Tuesday, May 10, 2022

सायकल अनुभव दि. १० मे २०२२

सायकल अनुभव   दि. १० मे २०२२

आज आलेला सायकल अनुभव...

आज सकाळी सायकलिंग करत दहिसरला संजयच्या घरी गेलो होतो... ऊन वाढल्यामुळे बोरीवली ते प्रभादेवी असा सायकलसह लोकल रेल्वेने प्रवास करायचे ठरविले...

तिकीट काउंटरवर स्वतःचे तिकीट काढून सायकलचे लगेज तिकीट मागितले असता... काउंटर क्लार्कने सायकलचे लगेज तिकीट स्टेशन वरील टीसीकडे मिळेल असे सांगितले...

स्टेशन वरील टीसी गायब असल्यामुळे आणि वेळेत घरी पोहोचायचे असल्यामुळे सायकलचे लगेज तिकीट न काढता (डब्यात टीसी आला तर दंड भरायचे ठरवून) लोकलच्या लगेज डब्यात चढलो... 

गाडी माटुंगा स्टेशनला आल्यावर तीन व्यक्ती लगेज डब्यात चढल्या आणि सर्वांचे तिकीट तपासू लागल्या .... "तुमच्याकडे लगेजचे तिकीट नसेल तर या डब्यातून प्रवास करता येणार नाही..." असे सांगून त्यातील दोघेजण सर्वांकडे मोबाईल मागू लागले...

माझ्याकडे त्यातील एक व्यक्ती मोबाईल मागायला  आल्यावर  विचारले "मोबाईल कशाला हवा." "लोकलने प्रवास करायचे तिकीट माझ्याकडे आहे." "सायकल लगेज साठी दंड भरायची तयारी आहे."

काही शंका आल्यामुळे त्याला विचारले कोण आहात तुम्ही... त्याने ओळखपत्र दाखविले... ती सर्व मंडळी RPF जवान होते...

 त्यांना विचारले " तुम्हाला तिकीट तपासण्याचा  अधिकार आहेत काय...
एकजण म्हणाला ... होय...  

तसे अथोरिटी पत्र रेल्वेने दिले आहे काय... 

कोणीही असे पत्र दाखवू शकला नाही... 

तसेच मोबाईल मागण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला... 

त्यावर काहीही उत्तर मिळाले नाही...

तेवढ्यात जवळजवळ पंधरा जणांचे मोबाईल दोघांनी जमा केले होते... डब्यातील इतर सर्व प्रवाश्यांना दादरला उतरवले...

 मला पण दादरला उतरा म्हणू लागले ... त्यांना सांगितले , "प्रभादेवी स्टेशनला उतरणार आहे... एक RPF जवान माझ्या बरोबर प्रभादेवीला आला... 
 
प्रभादेवीच्या रेल्वे कंट्रोल आणि टीसी ऑफिस मध्ये गेल्यावर तेथील अधिकाऱ्याला सांगितले... हा जवान कोणत्या अधिकाराने मोबाईल मागत होता... यांच्याकडे तिकीट तपासण्याचे अधिकार पत्र सुद्धा नाही... याची तक्रार नोंदवायची आहे... तसेच सायकल लगेजचा दंड भरायला तयार आहे...

 त्या अधिकाऱ्याने सांगितले प्रभादेवी स्टेशनवर टीसी तैनात नाही... त्यामुळे येथे दंडाची पावती बनविता येणार नाही...

त्या RPF जवानाला सांगितले तुझे ओळखपत्र दे... फोटोसह  तुझी तक्रार रेल्वे मंत्रालयाला करतो आणि सर्व बाबी ट्विटर आणि फेस बुकवर टाकतो... 
RPF जवानाने केलेली चूक त्याच्या लक्षात आली होती...
त्यावर त्या जवानाने सोडून दिले... 

सर्व सायकलिस्ट मित्रांना एकच सांगणे आहे की खालील बाबत आपल्याला सायकल संघटना मार्फत लोकलने सायकल घेऊन जाण्याचा नियमांची इत्यंभूत माहिती अवगत होणे आवश्यक आहे... तसेच सायकल लगेजचे तिकीट... तिकीट खिडकीवर मिळणे आवश्यक आहे.

१) लोकल प्रवासात सायकलचे लगेज तिकीट न देता टीसी २०० रुपयेची दंडाची पावती देतो... हातात रेल्वेचे तिकीट असताना  प्रवास सुरु होण्याआधी  सायकलसाठी दंडाची पावती देणे हे नियमबाह्य आहे...

२) २०० रुपये दंडाच्या पावतीवर सायकलचे वजन १३ किलो  असताना ४० किलो लिहितो... हे सुद्धा नियमबाह्य आहे...

३) मेट्रो रेल्वेने सायकल नेण्यासाठी डब्यात रॅक बनविले आहेत... तसेच काउंटरवर सायकल लगेज तिकीट मिळण्याची सुविधा आहे... तशी सुविधा लोकल मध्ये का नाही...

४) लोणावळा ते पुणे लोकलने सायकल नेताना तिकीट खिडकीवर आधारकार्ड दाखवून रीतसर ८० रुपयांचे सायकल लगेज तिकीट दिले होते... मग मुंबईतील लोकल मध्ये तसे का नाही...

५) खांदेश्वर ते CST प्रवासात सायकल लगेज चे १००रु चे तिकीट दिले होते...
६) RPF जवानाला तिकीट तपासण्याचे तसेच प्रवाश्याकडून मोबाईल मागण्याचे  रेल्वेने अधिकार पत्र दिले आहे काय?  याची माहिती रेल्वे प्रशासना कडून घेणे आवश्यक आहे...

७) सरकार प्रदूषण मुक्त भारत आणि फिट इंडिया चळवळी साठी सायकलिंगला प्रोत्साहन देत असताना... लोकल रेल्वे मधून सायकल घेऊन जाण्यास एव्हढ्या अडचणी का आहेत..  सर्व सायकलिस्टला सायकल लगेजचे रीतसर तिकीट भरून प्रवास करणे नक्कीच आवडेल... त्या साठी दंड तिकीट का घ्यावे...

८)  सायकलसह प्रवास करण्याबाबत सर्व लोकल रेल्वेच्या शाखांमध्ये एकच नियमावली असणे आवश्यक आहे... यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे...

सायकल संघटना या साठी काही मदत करू शकतील काय...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...
मोबाईल... 9869570266

6 comments:

  1. सतीश सर
    समाजाला व शासकीय आस्थापनाला जागरूक करायला पाहिजे, आपण प्रदूषण मुक्ती सह आशा प्रदूषित मानसिकतेबाबत रेल्वे मंत्रालयास जागरुक करावे व RCF यांनी सुरक्षितता सोडून असा धंदा बंद करणें आवश्यक आहे,

    ReplyDelete
  2. मित्रा, तू हे करण्याच धाडस दाखवलस त्या बद्दल तुझे मनापासून अभिनंदन!!! भारतीय रेल्वे आणि पुण्यात नियम वेगळे आणि मुंबई राजधानीचे , आंतरराष्ट्रीय शहर नागरीकांना हा नाहक ताप. कुणीही उठत, कायदा हातात घेत, जाब विचारायच धाडस करावे हा धडा तू घालून दिलास, हे उत्तम आणि आपण सारेच हे करूया तरच हे प्रकार थांबतील…

    ReplyDelete
  3. एकदम परफेक्ट लिहिलंय दादा तुम्ही 🤘

    ReplyDelete
  4. एकदम बरोबर आहे. या सर्व यंत्रणा कधी सुधारणार कोण जाणे.

    ReplyDelete
  5. खरं आहे, सायकल संघटनांतर्फे या विषयाचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. एकट्या माणसाला रेल्वे काउंटरवर अजिबात दाद देत नाहीत. यासाठी रीट पिटिशन दाखल करणे, रेल्वे मंत्रालयाला अर्ज देणे असे काही करायला पाहिजे.

    ReplyDelete