Showing posts with label धुवाधार राईड. Show all posts
Showing posts with label धुवाधार राईड. Show all posts

Monday, June 22, 2020

धुवाधार राईड, रविवार २१ जून २०२०

धुवाधार  राईड

रविवार २१ जून, २०२०

आज राईड ठरली ठाण्याला जायची, परंतु ज्यांना ज्यांना सांगितले ते सर्व काही तरी अडचणी सांगून आउट झाले. पण मनाने ठरविले होते, आज जायचेच राईडला. 

सकाळी 5.50 वाजता सुरू झाली सायकलिंग. आज वातावरण खूपच शांत-निवांत होते. एकतर रविवार त्यात सूर्य ग्रहण याचा परिणाम असावा. खरं तर निसर्गप्रेमींसाठी ग्रहण म्हणजे पर्वणी असते. परंतु आज वातावरण इतके ढगाळ होते की नक्की ग्रहण दिसेल काय याची शंका होती.

रात्री पडलेल्या पावसाच्या पाऊलखुणा अजून रस्त्यावर जाणवत होत्या. विक्रोळी फ्लाय ओव्हरवर पोहोचलो. ढगांचे आच्छादन भेदून रवीराजा नभांगणात  सप्तअश्वांच्या रथातून चौफेर स्वारी करत होता. प्रकाश किरणांचे आसूड गलेलठ्ठ ढगांवर ओढत होता. आज त्याचा मित्र चांदोबा त्याला भेटायला येणार होत. त्या भेटीत ढगांचा  अनाहूत अडसर सूर्याला अनावर झाला होता.
या चंद्र-सूर्य भेटीची पूर्वकल्पना सर्व पक्षी समुदायाला झाली होती, त्यामुळे सकाळीच झाडाझाडावर  नेहमीपेक्षा जास्त किलबिलाट जाणवत होता.

निसर्गातील काही विशिष्ट घटना पक्षी, प्राणी यांना आधीच समजतात. आज  कुत्रेसुद्धा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. परंतु सायकलच्या मागे न लागता, एकमेकांत लपंडाव खेळत होते. "मित्राच्या" भेटीला चंद्र अमावस्येची काळी चादर लपेटून येणार होता. त्याचा आनंद साजरा करत असावेत ही श्वान मंडळी.

मुलुंड ब्रिज जवळ आलो आणि आदित्यचा फोन आला, त्याच्या बरोबर प्रशांत आणि चिराग होते. माझ्या भेटीसाठी कॅडबरी जंक्शन जवळ थांबणार होते. 

स्पीड वाढवला आणि सव्वासात वाजता कॅडबरी जंक्शनला पोहोचलो. येथे मयुरेश आणि हिरेनची सुद्धा भेट झाली. एका मोबाईल होर्डिंग वर आम्ही जल्लोषात फोटो काढले. आदित्यने तर सायकलच गाडीवर चढवली होती.
तेथून उपवनला आलो. प्रशांतची भेट चार महिन्यानंतर झाली होती. त्याच्या सायकलचे बारीकसे काम हिरेनने केले. आदित्यने लज्जतदार काढा पाजला. येथून चिराग आणि प्रशांतसह बाळकुंम पाईप लाईनकडे प्रस्थान केले. खारगाव टोल नाका ओलांडून पाईप लाईन मध्ये प्रवेश केला.

दोन्ही बाजूला प्रचंड मोठे पाण्याचे पाईप आणि त्यातील निर्जन रस्त्यावरून आमची राईड सुरू झाली. रहदारी पासून अलिप्त अशी ही राईड करताना आम्ही पावसाची आराधना करीत होतो. खुप दिवसांनी प्रशांतने सायकलिंग सुरू केली होती. दुखऱ्या हाताला ग्रीप बांधली होती. त्यामुळे मॉडरेट सायकलिंग सुरू होते. चिरागने केस वाढविल्यामुळे त्याचा लुक एकदम बदलला होता. डोक्याला तो हेअरबँड लावून आला होता. 
हा पाईप लाईनचा रस्ता सायकलिस्टसाठी बनवला आहे असेच वाटत होते. आम्ही तिघे जणच या रस्त्यावर होतो. लांबून गाड्यांचा आवाज येत होता. या पाईप लाईनच्या डाव्या बाजूला मोठमोठी गोडाऊन आहेत. परंतु तेथे सुद्धा रहदारी कमी होती. ठाण्यावरून जवळपास वीस किमी राईड झाली होती. अंजुर फाट्याला हायड्रेशन ब्रेक घेतला. येथूनच मागे फिरायचे ठरले. 

पुन्हा सायकलिंग सुरू केले आणि धुवाधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा मारा एव्हढा जोराचा होता की सर्व मोटार सायकलस्वार गुडूप झाले. कशेळी पुलावर पावसाचा जोर आणखी वाढला. खाली ठाण्याची खाडी, त्याच्या पाण्यात  पडणारे पावसाचे थेंब उसळून पुन्हा वर उडत होते. या पुलावर थांबून पावसाचा लपंडाव पाहत होतो. फोटो काढून पुढे निघालो. 
खारगाव ओलांडल्यावर पाऊस थांबला, पण झाडांच्या खालून जाताना हवेने पानांवरून अंगावर येणारे पाण्याचे थेंब पावसाचा फील देत होते. पावसाचा मारा आणि वाऱ्यांचा पाऊस असे दुहेरी निसर्ग दर्शन झाले. निसर्गाचे अतिशय वेगळे रूप आज पाहिले.

चिराग आणि प्रशांतला ठाण्याला सी ऑफ केले.  विक्रोळी येथील गोदरेज गार्डन समोर हायड्रेशन ब्रेक घेतला. फुटपाथवर बसून समोरील हिरवळ न्याहाळत होतो. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा अनुभवत होतो. 
दहा वाजता ग्रहण सुरू झाले, तेव्हा ठाणे सोडले होते. वातावरण ढगाळ असल्यामुळे सुर्यग्रहणाचा मागमूस लागला नाही. रस्त्यावरील गाड्यांची वाहतूक रोडावल्याचे जाणवले.

साडे अकराच्या दरम्यान ग्राहणाचा मध्य होता. याच वेळेस दादरला पोहोचलो होतो. संपूर्ण दादरमध्ये शुकशुकाट होता. सर्व दुकानेसुद्धा बंद होती. या पूर्वी बऱ्याचदा खग्रास सूर्यग्रहण सुद्धा अनुभवले आहे. पण एव्हढा निर्मनुष्य रस्ता पहिला नव्हता. आजचे मुंबईतून दिसणारे सूर्यग्रहण तर खंडाग्रास होते. म्हणजेच संपूर्ण सूर्य झाकला जाणार नव्हता. तरी सुद्धा हा सन्नाटा का बरे झाला असावा?

सूर्यग्रहणाला सुद्धा करोना झाला असावा अशी शंका आली.

दुपारी बारा वाजता घरी पोहोचलो. आज 96 किमी राईड झाली होती.

अतुल आज संध्याकाळी चार वाजता गोरेगाववरून निघून, मित्रांसोबत सायकलिंग करत NCPA ला येणार होता. त्याने मित्रांना भेटण्याचे आमंत्रण दिले. तसेच गोरेगाव वरून निघाल्यावर मला व्हाट्स अँप लाईव्ह लोकेशन शेअर केले. 

तासाभरातच सर्वांची वरळी नाक्यावर भेट झाली. परंतू अतुलचे सायकल डिरेलर बिघडल्याने तो परत मागे गेला होता.
अपूर्व, मयांक, डिलोंन आणि सौगात यांच्या बरोबर राईड सुरू झाली. मयांक कडे MTB होती, बाकी तिघांकडे रोडिओ सायकल होत्या. जसलोक लूप चढल्यावर सर्व गोरेगावकर सायकलिस्ट पाणी प्यायला थांबले. आता मी आघाडी घेतली आणि डायरेक्ट NCPA गाठले. थोड्याच वेळात सर्वजण NCPA ला पोहोचले. अपूर्वने सर्वांची ओळख करून दिली. आज त्यांची प्रथम भेट सेलिब्रेट करण्यासाठी सर्वांना मावा केक घेऊन गेलो होतो. 
संध्याकाळचे सहा वाजले होते सूर्य अस्ताला चालला होता.  चौपाटीच्या कठड्यावर कोणालाही बसण्याची परवानगी नव्हती.  त्यामुळे एक कॉर्नर पकडून आम्ही उभे होतो. आज गर्दी होती पण प्रत्येकजण मास्क लावूनच वावरत होता.
अशी ही सायंकाळची सुशांत वेळ....
शीतल वाऱ्याची झुळुक ...
थंड मृदू मुलायम झुळूक  पावलांना हवीहवीशी वाटत होती...
समोर अथांग पसरलेल्या समुद्राच्या  लाटांची गाज दुरून सुद्धा कानाला सुखावत होती... 
त्या लाटांचे फेसाळत किनाऱ्याकडे झेपावणे डोळे भरून पाहात होतो...
त्या लाटा किनाऱ्याजवळ आल्यावर किनाऱ्याला हळुवार बिलगणे... 
मग लाजेने चूर होऊन किनाऱ्यापासून हळूहळू दूर जाणे...
त्या लाटेकडे  तृप्त किनारा  प्रेमभऱ्या नजरेने बघत समाधानी झाला होता...
त्याला माहित होते  ती येणारच आहे...
तीच प्रेमाची ओंजळ घेऊन पुन्हा रिती करायला त्याच्यापाशी....
 अथांग निळाई ल्यालेले आकाश...
 अनिमिष नेत्रांनी सागर किनारा न्याहाळत होते... समुद्रालाही  निळ्या आकाशाकडे पाहून प्रेमाचे भरते येत होते...
उचंबळणाऱ्या  लाटा चुगलखोरपणा करत होत्या... 
निळ्या आकाशाच्या अनिवार ओढीने समुद्राचे पाणी ही निळे निळे झाले होते....
काही ठिकाणी आकाश निरभ्र तर काही ठिकाणी पांढुरक्या अभ्रांचे पुंजके मंद वाऱ्यावर हलकेच तरंगत होते....
गगन राजांनी नुकताच आपला दरबार बरखास्त केला होता...
 त्याच्या दिव्य दैदिप्यमान अस्तित्वाच्या खुणा अजूनही आकाशात रेंगाळत होत्या...
मिलनोत्सुक नव युवतीच्या आरक्त गालाप्रमाणे आकाशी लालिमा पसरला होता....
सागराच्या निळ्या  पाण्याने तो लालीमा प्राशन केला होता...
आणि आनंदाने निळसर लाटा लहरत होत्या... 
अतिशय नयनमनोहर दृश्य दिसत होते... 
पक्ष्यांची किलबिल वाढली होती....
उबदार घरट्याची ओढ लागली होती...
घरट्यात वाट पाहणाऱ्या चिमण्या चोची... 
पंखाना बळ देत होत्या...
 हलके हलके अंधाराचे साम्राज्य वाढत होते...
 वारे ही लगबगीने इकडून तिकडे वाहात होते... वाहताना झाडांच्या फांद्या, एकमेकांशी हितगुज करत होत्या...
ह्या गुजगोष्टींमुळे आनंदाने डोलणारे वृक्ष...
त्यांचा आनंद..
त्यांच्या फुलांचा सुगंध... 
वातावरणात मिसळत होता..
त्यामुळे सारा आसमंत सुगंधित झाला होता....
 सोन्याच्या रथात विराजमान होऊन भास्कराची स्वारी क्षितिजाकडे प्रस्थान करत होती...
सोबत पांढऱ्या सावळ्या ढगांचा लवाजमा  सजून धजून तयार होता... 
त्याला निरोप देण्यासाठी.…

 निसर्गाचे हे विराट रूप डोळ्यात मावेनासे झाले...
म्हणून क्षणभर डोळे बंद करून मनचक्षुने त्या अथांगाचे दर्शन घेतले...
चौघांना वरळी नाक्यावर सी ऑफ केले आणि घराकडे निघालो ते भारावलेल्या मनाने...

संध्याकाळी 22 किमी राईड झाली होती.

आजच्या दोन्ही राईड जुन्या आणि नव्या मित्रांच्या संगतीने  धुवाधार झाल्या होत्या... 

त्या आदित्यचा उदय...
ग्रहण... 
आणि अस्त.. 
यांचा साक्षीदार होतो...

सतीश जाधव