Wednesday, August 14, 2024

सुमडो ते न्योमा सायकल वारी... (लडाख उमलिंगला पास मधील सायकल सफर...) दि २१.०७.२०२४

सुमडो ते न्योमा सायकल वारी... 
(लडाख मधील सायकल वारी...)
दि २१ जुलै २०२४

आज सुमडो वरून सायकलिंग करत न्योमा गाठायचे होते... 


काल संजयने पूर्ण दिवस आराम केला... तरीही
संजयला आणखी ॲक्लमटाईज  होणे गरजेचे होते... त्यासाठी १५३०० फुटांवरून आणखी खाली जाणे आवश्यक होते... म्हणूनच त्याने ११५०० फुटांवरील लेहला जायचे नक्की केले... दोन दिवस आराम करून, ताजातवाना होऊन तो आम्हाला हानले येथे भेटून पुढची राईड करणार होता...

सकाळी त्याला ताबडतोब बलेरो जीपपण मिळाली... काल सो मोरिरी साठी असलेला ड्रायव्हर समदीन आज लेहला निघाला होता...  त्यामुळे संजयला लेहला जाणे एकदम सुलभ आणि अतिशय स्वस्त झाले... सायकलची दोन्ही चाके काढून सायकल जीपमध्ये ठेवली... आणि सामानासह संजयला लेहला रवाना केले... 

सकाळी नाष्टा करताना बॉईल अंड्याचे दोन भाग करायला... हॉटेलच्या मालकिणीने मोठा सुरा परेशच्या हातात दिला... जसं काही परेशला नारळ फोडायचा आहे


सुमडो वरून न्योमाकडे.... माहे ब्रीज पर्यंत पूर्णपणे उताराचा रस्ता होता... सोकर नदीच्या किनाऱ्याने पुढे पुढे जाणारा वळणावळणाचा अतिशय सुरेख रस्ता... परेशची मुलाखत घेण्यास अतिशय सुयोग्य होता... या लडाख वारी बद्दल परेशचे विचार ऐकून मन प्रसन्न झाले... 

मध्येच एक विहंगम लॅण्डस्केप लागले... खळखळत वाहणारी नदी, प्रसन्नतेने दाटलेली हिरवळ, सप्तरंगाने नटलेला हिमालय आणि पक्षांचा किलबिलाट... या निसर्गाच्या रंगात रंगून जाण्यासाठी सायकली रस्त्याच्या कडेला झोपवल्या... आणि झोकून दिले त्या वातावरणात...

परेशचे डोळे तर सौंदर्य टिपायला तत्पर असतात... याचे प्रत्यंतर आले... माहे गाव येई पर्यंत परेशने प्रचंड फोटोग्राफी केली होती... दोघांचेही कॅंडीड  फोटो सेशन सुरू होते... निसर्गाच्या रंगमंचावर... माहे ब्रीज पर्यंत सतरा किमी कधी पार केले कळलेच नाही... पेडलच मारावे लागले नाही... अक्षरश तरंगतच आलो होतो... 

माहे ब्रीज ओलांडल्यावर लेह ते हानले रस्त्यांवर आलो... पर्यावरण परमिट नोंद केले... या वेळी दोन महिला पोलीस अधिकारी होत्या... त्यांनी परमिट नोंद करून घेतले... आणि झेरॉक्स प्रत परत केली... गेल्या वेळी झेरॉक्स नसल्यामुळे दोन तास थांबावे लागले होते... बदलाचे वारे जाणवले...

माहे ब्रीज जवळ सोकर नदीचा संगम सिंधू नदी बरोबर झाला आहे...  

 न्योमाकडे जाणारा हा रस्ता दोन पदरी होता...  रेखीव आणि शिस्तबद्धपणा त्याच्या नसात भिनल्या सारखा वाटला... सतत धावणाऱ्या आर्मीच्या गाड्यांनी आपला वसा त्या रस्त्याला दिला असावा... येथून न्योमा वीस किमी अंतरावर होते... 

आता सिंधू नदीच्या उगमाच्या दिशेने जात होतो... त्यामुळे रोलिंग चढाचा रस्ता होता... या रस्त्याने येणाऱ्या प्रत्येक मोटारसायकल रायडर्सना टाटा करत होतो... आर्मीच्या गाड्यांना जयहिंद सॅल्युट मारत होतो... समोरून सुद्धा तसाच प्रतिसाद मिळत होता... क्षणभराची गाठ... आनंदाच्या स्फुलिंगाचे संक्रमण करत होते...

हा रस्ता BRO ने बनविला होता... त्याच्या पाऊलखुणा BRO च्या अतिशय मार्मिक अशा बोर्ड स्लोगन वरून कळत होते...
 
"If You are Married... Divorce Speed" तसेच " Safety on Road is Safe-Tea at Home. 


पुढे  मिलिटरीची मोठी गाडी ब्रेक डाऊन झाली होती... तिच्या रीपेरिंग साठी आर्मीची टीम आली होती...  देशाचे आणि आमचे संरक्षण करत असल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या... त्यांच्या बरोबर फोटो काढले..


तेवढ्यात मिलिटरीचा फोटोग्राफर तेथे आला... फोटोग्राफरचा पण फोटो काढला...  
पुढे एका ठिकाणी  चर  खणायचे काम करणाऱ्या जवानांनी थांबवून थंड पाणी पाजले...

त्यानंत सर्वसामान्यांसाठी आर्मिने स्नो लेपर्ड वॉटर पॉइंट लागला होता...
 

तेथील फौजी हरिओमने  गरम पाणी पाजले... आणि पुढील प्रवासासाठी सफरचंद ज्यूस आणि बदाम दिले...

छोटीसी घाटी लागली... टॉप पॉइंट वरून सिंधू नदीचे विशाल वळणदार पात्र मन मोहून गेले...


दोन्ही बाजूला डोंगर... त्यावर जमलेले पांढऱ्या शुभ्र ढगांचे पुंजके आणि शांतपणे वाहणारी सिंधू नदी... नदीच्या पाण्यात पडलेले ढगांचे प्रतिबिंब...  असे लोकेशन परेशसाठी पर्वणी होती...परेशने मग DSLR कॅमेरा काढून निवांत फोटोग्राफी केली... 

पुढे पंधरा किमी जवळ आर्मी हॉटेल लागले...त्याचे नाव सुद्धा वैशिट्यपूर्ण होते... "न्योमा रीब्स" हे हॉटेल सर्व सामान्यांसाठी उघडे होते... नाष्टा आणि जेवण अप्रतिम आणि माफक किमतीत होते...  विशेष म्हणजे येथील फर्निचर गाड्यांच्या टायर पासून बनविले होते... टायरपासून बनविलेली स्कूटर म्हणजे कल्पकतेची कमाल होती...
सर्वात मोठे घबाड म्हणजे येथे सणसणीत फ्री वायफाय उपलब्ध होते... माझी तर पर्वणी होती... पुढे फक्त पाच किमी जायचे असल्यामुळे तेथे दोन तास थांबून वायफायचा पुरेपूर उपयोग करून घेतला... 

 या ठिकाणी लडाख मध्ये फिरायला आलेले मुंबई पुण्याचे वरिष्ठ तरुण नागरिक भेटले... ठाण्याच्या जयश्री वझे ताई भेटल्या...
सर्वांबरोबर खुप गप्पा झाल्या...  जेव्हा महाराष्ट्रातील माणसे इतर प्रांतात भेटतात तेव्हा घरातील माणसे भेटल्याचा आनंद होतो...

याच कॅफेमध्ये सातारा आणि कराडचे जवान विश्वनाथ आणि सूरज यांची भेट झाली

तर बोरिवलीचा  कॅप्टन  अमित कुलकर्णी भेटला.  जवांनाच्या भेटी घेऊन त्यांना शुभेच्छा देणे... हा सुद्धा आमच्या  उपक्रमाचा भाग  होता...

पुढचे पाच किमी मस्त फोटोग्राफी करत... आणि रमतगमत पार केले... न्योमा मध्ये होम स्टे शोधत असताना सायकलिस्ट मित्र ममता परदेसीचा मेसेज वाचला... तिने उमलिंगला सर करताना न्योमामध्ये राहिलेल्या हॉटेलचे नाव दिले होते... त्यामुळे हॉटेल सहज मिळाले... येथे सुद्धा सेल्फ कंटेन रुमची वानवा आहे..

न्योमा खूप मोठे गाव आहे... येथे ATM ची सुविधा आहे. तसेच प्रत्येक धाब्यावर, दुकानात हॉट स्पॉटची सुविधा उपलब्ध आहे... गुरुपौर्णमेनिमित्त कोणत्याही हॉटेलमध्ये मासांहार उपलब्ध नव्हता... येथे एक महत्त्वाची गोष्ट कळली... प्रीपेड MTNL फोन वर इन्कमिंग फोनची सुविधा होती. आउट गोईंग फोन करता येत नव्हता...

पंजाबी धाब्यावर डाळ भात आणि बर्गर खाल्ला... त्यामुळे हॉट स्पॉटची सुविधा मिळाली होती...पांडेच्या बेकरीत पेस्ट्री खायला मिळाली...

 न्योमामध्ये सायंकाळी रक्तवर्णाने ओथंबलेले आकाश पाहताना मनात विचार आला आपली माणसे नॉर्दन लाईट पाहायला नॉर्वे किंवा फिनलंडला जातात... तसेच लडाख मधील ईस्टर्न लाईट पहायला पाश्चिमात्य लोकांना बोलावले पाहिजे...

 ही केसरी वर्णाची निसर्गाची किमया पाहताना तिरंग्याच्या शिरावर केसरी रंग का आहे याची जाणीव झाली..


वाऱ्याबरोबर आकाशातील रंग सुद्धा बदलत होते...  सुधारणांचे वारे केंद्रशासित लडाख मध्ये जोरात वहात आहेत याचेच हे द्योतक होते...

जय श्री राम...

8 comments:

  1. Sir, tusi gr8 ho❤️

    ReplyDelete
  2. It's really great Experience and we'll narrated.. You are truly inspiring us

    ReplyDelete
  3. मस्तच रे, अशा प्रकाश शोभा आणि विविधता आवडली मला

    ReplyDelete
  4. सतीश... मस्तच 👏👏👏

    ReplyDelete
  5. Paresh Yashwant PatilAugust 15, 2024 at 11:28 PM

    खूपचं सुंदर वर्णन केलं आहे.

    ReplyDelete
  6. Paresh Yashwant PatilAugust 15, 2024 at 11:28 PM

    खूपचं सुंदर वर्णन केलं आहे.

    ReplyDelete