Sunday, October 4, 2026

सायकल... सूर आणि जागतिक विक्रम
दिनांक २ऑक्टोबर २०२६

काही कार्यक्रमांचं नियोजन आपण करतो; पण काही वेळा कार्यक्रमच आपलं नियोजन करून ठेवतो. 

२ ऑक्टोबरचा दिवस असाच होता.
सकाळी द्वारका आशापुरा सायकल राईड, दुपारी चार वाजता “तुम्हें क्या सुनाऊँ मैं…” हा कराओके कार्यक्रम आणि त्यात सहभागी होऊन जागतिक विक्रमाचा भाग होण्याची संधी. म्हणजे एका दिवसात सायकल, संगीत, घड्याळ आणि स्वतःचा श्वास... सगळ्यांनाच सांभाळायचं!

सकाळी साडेसहा वाजता मरोळच्या राममंदिरात पोहोचलो. मुंबई ते द्वारका आणि आशापुरा अशी 1400 किमी सायकल राईड होती... आशापुरा मातेची पूजा झाली, आरती करण्याचा मान मिळाला आणि मन अगदी प्रसन्न झालं. साडेदहा वाजता सायकल राईड सुरू झाली.

आरतीच्या वेळी हातात घंटा होती आणि राईड सुरू झाल्यावर हातात हँडल... मनात भक्ती होतीच; पण त्यासोबत एक छोटंसं घड्याळही टकटक करत होतं..
“चार वाजता कार्यक्रम आहे बरं का!”

गोरेगावपर्यंत राईड करून संगीताच्या कार्यक्रमाला जायची परवानगी आयोजकांनी मोठ्या मनाने दिली. ती एका अटीवर... ती म्हणजे उद्या सकाळी तलासरी येथे पुन्हा जॉइन करण्याच्या बोलीवर...

  साडेअकराच्या सुमारास गोरेगाव गाठलं आणि लगेच मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू केला. त्या वेळी माझ्या सर्ली सायकललाही बहुधा परिस्थितीची कल्पना आली असावी. ती म्हणाली... पेडल्स मी फिरवतेय, पण घाई तुझी आहे...

साधारण एक वाजता घरी पोहोचलो. आंघोळ, कपडे, थोडी तयारी आणि पत्नीला सोबत घेऊन गोकुळ हॉल कडे कार्यक्रमासाठी रवाना झालो...

शैलेंद्र आणि प्रीती दीदीला आधीच सांगितलं होतं, “शक्य तितक्या लवकर पोहोचतो.” आणि देवाची कृपा, सायकलची साथ आणि मुंबईच्या रस्त्यांशी झालेली मैत्री यांच्या जोरावर ३ वाजून ५१ मिनिटांनी हॉलमध्ये प्रवेश केला... संकेत कडे हजेरी नोंदवली...

चार वाजताच्या कार्यक्रमाला तब्बल नऊ मिनिटं शिल्लक होती...घड्याळाकडे पाहिलं आणि मनात आलं... आज तुझी आणि मैत्री टिकली!

यानंतर सुरू झाला सुरांचा सुंदर प्रवास. महानगरपालिकेतील कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचारी कलाकारांनी सुप्रसिद्ध संगीतकार मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेली तब्बल ३४ अजरामर गाणी कराओके वर सादर केली आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे गाणं संपलं की त्याच गाण्याचं लाईव्ह हमिंग करणं...

गाणं म्हणणं ही एक कला; पण गाणं म्हणतानाच स्वरांची अचूकता, लय आणि हमिंगचा सुरेख मेळ साधणं म्हणजे स्वरांशी केलेली खरी दोस्ती होती...
तब्बल ३० कलाकार, ३४ गाणी आणि जवळपास सहा तासांचा सुरेल प्रवास...

सोगो प्रीत यांच्या कल्पक संकल्पनेला कलाकारांचा सराव, मेहनत, उत्साह आणि कुटुंबीय-प्रेक्षकांची मनापासूनची मिळालेली साथ प्रोत्साहन कामी आले...

 संपूर्ण सभागृह अक्षरशः सुरांनी भरून गेलं...आणि अखेरीस OMG Book of World Records मध्ये या उपक्रमाची जागतिक विक्रम म्हणून नोंद झाली.


सकाळी राममंदिरात आरती करण्याचा मान...
आणि संध्याकाळी जागतिक विक्रमाच्या मंचावर गाण्याचा मान...

दिवसाची सुरुवात भक्तीच्या स्वरांनी झाली आणि शेवट संगीताच्या सुरांनी...

कार्यक्रम रात्री साडेदहा वाजता संपला. घरी पोहोचेपर्यंत साडेअकरा वाजले... इथे सामान्य माणूस म्हणाला असता, “चला, आता झोपूया.”
पण सायकलस्वाराचं घड्याळ वेगळ्याच कंपनीचं असतं...

पहाटे चार वाजता पुन्हा प्रस्थान... सायकलसह  डहाणूच्या दिशेने... हे सगळं पाहून माझ्या सायकलने  हळूच विचारलं... मालक, आपण सायकलिंग करतोय की महाराष्ट्र दर्शन?” 

पण खरं सांगायचं तर या धावपळीतच त्या दिवसाची खरी मजा होती. सकाळी पेडल्स फिरत होती...
संध्याकाळी स्वर झंकारत होते...मध्ये घड्याळाशी एक छोटीशी शर्यत सुरू होती...

आणि या सगळ्यांच्या शेवटी हातात आला एक अविस्मरणीय दिवस आणि मनात कायमचा राहिलेला जागतिक विक्रमाचा आनंद...

आयुष्याची गंमतही अशीच असते. दिवस किती मोठा होता यापेक्षा तो किती भरभरून जगला, याला जास्त अर्थ असतो.

सूर लागत राहू दे... आणि आयुष्याची मैफल अशीच रंगत राहू दे...


सतीश विष्णू जाधव