Monday, September 25, 2023

पावणेर अर्थात पाहुणचार


पावणेर अर्थात पाहुणचार.....

माणूस हा समाजप्रिय  प्राणी आहे...
समूहाने राहणे त्याल आवडते.....
त्यातूनच त्या समूहाची म्हणून एक संस्कृती उदयाला येते......

संस्कृती म्हणजे सभ्यता.....
सदवर्तनाचा दृश्य आविष्कार....

घराची शोभा ज्याप्रमाणे अंगण सांगते
त्याप्रमाणेच..
माणसांची सभ्यता शालीनता त्यास अवगत असणाऱ्या चालीरीतीतून कळते......

आपल्या घरी आलेल्या पै पाहुण्यांशी आपण जे काही वागतो बोलतो किंवा...
 त्यांचा जो काही आदर सत्कार करतो किंवा...
त्यांची जी काही उठबस करतो....
ठेप ठेवतो.... 
त्याला पावणेर किंवा पाहुणचार असं म्हणतात....

पावणेर हा तसा ग्रामीण शब्द आहे...
पण त्यात खूप अदब आहे...
पाहुणचार या शब्दात कृतीपेक्षा विचारपूस जास्त आहे.....

पूर्वी खेड्यात घर आणि अंगण एकच असल्यासारखं होतं....

त्यामुळे घरी येणारा पाहुणा लांबूनच नजरेस पडायचा....

पाहुणा किंवा पाहूणी दारात आल्याबरोबर घरातली माणसं तटातटा आदरपूर्वक उठून उभी राहायची...

लेकुरवाळी पाहुणी असेल तर भाकरतुकडा ओवाळून टाकला जायचा.......

न्हाणीघरात पायावर पाणी घेतल्या शिवाय घरात प्रवेश नव्हता.....

बसायला घोंगडी टाकली जायची....
उन्हाळ्याच्या दिवसात रांजनातील थंडगार पाण्याचा तांब्या  आणि गुळाचा खडा असा देशी पाहुणचार पाहुण्यांपुढं ठेवला जायचा..

पाहुणे तातडीने निघणार असतील तर गरम दूध आणि शेवया उकडून पितळीत पाहुण्यांच्या पुढे मांडल्या जायच्या...

हातावर पाणी पडल्याशिवाय पाहुणा घराबाहेर जाऊच शकत नव्हता...
हे पावणेर....

पाहुणे निवांत असतील तर चार दोन दिवस ठेवून घेतले जायचे.....

आवडीनिवडीचं भोजन तर व्हायचंच पण पोटभर साऱ्या गणागोताच्या गप्पा मारल्या जायच्या....
त्यात आस्थेवाईकपणा होता...
मला काय त्याचं असं नव्हतं.....

जाताना आपल्या शेतशिवारात पिकलेला वानवळा मोठ्या आवडीने दिला जायचा.....
मग ते आंबे असतील नाही तर खरवस असेल.....
खूप मजा असायची.....

माहेरवाशीण माहेरी आली तर मग तिला न्हाऊमाखू घातलं जायचं...
सासराबद्दल सखोल विचारपूस केली जायची.....

चोळी पातळ घेतलं जायचं....
हातात चुडा भरला जायचा....
हे सवाष्णीचं लेणं आहे.....

लग्न झालेल्या व माहेरी आलेल्या मुलींच्या देखील खूप काही अपेक्षा नसायच्या......

आईवडील भाऊ भावजय यांच्या राज्यात ....
तिचं जे काही पावणेर व्हायचं
त्यात ती संतुष्ट होती.....

काळ्या पोतीत ओवलेली
दोन डोरली चार सोन्याचे मणी
म्हणजे तिचं मणीमंगळ सूत्र....
पायात पावलीभर चांदी घालून घडवलेली खणखणीत जोडवी...
कानात कर्णफुले...
हातात हिरवा चुडा....
कपाळाला ठसठशीत कुंकू..
एवढ्या माफक साजशिनगारात घरी आलेली माहेरवाशीण आनंदी असायची.......

सासरी जाताना सर्व वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून मग निघायचं....

सासरी नसणारं आणि माहेरी असणारं
असं म्हणून जे जे काही असेल ते आई आपल्या या लाडक्या लेकीला गाठोड्यात गाठीवर गाठी बांधून द्यायची......

तिला मुलबाळ असेल तर त्याला अंगडं टोपडं घ्यायचं....
गाठोडं जड झालं तर आई किंवा भाऊ बैलगाडी करून या पोरीला सासरी सोडवून यायचे......

लेकीच्या सासरी पुन्हा या माहेराहून आलेल्या मंडळींचं स्वागत व्हायचं...
जेवू खाऊ घालून किमान एक रात्र मुक्काम केल्यानंतरच त्यांची सुटका व्हायची.........

त्यात एकमेकां विषयीचा मान सन्मान आदर यांचं प्रकटीकरण असायचं.....
गोडवा असायचा....

श्रद्धेने केलेल्या या आटापिटीस 
पावणेर अथवा पाहुणचार असं म्हणायचं...........

घरी आलेली पाहुणी जवळची का लांबची याचा विचार न करता हातात बांगडया तर भरल्या जायच्याच....

जाताना  पिढयावर बसवून परातीत गहू तांदूळ व खोबरं घेऊन घसघशीत हातानं हळदीकुंकू लावून खणा नारळानं ओटी भरली जायची.....

पुरुष पाहुण्यास टॉवेल अथवा उपरणे व टोपी गंध लावून दिली जायची...

यात देण्याचा भाव होता...
अंतरीचा उमाळा होता...

पदरातील ओटी काढून ठेवताना त्यातील मूठभर धान्य पुन्हा त्या परातीत टाकलं जायचं.....

त्यामुळे धनधान्यास बरकत येते अशी समजूत आहे.....
अशी ओटी भरून केलेलं पावणेर आपल्यातील कितीतरी माता भगिनींच्या वाट्याला आलं असेल....

घरोघरी आलेल्या पाहुण्यांचं ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार पावणेर व्हायचं...

अगदी शेजारच्या घरात सुध्दा रोज वाटीभर का होईना पण भाजी ज्याला खेड्यात कालवण म्हणतात नित्यनेमाने दिलं घेतलं जायचं....
बेगमीचा मसाला जरी केला तरी तो पहिला शेजीबाईच्या घरी मासला म्हणून दिला जायचा.....

नाहीचा पाढा न लावता आहे त्यातूनच घासातील घास देण्याची भावना म्हणजे पावणेर.....
आणि दिल्यानं वाढतं.....
म्हणून चहासाठी कप आणि बशी...
बशीतला पिऊ आणि कपातला देऊ...
हे सहजसाध्य अगत्य......

त्यातून सुखदुःखाची वाटणी व्हायची..
कितीएक प्रसंग तर परस्पर निभावले जायचे.....

घराचं दार सदैव उघडं....
माणसं मनानं मोकळी ढाकळी होती..

यात कृती आणि त्यामागची भावना दोन्ही महत्वाच्या मानल्या जायच्या....

*शेजी आली घरा कशी बोलते हासून..*

*मनुष्य जन्म असा काय जायचं साधून....*

माणसाचा जन्म म्हणजे पाण्यावरला बुडबुडा....
तेव्हा कपाळावर आठी न पडता हशी खुशीनं राहावं.......
प्रेमानं अदबीनं वागावं.....
तेवढंच संगती येतं असं शिकविणारा संस्कार त्याचं नाव पावणेर......

आता काळ बदलला आहे....
सगळ्या गोष्टीत नको एवढा औपचारिकपणा आला आहे....
अनौपचारिक असं काही असतं हेच मुळी लक्षात येत नाही.....

त्यामुळं माणसं मनात कुढतात...
आणि स्वहस्ते स्वतःचा ऱ्हास करून घेतात......

पाहुणचाराच्या जुन्या पद्धती जरा अंमलात आणण्याचा प्रयत्न करूया..

चेहऱ्यावर चोवीस तास संकोचाचं बेगड लावून जगणं जरा बंद करू.....
व्यक्त होऊ...

समोरच्याच व्यक्त होणं आणि आपण समरसून समजून घेणं हे सुध्दा पावणेरच आहे......

असं पावणेर वाढीस लागलं म्हणजे आपण जगातील सगळ्यात श्रीमंत झालो आहोत असं समजावं......

मंगल हो.... !!!

संकलित....

Saturday, September 23, 2023

आतला आनंद...

मोगऱ्याचा गजरा...

मैत्रिणीने दिलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याचा सुगंध दरवळत होता. ते वाऱ्यावर बांधले आणि मन भरून त्यांच्या भेटीचा आनंद अनुभवत राहिले. फार दिवसांनी एखादे जुने ओळखीचे, प्रेमाचे माणूस भेटावे तसा त्या फुलांच्या भेटीने मला विलक्षण उल्हास वाटत होता. 

पुण्यात फुलांना तोटा नाही. गुलाब, निशिगंधा पासून तो अगदी ग्लाडिओला, जर्बेरा पर्यंत नाक्यानाक्यावर फुलांचे तुरे मिळतात. समारंभात आदरणीय पाहुण्यांना, वक्त्यांना आदरपूर्वक दिले जाणारे गुच्छ प्रत्यक्ष बघते. पण का कोण जाणे, त्या गुच्छांना एक औपचारिकपणा असतो. सहज मिळणाऱ्या फुलांचा निर्भर आनंद ती सहसा देत नाहीत. फुले एकतर झाडावरून खुडून घ्यावीत किंवा कुणीतरी अलगद ती आपल्याला द्यावीत. तीही खासगी भेटीत. जाहीरपणे फुलांचे गुच्छ स्वीकारताना संकोच वाटतो.

फुले सारीच आवडतात; पण मोगाऱ्याशी माझे भावबंध बालपणापासून जुळलेले आहेत. गावी एके ठिकाणी पाठीमागच्या अंगणात मोगऱ्याची असंख्य झाडे होती. आजोळी असताना आजीने लावलेली, जोपासलेली मोगऱ्याची झाडे नातलागांइतकी जवळची वाटत. ती फुले हळुवार हाताने खुडताना एक अनामिक आनंद लाभे. 

शाळकरी वयात पुण्यामध्ये वसंत ऋतूत 'गजरा मोतियाचा' केव्हातरी मिळे. त्याची अपूर्वाई काही वेगळीच असे. पुण्यात 'हजारी मोगरा' नावाची मोगऱ्याच्याच नात्याची फुले पहिली. त्यांना मंद गोड सुवास असे. मुंबईला असताना मदनबाण, सुरंगी, सोनटक्का अशा फुलांचा परिचय झाला. ती आवडली ही; पण मोगऱ्याच्या फुलांसारखी जवळीक जडली नाही.  सुवासाने घमघमणारा सोनचाफा, देखणं रूप आणि सुवास ल्यालेल्या फुलांचा राजा गुलाब, दिमाखदार सौंदर्याने नटलेली, कुर्रेबाज दिसणारी फुलांची राणी शेवंती, हळव्या आर्त आठवणी जागवणारी बकुळीची फुले... सारीच हवी हवीशी वाटणारी; पण माझ्या मनातले मोगऱ्याचे स्थान त्यापैकी कुणीही कधी घेतलेले नाही. 

ज्ञानेश्वरांनी आपल्या मधुर ओव्यांचे वर्णन करताना   वसंतागमींचीं वाटोळीं |  मोगरीं जैसीं ||  अशी चित्रमय उपमा वापरली आहे !

शांताबाई शेळके यांच्या आतला आनंद या ललित लेखनमालेतून...

Wednesday, September 20, 2023

आवरण... डॉ. एस एल भैरप्पा

आवरण... डॉ. एस एल भैरप्पा

ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध कन्नड लेखक, साहित्यिक डॉ.एस एल भैरप्पा यांची "आवरण" ही कादंबरी वाचनात आली... माझ्या आयुष्यात एकटाकी सलग एका दिवसात वाचून काढलेली ही एकमेव कादंबरी ठरली आहे...

भारतातील छद्मी धर्मनिरपेक्षता तिच्या अडून हिंदू धर्मावर होत असलेले आणि इतिहासातील झालेले  हल्ले, पाडलेली पवित्र मंदिरे...लव्ह जिहाद आदी गोष्टी अतिशय परिणामकारकरित्या या कादंबरीत मांडण्यात आल्या आहेत...

लव्ह आणि लव्ह जिहाद मधील अंतर समजून घेताना आवरण उपयोगी पडते. लक्ष्मीच्या वडिलांचं वाक्य... मुस्लिम मुलाशी लग्न केल्यावर तुझाच मुलगा हिंदू मंदिरे पडायला पुढाकार घेईल... तेव्हा काय करशील.

भारतातील  ढोंगी सेक्युलर लोकांची लक्तरे या कादंबरीतून डॉ. भैरप्पा यांनी वेशीवर टांगून ठेवली आहेत... जे पुरोगामी (सेक्युलर) विचारांचा बुरखा तोंडावर घेऊन बसले आहेत... त्यांचा तो बुरखा डॉ. भैरप्पांनी टराटरा फाडला आहे..

 कुठल्याही विषयावर लिखाण करण्याआधी त्या विषयाचा सर्व अंगाने अभ्यास-वाचन, मनन करून... भरपूर परिश्रम घेऊन तसेच त्या विषयातील तज्ज्ञांशी विचारविमर्ष करूनच त्याची आवरण ही कादंबरी साकार झाली आहे...

 हिंदूचे आद्य आराध्य दैवत असलेल्या काशी विश्वनाथाला दरवर्षी पंचवीस लाख लोक जातात पण तिथे ज्ञानव्यापी मस्जीद आहे तेच मूळचे काशी विश्वनाथाचे मंदीर आहे. आपण जिथे नमस्कार करतो ते मूळ मंदीर नाही  हे लक्षात आल्यावर मूळ मंदिराच्या स्थळावर नमस्कार करण्याची इच्छा तीव्र होते.

 कोट्यवधी भारतीयांच्या या इच्छेला सुप्रसिद्ध कन्नड कादंबरीकार डॉ एस.एल. भैरप्पा यांनी "आवरण" या कादंबरीतून वाचा फोडली आणि ती कादंबरी केवळ कन्नड वाचकांची न राहता भारतीयांची झाली. कन्नड भाषेत पंचवीस आवृत्या निघाल्या आणि अन्य भारतीय भाषांच्या आवृत्त्या दररोज वाढत आहेत.

फेब्रुवारी २००७ मध्ये "आवरण" प्रकाशित झाली. २००९ पर्यंतच हिची २२ पुनर्मुद्रणे झाली. तीन वर्षांत या कादंबरीवर १० चर्चासत्रे झाली. तसेच या पुस्तकावर १० पुस्तके प्रकाशित झाली, त्यापैकी ४ पुस्तके ही "आवरण" वर टीका करणारी आहेत. आवरणने कन्नड पुस्तकांच्या खपाचे आजवरचे सारे विक्रम मोडून काढले आहेत.

वाचकांनी या कादंबरीला डोक्यावर घेतले आहे, तर दुसऱ्या बाजूला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते यू.आर. अनंतमूर्ती, गिरीश कर्नाड, चंद्रशेखर कंबार अशा नामवंत कन्नड लेखक-नाटककारांनी या कादंबरीवर टीकेची झोड उठवली आहे. गंमत म्हणजे जी नामवंत विचारवंत मंडळी आवरणवर तुटून पडताहेत, टीका करताहेत त्या प्रवृत्तीची पात्रे कादंबरीत सुद्धा आहेत. सत्य झाकोळणाऱ्या या प्रवृत्तीला पुराव्यानिशी उघडे पाडणे हा या कादंबरीचा गाभा आहे.

सत्य कोणाच्या रागालोभाची पर्वा करीत नाही. एका अर्थाने आवरण ही सत्यनिष्ठ कादंबरी आहे. "हिडन टॉरिझन्स : 1000 ईयर्स ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन' चे लेखक एन.एस. राजाराम यांनी आवरणची तुलना डॅन ब्राऊन यांच्या विश्वविख्यात "दा-विंची कोड" या कादंबरीशी केली आहे. स्वार्थी आणि प्रभावी शक्तींनी खरा इतिहास दडपून ठेवून खोट्या इतिहासाचा प्रचार करणं, हे दोन्ही कलाकृतींमधील समान सूत्र आहे.

कादंबरीची सुरुवात फ्लॅश बॅकपद्धतीने होते. ही कादंबरी ऐतिहासिक आणि वर्तमान या दोन स्तरांवर उलगडत जाते. १९९२ साली बाबरीचा ढांचा पाडण्यात आल्यानंतर समाजात धार्मिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असते. त्यानुसार प्राचीन वास्तू-शिल्पांवर आधारित माहितीपट निर्माण करण्याचे काम आमीर आणि रझिया कुरेशी यांच्यावर सोपविण्यात येते. माहितीपटाच्या प्राथमिक तयारीसाठी दोघेही विजयनगर (हंपी) येथे येतात. तेथील उद्‌ध्वस्त मंदिरे पाहून रझिया अंतर्मुख बनते.

रझिया ही पूर्वाश्रमीची हिंदू असते. लक्ष्मी तिचं आधीचं नाव. आमीरच्या प्रेमात पडून तिने धर्मांतर केलेले असते. घरातून वडिलांचा विरोध असूनही पुरोगामी विचारांच्या प्राध्यापक शास्त्री यांच्या प्रोत्साहनामुळे आणि आमीरच्या आधुनिक विचारांमुळे ती मुस्लिम बनते. हिंदू धर्मावर टीका करणे आणि प्रस्थापित विचारवंतांच्या वर्तुळात वावरणे यामुळे ती सतत प्रसिद्धीत असते. याच सुमारास विजयनगरच्या भग्न अवशेषांनी ती अंतर्मुख होऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न करू लागते.

रझिया सत्यावर आधारित डॉक्युमेंटरीचा आग्रह धरू लागते अन्‌ आमीर मात्र सत्याशी प्रतारणा करीत असल्याचे तिच्या ध्यानात येऊ लागते. दरम्यान तिच्या वडिलांचे - आप्पांचे निधन होते. लक्ष्मी तब्बल २८ वर्षांनंतर आपल्या गावी पोहोचते. कादंबरीला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळते ती इथे. रझियाला छळणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची आशा तिच्या मनात येथे निर्माण होते. तिच्या वडिलांनी एकत्रित केलेली ग्रंथसंपदा तिच्या हाती लागलेली असते. आप्पांनी काढलेली टिपणे आणि त्यांचा व्यासंग पाहून लक्ष्मी स्तिमित होते. तिथेच राहून अभ्यास करायचा निर्णय ती घेते. लक्ष्मीने परधर्मात जाऊन विवाह केल्यानंतर आप्पांनी मुस्लिम धर्म, मुस्लिम चालीरीती, त्यांची आक्रमणे, भारतात आणि भारताबाहेर घडविलेला विध्वंस यांचा अभ्यास सुरू केलेला असतो. यावर आधारित एक गंभीर पुस्तक लिहायचा त्यांचा निर्धार असतो, पण त्यांच्या मृत्यूने ते काम अधुरे राहिलेले असते. वडिलांनी जमविलेली पुस्तके आणि त्यांनी काढलेली टिपणे यांच्या सहाय्याने ते अधुरे काम पूर्ण करण्याचे लक्ष्मी ठरवते. ही कादंबरीतील कादंबरी फारच अप्रतिम आहे. ती स्वत: वाचण्याचा आनंद प्रत्येकाने घेतलाच पाहिजे.

दरम्यानच्या काळात आमीर रझियापासून मानसिकदृष्ट्या दूर होऊ लागतो. या वयात तो एका कोवळ्या मुस्लिम मुलीशी निकाह करतो. दरम्यान प्राध्यापक शास्त्री यांच्या आईचे निधन होते. या काळातील पुरोगामी म्हणवून घेणारे प्राध्यापक शास्त्री आणि आधुनिक विचारांचा बुरखा पांघरणारा आमीर यांचे चित्रण खूपच प्रत्ययकारी झाले आहे. या पात्रांचे वर्तन वाचताना आजच्या समाजातील ढोंगी पुरोगामी विचारवंत-लेखक आपसूकच डोळ्यांसमोर तरळू लागतात. सध्याचे वास्तवच अत्यंत अचूकपणे लेखकाने या पात्रांच्या माध्यमातून समोर आणले आहे.

याच काळात इतिहास पुनर्लेखनाविषयी प्रा. शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली सरकारकडून एका परिषदेचे आयोजन करण्यात येते. या परिषदेला रझियालाही आमंत्रण असते. मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा इतिहास पुढे रेटण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा रझिया पुराव्यानिशी या गोष्टीला विरोध करते. शास्त्रींसाठी ही घटना अनपेक्षित असते. पुढील परिषदेसाठी रझियाचा पत्ता कट होतो. कादंबरीतला हा भाग देशातील विविध विद्यापीठांतील विचारवंत म्हणवून घेणाऱ्यांचे चारित्र्य उघडे पाडणारा आहे. इतिहासाचे पुनर्लेखन, भगवेकरण आदी वारंवार चर्चेत येणाऱ्या वादांमागील सत्य समजून घेण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांनी हा भाग आवर्जून वाचलाच पाहिजे.

 स्वत:ला निधर्मी, सेक्युलर समजणारे विचारवंतांचे खरे स्वरूप अतिशय जिवतंरीत्या कादंबरीच्या शेवटच्या भागात साकारले आहे.

लक्ष्मीच्या कादंबरीतील नायक रजपूत राजपुत्र आहे. युद्धात पराभव झाल्याने त्याला गुलाम म्हणून राहावे लागते आहे. त्याचे बीज फोडून त्याला खोजा (हिजडा) म्हणून जनानखान्यात ठेवलेलं असतं. हा आता इस्लामच्या प्रभावाखाली आलेला असतो. या खोजाच्या माध्यमातून लक्ष्मीची कादंबरी उलगडत जाते. या राजपुत्राच्या वाट्याला काय काय येतं? काशी विश्वनाथाचे मंदिर उद्‌ध्वस्त होतानाचा प्रसंग, गंगेच्या किनारी भेटलेल्या साधूशी संवाद आणि त्यातून त्याच्या मनाला आलेली उभारी हे सारं  कादंबरीतच चित्रमय होत... आपल्या समोरच ते प्रसंग घडत आहेत असं जाणवत.

खोजा झालेला  राजपुत्र छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने स्वातंत्र्याचा बिगुल वाजविणाऱ्या छत्रसालाकडे जायला निघतो आणि रझियाच्या कादंबरीचा शेवट होतो, पण त्या कादंबरीच्या प्रकाशनानंतर उठलेला हलकल्लोळ, वेगाने घडणाऱ्या घडामोडी "आवरण'च्या शेवटच्या भागात रेखाटल्या आहे. आवरणमधील रझियाच्या कादंबरीला जो विरोध झाल्याचे आवरणमध्ये वर्णन आले आहे... तसाच विरोध आवरणला होताना दिसत आहे. कादंबरीकाराचे हे यशच म्हटले पाहिजे.

आवरणमधील रझियाच्या कादंबरीवर सरकार बंदी घालते, तेव्हा आमीरही रझियाच्या मदतील धावून येतो. कारण रझियाच्या कादंबरीने त्याचे डोळे उघडतात. रझियाने आपल्या कादंबरी लेखनासाठी ज्या इतिहास ग्रंथांचा आधार घेतलेला असतो, ती संदर्भग्रंथांची यादी न्यायालयीन लढ्यासाठी घेण्यात येते. १३६ ग्रंथांची सूची बनवून त्या आधारे कादंबरीवरील बंदी विरोधात न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार लक्ष्मी आणि आमीर करतात आणि येथे आवरण कादंबरी समाप्त होते.

डॉ. भैरप्पा यांची लेखनशैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. कादंबरीतील वर्तमान संदर्भ खूपच बोलके आणि जिवंत आहेत. गिरीश कर्नाड, यू.आर. अनंतमूर्ती आदी विचारवंत आणि साहित्यिक मंडळींचे ढोंग उघड करणारी काही पात्रे कादंबरीत अतिशय जिवंतपणे साकारली आहेत. काहीजणांना वाटते की, कादंबरीतील प्राध्यापक शास्त्री हे पात्र यू. आर. अनंतमूर्ती यांच्यावरच आधारलेले आहे. धर्मनिरपेक्षता, पुरोगामी, आधुनिक विचारांचे म्हणवून घेणारी ही मंडळी सत्याचा अपलाप कशा रीतीने करतात, हे "आवरण'मधून अतिशय खुबीने व प्रभावीपणे मांडले आहे. 

 भारतीयत्व, भारतीय संस्कृती विशेषतः हिंदू जीवन पद्धतीचा अभिमान भैरप्पा यांच्या लेखणीतून झळकतो... त्यामुळेच सेक्युलर टोळी, धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी लोकांचे कळप "आवरण" वर  किंबहुना त्यांच्या साहित्यावर तुटून पडताना दिसत आहे. 

"आवरण'मधील भूमिका आणि वास्तव १३६ ग्रंथांच्या आधारे संदर्भपृष्ठांसह मांडल्याने सेक्युलरांच्या टीकेला वेगळे उत्तर देण्याची आवश्यकताच राहिलेली नाही, यात डॉ. भैरप्पा यांचा व्यासंग, अभ्यास आणि चातुर्य दिसून येते. मोजक्या शब्दांत मोठा आणि मार्मिक आशय व्यक्त करण्याची लेखकाची शैली वाचकास चिंतनाला प्रेरित करते. 

पुढील काही उदाहरणे पाहा...

"विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला "आवरण' म्हणतात आणि असत्य बिंबविणाऱ्या कार्याला "विक्षेप' असे म्हटले जाते. व्यक्तिगत पातळीवर चालणाऱ्या या क्रियेला "अविद्या' आणि सामूहिक अथवा जागतिक पातळीवर चालणाऱ्या या क्रियेला "माया' म्हटलं जातं.''

 आपल्या व्यतिरिक्त इतर कुणाचीही आराधना करणाऱ्या भक्ताला तो सतत जाळणाऱ्या नरकात टाकून देतो. अशा प्रकारच्या देवाची निर्मिती करणारेही अशाच मत्सरी स्वभावाचे आहेत, असा याचा अर्थ नाही का होत? 

मी फक्त एकटा आहे, तिथे इतर कुणाला जागाच नाही, असं म्हणणारा; काम-क्रोध-मद-मत्सर असलेला देव निर्माण करणारा धर्म तरी कसला?''*

औरंगजेब १७०७ साली वारला. त्या नंतर त्याचा शेवटचा मुख्याधिकारी हिनायतुल्ला खान याच्या आज्ञेवरून काश्मिरच्या साकी मुश्ताक खान यानं त्याचा आवडता बादशाह औरंगजेब याचा इतिहास लिहिला आहे. दरबारात असलेल्या पुराव्याशिवाय त्यानं एकही वाक्य लिहिलेलं नाही. त्या ग्रंथाचं नाव आहे "मासिर ई आलमगीरी."  "बादशहाच्या आज्ञेनुसार त्याच्या अधिकाऱ्यांनी काशीच विश्वनाथ देवालय नष्ट केलं" अशी वर्दी आली. अशी त्यात स्पष्टपणे नोंद आहे. १६७० साली रमजान महिन्यात पवित्र कर्तव्य म्हणून मथुरेच देवालय नष्ट करावं, असा औरंगजेबाने हुकूम केला. त्याच जागी मोठी मशीद उभारली... असं त्याचं पुस्तकाच्या पुढच्या प्रकरणात लिहिलं आहे.

बादशहाच्या बाराव्या वर्षी विश्वनाथ देवालयाचा नाश झाला आणि मथूरेच  देवालय तेराव्या वर्षी पाडण्यात आलं.

औरंगजेबानं विश्वनाथ मंदिराचा विद्‌ध्वंस करून त्या जागी उभारलेल्या मशिदीचं, काटेरी कुंपण बांधून आता सशस्त्र सैनिक रक्षण करताहेत.'*

"मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्याशी नातं जोडून "आपण त्यांचेच वारसदार' या भावनेत आपण अडकणार असू तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारीही स्वीकारावी लागेल.''

यातूनच इतिहासातील जळजळीत सत्य समोर येत आणि त्याला झाकोळून कट्टरपंथी मुस्लिमांचे लांगुलाचन करणारे डावे पुरोगामी यांचा बुरखा टराटर फाटून जातो...

आधुनिक शिक्षणाशिवाय कुणाचीही बुद्धी प्रखर होणार नाही... पण आधुनिक शिक्षण घेतलेली स्त्री समानतेची मागणी करणार... केवळ आर्थिक, सामाजिक आणि सहजीवनात नव्हे तर धार्मिक पातळीवरही !... मग ती प्रश्न ही उपस्थित करू शकते... देव पुरुषच का असला पाहिजे ?  स्त्री का असू नये ? हिंदू धर्मात पुरुष देवतांइतक्याच स्त्री देवता आहेत... पुरुष देवतांपेक्षा त्या अधिक शक्तिशाली ही आहेत... सगळे देव दुर्गेला शरण जातात... महिषासुरासारख्या राक्षसाला ठार मारण्याची शक्ती तिला आहे... मुस्लिम धर्माच्या स्थापनेआधी अरेबियामध्ये ही अनेक स्त्री दैवतं होती... प्रवादी(स) यांनी त्यांच्यावर बंदी घालत अल्लाह नावाच्या पुरुष दैवताला तेवढं शिल्लक ठेवलं... एखाद्या स्त्री दैवताला का शिल्लक ठेवलं नाही ? दैवताच्या पुरूष रुपाच अस्तित्व या स्त्री देवतेवर आधारित आहे... राणी मधामाशीची सेवा करणाऱ्या कष्टकरी मधमाशांसारखं !  जिज्ञासा अध्यात्मिक पातळीवर पोहोचली की प्रत्येक स्त्रीवादी व्यक्ती अशाप्रकारे वेदांती होते... शिवाय स्त्री आणि पुरुष हा भेद केवळ प्रकृतीच्या पातळीवरचा आहे. आत्म्याच्या पातळीवर पोहोचलं तर लिंगभेद नाही... परमतत्व असलेलं ब्रम्ह स्त्री ही नाही आणि पुरुष ही नाही. असंच वेदांत ही मानतो.. 

इतिहासातील सत्य उघड्या डोळ्यांनी जाणून घेऊन स्विकारल्याशिवाय इतिहासातून धडाही मिळत नाही...

दलित आणि मागासलेल्या समाजाला आरक्षण उपलब्ध करून देऊन, त्याच्याशी अपमानास्पद वागणाऱ्यांना योग्य ती शिक्षा करून त्यांना देवळात प्रवेश देऊनच नव्हे तर पुजारी म्हणून नेमणूक करत सगळा समाज ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करतोय ना? अशा प्रकारे सुधारणा घडवून आणण्याची संधी मुस्लिम समाजात का उपलब्ध करून देत नाही? आणि सुधारणा व्हायच्या असतील तर आधी चुकांची जाणीव व्हायला नको का? इतिहासाचे सत्य दर्शन झाल्याशिवाय या सुधारणा कशा होतील...?

तुम्ही म्हणताय तसे मुस्लिम राजे बादशहा वागले ते खरंय अस मान्य केल, तरी त्या कारणासाठी आजच्या मुस्लिम बांधवांचा द्वेष करून समाजातलं वातावरण कलुषित करून राष्ट्रच काय हित साधणार आहे?  एका पुरोगाम्यांच्या प्रश्नावर डॉ. भैरप्पा म्हणतात...

"कुणाचा तिरस्कार करणं, हेटाळणी करणं, मन कलुषित करणं हा इतिहासाचा उद्देश कधीच नसतो. असता कामा नये. आपल्या आधी होऊन गेलेल्या चुका डोळसपणे समजाऊन घेऊन आपण आजचं जीवन शक्यतो, निदान त्या दोषापासून तरी मुक्त करून घेतलं पाहिजे. म्हणूनच ऐतिहासिक सत्याला कुठलाही रंग न देता, थेट त्याकडे  पाहण्याचा प्रामाणिकपणा हवा. पण तुम्ही त्यांना तशी संधीच देत नाही. मागे होऊन गेलेल्या मुस्लिम राजांच्या  वागणूकीला आजचे मुस्लिम जबाबदार नाहीत,  हे खर आहे. पण आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुकांची प्रांजळपणे जाणीव करून घेऊन त्यांच्या चुकांची जबाबदारी नाकारायची असेल तर याचा अर्थ, आपण चुकांच समर्थन करतो, असाच होतो. 

अगदी अलिकडच्या काळात कोरियामध्ये आपल्या लोकांनी केलेल्या अन्यायाची जबाबदारी जपाननं स्वीकारली, याचा अर्थ काय? नाझींनी मानवते विरुद्ध जी हीन कृत्यं केली, त्यासाठी जर्मन माणसांनी पश्चाताप व्यक्त करून, यानंतर कधीही अशा घटना घडणार नाही, अशी शपथ घेतली नाही का? 

भारतीय मुस्लिम समाजाला अशा नैतिकतेशी विस्तार पावण्याची तुम्ही संधीच देत नाही. इतिहासातील सत्याचा प्रामाणिकपणे स्वीकार करण्याचं धैर्य असेल तर आपण पुन्हा त्या ऐतिहासिक चुका करणार नाही. आपणही त्यांना त्यासाठी मदत केली तर समाजातील भातृत्व, एकता यासारखे राष्ट्रीय ऐक्यासाठी आवश्यक असलेले गुण अधिक दृढ होतील आणि राष्ट्राच्या ऐक्याचा पाया अधिक भक्कम होईल, असं नाही का वाटत?"

सर्वजण समान आहोत, या तत्त्वाचा स्वीकार करून आपण आपल्या देशाचं संविधान लिहिलं नाही का? त्याच प्रमाणे परधर्माचा द्वेष करत स्वतःच्या प्रेषितानं सांगितलेला धर्म श्रेष्ठ मानून, आपल्या धर्मात न येणाऱ्यांना ठार करा असं सांगणाऱ्यांच्या मनोभावनांचा तिरस्कार करून "एकं सत् विप्रा: बहुदा वदंति" हे तत्त्व सगळ्यांवर कठोरपणे लादल्याशिवाय आपण ऐक्याच्या गोष्टी केल्या, तर त्या पोकळ ठरणार नाहीत का? 

डॉ. भैरप्पा यांनी "धर्मप्रसाराच्या कामासाठी जिहाद" केल्यावर स्वर्गात काय काय मिळतं याच अतिशय मार्मिक आणि अभ्यासपूर्ण वर्णन केलं आहे...

दूध आणि मध यांनी भरलेलं सरोवर... ऊन नाही आणि थंडीही नाही, अशी हवा असलेलं उद्यान. म्हणाल तेथे घेऊन जाणारे घोडे. रेलून बसायला सुखासन. टपोऱ्या मोत्यासारख्या तेजस्वी विशाल डोळ्यांच्या युवती, त्या ही कशा ठाऊक आहेत? कोवळ्या आकर्षक स्तनाच्या, अक्षत योनीच्या चिरयौवना. त्यांचं नाव ह्युरी. त्यांचं शरीर पारदर्शक असतं. त्यातून आतली हाडं हिऱ्या माणकातल्या रेषांसारखी दिसतात. सर्वसाधारण स्त्रीला असणारा विटाळ, गरोदरपण, बाळंतपण, एव्हढच काय, अत्यंत नैसर्गिक अशा मलमुत्रादी क्रियापासून दूर अशा अतिशुद्ध स्त्रिया असतात. आपला पती म्हणून स्वीकार केल्यावर पतीबद्दल सदैव कृतज्ञ असणाऱ्या; परपुरूषाकडे नजरही वर करून न पाहणाऱ्या स्त्रिया असतात. मुख्य म्हणजे या स्त्रियांचं वय कधीच वाढत नाही. जिहाद करून स्वर्गात प्रवेश केलेल्या प्रत्येक पुरुषाला अशा बहात्तर ह्यूरी मिळतात. त्यानं कुठल्याही वयात प्रवेश केला तरी त्याचं वय तीस वर्षाचं होत. त्यानंतर त्याच वय वाढत नाही. शिवाय शंभर पुरुषांइतकं पुरुषत्व लाभत. तसेच प्रत्येकासाठी हिऱ्यांनी बांधलेला राजवाडा आणि नऊ हजार गुलाम दिमतीला असतात.

हे वाचल्यावर बहात्तर ह्युरी म्हणजे काय याचा अर्थ प्रथमच कळला.

डॉ. भैरप्पा यांनी टिपू बद्दल केलेलं संशोधन टिपूच्या धर्मांधतेवर प्रकाश टाकते...

टिपू स्वतःच्या हस्ताक्षरात फारसी भाषेत चोपडी लिहून ठेवायचा. त्याबद्दल त्याने आयुष्यभर गोपनीयता बाळगली होती. कर्नल विल्यम कर्क पॅट्रिक याला ती  हस्तलिखित श्रीरंगपट्टणच्या राजवाड्यात शौचालयात सापडली. टिपूचा अत्यंत विश्वासू सेवक हाबिबउल्ला यानं ती ओळखली आणि ते हस्ताक्षर टिपूचंच‌ असल्याची खातरजमा केली. त्याची मुळ प्रत आणि इंग्लिश अनुवाद लंडनमधील इंडिया ऑफिस मध्ये आहे.

ती वाचल्यावर टिपू किती धर्मांध होता, याची अधिकच खात्री पटते. त्यात तो हिंदूंचा उल्लेख "काफर" असा करतो. इंग्लिश लोकांचा उल्लेख क्रिस्त असा करतो. लांबलचक दाढीवाले मुल्ला त्याच्या स्वप्नात वरचेवर येतात. प्रवादी महंमदानी टिपूला सोडून मी स्वर्गात पाऊल ठेवणार नाही, असं सांगितलं; असं एक लांब दाढीवाला सांगतो. मुस्लिम नसलेल्या सगळ्यांना मुस्लिम आणि सगळी मुस्लिमेतर राज्य मुस्लिम करण्याचं स्वप्न तो पाहतो. 

या छोट्या चोपडीत भारताच्या अधूनुकीकरणाचा सूक्ष्मसा धागा शोधूनही सापडत नाही. आपल्या मार्गातला मोठा काटा ब्रिटिश यांना पळवून लावण्याची तीव्र इच्छा तो यात वरचेवर व्यक्त करतो. या एका कारणासाठी त्याला आधुनिक जाती विरोधक आणि भारतीय तंत्रज्ञानाचा पितामह म्हणून चोपडीचा आधार घेणं कसं शक्य आहे? या प्रश्नाचं उत्तर बौद्धिक कसोटी मानणाऱ्यांना देता येत नाही.

मलबार आणि कोडगु येथील हिंदूंचं जबरदस्तीनं धर्मांतर करणाऱ्या टिपूनं म्हैसूर प्रांतात हे धैर्य दाखवलेलं दिसत नाही. १९७१ मध्ये ब्रिटिशांशी मोठ युद्ध झालं, टिपू हरला. ब्रिटिशांना फार मोठ्या प्रमाणात संपत्ती आणि दोन मुलांना युद्धकैदी म्हणून सुपूर्द केल्यानंतर शृंगेरी मठाला भेटवस्तू देऊन त्यानं हिंदूंच्या मताला गोंजरण्याचा प्रयत्न केला, या घटनेचा उपयोग करून आजचे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणारे टिपूलाही धर्मसहिष्णू म्हणताहेत.

अफगाणचा राजा जमानशाहला आणि तुर्कस्तानच्या खलिफाला भारतावर आक्रमण करून संपूर्ण देश इस्लाममय करा, असं पत्र टिपून लिहिलं होत.

 १७९६ साली म्हैसूरचा राजवाडा त्यानं लुटला, तेव्हा तिथल्या ग्रंथालयातील अमूल्य ग्रंथ, ताडपत्रवरील हस्तलिखित जळण म्हणून वापरायची आज्ञा दिली होती. मलबारचे मुसलमान मल्याळम भाषा, तमिळनाडूचे मुसलमान आजही तमिळ भाषा बोलतात. पण म्हैसूरचे मुसलमान आजही उर्दू बोलतात. कन्नड बोलायला लिहायला नकार देतात, ते टिपूनं सुरू केलेल्या उर्दू फारसी शिक्षणाच्या  पद्धतीमुळे ! आपल्या हिंदू सेनाधिकाऱ्यांना पकडून त्यांचं धर्मांतर करायची सूचना देणारी, टिपूची कितीतरी पत्र आजही आपल्याला वाचायला मिळतील.

त्याच क्रौर्य, इतर धर्मांवराचा  त्याचा द्वेष आणि या प्रदेशातील मूळ रहिवाशां विषयी असलेला तिरस्कार यां सारख्या शेकडो घटनांची पुराव्यानिशी नोंद आहे.

इतिहासात झालेल्या अन्याय, जुलूम जबरदस्ती, दहशतवाद आणि त्या अनुषंगाने झालेले धर्मांतरण मान्य करून अशा चुका  पुन्हा  होणार नाहीत... याची खबरदारी घेणे... या साठीच इतिहासाचे सत्य स्वरूप सर्वांना आकलन होणे आवश्यक आहे...

डॉ भैरप्पा यांचे हे अभ्यासपूर्ण संशोधन डोक्याला झिनझिण्या आणतं... या कादंबरीत डॉ भैरप्पा यांनी अभ्यासलेल्या १३६ ग्रंथांची यादी दिली आहे... त्यामुळेच आवरण ही कादंबरी सत्यावर आधारलेली आणि इतिहासावर जळजळीत प्रकाश टाकणारी ठरली आहे...

ही कादंबरी वाचून... पुढच्या पिढीला सुद्धा हा सत्य  इतिहास अवगत करून देणं... हेच आपले परम कर्तव्य आहे...

मंगल हो !!!

 






Tuesday, September 19, 2023

जपणूक छंदाची

जपणूक छंदाची

आजच्या काळात प्रत्येकाचं जीवन इतकं धकाधकीचं आणि धावपळीच झालंय की कधी कधी श्वास  घ्यायला ही उसंत नाही असे वाटते... परंतु आपल्या जीवनात असलेले छंद कसोशीने जपले... तसेच छंद जोपासण्यासाठी नवनवीन ठिकाणी भ्रमंती केली की नव्या तजेल्याने... ऊर्जेने आपण नेहमीच्या जीवनात परतू शकतो..


असच काहीसं जाणवलं ज्योतिबा दख्खन हील मॅरेथॉनमध्ये.... नियमित सायकलिंग करणे हा माझा छंद... परंतु नवनीत आणि निलेश या सायकलिस्ट मित्रांच्या मॅरेथॉन प्रेमाने मला धावण्यासाठी उद्युक्त केले... 

 आज पहाटेलाच कारने ज्योतिबा डोंगराकडे निघालो... घाट सुरु झाला आणि धुक्याच्या लाटा अंगावर येऊ लागल्या... गाडीच्या लाईटच्या प्रकाशात पुढील पाच फुटावराचे पण दिसत नव्हते...सकाळचं झुंजुमुंजू झालं होत... पण कुंद वातावरणामुळे पहाटेच्या उजेडाचे कवडसे सुद्धा घुरकट झाले होते...

उजाडलं...  अन् ज्योतिबाच्या पायथ्याचा प्रदेश झाडाझुडपातूनी शेतांनी भरलेला असल्यामुळे मोर शिंपी, बुलबुल, खंड्या यांचा किलबिलाट कानावर पडत  होता... सुखद गारवा आणि पावसाच्या शिडकाव्यासह जागोजागी वाहणारे ओहळ... हिच तर निसर्गाची नयनरम्य देणगी होती...

PWD मैदानात पोहोचलो. तेथे मॅरेथॉनची जोरदार तयारी सुरू होती. थोड्याच वेळात वॉर्मअप झुंबा सुरू झाला...  झुंबावर डान्स करणे... म्हणजे संपूर्ण बॉडी रिलॅक्स करणे होते...

प्रथम २१ आणि १५ किमी  मॅरेथॉन सुरू झाली... त्याच्या पाठोपाठ पंधरा मिनिटांनी ५ आणि १०  किमी मॅरेथॉन सुरू झाली... दाट धुक्यात धावणे... एक पर्वणी होती... त्या कुंद वातावरणात ज्योतिबाचा डोंगर अडीच किमी खाली उतरत निघालो... सोबत नवनीत आणि निलेश होता... 

सुरुवातीलाच नवनीतने आघाडी घेतली... पाठोपाठ निलेश सुद्धा पुढे गेला... खूप वर्षांनी उतारावर धावत असल्यामुळे गुढग्यावर  प्रेशर येत होते म्हणून पुढच्या चौड्यावर भार देऊन धावत होतो... थोड्याच वेळात रिदम मिळाला... आणि पळण्याचा वेग वाढला... हळूच निलेशला ओव्हरटेक केलं... अडीच किमी वळणावर निलेशने मला गाठलं... तेथे केळ आणि पाणी घेतलं... 

आता चढाकडे धावणे सुरू झाले... बऱ्यापैकी उजाडले होते... त्यामुळे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या माणसांची वर्दळ तसेच  गाड्यांची रहदारी वाढली होती... चढावर धावण्याचा वेग बऱ्यापैकी कमी झाला होता... परंतु एका रिदमने  धावल्यामुळे दम लागत नव्हता...  बरोबर सव्वा तासात पाच किमी धावणे पूर्ण झाले होते...


पाठोपाठ निलेश ही आला... नवनीतने तर एका तासाच्या आतच मॅरेथॉन पूर्ण केली होती...

मेडल मिळाले... सोबत उपिट सह कांदापोहे आणि चहाची न्याहरी मिळाली... फोटो सेशन पाठोपाठ रिलॅक्ससाठी झुम्बा सुरू झाला...  पंधरा वीस मिनिटे अक्षरश: नाचलो...  झुंबा प्रकार एकदम भावला...  

या मॅरेथॉनचे गोड फलित म्हणजे... सातारा, इंदापूर, सांगलीच्या धावपटूंच्या ओळखी होणे... विशेष म्हणजे त्यातील बरेच धावपटू सायकलिस्ट पण होते... सायकल सोबत क्रॉस ट्रेनिंग म्हणून सुरू केलेले मॅरेथॉन धावणे अगणित आनंददायी होते... एक नवा अध्याय सुरू झाला आहे... मित्रांच्या संगतीने...

मंगल हो... !!!


Friday, September 15, 2023

*प्रयत्नांची पराकाष्ठा... एकवीरा राईड...*


प्रयत्नांची पराकाष्ठा... एकवीरा राईड...

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे... या उक्तीचा पुरेपूर अनुभव आज घेतला... उत्तराखंड हिमालयात या महिना अखेरीस सायकल राईडसाठी जातोय... हिमालयात दहा हजार फुटांवर सायकल चालविणे... हे एक वेगळे चॅलेंज असते... त्याचे मुख्य कारण म्हणजे प्राणवायूची असणारी कमतरता... त्यासाठीच आज नॉन स्टॉप खंडाळ्याच्या घाट चढण्याचे चॅलेंज स्वीकारले होते... सोबतीला विजय आणि नवनीत सुद्धा होते... पुढील काळात त्यांची सुद्धा हिमालय राईड साठी तयारी कारणासाठी आज त्यांची ट्रेनिंग होती...

सकाळी खोपोली मध्ये मटकीची उसळ, विजयने आणलेली तांदळाची भाकरी आणि केळे असा जोरदार नाष्टा केला... त्या नंतर बरोबर आठ वाजता खंडाळ्याच्या बोरघाट चढाची सुरुवात करतानाचा... दोघांनाही टास्क दिले... आज शिंगरोबा मंदिराजवळ स्टॉप नाही... सलग न थांबता संपूर्ण घाट चढायचा आहे... सीट वरून खाली उतरायचे नाही... की सायकल थांबवायची नाही... स्वतःच्या मनाशी अधिष्ठान करा... निग्रह करा... आणि राईड सुरू करा... 

आजचे टास्क तसे खडतर होते... शरीराचा आणि मनाचा कस लावणारे होते... खोपोलीच्या मुख्य रस्त्यापासून एकदम चढाला सुरुवात होते... अतिशय निर्धाराने आणि एका विशिष्ट गतीने तिघांची राईड सुरू झाली... विजय आणि नवनीतने मला फॉलो करायचे ठरविले होते... सुरुवातीलाच  वळणाचे दोन अवघड चढ लागले... त्यात मागून गाड्यांची रहदारी सुध्दा होती... एकमेकांना ओव्हरटेक करणाऱ्या गाड्यांना सांभाळत सायकलचे पेडल सतत चालू ठेवणे... हे एक मोठे दिव्य होते... कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन... न डगमगता मार्गक्रमण करायचे होते... अशा वेळी चित्त स्थिर ठेऊन... कोणतेही नकारात्मक विचार मनावर स्वार होणार नाहीत... हेच सांभाळायचे असते... त्या मुळेच अतिशय संथ गतीने परंतु दमदारपणे सायकलिंग सुरू होते...  

सकाळच्या वातावरणात दमटपणा होता... त्यामुळे थोड्याच वेळातच घामाच्या धारा वाहू लागल्या... कपाळावरचा घाम भुवयामधून डोळ्यावर उतरू पाहत होता... चष्मा आणि हेल्मेट डोक्यात असल्यामुळे  घाम पुसणे सुध्दा अवघड झाले होते... परंतु जेव्हा मनापासून निग्रहाने आपण एखाद काम हाती घेतो तेंव्हा निसर्ग सुद्धा आपणाला मदत करतो... वाऱ्याच्या एका जोरदार झुळकिने सायकलच्या दांडीला रुमाल लावला आहे याची जाणीव करून दिली... एका हाताने सायकल सावरत... रुमालाने कपाळावरचा सर्व घाम पुसून काढला...

शिंगारोबाचा टप्पा आवाक्यात दिसू लागला... नेहमीचा हायड्रेशन पॉइंट... मंदिराचे पुजारी थांबण्यासाठी हात करत होते... परंतु त्यांना टाटा करून... दमदारपणे आम्ही तिघांनी ही पुढे प्रस्थान केले... पुढची दोन हेअर पिन वळण आणि खडी चढण... आमची परीक्षा घेणारी होती... गियर एक - एक करून सुद्धा झिकझ्याक करण्याशिवाय गत्यंतर नव्हते... वळणावर खालून चढणाऱ्या गाड्या लांबून वळण घेत असल्यामुळे... त्या गाड्यांच्या मागील भागापासून सावध राहून पेडलींग करणे... अतिशय कसबीच काम होत... चढावर दमछाक झाली असेल तर सायकलचे हॅण्डल सुद्धा डगमगू लागते... अशा वेळी सायकलचा तोल सांभाळणे सुद्दा जिकरीचे होते... मानसिक बळ आणि लक्ष गाठण्याचा दृढ निश्चय हेच अशा प्रसंगातून तारून नेऊ शकते...

अमृतांजन पुलावर पोहोचलो... उजव्या बाजूला नागफणी कडा आमच्या स्वागताला उभा होता... कड्यावराचे वातावरण एकदम हिरवेगार होते... या ठिकाणी खंडाळ्याचा थंडावा जाणवू लागला... वाहणाऱ्या घामाच्या धारांना ही थंडी सुखावत होती... आता शेवटची  दोन चढाची वळणे शिल्लक होती... प्रचंड दमछाक झाली होती... पण मन अतिशय कणखर होते... दमदारपणे आणि  संथ गतीने शेवटचा टप्पा सुरू झाला... पहिले वळण पार केले आणि नवनीतच्या अंगात विद्युल्लता संचारली... तो भराभर पेडल मारू लागला... त्याच्या पाठोपाठ विजय सुद्धा जोशात आला... दोघांनी हा हा म्हणता  वाघजाई मंदिर गाठले... मागोमाग माझा निश्चय सुद्धा तडीस गेला होता... तिघेही घामाने थबथबून गेले होते... 
एक संकल्प... एक अधिष्ठान पूर्ण झाले होते... 

बऱ्यापैकी विश्रांती घेऊन नारायणी धाममध्ये येऊन दुपारच्या जेवणाची कूपन काढली... आता पुढील नियोजन नवनीतकडे होते... 
एकवीरा आईचे दर्शन घेण्याअगोदर टोल प्लाझा ओलांडून वाघजाई गावाकडे वळलो... येथे एकवीरा आईच्या भावाचे... भैरव बाबाचे मंदिर आहे... मंदिरात निवांत दर्शन घेतले... हिरवाईने नटलेला अतिशय नितांत सुंदर परिसर आणि लांबच्या  डोंगरात दिसणारे एकवीरा आईचे मंदिर पाहून मन मोहून गेले... 

तेथल्या सायकल चालविणाऱ्या मुलांनी एकवीरा डोंगराकडे जाणारा शॉर्टकट रस्ता दाखविला... परंतु त्या रस्त्यावर खूप चिखल असल्यामुळे हायवे वरून कर्ल्या पर्यंत गेलो... एकवीरा आईच्या पहाडाच्या अर्ध्या रस्त्यावर गाड्या पार्किंगची व्यवस्था आहे... तेथे जाणारा रस्ता अतिशय तंग आणि खडी चढाईचा आहे... दोघांनाही या रस्त्यावरून सायकलिंगसाठी उद्युक्त करण्यासाठी मागे न पाहता कार्ला घाटात सायकल घातली... माझ्या मागे येण्याशिवाय विजय आणि नवनीत कडे पर्याय उरला नाही... आणि हो !!! दोघांनीही तो अतिशय कठीण कार्ला घाट बघता बघता पार केला... वर गाड्या पार्किंगमध्ये पोहोचल्यावर दोघांच्या चेहऱ्यावराचे तेज पाहण्यासारखे होते... जणूकाही हिमालय चढून गेल्याचा आनंद दोघांच्या देहबोलीतून जाणवत होता... 

प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यावर जे यश प्राप्त होते... त्याचा आनंद अवर्णनीय असतो... हेच या राईड ने सिद्ध केले होते...

एकवीरा आईच्या दर्शनाने पुन्हा ऊर्जा मिळाली... ती परतीच्या सायकलिंगसाठी...

मंगल हो... !!!