Thursday, November 30, 2023

टप‌ टप‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले....


टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले...

पारीजातक किंवा प्राजक्त... अतिशय नाजूक आणि आवडीचे फुल... मस्त सुगंध दरवळतोय वेचलेल्या हातामध्ये...

प्राजक्ताचे फुल इतके नाजुक की हळुवार स्पर्शानेही कोमेजून जाणारे... 

उन्हाचा ताप सहन करायला नको म्हणुनच  रात्री उमलणारे.... 

आज पहाटे फुलांनी बहरलेला प्राजक्त पाहिला...

हिरवळीवर पडलेला सडा...

जसा काही आकाशात  प्रकट झालेल्या असंख्य तारकांच...

पांढर्‍याशुभ्र पाकळ्या आणि केशरी रंगाचा देठ...  निसर्गाचा हा नाजुक अविष्कार...

एखाद्या सुंदर आणि मादक ललने सारखा...

प्राजक्त पाहिला की अलगद आठवतात त्या व. पु. काळे यांच्या ओळी...

पारीजातकाचं  क्षणभंगुर आयुष्य लाभलं तरी चालेल...

पण लयलुट करायाची ती सुगंधाचीच...

मंगेश पाडगावकरांची कविता तर हृदयातील अनमोल ठेवा आहे...

टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले 

भिर् भिर् भिर् भिर् त्या तालावर गाणे अमुचे जुळे !

कुरणावरती, झाडांखाली ऊन-सावली विणते जाळी...

येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले !

दुर दुर हे सूर वाहती उन्हात पिवळया पाहा नाहती...

हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !

गाणे अमुचे झुळ-झुळ वारा... गाणे अमुचे लुक-लुक तारा...

पाऊस, वारा, मोरिपसारा या गाण्यातुन फुले !

फुलांसारखे सर्व फुलारे... सुरात मिसळुनि सुर चलारे... 

गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे !

तसेच सुवर्णतुला संगीत नाटकातील विद्याधर गोखले यांचे  पद आठवले...

अंगणी पारिजात फुलला ।

बहर तयाला काय माझिया प्रीतीचा आला ॥

धुंद मधुर हा गंध पसरला

गमले मजला मुकुंद हसला

सहवासातुर मदिय मनाचा कणकण मोहरला ॥

सुनिताबाईंच्या "आहे मनोहर तरीही"  ग्रंथामधला प्रसंग आठवला...

पहाटे  सुनिताबाई प्राजक्ताची  फुले वेचत असताना पु.ल. नीं हळूच झाड हलविले आणि सुनिताबाईंवर प्राजक्ताचा वर्षाव झाला... 

प्रेमाला वय नसतं... हेच प्राजक्त सांगतो...

त्यामुळे बालपणीचा काळ आठवला आणि जुन्या मधुर आठवणी चाळवल्या...

माझा बालमित्र... सकाळी प्राजक्त वेचुन घरी आणताना हाताच्या उष्णतेने कोमेजतात... म्हणुन ही फुले आणण्यासाठी ओला रुमाल अंगणात घेऊन जायचा...आणि घरात आणल्यावर घंगाळ्यात पाणी घालुन त्यावर  प्राजक्त तरंगत ठेवायचा... त्यामुळे संपूर्ण दिवसभर प्राजक्ताचा मंद दरवळ घरात असायचा...

त्यामुळे नेहमी वाटायचे जिण असावं तर प्राजक्ता सारखं...

या संदर्भात आनंद चित्रपटातील डायलॉग आठवला...

बाबू मोषाय... जिंदगी बडी होनी चाहिए... लंबी नाही...

किती जगलास यापेक्षा कसा जगालास हेच महत्त्वाचे आहे...

प्राजक्तांच्या फूलाबाबत फार सुंदर कथा आहे...

 रुपनगरच्या राजकन्येचं सुर्यावर निरतिशय प्रेम होत... लग्नाच्या दिवशी सुर्यदेव मांडवात येत नाहीत...म्हणुन राजकन्या रुसून... रागावुन... धगधगत्या होमकुंडात स्वतःला झोकुन देते... 

तेथे प्रकट होते प्राजक्ताचे रोपटे...

सुर्यदेवावर राग म्हणुन हे प्राजक्ताचे फुल दिवसा फुलत नाही...

दिवस उजाडला आणि सूर्य देव आसमंतात वर येऊ लागला की प्राजक्त  कोमेजून जाते... 

परंतु पहाटेचा मंद सुगंधीत दरवळ तिच्या निस्सीम प्रेमाची साक्ष देतं राहते...

लहानपणी आजीच्या गावाला गेल्यावर  प्राजक्ताच्या फुलांच्या माळा हातात घालून लपंडाव खेळायचो... 

प्राजक्ताचे केशरी देठ चुरडले की सुगंधित केशरी रंगाने हात गंधित व्हायचे...

फुलांचा पाऊस पहायचा असेल तर पहाटे प्राजक्ताचं झाड हळुवार हलवायचं आणि त्या सड्यात न्हाऊन जायचं...

श्री कृष्ण आणि सत्यभामेची कथा सुद्धा प्रसिद्ध आहे...

श्री कृष्ण हे झाड स्वर्गातून पट्टराणी रुक्मिणीसाठी आणत असताना... वाटेत सत्यभामेन हट्ट धरला... प्राजक्त माझ्या अंगणातच लावायचा... तिच्या हट्टाखातर श्री कृष्णाने तिच्या अंगणात प्राजक्त लावला... 

रुक्मिणी रुसली... श्री कृष्ण हसला आणि म्हणाला... उद्या सकाळी माझ्याबरोबर अंगणात ये... प्राजक्ताचा सर्व सडा रुक्मिणीच्या अंगणात पडलेला होता... 

शाळेत मंदारमाला वृत्त शिकविताना गुरुजींनी वरील कथा सांगितली होती... या वृत्तात बावीस अक्षरे असतात.. तसेच त्याचे उदाहरण अजूनही लक्षात आहे...

मंदारमाला रमालाच लाभे उभा वृक्ष तो सत्यभामांगणी

पहाटेच्या प्राजक्ताने आठणींचा खजिना उघडला...  सर्वांना भरभरून वाटण्यासाठीच...

मंगल हो... !!!



6 comments:

  1. Sunder varnan...Apratim mandani

    ReplyDelete
  2. Ekdam dilchasp, satishrao manala bhawli

    ReplyDelete
  3. जांबोटकर सरांचे अभिप्राय...

    वा, फारच छान लिहिलं आहे. संपूर्ण लेखात प्राजक्ताच्या नाजूक फुलांचा आणि विविध काव्यांचा विलोभनीय सडा पाहत अलगद पावलांनी चालतांना दरवळणारा मंद सुगंध जाणवला. आनंद वाटला. असेच लिहीत रहा. वाचायला आवडेल.

    ReplyDelete
  4. सोगो मैत्रीण वर्षाचे अभिप्राय...
    अतिशय भावस्पर्शी आणि हृदयस्पर्शी आहे तुझे लिखाण, मला माहेरी घेऊन गेले ते, आमच्या घरी हे झाड होते, अनेक लोक येऊन झाड हलवून फुले घेऊन जायचे, माझा जीव टांगणीला लागायचा आपल्याला मिळतील की नाही, त्या आठवणी जाग्या झाल्या, प्राजक्ताच्या फुलांचा वर्षाव झाला, खूप खूप धन्यवाद,

    ReplyDelete
  5. मित्राचे अभिप्राय...

    एक नाजूक , सुवासित,सुंदर फूल ...
    पहाटे नजरेस पडले अन् मनाचा तळ ढवळून निघाला....
    किती आठवणी ,कविता ,गोष्टी ,कथा, बालपण यांची दिंडी निघाली...
    तिच्या दर्शनाने मन खूपच आनंदित झाले..
    असंच मनासारखं निसर्गसानिध्य लाभो आणि स्वतः आनंदित होऊन ब्लॉग द्वारे सर्वांना आनंद वाटत रहा...

    ReplyDelete
  6. फारच छान 🌿

    ReplyDelete