Tuesday, May 25, 2021

नर्मदा परिक्रमा (दिवस चौदावा) गरुडेश्वर ते जीवनपूरा (नानी अंबाजी) ते चापरिया११.०१.२०२१

  नर्मदा परिक्रमा (दिवस चौदावा)
  गरुडेश्वर  ते जीवनपूरा (नानी अंबाजी) ते चापरिया

११.०१.२०२१

पहाटे पाच वाजताच जाग आली. गायत्री मंदिरातून नर्मदा तटावर आलो. पहाटेच्या संधीप्रकाशात नर्मदा मैयेच्या किनारी स्नान करणे म्हणजे पर्वणी होती. दोन लोटे डोक्यावर घेतल्यावर एकदम उबदार वाटू लागले. संजयने तर मस्त डुबक्या मारल्या. सचैल स्नान करून गायत्री मंदिरात आलो. तयारी करून मैंय्येची पूजा केली.
सायकलची साफसफाई करून तीला तेलपाणी दिले.  सायकलवर सर्व सामान व्यवस्थित बांधून गरुडेश्वर मंदिरात आलो.

नितांत सुंदर परिसर... चारही बाजूला वड, आंबा आणि सुरुची झाडे डोलत होती. मंदिरा समोरच तुळशी वृंदावन होते. पसरलेल्या वेलींनी हरीत सौंदर्यामध्ये भर पडली होती. मंदिरात जाऊन गरुडेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. टेकडीच्या उंचवट्यावर हे मंदिर स्थित होतेे. मन एकदम शांत झाले. परमेश्वराच्या दरबारात, रमणीय जागेत आल्यावर मन भारावून जाते.
गरुडेश्वर कथा:
     या स्थानावर गजासुर नामक राक्षसाने तपस्या करणाऱ्या ऋषी मुनींना अतिशय त्रास देऊन उच्छाद मांडला होता. सर्व ऋषीमुनींनी श्री महाविष्णु भगवंताचा धावा केला. परमेश्वराने गरुडाला गजासुराचा वध करण्याचा आदेश दिला. गजासुर आणि गरुड यांत घनघोर युद्ध झाले. युद्धाला नऊ दिवस झाले तरीही गजासुराचा पाडाव होईना. तेव्हा देवदेवतांनी आणि ऋषीमुनींनी श्री विष्णूची पुन्हा प्रार्थना केली की गरुडाला अशी दिव्य शक्ती प्रदान करा की गजासुराचा वध होईल. दहाव्या दिवशी युद्ध सुरू झाल्यावर महाविष्णूच्या कृपेने गरुडाला रौद्र  स्वरूप प्राप्त झाले. रौद्र स्वरूपात गरुडाने गजासुरावर घणाणते वार केले आणि त्याच्या शरीराचे सहस्त्र तुकडे केले. गजासुराचा वध करून त्याचे मास खाल्ल्यावर गरुड शांत झाला.

तेथे पडलेली गजासुरची हाडे आणि कवटी पावसाच्या पाण्याने वाहत जाऊन नर्मदे मध्ये आली. नर्मदेच्या स्पर्शाने गजासुर पुनर्जीवित झाला. नर्मदा मातेच्या कृपेने आणि मैय्येच्या स्पर्शाने गजासुराची असुरी शक्ती नष्ट होऊन त्याला दिव्य रुप  व ज्ञान प्राप्त झाले. नर्मदा  माताने त्याला गजेंद्र नाव दिले. गजेंद्रने नर्मदा  मातेला विनंती केली की आपली सेवा करण्यासाठी माझ्यावर अनुग्रह करा. तेव्हा नर्मदा मैय्याने गजासुराला दर्शन देऊन स्वउद्धार आणि लोक कल्याणासाठी  शिव-पार्वतीची आराधना करण्यास सांगितले.

         गजेंद्रने शिव-पार्वतीची शंभर वर्ष तपश्चर्या केली.  भोलेनाथ प्रकट होऊन त्याला स्वउद्धार आणि लोक कल्याणासाठी ज्या ठिकाणी त्याचा वध झाला तेथे गरुडेश्वर मंदिरांची स्थापना करण्याचे आदेश दिले. अशा रीतीने गजेंद्रने स्वउध्दार केला आणि गरुडाच्या तापातून मुक्त झाला.  तसेच त्या ठिकाणी नर्मदा मैय्येच्या पात्रात नाभीपर्यंतच्या जलात उभे राहून जे भक्तगण पितृतर्पण करतात त्यांच्या एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो.    
          भगवान भोलेनाथ गजेंद्रला पुष्पक विमानात बसवून कैलाशपुरी घेऊन गेेले आणि त्याला शिवगणात समावून घेतलेे. गजेंद्र आणि गरुड दोघेही संजीवन रुपात येथे आहेत.

प्राचीन गरुडेश्वर मंदिरातून श्री वासुदेवानंद सरस्वती (टेम्बेस्वामी) मंदिर प्रांगणात आलो. प्रथम दत्त मंदिरात दर्शनासाठी गेलो. दत्त मंदिराच्या गर्भगृहाचे द्वार बंद होते. त्रिमुखी श्री दत्ताचे दर्शन जाळीतून घेतले. दत्तगुरूंच्या डाव्या बाजूला आद्य शंकराचार्य आणि उजव्या बाजूला सरस्वती मातेची स्थापना केली आहे. समोरच श्री टेम्बेस्वामी महाराजांची पद्मासनात बसलेली, भगवे वस्त्र परिधान केलेली मूर्ती होती.

समोरच्या गुरू महाराजांच्या चरण पदचिन्हावर नतमस्तक झालो.
मंदिरातील श्री आदि शंकराचार्य आणि श्री स्वामी समर्थांच्या तस्विरी मनावर गारुड करून गेल्या.
प्रांगणात असलेल्या पवित्र औदुंबर वृक्षाचे दर्शन घेतले.
तेथून श्री टेम्बेस्वामींच्या  समाधी स्थळी जाऊन स्वामींच्या निर्गुण चरण पादुकांचे दर्शन घेतले. तेथेच थोडावेळ समाधिस्त झालो. "नमो गुरवे वासुदेवाय" मंत्राचा जप केला. मन भावविभोर झाले.
टेम्बेस्वामींच्या समाधी मंदिरात संगमरवरी कमळाचे फुल आहे त्यावर दोन पादुका आहेत, पादुकांच्या मध्ये स्फटिकाचे शिवलिंग आहे. कमळ हे ब्रह्माजींचे, पादुका हे महाविष्णूचे तर लिंग हे शंकराचे प्रतीक आहे. श्री वासुदेवानंद सरस्वतींना दत्त भगवंताचे अवतार मानले गेले आहे. टेम्बेस्वामींच्या निर्गुण निराकार समाधीसह ही तीन प्रतीके म्हणजे श्री दत्ताचे प्रतिकात्मक रूप आहे. या समाधीचे पूजन म्हणजे श्री दत्त भगवंताचे देखील पूजन आहे. 

गरुडेश्वर येथे दत्त मंदिर का बांधले याची माहिती अत्यंत रोचक आहे : 
श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज श्री टेम्बेस्वामींनी; श्री गांडा महाराज यांना सांगितले की, "माझ्या देहाचा आता काही भरवसा नाही, तेव्हा येथील दत्तमूर्ती नरसोबाची वाडी अथवा गाणगापूरला ठेवायला हवी. तेव्हा कोणी सुभक्ताला बोलावून, त्याला ही मूर्ती अर्पण करा".
त्याच रात्री श्री गांडा महाराज यांना श्री दत्तप्रभूंचा दृष्टांत झाला आणि त्यांना सांगितले, "गरुडेश्वर येथेच मला कायम लीला करायच्या आहेत, तेव्हा कोणा श्रद्धावान भक्ताला येथेच माझे मंदिर बांधायला सांगा. या स्थानाची महती नरसोबाची वाडी आणि गाणगापूर पेक्षा वाढत जाईल, याची निश्चितरूपाने खात्री ठेवा.  माझ्या मूर्तीला येथेच स्थापित करून तिच्या  पूजा-अर्चनेचा प्रबंध करा. एव्हढे सांगून श्री दत्त दिगंबर त्या मुर्तीत अंतर्ध्यान पावले.
या पावन घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी श्री गांडा महाराज यांनी वरील दृष्टांताबाबत स्वतःच्या हस्ताक्षरात एक विज्ञप्तीपत्र लिहिले आणि सर्व भक्तगणांना वाचायला दिले. श्री गांडा महाराजांचे हस्ताक्षर पाहून कोणाही भक्तांच्या मनात संदेह राहिला नाही. त्या नंतर गरुडेश्वरला दत्तमंदिर बांधण्याबाबत विचारविमर्श झाला. या दृष्टांताबाबत  श्री दत्त दिगंबरांनी; श्री टेम्बेस्वामी महाराजांना कोणताही संकेत दिला नव्हता. तद्नंतर श्री टेम्बेस्वामींनी श्री गांडा महाराजांना भरुचला पाठविले.
जेव्हा टेम्बेस्वामींच्या हातात गांडा महाराजांच्या हस्ताक्षरातील विज्ञप्तीपत्र पडले; तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले आणि म्हणाले, "माझा संकल्प श्री दत्तगुरूंना पसंत आला नाही, म्हणूनच मला कोणतीही माहिती न देता श्री गांडा महाराजांना दृष्टांत दिला. स्वामी महाराजांनी श्री दत्तात्रेयांची गरुडेश्वरला राहण्याची कामना पाहून श्री दत्त प्रभूंचे मंदिर बांधण्याचा शुभारंभ संवत १९७०, वैशाख शुद्ध सप्तमीचा मुहूर्त काढला. मंंदीराचे  बांधकाम पूर्ण झाल्यावर, मंदिरात श्री दत्त प्रभूंची प्रतिष्ठापना संवत १९७२, माघ वद्य द्वितीयेला श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामी यांच्या शुभहस्ते झाली.

गरुडेश्वर या नितांत सुंदर, पावन आणि पवित्र स्थानी आणखी एक दिवस राहायला हवे होते. मंदिराच्या प्रांगणात बसून मैय्येला पाहणे हे तर आनंदध्यान होते. येथील मैंय्येचा घाट मागील वर्षीच्या पुरात वाहून गेला होता. येथे घाट पुनर्निर्माणाचे काम सुरू होते. बराच वेळ व्यतीत केल्यावर पुढे प्रस्थान केले.

हम रस्त्यावर येऊन आता भारताचे गौरवस्थान सरदार वल्लभभाई पटेल यांचा "एकतेचा पुतळा" या स्थळाकडे प्रयाण केले. अतिशय आलिशान चौपदरी रस्त्यावरून मार्गक्रमण सुरू झाले. अर्ध्या तासातच केवडिया रेल्वे स्टेशनकडे पोहोचलो. येथे, "माननीय पंतप्रधान यांचे स्वागत असो" असे मोठमोठे होर्डिंग लागले होते. लवकरच केवडिया स्टेशनच्या उदघाटन समारंभाला देशाचे पंतप्रधान येणार होते.

   आज नेमका सोमवार असल्यामुळे एकात्मतेचा पुतळा पर्यटन केंद्र बंद होते. पुढील पोलीस चौकी जवळ आम्हाला अडविले. सायकल वरून नर्मदा परिक्रमा  करतोय हे समजल्यावर आम्हाला पुढे सोडले. परंतु पर्यटन स्थळाचे प्रांगण बंद असल्यामुळे रस्त्यावरूनच पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे दर्शन घेतले. 


  भारताला गौरवशाली असणारे हे सरदारांचे स्मारक पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे येत असतात. आता येथे फ्लोटिंग एअरपोर्ट सुद्धा होतंय. बडोदा, अहमदाबाद येथून आलेली  विमाने सरदार जलाशयात उतरणार आहे. आम्हाला येथपर्यंत आणल्याबद्दल सायकलींचे सुद्धा सरदारांच्या लोकेशनवर फोटो काढले. हा संपूर्ण परिसर तसेच सरदार धरण पहायचे असेल तर संपूर्ण दिवस हवा.
जवळच असलेल्या पंचेंद्रिय बगिच्यात थोडावेळ विश्राम घेतला. या बगिच्यात झाडाचे खोड सदृश्य बसण्याचे ठोकळे बनविले होते. त्यावर बसून सोबत असलेली पार्लेजी बिस्कीट बाहेर काढली. बिस्कीट खाता खाता एक गोष्ट लक्षात आली. बगिच्यात बराच कचरा पडला आहे. संजयने कचरा डब्याजवळ असलेली काळी पिशवी घेऊन बगीच्यातील  कचरा सफाई अभियान सुरू केले. नर्मदा परिसर स्वच्छता अभियान हा सुद्धा परिक्रमेचा एक भाग होता.

एव्हढ्यात प्रकाश तडवी भाऊ जवळ आले आणि आस्थेने चौकशी केली. त्यांनी सरदार पटेलांच्या एकात्मतेच्या पुतळ्याच्या जडण घडणीची  माहिती  सांगण्यास सुरुवात केली.

सरदार धरण आणि एकात्मतेचा पुतळा :

केवडिया येथे नर्मदा नदीच्या मधोमध एक छोटासा टापू होता.  तो साधू बेट म्हणून प्रसिद्ध होता. पूर्वी बऱ्याच ऋषी मुनींनी या उंच टापूवर तपस्या केली होती. या ठिकाणी एकात्मतेचा पुतळा उभारण्यासाठी सन २०१३ मध्ये या जागेचे भूमिपूजन झाले. आणि २०१४ मध्ये एल अँड टी कंपनीने बांधकामाला सुरुवात केली.

साधू बेटाचे सपाटीकरण करून त्यावर दोन  प्रचंड पिलर उभारण्याचे काम सुरू झाले. सिमेंट काँक्रीटच्या पिलरमध्ये एकशे नऊ टन लोखंडाच्या सळ्या वापरण्यात आल्या आहेत. तसेच सहा हजार टन स्टीलचा वापर पुतळ्याचे स्ट्रक्चर बनवण्यासाठी झाला आहे. तर बाहेरील आवरणासाठी मेटल प्लेट्सचा वापर करण्यात आला आहे. एकूण ६५०० प्लेट्सचे आवरण आहे. प्रत्येक प्लेटच्या मागे एक कंप्युटराईज्ड कोड नंबर लिहिलेला आहे. जेणे करून  एखादी प्लेट दुरुस्ती करायची किंवा बदलायची झाल्यास सोपे व्हावे. पाच वर्षांचा करार असताना, एल अँड टी च्या २५० अभियंता आणि ६००० कुशल कामगारांनी बेचाळीस महिन्यात हे काम पूर्ण केले. सातपुडा आणि विंध्याचल पर्वत रांगा मध्ये हे स्थान वसलेले आहे.

लीड, झिंक, टिन आणि तांबे या मिश्रधातूच्या प्लेट्स तयार केल्या आहेत. जेणे करून त्यास गंज पकडू नये. ६.५ रीक्टर स्केलचा भूकंप किंवा १८० किमी वेगाचे वादळ सुद्धा या महाकाय पुतळ्यास हानी पोहोचवू शकत नाही. ५९७ फूट उंचीचा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. महाराष्ट्राचे ख्यातनाम शिल्पकार श्री राम सुतार यांनी ह्या पुतळ्याचे डिझाईन बनविले आहे. या पुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जन्मदिनी दि ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

या पुतळ्या पासून चार किमी अंतरावर सरदार धरण  बांधण्यात आले आहे. हे धरण गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर बांधले आहे. धरण १२१० मीटर लांब आणि उंची १६३ मीटर आहे. येथे दररोज १४५० मेगावॅट वीज निर्मिती होते यातील ५७% मध्यप्रदेशला २७% महाराष्ट्राला आणि गुजरातला १६%  वीज मिळते. येथून कच्छ पर्यंत  कॅनॉलद्वारा पाणी पुरविले जाते.

कच्छच्या मांडवी गावापर्यंत या कॅनॉलची लांबी ४५८ किमी आहे. तेथून ७४ किमी कॅनॉल राजस्थानात सुद्धा जातो. या योजने मार्फत गुजरात मधील ८२१५ गावांतील १८ लाख हेक्टर जमीनच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे.

ही सर्व माहिती मान्यताप्राप्त गाईड प्रकाश तडवी याने दिली ...  काहीही मोबदला न घेता... प्रत्येक परिक्रमावासींनी आणि भारतीयाने जरूर पाहावे हे भारताचे गौरवशाली स्थळ आहे.

वाटेतील आदीत्येश्वर महादेव मंदिराला भेट दिली. येथे चहा मिळाला. पुढे दीड तासात टणकला गावात पोहोचलो. येथे केळी, पेरू आणि द्राक्ष असा फलाहार केला.
आता नानी अंबाजीकडे प्रस्थान केले. जीवनपूरा गावातील नानी अंबाजी मंदिरात पोहोचलो. नानी अंबाजी म्हणजे छोटे अंबाजी महाराज... मन प्रसन्न झाले.

दुपारचा एक वाजल्यामुळे कडकडीत ऊन पडलं होतं. परंतु मंदिर परिसर झाडांचा आणि हिरवळीचा असल्यामुळे थोडा विश्राम घेतला. गुळ खोबरे प्रसाद मिळाला. पाण्याच्या बाटल्या भरून घेऊन पुढे प्रस्थान केले.

आता पायी पारिक्रमा मार्गावरून सायकलिंग सुरू केली दोन ठिकाणी पाण्याने भरलेले नाले, सायकल ढकलत ओलांडावे लागले. दगड धोंड्याच्या पाऊल वाटेवर सुद्धा सायकल ढकलाव्या लागल्या.

गठबोरिया गाव पार करून वाहास गावात आलो. येथे वाघेश्वर महादेव मंदिर आहे. येथील बाबाजींनी चहा प्यायला बोलावले. नानी अंबाजी वरून तीन तास सायकलिंग झाली होती. चहाची सुद्धा इच्छा मनात आली होती. मंदिर परिसर हिरवळीने नटलेला होता. विशेष म्हणजे दहा फूट उंचीची शंकराची मूर्ती येथे विराजित होती. 


आज कवाट गावात विश्राम घ्यायचे ठरविले होते. डांबरी रस्ता बराच तापला असल्याने सायकलचा वेग कमी झाला होता. वाटेत एक कलिंगडवाला भेटला. लाला धम्मक आणि रसदार कलिंगड खायला मिळाले. "चापरिया गावात रस्त्यावरच एका घरात अन्नक्षेत्र चालविले जाते; तेथे थांबा", असे कलिंगड बाबाजींनी सांगितले. निवांतपणे अख्खे कलिंगड खाल्ले. त्यामुळे  विश्रांती झाली आणि एनर्जी सुद्धा मिळाली.

सायंकाळी चापरिया गावात पोहोचलो. अमित पटेल यांचा हा फार्म हाऊस होता. आधीच आठ पारिक्रमावासी येथे आले होते.  संपूर्ण बंगल्यात आम्ही दहाजण होतो. पटेल दादांनी संपूर्ण फार्म हाऊस आमच्या ताब्यात दिले. किचनमध्ये सर्वकाही आहे, असे सांगितले आणि काही कामानिमित्त बाहेर गेले. या फार्म हाऊसच्या बाहेरील पोलवर भगवा झेंडा लावलेला आहे, त्या अनुषंगाने परिक्रमावासी येथे थांबतात.  फार्म हाऊस मध्ये घोडा पण बांधलेला होता. प्रेमाने आणि विश्वासाने परिक्रमावासीयांना बंगल्याची चावी देणे... ही मैंय्येची कृपाच म्हणावी...

  स्नानसंध्या केल्यावर मैय्या पूजन झाले. किचनचा ताबा घेतल्यावर पायी चालणाऱ्या  पारिक्रमावासींनी पोळी भाजी बनविण्याचे ठरविले. भांडी घासण्याची कामगिरी आम्ही दोघांनी स्वीकारली.
  तासाभरात भाजी पोळीचे  जेवण तयार झाले. जेवण झाल्यावर रात्री लाईट नसल्यामुळे सायकल टॉर्चच्या प्रकाशात भांडी घासण्या-धुण्याचे काम केले  आणि भांडी व्यवस्थित मांडून ठेवली. आज पर्यंतच्या परिक्रमेतील सदाव्रतचा पहिलाच प्रसंग होता.

रात्री निद्रा देवीच्या अधीन होण्याअगोदर आजच्या परिक्रमेच सिहावलोकन केले... नर्मदा मैय्या  अध्यात्मिकरीत्या महत्वाची आणि पूजनीय आहेच तशीच जीवनदायिनी सुद्धा आहे याची प्रचीती आली.             (श्री दत्त मंदिर, गरुडेश्वर)

सनातन धर्म आणि प्राचीन हिंदू संस्कृती याची माहिती तरुणपणातच व्हायला हवी याची जाणीव झाली.

नर्मदे हर !!!

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

No comments:

Post a Comment