दापोली सायक्लोथॉन... सीजन ७... एक सुखद आणि विलक्षण अनुभव...
दि. ११ मे २०२५
आनंद हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा पैलू आहे... परंतु सायकलिंगचा कल आजच्या काळात रेसिंगकडे वळलेला दिसतो... रेस म्हटली की स्पर्धा आली त्यामुळे हेच आनंदी वातावरण दूषित होते...
सायकलिंगचा मूळ उद्देश आहे.. फिटनेससह निसर्गाचा आनंद घेणे... आणि गवसलेला आनंद भरभरून वाटणे... याच संकल्पेवर आधारित आजची दापोली सिनिक सायक्लोथॉन होती...
दापोली सायकल क्लबने महाराष्ट्रातील प्रथितयश टुरिंग सायकलिस्टना आमंत्रित केले होते... ते याच कारणासाठी... दापोली परिसरातील निसर्गरम्य वातावरणाचा या सायकलिस्टनी आस्वाद घ्यावा आणि त्यांच्या जीवनात सायकलिंग मुळे निर्माण झालेला आनंद सर्वांना दिलखुलासपणे वाटावा... सर्व आमंत्रित रजिस्टर करून या निसर्गरम्य सायकल वारीत सामील झाले होते...
या राईड मध्ये पुण्याहून डॉ सुभाष कोकणे, निरुपमा भावे, जुगल राठी, राजू औटी, जयश्री जाधव, विजय हिंगे, रेखा राव आणि विद्याधर पालकर यांनी भाग घेतला होता... यातील सुभाष, राजू आणि विजय पुण्याहून सायकल चालवत दापोलीला पोहोचले होते... तर मुंबई ठाण्यातून जयप्रकाश परब, विठ्ठल चव्हाण आणि महेंद्र निकम सहभागी झाले होते... महेंद्र सुद्धा ठाण्याहून सायकलिंग करत आला होता...
दापोली सायकल क्लबच्या मदतीसाठी नयन, नारायण आणि अक्षय हे मुंबईचे प्रतिथयश सायकलिस्ट एक दिवस आधीच दापोलीत आले होते...
दापोली सायकल क्लबचे सर्व सदस्य पाहुण्यांच्या सुखसोईची आस्थेनं काळजी घेत होते... स्वतः अंबरीश गुरव सर्व आघाड्यांवर पुढे होता... परंतु प्रसिद्धी पासून लांब राहणारा अंबरीश पडद्यामागचा महान कलाकार होता...
सकाळी पाच वाजता निरुपमा आणि सुभाष यांनी या निसर्गरम्य वारीला झेंडा दाखवला... सुरुवातीला दापोली वरून हर्णे बंदराकडे उतरणारा रस्ता पहाटेच्या संधिप्रकाशात पार झाला आणि निसर्ग हॉटेल कडून वेडीवाकडी वळणे असणारा घाटाचा रस्ता सुरू झाला... घाट पार केल्यावर सिव्ह्यू पॉईंट लागला... तेथे निवांत फोटोग्राफी झाली...
त्या टेकडी वरून हर्णे गाव आणि विस्तीर्ण समुद्र किनारा डोळ्याचे पारणे फेडत होता...
सकाळच्या सूर्य किरणांनी न्हाऊन निघालेला समुद्र सुवर्णमय होऊन चमचमत होता... पुढे पंचतारांकित हॉटेल जवळील अगस्त्य ऋषीच्या (देव-दानव युद्धाच्या वेळी देवांशी वैर धरलेले कालकेय दानव हे समुद्राच्या तळाशी जाऊन लपल्यावर अगस्ती महर्षींनी अख्खा समुद्र ओंजळीत घेऊन पिऊन टाकला आणि कालकेयांना ठार मारले त्यामुळे देवांवरील संकट निवारले) भव्य पुतळ्यासमोर सुद्धा फोटोग्राफी झाली...
पुढचा भन्नाट उतार उतरताना कस लागत होता... दोन अतिशय शार्प टर्न वर मुंगीच्या गतीने सायकल उतरविणे भाग होते...
पुढे आंजर्ले पुलावर पोहोचलो... हा तर अतिशय निसर्गरम्य फोटो पॉईंट होता... अडखळ आणि आंजर्ले मधून वाहणाऱ्या आणि सागराला मिळणाऱ्या जोग नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर विसावलेल्या बोटी... आणि त्या वर फडफडणारे रंगीबेरंगी झेंडे उत्साहाची साक्ष देत होते...
जोरदार वाऱ्यामुळे उसळणाऱ्या पांढऱ्या लाटांवर बोटी डोलत होत्या... जणुकाही निसर्ग संगीताला साथ देत होत्या... दाटीवाटीने उभ्या असलेल्या बोटी समुद्र सफरीसाठी खुणावत होत्या... येथे सुद्धा भरपूर फोटो काढले...
आंजर्ले खाडी पुलाकडून परतीची सफर सुरू झाली... वाटेत प्रत्येक ठिकाणी हायड्रेशनची चोख सोय होती...
समुद्रकिनारी असणाऱ्या पाजपांढरी गावातील सुप्रसिद्ध राम मंदिराचे दर्शन घेऊन थेट हर्णे बंदरात आलो... समोर दिसणारा सुवर्णदुर्ग किल्ला छत्रपतींच्या पदाचिन्हांची आठवण करून देत होता... हर्णे बंदराच्या टोकाला ७७ वर्षीय जुगल राठीने मोठ्या दगडावर चढून अशा काही पोज दिल्या की तो हवेतच विहार करतोय... या वयात सुद्धा त्याच्याकडे असणारी सळसळती ऊर्जा मन मोहून गेली...
त्या नंतर हर्णे बंदरातील मासे बाजाराला भेट दिली... पंचक्रोशीतील जनतेने तुडुंब गर्दी केली होती या समुद्र किनाऱ्यावरील बाजारात... माशांची विक्री लिलाव पद्धतीने सुरू होती...
बाजारातून बाहेर पडून परतीची सफर सुरू झाली... आता दापोलीचा सहा किमीचा घाट चढायचा होता... वरिष्ठ तरुण निरुपमा आणि जुगल तो घाट आरामात चढले... राईडचा शेवटचा टप्पा पार केल्याबद्दल जुगलने सर्वांना कॉफी बिस्किटची ट्रीट दिली... आज जुगल भयंकर खुश होता...
तर निरुपमा समवेत प्रत्येक सायकलिस्ट फोटो काढायला धडपडत होता...
डॉ सुभाष,जयश्री, हेमा, राजू आणि विजय आंजर्ले येथील कड्यावरच्या गणपतीचे दर्शन घ्यायला गेले होते...
सायकल वारी शेवटच्या टप्प्यात आली पण पन्नास किमी पूर्ण झाले नव्हते म्हणून जुगल बरोबर दोन आंजर्ले सिटी लूप मारले... आणि पन्नास किमी अंतर पूर्ण झाले...
सर्वांना मेडल बरोबर सर्टीफिकेट मिळाली... तसेच साठ वर्षांवरील सर्व निमंत्रितांना सन्मानचिन्ह देण्यात आले...
कांदापोहे आणि बटाटावडा पाव हा नाश्ता श्रम परिहारासाठी पुरेसा होता...
या सायकल वारीत ७ वर्षाच्या विद्यार्थ्यांपासून ७७ वर्षाच्या वरिष्ठ तरुणांपर्यंत जवळपास शंभर सायकलिस्टचा सहभाग होता... शॉर्ट सिटी लूप मारणाऱ्या... सात वर्षाच्या श्वेत तांबेने सर्वांचे लक्ष आकर्षित केले होते...
सिनिक कोस्टल रूट सर्वांनी एन्जॉय करणे... हा दापोली सायकल क्लबचा... सायकल सफर भरविण्यामागचा मुख्य उद्देश होता... सर्वांना कोकणाच्या निसर्गरम्य परिसराची माहिती करून देणे... आणि निसर्ग पर्यटनासोबत सायकलिंग वाढविणे हा उद्देश पूर्णपणे सफल झाला होता...
सायकलिंग करताना निसर्गाचा परिपूर्ण आनंद घेणे तसेच चोखायचा आंबा, पांढरे जाम, लुसलुशीत घावणे, उकडीचे मोदक, कोकम सरबत यांचा आस्वाद घेण्याबरोबरच, निवांत फोटोग्राफी करणे हा लाभ सर्व सायकलिस्ट ना मिळाला...
दापोली सायकल क्लब तर्फे शॉर्ट सिटी लूप आणि फन राईड अशा प्रकारात सुद्धा सायकल सफर ठेवली होती... जवळपास २५० लहानथोर सायकलिस्टनी यात भाग घेतला होता... पाच किमी साठी रजिस्टर केलेल्या कित्येक मुलांनी चाळीस किमी सायकलिंग पूर्ण केले होते... याचे त्यांच्या पालकांना खूप आश्चर्य वाटत होते... मुलांना रोख रक्कम बक्षीस मिळाल्यामुळे ते जाम खुश होते...
दापोली सायकल क्लबने भरविलेल्या तीनही प्रकाराच्या सायकल सफरीला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे स्थानिकांमध्ये सायकल प्रेम वाढविणे आणि मुलांची अफाट ऊर्जा पालकांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश सफल झाला होता...
जय श्री राम
सतीश जाधव
7977690993
Great! Congratulations 👏👏👏
ReplyDeleteCongratulations to all the champions! Cycling is a beautiful experience.
ReplyDeleteसंर तुमच्या सायकल प्रेमाला आणि हुबेहूब प्रसंग लिखाणाला सलाम, great सर
ReplyDeleteमित्र जयप्रकाश याचे अभिप्राय...
ReplyDeleteDapoli cycling che Sundar varnan kele ahe. Tumchyamadla lekhak mi pahila. Khup khup abhinandan. Mazi ride pan khup smarniya zali . Tumchya bhetimule charges chand lagle. Asach sahavas pudhil kalat labho. You are the true cyclists with good thoughts about cycling. I hope to do cycling with you in future. 🌹🙏🚴😃
Really great description.
ReplyDeleteपरममित्र लोचन चे अभिप्राय...
ReplyDeleteएक सुखद आणि विलक्षण अनुभव....
लेखाच्या उत्तम शीर्षकानुसार लेखही उत्तम!!
वाचकांना भरभरून आनंद देणारा !!!!
निसर्गावर, माणसांवर आणि तितकेच सायकलिंगवरही नितांत प्रेम लेखामध्ये प्रतीत होते आहे.
कोकणाचा निसर्ग, समुद्र अतिशय वेड लावणारा आहेच, त्यात अश्या प्रेमळ दृष्टी आणि मन लाभलेल्या व्यक्तीने केलेले यथार्थ शब्दांचे ओघवते वर्णन आणि चित्रण .. ..
सायकलिंग करणाऱ्या व्यक्तीला ही सफर न केल्याची रुखरुख हा लेख वाचून नक्कीच वाटेल...आणि ही सफर केलेल्या सर्वांना
पुनः प्रत्ययाचा आनंद मिळेल ....
Lovely route, photo shoot and description sir.
ReplyDeleteमित्र शिवाजी सलगरचे अभिप्राय...
ReplyDeleteसर्वच सायकल पटूंचे खूप खूप अभिनंदन...
सतिश जाधव सरांचे विशेष अभिनंदन...
कारण त्यांनी या आनंदमयी सायकल रॅली चे इतके सुंदर वर्णन केले आहे की, रॅली मध्ये सहभागी नसणा-याला वाचताना पश्चात्तापच झाला पाहिजे...
👍💐🚴♂️💐🚴♀️💐🙏