुबेराचे दर्शन घ्यायला आला होता. परंतु आम्ही मनाचे धन गोळा करायला कुबेर भंडारीकडे आलो होतो.

येथे कुबेराने भगवान शिवाची घोर तपस्या केली होती. कुबेर भंडारीचे दर्शन घेऊन मंदिरामधून नर्मदा घाटावर उतरलो.

या मंदिरात दक्षिणेकडील पोयछा तटावरून  बरीच भक्त मंडळी नर्मदा मैय्या पार करून येत होती. तेथून राजपिपला १५ किमी अंतरावर आहे. कुबेर भंडारीचा नर्मदा घाट भक्तगण आणि परिक्रमवासी यांनी फुलून गेला होता. या घाटाजवळच सिद्धबाबा महर्षी अरविंदजी यांच्या तपस्या स्थळाचे दर्शन घेतले. बाबा अरविंदजी यांना येथे महाकालीचा साक्षात्कार झाला होता.  श्री अवधूत स्वामींचा "श्वासे श्वासे दत्तनाम स्मरात्मन्" हा मंत्र भिंतीवर विराजमान होता.

करनाळी गावातीळ कुबेर भंडारीच्या मंदिराजवळच वरसंग नदी, गुप्त सरस्वती आणि नर्मदा मैय्या यांचा त्रिवेणी संगम आहे, तेथे पोहोचलो. याला दक्षिण प्रयाग म्हणतात.

वरसंग नदी, गुप्त सरस्वती नदीसह महाकाय नर्मदेमध्ये विलीन होत होती.  हा अद्भुत रम्य संगम सोहळा पाहत होतो. संपूर्ण परिसर राहुट्यांनी फुलून गेला होता. बरेच पुरोहित मंडळी सामुदायिक पूजा करीत होते. सर्व परिसर पाहून पुढे प्रस्थान केले.

तासाभरात तिलकवाडा येथे पोहोचलो. येथे कैलास मानसरोवर सेवा समिती तर्फे परिक्रमावासींसाठी अन्नक्षेत्र सुरू होते. जेव्हा जेव्हा तहान लागली तेव्हा तेव्हा अन्नक्षेत्र हजर... ही स्थिती म्हणजे मैय्येशी केलेले हितगुज होते... आम्ही मागावे आणि तिने पूर्ण करावे...

स्वामी चंद्रमौली महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली  राजेश कुलकर्णी आणि मनोज शहा यांच्यातर्फे हे सेवा केंद्र चालविण्यात येत होते. येथे चहा कंदापोहेचा बालभोग मिळाला.

जवळच मणिनागेश्वर मंदिर आहे. तिकडे प्रस्थान केले. प्राचीन मणिनागेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सुरू होता. येथे मणिनागेश्वराचे मुख्य मंदिर आहे त्याच बरोबर  सुवर्णजडीत हनुमान आणि विस्मय गणपती यांचे दर्शन झाले.

मणिनाग या सर्पाने महादेवाची घोर तपस्या केली. म्हणून येथे प्राचीन मणिनागेश्वर मंदिर स्थापित आहे. सरदार सरोवर धरण प्रकल्पामुळे येथील नर्मदा मैंय्येचा घाट आता अस्तित्वात नाही. मंदिराच्या काठड्यावरून नर्मदा मैय्येचे दर्शन घेतले.

  मणिनागेश्वर तीर्थाची कथा :   काश्यप ऋषींना दोन पत्नी होत्या. एक कदू आणि दुसरी विनता. दोघींमध्ये एकदा विवाद झाला की, "उचै:श्रवा घोडा श्वेत आहे की शाम आहे"  विनताने सत्य सांगितले की तो घोडा श्वेत आहे. परंतु कदूने तीला खोटे ठरविण्यासाठी आपल्या सर्व काळ्या सर्प पुत्रांना सांगितले, "तुम्ही सर्वजण उचै:श्रवाच्या संपूर्ण शरीराला लपेटून घ्या, जेणे करून तो श्याम दिसेल". परंतु सत्य आणि धर्म पारायण मणीनाग या पुत्राने मातेच्या आज्ञेला नकार दिला. त्यामुळे माता कदूने त्याच्या त्याग केला. म्हणून तो दुःखी होऊन रडत रडत नर्मदेच्या उत्तर तटावर शिवाच्या चरणी लीन झाला. त्याच्या अश्रूतून मणी अर्थात मेण नदीचा उद्गम झाला. हीच मेण नदी नर्मदा मैय्येला विलीन होते. श्वेत घोडा उचै:श्रवा; सापांमुळे श्याम झाल्याने विनता विवादात हरली आणि ती कदूची दासी झाली.

विनताचा पुत्र गरुड... त्याला आपली आई दासी झाली आहे कळल्यावर; तो कदूकडे आला आणि म्हणाला, माते; विनता आईला दास्यमुक्त करण्यासाठी मी काय करू? कदूने आपल्या पुत्रांचा उद्धार करण्यासाठी त्यास स्वर्गातून अमृत आणावयास सांगितले. गरुडाने इंद्राला पराजित करून अमृत घेऊन आला. अमृतकुंभ माता कदूच्या पुढ्यात ठेऊन आई विनताला दास्यमुक्त केले.

इंद्राने ब्राम्हण वेष करून कदू आणि सर्व सर्पांना सांगितले, "नर्मदा स्नान करून पवित्र व्हा आणि मग अमृतपान करा". सर्व स्नान करायला गेले असता, इंद्र अमृतकलश घेऊन गेला. ज्या ठिकाणी अमृत कलश ठेवला होता तेथे कुश गवत उगवले होते. त्या गवतावर अमृताचे काही थेंब पडले असतील म्हणून सर्प ते कुश गवत चाटायला लागले. त्यामुळे त्यांच्या जिव्हा (जीभ) दोन भागात दुभंगल्या.

कदूला आपल्या  कर्माचा पश्चाताप झाला आणि तिने मणिनागाला आपला पुत्र म्हणून स्वीकार करून त्याचे सत्य कर्माबद्दल अभिनंदन केले. "भगवान आशुतोष शिवाला" प्रसन्न करून मणिनाग ह्या स्थानावर आजही विराजमान आहेत. हे तीर्थ "मणिनागेश्वर" नावाने प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या प्रांगणात स्वामी विवेकानंदांचा पूर्णाकृती पुतळा विराजमान आहे, हे खूपच प्रेरणादायी होतं.

आता पुढची परिक्रमा गरुडेश्वर पर्यंत होती. मैय्येच्या किनाऱ्याने;  गावागावातून जाणारा आणि वळणावळणाचा रस्ता निवडला होता. सव्वा तासात गरुडेश्वर येथील श्री वासुदेवानंद सरस्वती टेम्बेस्वामींच्या मंदिराजवळ पोहोचलो. सध्याच्या काळात येथे पारिक्रमा वासीयांची निवास व्यवस्था नव्हती. म्हणून तेथून जवळच असलेल्या माँ भगवती अन्नक्षेत्र येथे पोहोचलो.  तेथील गायत्री मंदिरात परिक्रमवासी तसेच साधुसंत यांची भोजनप्रसादी आणि निवास व्यवस्था होती. श्री टेम्बेस्वामींचे दर्शन उद्या करणार होतो.

आज जवळपास ८० किमी सायकल पारिक्रमा झाली होती. गायत्री मंदिरात बरेच पायी परिक्रमवासी होते.  स्नानसंध्या आटपल्यावर नर्मदा मैयेची पूजा केली.  थोड्याच वेळात गायत्री मातेची आरती सुरू झाली. आम्ही सर्वांनी मनोभावे गायत्री आरती मध्ये भाग घेतला.

गायत्री मातेला भोग दाखविल्यावर भोजनप्रसादिला आम्ही सर्व परिक्रमावासी एकत्र पंगतीत बसलो. मंदिराच्या पुजारी बाबाजींनी भोजनाला सुरुवात करण्या अगोदर गायत्री मंत्र म्हणायला सुरुवात केली ... भोजना अगोदर म्हटलेली प्रार्थना जठराग्नी उद्विपित करतात... यांची प्रचिती आली. सात्विक डाळ खिचडी पंचपक्वान्ना सारखी भासली.

अंजाली येथून अनसूया मातेच्या आशीर्वादाने सुरू केलेली पारिक्रमा चांदोद येथील शेषणारायण मंदिर, करनाळी येथील कुबेर भंडारी मंदिर, तिलकवाडा येथील मणिनागेश्वर मंदिर आणि पवित्र गरुडेश्वर येथील गायत्री मंदिरापर्यंत नर्मदा मैयेच्या किनाऱ्याने झाली होती. आजची परिक्रमा या सर्व पवित्र स्थळांना समर्पित केली..

कार्यकारण भाव आता कमीकमी होऊ लागला आहे.

सर्व काही नर्मदा मैय्येच्या कृपेने घडते आहे...

सतीश जाधव
मुक्त पाखरे....

4 comments:

  1. गरुडेश्वर व कुबेर भंडाराची आठवणझाली

    ReplyDelete
  2. मित्र समीरचे अभिप्राय

    Khup chaan😊👍

    मी सुद्धा नर्मदा परिक्रमा वर खूप पुस्तके वाचली आहेत

    वाचल्यानंतर आपण सुद्धा नर्मदा परिक्रमा करावी असे वाटते

    मात्र आपण साक्षात ती करत आहात हे ऐकून आणि वाचून पुन्हा एकदा माझी पण ईच्छा पुन्हा जागृत झाली...😊👍

    खूप सुंदर वर्णन केलेले आहे , असेच लिहीत रहा आणि आपल्या मनाजोगे आयुष्य असेच जगात रहा..👍

    तुमची नर्मदा परिक्रमा यशस्वी होवो🙏👍😊

    ReplyDelete
  3. मित्र निनादचे अभिप्राय

    👆🏻आजच्या परिक्रमा मार्गात नर्मदा माईच्या सोबत विविध मंदिराच्या दर्शनाने मन आनंदात रममाण झाले आणि वर्णन वाचून अन् सोबतच्या सुरेख फोटो दर्शनाने आम्हालाही आनंद सागराच्या लहरी अनुभवता आल्या...

    ReplyDelete
  4. आपण खूप सुंदर लिहिता . वाचताना सर्व डोळ्यापुढे उभे राहिले . आपण केलेल्या नर्मदा परिक्रमेची आठवण आली. असेच लिहीत रहा म्हणजे आपण केलेली परिक्रमा ताजीच राहील फोटो पण खूप सुंदर आहेत नर्मदेहर🙏

    ReplyDelete