Showing posts with label ट्रेकिंग. Show all posts
Showing posts with label ट्रेकिंग. Show all posts

Wednesday, July 15, 2020

माना गावाची कथा

*// माना गावाची कथा //*

मित्रांनो !!!,  
आज तुम्हाला एक गमतीदार कथा सांगणार आहे "माना" गावाची !  खूप जणांनी चारधाम यात्रेतील बद्रीनाथ धाम पाहिले असेलच. या बद्रीनाथ पासून चार किमी अंतरावर आहे माना गाव.

"भारतका आखरी गाव" असे या गावाच्या प्रवेशद्वारावर लिहिले आहे.  

येथून पांडव स्वर्गारोहणासाठी गेले होते. पांडवांना पाहण्यासाठी या गावात सरस्वती नदी अवतीर्ण झाली. तीच्या  प्रचंड मोठ्या रोरावत वाहणाऱ्या  प्रवाहातून  पलीकडे जाणे पांडवांना शक्य नव्हते, त्यामुळे युधिष्ठिराच्या आज्ञेने भीमाने भलीमोठी शिळा या प्रवाहावर टाकली आणि याच शिळेवरून सरस्वती नदी ओलांडली. हीच महाकाय शिळा भीमपूल म्हणून प्रसिद्ध आहे. 

माना गावाच्या वेशीवर भीमपुलाचे दर्शन होते. तसेच पुढे स्वर्गारोहिणीच्या दिशेने सहा किमी गेले की वसूधारा धबधबा लागतो. पांढरे शुभ्र दुधासारखे दवबिंदू जेव्हा अंगावर पडतात तेव्हा मन मोहरून जाते. हवेच्या जोरदार झोताबरोबर हा जलप्रपात अक्षरशः नाचत असतो. 

या गावात एक चहाचे दुकान आहे. येथे सुद्धा भारताचे शेवटचे चहाचे दुकान हा बोर्ड आहे. येथे जरूर चहाचा आस्वाद घ्या.

   व्यास रचित महाभारताचे लिखाण जेव्हा गणपती बाप्पा करत होते त्यावेळी सरस्वतीच्या रोरावत वाहणाऱ्या आवाजामुळे बाप्पाची एकाग्रता भंग पावत होती. गणपतीच्या शापामुळे सरस्वती नदी भीम पुलाजवळच भूमीत लुप्त झाली आहे. त्यामुळे भीम पुलाच्या एका बाजूला सरस्वतीचे रौद्र रूप दिसते तर पुलाच्या दुसऱ्या बाजूला नदीच्या पाण्याचा थेंब सुद्धा दिसत नाही. निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी माना गावाला भेट द्यायलाच हवी. 

जवळच व्यास गुंफा आणि गणेश गुंफा आहेत. या गुंफे मागचा डोंगर व्यास पोथी म्हणून प्रसिद्ध आहे. तो डोंगर महाभारताच्या ग्रंथाची पाने असल्याचा भास होतो.

 "महाभारत" व्यास महर्षींनी लिहिले हे सर्वांना माहीत आहे. प्रत्यक्षात, व्यास मुनींना अंतचक्षूंनी महाभारत दिसले, स्फुरले. व्यासांच्या लक्षात आले, ज्या प्रचंड वेगाने आपल्याला महाभारत स्फुरते आहे, त्या वेगाने आपण ते लिहू शकणार नाही, म्हणून ते लिहिण्यासाठी त्यांना लेखनिकाची आवश्यकता होती.

तिन्हीत्रिकाळ भ्रमंती करणाऱ्या नारद मुनींना, व्यास महर्षींनी या बाबत विचारणा केली, " मुनिवर मला महाभारत स्फुरते आहे, ते लिहिण्यासाठी लेखनिक हवा आहे". नारद मुनी म्हणाले, " महर्षी, कुशाग्र बुद्धीचा आणि विद्येची देवता असणारे गणपती बाप्पा यांच्याकडे विचारणा करा".

महर्षी व्यास मुनी गणेशकडे गेले आणि विनंती केली, " गणराया मला प्रचंड वेगाने महाभारत स्फुरत आहे आणि त्याच वेगाने ते लिहायला मला लेखनिकाची आवश्यकता आहे, तुम्ही मदत कराल काय". हे विचारताना व्यासांच्या मनात एक शंका आली, बाप्पाचे मोठे पोट, हत्तीचे तोंड, सावकाश चालणे यामुळे गणपती खरच महाभारत प्रचंड वेगाने लिहू शकेल काय?

बाप्पानी त्यांचे बारीक असलेले डोळे आणखी बारीक केले आणि गालात हसू लागले, अंतचक्षूंनी गणरायांनी व्यासांच्या मनातील शंका जाणली होती. बाप्पा हसत म्हणाले, " महाभारत लिहायला मी लेखनिक म्हणून जरूर तुम्हाला मदत करीन, पण माझी एक अट आहे". मुनिवर म्हणाले, "बोला, काय अट आहे" बाप्पा म्हणाले, " तुम्हाला प्रचंड वेगाने स्फुरणारे महाभारत मी लिहायला तयार आहे, परंतु जो पर्यंत तुम्ही बोलत आहात तो पर्यंत माझी लेखणी चालेल, पण जेव्हा तुमचे बोलणे थांबेल, तेव्हा माझी लेखणी ही थांबेल".

महर्षी व्यास एकदम भानावर आले, त्यांचे बाप्पाच्या लिखाणाबद्दल शंका निरसन तर झालेच, पण स्फुरणारे महाभारत सांगताना मध्ये मध्ये आपल्याला उसंत घ्यावी लागणार आहे, याची जाणीव सुद्धा झाली. मुनिवरांनी थोडावेळ विचार केला आणि खजील होऊन गणपती बाप्पाला नमस्कार केला. महर्षी म्हणाले, "तुमची अट मान्य आहे, पण माझी सुद्धा एक अट आहे " बाप्पांनी होकार दिला. व्यास म्हणाले, "गणेशा, मी महाभारत तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही समजून उमजून लिहायचे आहे". 

गणेशाने ही अट मान्य केली. त्यानंतर व्यास महर्षींनी प्रचंड वेगाने स्फुरणारे महाभारत बाप्पाला सांगायला सुरुवात केली. तसेच त्यांना उसंत मिळण्यासाठी महाभारतात व्यासानीं काही कूट प्रश्न निर्माण केले, ते समजून उमजून घेण्यासाठी गणपती बाप्पाला काही वेळ लागायचा, तेवढा वेळ व्यासांना उसंत मिळायची. अशा प्रकारे व्यासांनी अव्याहतपणे महाभारत सांगितले आणि बाप्पानी ते अखंडितपणे लिहून घेतले. 

असे रचले महाभारत, "व्यासांना स्फुरले आणि गणेशाने लिहिले".

मित्रांनो, आपल्या जीवनात सुद्धा आपण प्रत्येक गोष्ट जर समजून उमजून केली, तर ती अतिशय अचूक होईल आणि ती कधीही आठवावी लागणार नाही. ती गोष्ट आपली अंतर्मनाच्या गाभाऱ्यात कोरली जाईल. 

कोणतीही गोष्ट "समजून उमजून" करणे म्हणजेच वर्तमानात राहुन काम करणे हे आहे.

आजच्या या सुंदर दिवशी चला आपण संकल्प करूया, "मी प्रत्येक गोष्ट समजून उमजून करीन"

सतीश विष्णू जाधव