Saturday, May 28, 2022

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती आणि १०९ वे रक्तदान...... २८ मे २०२२


स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती आणि १०९ वे रक्तदान
२८ मे २०२२

अशोकला फोन करून , 'उद्या सकाळी  आठ वाजता घरी भेटायला येतो' असा निरोप दिला... तसेच संजयला फोन फोन करून;  सिद्धीविनायक मंदिराजवळ सकाळी साडेपाच वाजता भेटण्याचे नक्की केले. त्याच्या सोबत मरीन लाईन्स पर्यंत राईड करायची होती...

आज विशेष म्हणजे मोबाईलची रिंग वाजण्याच्या अगोदरच पहाटे साडेचार वाजता  जाग आली. लाईव्ह लोकेशन प्रमाणे संजय घरातून चार वाजता  बाहेर पडला होता... पाऊण तासात सर्व तयारी करून "सखीसह" सिद्धीविनायक मंदिराकडे प्रस्थान केले.  संजयची भेट झाली...  आणि सुरू झाली दोस्ताबरोबर सायकल राईड...

वातावरण अतिशय आल्हाददायक होते... रहदारी एकदम तुरळक होती... सुरेख सकाळ होती... शीतल सकाळ म्हणजे आनंद सोहळा असतो... वाऱ्याची गार झुळूक, रस्त्यावरील झाडांच्या पानांची सळसळ,  मंद स्वरात कानावर पडणारा पक्षांचा किलकीलाट, सायकलच्या चाकांच्या चक चक आवाज... निसर्ग संगीताच्या साथीने NCPA ला कधी पोहोचलो कळलेच नाही... 

टक्क उजाडले होते... आज शनिवार असल्यामुळे जॉगर्स, सायकलिस्ट आणि सकाळी भटकंती करणाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती...
 ओबेरॉयच्या समोर बसून अल्पोपहाराची मेजवानी सुरू झाली... मोड आलेले मूग आणि शेंगदाणा लाडू म्हणजे फुल ऑफ प्रोटीन होते. येथील श्वानांची आता दोस्ती झाली आहे... बोलावल्यावर जवळ आले... त्यांच्याशी गप्पा मारल्या... फोटो काढले... संजय बरोबर पुढील मोठ्या राईडचे प्लॅनिंग झाले...
सुरू झाली संजयच्या परतीची राईड दहिसरकडे... त्याला अंधेरी पर्यंत कंपनी देणार होतो... तेथून कोलडोंगरीला अशोकच्या घरी भेट देणार होतो... 

पेडर रोडचा चढ चढून महालक्ष्मी मंदिराकडे उतरलो आणि तेथून वरळी चौपाटी मार्गे शिवाजी पार्कला आलो... आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती... त्यांच्या स्मारकाला अभिवादन करून  माहीमकडे प्रस्थान केले... 

पश्चिम द्रुतगती मार्गावर आल्यावर एक माझ्याच वयाचा तरुण हायब्रीड सायकलला जोरजोरात पेडलिंग करत पुढे पास झाला... तो पूल चढताना खांदे हलवत धापा टाकत, जोर काढत पेडलिंग करत होता... त्याची गम्मत करायचे ठरविले... सायकल टॉप गियरला घेऊन स्पीड वाढविला आणि सांताक्रूझ फ्लाय ओव्हरवर त्याला गाठले... चढावर पुन्हा तो धापा टाकू लागला... त्याला बाय बाय करत पुढे सटकलो... पुढे पुढे तो  जवळ आला की माझा स्पीड वाढलेला असे... अंधेरी फ्लाय ओव्हर पर्यंत त्याच्याशी लपंडाव खेळत होतो... मागून येणारा संजय हसत होता... संजयला टाटा करण्यासाठी अंधेरी फ्लाय ओव्हर जवळ थांबलो... आणि संजयसह त्या वयस्क तरुणाला सुद्धा बाय बाय केले...

जवळच असलेल्या अशोकच्या लक्ष्मी टॉवर मध्ये सकाळी आठ वाजता पोहोचलो... सुहास्य अशोक दारातच उभा होता... घामाने चिंब भिजल्यामुळे पंख्याखाली जमिनीवर बसलो... मग सुरू झाली गप्पांची मैफिल... जुन्या ट्रेकिंगच्या गोष्टी... नायर रुग्णालयातील जुने दोस्त मंडळी... नायर महोत्सव... हिमालयातील संदकफू फालुट ट्रेक... या गप्पामध्ये रममाण झालो... अशोकने बहारदार कॉफी बनविली तसेच सोबत शेव आणि कचोरी आली... हे सगळं संपतंय तो पर्यंत सुनबाई स्मिताने बनविलेल्या झकास इडल्या चटणी आली... मुलगा अभिजित तेव्हढ्यात जिम मधून आला... सायकलिंग... ट्रेकिंग... प्राणायाम... मेडिटेशन या गप्पात दोन तास कसे गेले ते कळलेच नाही... खूप महिन्यांनी अशोकाची भेट झाल्यामुळे खूपच आनंद झाला होता... त्याला प्रत्यक्ष भेटल्यामुळे आनंदाच्या धबधब्याचा वर्षाव झाला होता...
परतीची राईड करत साडेअकरा वाजता घरी पोहोचलो... आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीचे औचित्य साधून रक्तदान करण्याचे  नक्की केले होते... के ई एम च्या सोशल वर्कर कविता ससाणे बाईंना फोन केला... आज अर्धा दिवस असल्यामुळे साडेबारा वाजे पर्यंतच रक्तदान करता येईल हे  समजल्यावर तातडीने के ई एम रक्तपेढीवर पोहोचलो... ससाणे बाईंना खूप आनंद झाला... 

फॉर्म भरून डॉ पूजा आणि डॉ ऋतुजा यांना भेटलो... रक्तदाब, वजन, Hb तपासल्यावर... प्रश्नावली पूर्ण  झाली... माझे १०९ वे रक्तदान आहे समजल्यावर त्या आश्चर्याने स्तिमित झाल्या होत्या...

रक्तदान कक्षात वरिष्ठ तंत्रज्ञ उज्वला मॅडम यांनी ओळखले...  १०० व्या रक्तदानावेळी सुद्धा त्या उपस्थित होत्या... रक्तदानाची सुई एव्हढ्या सराईतपणे टोचली... की समजले पण नाही...

इतक्यात रक्तदान केंद्रावरील सर्व स्टाफ भेटायला आला... रक्तदान सुरू असतानाच ससाणे मॅडम माझ्या सायकलिंगचे किस्से सर्वांना सांगत होत्या... वरिष्ठ लॅब टेक्निशियन सांगळे सर आणि विलास घाडीगांवकर सर यांची ओळख झाली...  विलासरावांनी  पण १०० वेळा रक्तदान केले आहे... 

ब्लड बँकेतील लॅब टेक्निशियन कविता जाधव, मंगल, प्रांजल पाटील, कमल यांच्या सह फोटोसेशन झाले. 

मेडिको सोशल वर्कर हेमंत यांनी रक्तदानाचे प्रमाणपत्र बनवून आणले... सर्वांच्या उपस्थितीत धाडीगावकर सरांनी प्रदान केले...

ते म्हणाले, "तुमच्या रक्तदानाचे १०९ वे पुष्प आम्हा सर्वांना अतिशय प्रेरणादायी आहे" 

शेवटी सहाय्यक राजेंद्र  बिस्किटासह दोन कडक कॉफी घेऊन आला... 

सर्वांचे प्रेम आणि शुभेच्छांची पोतडी घेऊन घरी प्रस्थान केले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त आज काहीतरी मोठे करायचे ठरविले होते... त्याला मूर्त स्वरूप आले... आज केलेली ७० किमी सायकल राईड... परममित्र संजय आणि अशोकची झालेली भेट आणि १०९ वे रक्तदान... या पेक्षा आणखी मोठे काय असू शकते...

आजचा दिवस संस्मरणीय झाला होता...

एका प्रचंड ऊर्जा स्रोत मिळाल्याचा आनंद झाला आहे...

सतीश जाधव
मुक्त पाखरे....




 

10 comments:

  1. रक्तदान श्रेष्ठ दान सुंदर मामा

    ReplyDelete
  2. Great
    1000 salutes

    ReplyDelete
  3. जीवनाचा खरा आनंद...💐💐💐

    ReplyDelete
  4. निख्खळ आनंद,याला जीवन ऐसे नांव

    ReplyDelete
  5. खूपच सुंदर अनुभव आहे सतीश

    ReplyDelete
  6. सुंदर

    ReplyDelete
  7. You are always great Samudra

    ReplyDelete
  8. सतीश साहेब आपण सर्वांसाठी प्रेरणादायी आहात. आपण अजूनही तरुण आहात आणि पुढील अनेक वर्षे तरुणच राहून सर्वांसाठी आदर्श ठरणार आहात यात शंका नाही. आपणांस खुप खुप शुभेच्छा

    ReplyDelete
  9. Great 💐💐💐🙏🙏

    ReplyDelete