Showing posts with label गाठी भेटी राईड. Show all posts
Showing posts with label गाठी भेटी राईड. Show all posts

Thursday, June 18, 2020

गाठी भेटी राईड

गाठी भेटी राईड
18.06.2020

सकाळी 5.50 वाजता राईड सुरू केली. आज ठाणे येथील उपवन पर्यंत सायकलिंग करायची होती. चाळीस मिनिटात कुर्ला हायवेला पोहोचलो. येथील फ्लायओव्हरच्या कठड्यावर कावळ्यांची सभा भरली होती. आज भरपूर पाऊस पडणार आहे. सर्वांनी पंखांची काळजी घ्या... असाच काहीसा विषय असावा.

थोडा पुढे आलो आणि एकदम विस्मयचकित झालो... एका स्कोडा गाडीवर गुलमोहर फुलांचा सडा पडला होता. जसे की, गाडी लग्नासाठीच सजविलेली होती. वातावरण अतिशय छान आणि ढगाळ होते. धुंद कुंद, आल्हाददायक रस्यावरून राईड सुरू होती. कधीही पाऊस पडेल अशी चिन्ह होते. खंड्या पक्षाचा "चिकू.. चिकू.. चिकू.. आवाज पावसाला साद घालत होता. रस्त्यावरची झाडे पिवळ्या, लाल फुलांनी बहरली होती. "भीगा भीगा नशीला दिन है.. आवो चलो कही छुप जाये" या गाण्याची धून कानावर पडत होती. 
विक्रोळी फ्लायओव्हर ब्रिजवर आलो. समोरच्या काळ्या भुऱ्या ढगाच्या मिठीतून सुटून सूर्यदेव आपली प्रभा, धरणीवर पाठवायचा प्रयत्न करत होते. 
नभांगणाचा अनभिषिक्त सम्राट, त्या गलेलठ्ठ ढगांपुढे हतबल झाला होता. त्यामुळे रस्त्यावरच्या दिव्यांचा प्रकाश सुद्धा प्रखर वाटत होता. ते ढग बरसण्यासाठी तयार होते, पण वरुण राजाची आज्ञा अजून झाली नव्हती.
सव्वा सात वाजता मुलुंड टोल नाक्याकडे पोहोचलो.  एव्हढ्यात हिरेनचा फोन आला. पंधरा मिनिटात उपवनला पोहोचतो आहे, त्याला सांगितले. 
कॅडबरी नाक्यावर वळल्यावर येऊर पायथ्यापर्यंत चढ लागतो. अतिशय दमदार पेडलिंग करत येऊर पायथा चढलो. तेथून भन्नाट उतार उतरत तडक उपवन गाठले. 

आज बरेच समर्पयामि सभासद उपस्थित होते. कुलथे दादा आणि किशोरीची भेट झाली. 
 विशेष म्हणजे आदित्य कारखानीस आणि स्नेहाची उपस्थिती होती. मीडियाचे एक फोटोग्राफर सुद्धा आले होते. सध्याच्या सोशल डिस्टनसिंग कार्यक्रमामुळे बऱ्याच व्यक्ती सायकल घेण्यास इच्छुक होत्या, यासाठीच आज सायकालिस्टच्या मुलाखती होत्या.

भारतातील रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेता, सायकलिंगसाठी MTB सायकल कशी उपयुक्त आहे, या साठी मुलाखती होत्या.  बलवंतने हिंदीत, मयुरेशने मराठीत, आदित्यने इंग्रजीत, तर जिनेशने गुजरातीमध्ये मुलाखत दिली. मी मुंबई ते कन्याकुमारी राईडच्या अनुषंगाने  तर  स्नेहाने महिलांच्या सायकलिंग बाबत मुलाखत दिली. 
केळी, चहा बिस्कीट, तजेलदार काढा यांचा नास्ता झाला. हिरेनने माझी सायकल अप टू डेट केली होती. 

आदित्य (काका), मयुरेश आणि सुधीर शेट्टी बरोबर माझी परतीची राईड सुरू झाली. उपवन गेट जवळच जॉगिंग करणाऱ्या भूषण अहिरेची भेट झाली. अहिरे "सोनम वांगचुक" चा फॅन आहे, ज्याच्यावर थ्री ईडियट चित्रपट बनविला आहे.

त्यानंतर मयुरेश घराकडे सटकला. आदित्य आणि सुधीर मला  मौर्य डेअरी शॉप मध्ये घेऊन गेले. खास माझ्यासाठी कुल्फी आईस्क्रीमची फार्माईश झाली. आईस्क्रीम खाता खाता पनीर सुध्दा हातात आले. आजचे पनीर आणि आईस्क्रीम हे कॉम्बिनेशन एकदम भन्नाट होते. घरी न्यायला सुद्धा पनीरचे पाकीट मिळाले. आदित्यची उदारता आणि सुधीरचे औदार्य पाहायला मिळाले. 

दोघांची माझ्या बरोबर राईड सुरू झाली. तीन हात नाक्यावर नवीन पुलाचे काम चालू आहे. तेथील मातीच्या ढिगाऱ्यावर आदित्य पाठोपाठ मी सायकल चढवली. आता ठाण्यात ऑफ रोडिंग सायकलिंग सुरू झाले. खड्डे खुड्डे,  छोटे उंचवटे, दगड, पावसात ओलसर झालेली माती या वरून सायकलिंग करणे थ्रीलीग होते. नवनवीन रस्ते शोधण्याबाबत मानलं पाहिजे आदित्यला. 

तेथून दोघांनी मला मुलुंड ऐरोली पुलापर्यंत कंपनी दिली. मुंबई ते गोवा सायकलिंग  प्लॅनिंग आदित्य बरोबर करायचे ठरले. त्यांना टाटा केला.
मुलुंड पार केल्या वर मिठागर परिसरातील पानथळीवर बगळ्यांचे थवे उतरले होते. 

विक्रोळीला पोहोचल्यावर, देवनारला गीते साहेबांना भेट द्यायची आहे, हे आठवले. घाटकोपर वरून गोवंडीला सायकल वळवली. जोरदार पाऊस यायचे लक्षण दिसत होते, म्हणून पेडलिंगचा वेग वाढविला.

 महापालिका एम पूर्व विभागात काम करणारा माझा मित्र किरण लहाने, अनपेक्षितपणे समोर आला. माझ्या तोंडावर स्कार्फ असल्यामुळे खात्री करण्यासाठी त्याने सायकलच्या पुढे स्कुटर घातली, '"तुम्ही जाधव साहेब का"
 होय, मी म्हणालो.
  त्याच्या पण चेहऱ्यावर मास्क होता त्यामुळे मी पण पटकन त्याला ओळखले नव्हते. पण हसऱ्या डोळ्यावरून किरणला ओळखले. खूप आनंद झाला त्याला भेटून.

किरणला घेऊन गीते साहेबांच्या घरी गेलो. किरण लहाने, गीते साहेबांच्या गाववाला निघाला. थोड्या वेळाने कार्यालयीन कामासाठी तो बाहेर पडला. आता धुवादार पाऊस सुरू झाला होता.

गीतेंनी माझ्या आवडती डिश बनविली होती, गव्हाच्या चिकाची पेज. गरमागरम पेज प्याल्या नंतर फक्कड चहा आला. चहाचे घोट घेताना पावसाच्या सरींकडे लक्ष होते.

 धुवादार पाऊस पडत होता. बाहेरच्या पत्र्यावर पडणाऱ्या पावसाच्या सरी,  वरातीच्या ताशा सारखा तडतड आवाज करीत होत्या. चहा पिता पिता त्या वरातीत सामील झालो होतो. बराच वेळ गीतेंशी गप्पा मारल्या. 

पाऊस थांबल्यावर सायकल निघाली घराच्या वाटेवर. पाऊस येणार ही आशंका असल्यामुळे, चष्मा काढून ठेवला, तसेच फ्लूरोसंट हिरवे विंडचिटर घातले. देवनार पार करून घाटकोपरमध्ये प्रवेश करताच आभाळ फाटले आणि पावसाचा जबरदस्त वर्षाव होवू लागला.

 जोरदार पावसामुळे सर्व मोटार सायकलवाले रेनकोट असून सुद्धा रस्त्याच्या कडेला थांबले होते. पावसाच्या जोरदार सरींमुळे त्यांच्या हेल्मेटवर फॉग जमा होऊन त्यांची व्हीजिबलिटी नाहीशी झाली होती. म्हणून मोटारसायकल स्वार स्तब्ध झाले होते.

पण माझी सायकल, वाऱ्यासह कोसळणारा पाऊस, रस्त्यावर तुंबलेले पाणी या कशालाही न जुमानता पळत होती.  जलधारांनी चिंब भिजलो होतो. वारा मागे ढकलत होता. पण मनाने ठरवले होते, आता न थांबता, पावसाची साथसंगत करत घर गाठायचे. सतत अर्धातास बेधुंद पावसात राईड करत होतो. मुंबई ते कन्याकुमारी सफरीत अशीच पावसाळी राईड केली होती. अंगावर पाऊस घेऊन सायकल चालविणे म्हणजे थेट पावसाशी दंगामस्ती करणे होते.

सोसायटीत प्रवेश केला तो चिंब भिजण्याचा मनमुराद आनंद लुटूनच!!!

आज 75 किमी राईड झाली होती.

आज मित्रांच्या गाठीभेटीसह पावसाची सुद्धा गाठ पडली होती, निसर्गाचे नवे रूप दाखविण्यासाठी.

सतीश जाधव