Showing posts with label उपनिषद. Show all posts
Showing posts with label उपनिषद. Show all posts

Thursday, October 8, 2020

ईशावास्योपनिषद भाग तीन कर्मयोग

 ईशावास्योपनिषद भाग तीन

कर्मयोग 


कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छत् शतं समाः।

एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ॥


मनुष्याने या जगात कर्म करतांना शंभर वर्षे आनंदाने जगण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे. जो आपली विहित कर्मे योग्य प्रकारे करीत असतो त्याला त्या कर्माचे बंधन कधीही नडत नाहीत.

ईशावास्य उपनिषद हे 'कर्मयोग' सांगते. परंतु जी कर्मे फलदायी वाटत नाहीत ती कर्मे आपण टाळतो आणि ज्या कर्मामुळे आपल्याला धन, कीर्ती, लौकिक मिळत असेल अशी कर्मे करायला आवडतात. पण जेथे आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेथे निराशा येते, जीव क्रोधाने, लोभाने जळू लागतो. 

उपनिषदात फलाची अपेक्षा न करता कर्म करावे असे सांगितले आहे. परंतु या जगात मृत्यूपर्यंत सकाम कर्म करावे लागते असे सांगत त्याचाही निषेध केलेला नाही. निष्काम कर्म अधिक चांगले हे मात्र सांगितले आहे. निष्काम कर्म आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून अर्थात भवचक्रातून सोडविण्यास उपयुक्त ठरते असे हे उपनिषद सांगते.

'सकाम कर्म'  म्हणजे फळ  साध्य करण्यासाठी केलेले कृत्य.

'निष्काम कर्म' म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता  केलेलं कर्म.

 कर्मयोगानुसार निष्काम कर्म केल्यामुळे फळ चांगले मिळो अथवा वाईट, कर्मयोगी...  ना चांगले फळ मिळाले म्हणून आनंदी होत,  ना वाईट फळ मिळाल्यामुळे दुःखी होत. तो सुख आणि दुःखाच्या पलीकडची स्थिती, ज्याला सच्चिदानंद म्हणतात, त्याची अनुभूती घेत असतो. जेव्हा निस्पृहतेने कर्म केले जाते, तेव्हाच हे शक्य होते. 

 कर्म करताना फळाची इच्छा धरली तर त्याला सुख किंवा दुःखाचे फळ प्राप्त होते आणि ती व्यक्ती कर्मफलाच्या बंधनात बांधली जाते.

कर्म कधीही सोडता येत नाहीत, पण बंधनातून अलिप्त असे कर्म करता येते. म्हणून उपनिषद सांगते ‘ विहित कर्म करा’ जसे की नित्याच्या श्वासोच्छवासा प्रमाणे कर्म अगदी सहज, अनायास घडते आहे. 

"विहित कर्म" जसे की लहान बाळ भूक लागली की मोठ्याने रडते. जे मिळेल ते चोखून घेते. जे घेतले आहे,  ते पचविणे आणि झोपणे, ही त्याची विहित कर्मे आहेत. पण तो जसा मोठा होतो तशी त्याची विहित कर्मे बदलत जातात. रांगणे, बसणे, बोलणे ही त्याची विहित कर्मे होतात. नंतर तो विद्यार्थी  होतो. आता तो पाळण्यात झोपणार नाही, पांगुळगाडा चालविणार नाही. अध्ययन त्याचे विहित कर्म होईल. नंतर तो कुटुंबाचे पालन पोषण करणारा जबाबदार गृहस्थ होईल. अशा प्रकारे विहित कर्मे बदलतात. पहिली कर्मे सहज सुटली जातात.  

परंतु जेव्हा बुद्धी चालायला लागते, वासना विकारांचा लेप त्यावर चढतो, तेव्हा मी - माझे, आवड-निवड सुरु होऊन विवेकबुद्धी लोप पावते. येथे विहित कर्म विकारग्रस्त होते आणि मग मनासारखे झाले नाही की अपयश भेडसावू लागते. जगणे निरस होते. मन निराशेने लिप्त होते. 


सत्य हे सुवर्णाच्या झाकणाने झाकलेले असते असे हे उपनिषद सांगते. सत्य समजून घ्यायचे असेल तर सुखदु:खापलीकडे जावे लागते. परंतु मनुष्य सुखाचा अनुभव सोडायला तयार नसतो. या अनुभवाची तो पुन: पुन: प्रतीक्षा करतो. लोभामुळे या सुखाची तो पुन्हा पुन्हा  अपेक्षा करतो . सत्य जाणून न घेता सत्यावरील सुवर्ण झाकणाच्या मोहात पडतो आणि सत्याच्या अतीव आनंदाला मुकतो.

 कर्मफलातून मिळालेल्या सुखालाच तो शाश्वत आनंद मानतो. परंतु ह्या सुखाचा जेव्हा लोप होतो तेव्हा दुःखाची निर्मिती होते. 

सुखाच्या अनुभवालाही दूर लोटून माणूस पुढे जातो तेव्हाच त्याला शाश्वत सत्याचा बोध होतो. यालाच "सच्चिदानंद" म्हणतात.

सर्व ईश्वराचेच आहे, 'माझे' म्हणण्यासारखे जगात काहीच नाही. म्हणून “ मी – माझे ” याला  काहीच अर्थ नाही. 'मी' हा 'माझे' या भावनेवर पोसलेला असल्याने 'मी'पणाही निरर्थक आहे,  हेच हे उपनिषद आग्रहाने सांगते. जसे की ... आजची भाकरी मी खाल्ली उद्याची मिळणार आहे. म्हणून भरून ठेवलेले धान्य रोज कोणी मोजत नाहीत. हे माझे आहे असा जपही करत नाहीत. त्याचा विनियोग आवश्यक तेव्हा करतो. वेळेला सर्वांच्या उपयोगासाठी करतो. त्याचा ध्यास सोडून देतो. 

 काम करणे अगत्याचे आहे की नाही ते पाहणे महत्वाचे आहे. ते काम जरुरीचे असेल तर  करताना सर्व  चित्तवृत्ती गुंतल्या पाहिजेत, तरच ते काम सुरेख होते.  परंतु बऱ्याच वेळेला आपल्या वाट्याला आलेले काम हीन दर्जाचे वाटते. दुसऱ्याला मिळालेले सगळे चांगले वाटते. त्याचे घर, त्याचे ऐश्वर्य, त्याची मुले चांगली वाटतात. तुलना करून  मन दुषित करणे, पुन्हा त्यात ‘मी’पणा कालवून कामाचे रूप बिघडवून टाकणे, या मुळेच नातेसंबध दुरावतात. 

आपल्याकडे येणारी कामे प्रसन्न मनाने कुशलतेने करणे हा ‘योग’ आहे, यज्ञ आहे. कृतज्ञता मनात ठेऊन कर्म करणे म्हणजे यज्ञ होय. जेवणाच्या अगोदर आपण प्रार्थना करतो “ उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ” आपल्या जठराग्नित दिलेली ती आहुती आहे.  मग जिभेचे चोचले राहत नाहीत. अन्नाला नावे ठेवणे, नासधूस करणे हे घडत नाही. स्वयंपाक करणे ही यज्ञकर्माची पूर्वतयारी आहे. ते आनंदाने, प्रेमाने केले की आपोआप रुचकर, पुष्टीकर होईल. 

उपनिषदात सांगितल्यानुसार जीवन जगताना .. करावी लागणारी / निवड केलेली कामे  आनंदाने, कुशलतेने, कुणाशीही तुलना न करता , 'मी' पणा दूर सारून केल्यास आनंदात शंभर वर्षे जगणे सहज सुकर होईल.


// श्री कृष्णार्पणमस्तु //