Saturday, May 29, 2021

नर्मदा परिक्रमा (दिवस पंधरावा) चापरिया ते कवाट, कढीपानी (निळकंठ महादेव), हापेश्वर (कलहंसेश्वर महादेव) ते उमरट १२.०१.२०२१

नर्मदा परिक्रमा (दिवस पंधरावा)

  चापरिया ते कवाट, कढीपानी (निळकंठ महादेव), हापेश्वर (कलहंसेश्वर महादेव) ते उमरट

१२.०१.२०२१

साडेपाच वाजता उठून सकाळचे कार्यक्रम आणि मैंय्येची पुजा करून सायकलवर खोगीर चढवले. आमच्या अगोदरच पायी परिक्रमावासी मार्गस्थ झाले होते. बंगल्याची चावी गेट जवळच्या खुंटीला लावून सकाळी सात वाजता पेडलिंग सुरू केले.

पहिले ठिकाण कढीपानी होते. पुढील पारिक्रमा सुरू झाली. थोड्याच वेळात पायी परिक्रमा वासीयांना नर्मदे हरची साद घालून पुढे जात होतो.  जंगलाचा रस्ता होता. आज मस्त धुकं पडलं होतं त्याचा आनंद घेत विंध्याचल जंगलातून वरखाली चढउताराच्या रस्त्यावरून रमतगमत चाललो होतो. पूर्वेकडून उदयाला येणारा सूर्य धुक्यात आपली कांती हरवून मार्गक्रमण करीत होता. झाडांच्या लोकेशनवर दिसणारा पांढराफेक सूर्य  पौर्णिमेच्या चंद्रासारखा भासत होता.

सकाळच्या वातावरणात घाट चढ उतार करताना वरून थंडी वाजते आहे आणि आतून घामाने ओलाचिंब झालोय अशी अवस्था झाली होती. धुक्यातून वाट काढणाऱ्या मोटारसायकल सुद्धा मंदगतीने चालल्या होत्या.  दीड तासात कढीपानी येथे हायड्रेशन ब्रेक घेतला.

कढीपानी गावात बालभोगसाठी एका चहाच्या टपरीवर थांबलो. चहा बिस्कीट खाताना एक गोष्ट लक्षात आली. चहा पिणारे गावकरी चहाचे कागदी कप आणि बिस्किटांचे रॅपर इतरत्र टाकत होते. त्यामूळे टपरीच्या चोहीकडे खूपच कचरा दिसत होता. संजय उठला आणि सर्व कचरा उचलू लागला. तसा चहा दुकानवाला पटकन पुढे आला आणि म्हणाला, "बाबाजी मै साफ करता हुँ."  संजय पुढे म्हणाला, "हम हापेश्वर जाके वापस आ रहे है."

पुढे हापेश्वर पाच किमी होते. शूलपाणी जंगलातून जाणारा रस्ता एकदम ओबडखाबड होता. जवळपास बारा घाट लागले. ऑफ रोडिंग घाट चढताना अक्षरशः धापा टाकाव्या लागत होत्या, तर अतिशय तीव्र उतारावर खुप सावधगिरी घ्यावी लागत होती. उतारामध्ये वळण आणि दगडमाती आली की सायकल थांबविण्या शिवाय पर्याय नसतो. पाच किमी जाण्यासाठी पाऊण तास लागला.

हापेश्वर जवळील नर्मदा  जलाशयाकडे आलो.

सरदार धरण प्रकल्पामुळे मुळ पुरातन हापेश्वर मंदिर आणि परिक्रमेचा जंगलातून जाणारा मार्ग  जलाशयात बुडाला होता. या ठिकाणी वीज प्रकल्पाचे काम सुद्धा सुरु होते. या जलाशया जवळच नवीन मंदिर बांधले होते. नर्मदा मैय्येचे दर्शन घेतले. हापेश्वरच्या नर्मदेच्या पलीकडच्या तटावर महाराष्ट्र आहे. कलहंसेश्वर महादेव मंदिरात आलो. मंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेतले. रामजानकी, लक्ष्मण आणि मुळ मंदिरातून आणलेला वटवृक्ष यांचे सुद्धा दर्शन घेतले. अतिशय विस्तीर्ण परिसरात वीस फुट महादेवाच्या बसलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती.कलहंसेश्वर ऋषींनी या ठिकाणी घोर तपश्चर्या केली त्यांना शिवशंकर प्रसन्न झाले. तेव्हा भोलेनाथाकडे वरदान मागितले, आपण येथेच विराजमान व्हा आणि ह्या भूमीला पावन करा. तसेच भक्तांना आपल्या दर्शनाचा लाभ द्या. कलहंसऋषींच्या संकल्पमुळे शिवमहादेव येथे स्थापित आहेत म्हणून हे देवस्थान कलहंसेश्वर महादेव नावाने प्रसिद्ध झाले. भक्तांना बारा डोंगर पार करून येथे धापा टाकत, हापत यावे लागते म्हणून याला हापेश्वर सुद्धा म्हणतात. मंदिरातील बाबाजींनी बालभोग म्हणून चहा नानखटाई दिली.

कढीपानी कडे परतीची सफर सुरू झाली. रस्ता सरावाचा झाल्यामुळे परतीचे पाच किमी अंतर लवकर पार झाले. रमेश भाईच्या चहा दुकानजवळ आलो आणि काय आश्चर्य दुकान जवळचा सर्व कचरा गायब झाला होता. कोपऱ्यातल्या एका कचरा पेटीत कचरा बंदिस्त झाला होता. विशेष म्हणजे आता चहा पिणारी सर्व मंडळी कागदी कप आणि रॅपर कचरा पेटीतच टाकत होते. चहावाल्या रमेश भाईचा सर्व गिऱ्हार्ईका समक्ष संजयने  नानखटाई आणि खारी देऊन हृद्य सत्कार केला.

खूप आनंद झाला; साफसफाई कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाल्या बद्दल...
कढीपानीच्या नीलकंठ महादेव मंदिरात आलो. शंभू महादेव दर्शन घेतले.  पायी पारिक्रमा करणारा आदित्य मंदिरात भेटला. अगोदर त्याची भेट चापरियाला झाली होती. या मंदिरात, "केसरीया... पधारो मारो... देस.." हे गाणे  मनापासून गायला. अक्षरशः डोळे मिटून हे गाणे ऐकले. आदित्य आणि त्याचे पायी पारिक्रमा करणारे तीन मित्र हापेश्वरच्या जंगलातून नर्मदेच्या काठाने परिक्रमा करणार आहेत. जर मनाने ठरविले आणि मैय्येवर नितांत विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही... हेच त्याच्या बोलण्यातून प्रतीत होत होते.

खाच खळगे आणि वर खाली होणाऱ्या रस्त्यामुळे दुपारच्या उन्हात आमचा कस लागत होता. ऑफ रोडिंग सायकलिंग करत 'वागन' गावात पोहोचायला दीड तास लागला. बजरंग नास्ता हाऊस टपरी जवळ थांबलो.

जेवणाची वेळ होती पण कडक उन्हात त्याची आवश्यकता वाटत नव्हती. पपई खात असलेल्या दुकानदाराने आम्हाला पाहताच अर्धी पपई दिली. उकडलेले वाटणे आणि बटाटा यांचे चाट बनवून दिले. "बाबाजी ठहरो, आपको गरमागरम भजी खिलाता हूँ."  ही खातिरदारी भोजनप्रसादी पेक्षा भारी होती.

थोड़ी उसंत घेतली. येथून शंभर मीटरवर गुजरात आणि मध्य प्रदेशची सीमा होती. हापेश्वरच्या जंगलातून गेलो असतो तर प्रथम महाराष्ट्र आणि नंतर मध्यप्रदेश लागले असते. आजचा मुक्काम डही गावात होता. येथून डही गाव साधारण ५५ किमी आहे. एव्हढ्यात परम मित्र लक्ष्मणचा फोन आला. त्याच्याशी गप्पा मारणे म्हणजे एनर्जी बुस्टिंग असते. त्याच्याबरोबर सुद्धा नर्मदा परिक्रमा करायची आहे. याची त्याने आठवण करून दिली.

आता हेडविंड सुरू झाली होती. येथे रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणावर चालू होते. त्यामुळे सिमेंट काँक्रीटचा रस्ता तर मध्येच दगड धोंडे मातीचा रस्ता असा सुख दुःखाचा मार्ग  होता. जीवनाचे पण असेच असते. सुखाने हुरळून जायचे नसते तर दुःखाने खचून जायचे नसते. याच वेळेस माझ्या जुकबॉक्स मध्ये, " तुझको चलना होगा" हे गाणे लागले होते. खरचं सायकलिंग म्हणजे मेडिटेशन असते. आपणच आपल्याशी बोलत असतो.

दोन तासात कोसारीया गावात पोहोचलो रुलसिंह भाई येथे अन्नक्षेत्र चालवतात.  दारात असलेल्या गोंडस शेळीच्या कोकराला उचलून घ्यायचा मोह टाळता आला नाही.

ते लहान पिल्लू घरातील नातवडांची आठवण देऊन गेला. 

दुपारचे साडेतीन वाजले होते आणि रुलसिंह भाई आम्हाला राहण्याचा आग्रह करत होते. चाळीस किमी वरील डही गाठण्याचा निर्धार होता. परंतु शेवटी नर्मदा मैंय्येची इच्छा...  कोसारीयाला चहा घेऊन पुढे मार्गक्रमण केले.

उमरट येथे पोहोचायला सायंकाळचे पाच वाजले होते. आज जवळपास ९० किमी परिक्रमा झाली होती. एका घराबाहेर भगवा झेंडा आणि माँ नर्मदा अन्नक्षेत्रचा बॅनर होता. दारात उभ्या असलेल्या गरासिया भगत भाई  प्रेमाने त्यांच्या घरात घेऊन गेले.
  शेणाने सारवलले घर आणि घरातील मैय्येने आदराने केलेले स्वागत पाहून मन खूप प्रसन्न झाले.  येथेच आजचा विश्राम करायचा हा विचार मनात आला... नेमकं संजय पण म्हणाला आपण येथेच राहूया... मनाची भाषा मनाला कळली होती. खरंच संजयचे आणि माझे ट्युनिंग हृदयातून जुळले होते.
 
"श्रमिक हो घ्या इथे विश्रांती" हे सायकलचे बोल सुद्धा कानावर पडले. चहा घेतल्यावर प्रथम सायकलची तेलमालिश केली. सायंकाळी वातावरणात गारवा जाणवू लागला होता. त्यामुळे मागच्या शेतात केलेली थंड पाण्याची आंघोळ शरीर आणि मनाला थंडावा देऊन गेली.

भगत पतिपत्नीच्या उपस्थितीत मैय्येचे पूजन झाले.

मोलमजुरी करणारे भगतकुटुंब गेली अठरा वर्ष परिक्रमावासीयांची अव्याहतपणे सेवा करत आहेत. खरंच हीच आहे मनाची श्रीमंती... स्वतः अर्धपोटी राहून दुसऱ्याला जेवू घालणे... हा निरंतर चालणारा लोकसेवेचा महायज्ञ  राजसूय यज्ञापेक्षा महान आहे. आम्ही दोघांनी भगत यांचे बँक डिटेल्स घेतले... या लोकसेवेच्या यज्ञात खारीचा वाटा उचलण्यासाठी...

घरातली  जमिन शेणाने सारवताना सुद्धा कलात्मकता होती. शेणाचे जमिनीवर उमटलेले पट्टेसुद्धा रांगोळी सारखे भासले. चवळीच्या शेंगांची भाजी, नाचणी आणि ज्वारीची मिश्र भाकरी, आणि आमटी-भात असा सुग्रास बेत सोबत मैयेची, मायेने वाढण्याची किमया... आईची आठवण देऊन गेली.

परमेश्वर कुणाच्या तरी रुपात आपल्या आसपासच वावरत असतो आणि आपली सेवा करतो... मैय्येचे हे आगळे वेगळे रूप पाहून मन सद्गदित झाले.

विचारांच्या या संक्रमणात निद्रादेवीच्या अधीन कधी झालो हे कळलेच नाही.

नर्मदे हर !!!

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

2 comments:

  1. मित्र निनादचे अभिप्राय

    बारीकसारीक तपशिलासह यथार्थ वर्णन. .
    तरीही कुठेही पाल्हाळ नाही तर अतिशय उत्कंठा वाढविणारे....
    कसा बर झाला यापुढचा प्रवास या उत्सुकतेने पुढे पुढे वाचले जाते, सोबत अतिशय आनंद देणारे निसर्ग छायाचित्रे आणि वर्णन केलेल्या प्रसंगाला साजेसे फोटो..
    तुम्हाला मिळालेला आनंद वाचताना वाचकास ही भरभरून मिळतो.. जणू वाचक तुमच्या सह सायकलवरून परिक्रमा करत नर्मदा मैया तसेच देवालयांमधून देवदेवतांचे दर्शन घेतो...

    ReplyDelete