Showing posts with label निसर्गाकडून निसर्गाकडे सायकल राईड. Show all posts
Showing posts with label निसर्गाकडून निसर्गाकडे सायकल राईड. Show all posts

Wednesday, June 17, 2020

निसर्गाकडून निसर्गाकडे सायकल राईड

निसर्गाकडून निसर्गाकडे सायकल राईड

16.06.2020

 सकाळी पावणे सहा वाजता राईडला सुरुवात केली.  आज पहाटेच पाऊस पडून गेला होता. रस्ता अर्धा ओला अर्धा सुका होता. ठिकठिकाणी फुलांच्या रांगोळ्या पसरल्या होत्या.  वातावरणात गारवा होता. "दूरच्या रानात, केळीच्या बनात" गाणे सायकलच्या पेडल बरोबर साथ देत होते. पक्षांचा किलबिलाट गाण्याची साथसंगत करत होता.

आज एक गम्मत झालीय, कुत्र्यांना सुद्धा मी परिचित झालोय, त्यामुळे त्यांनी भुंकत सायकल मागे पाळायचे सोडून दिलंय. हिंदमाता जवळ कावळ्यांची मस्त मेजवानी चालती होती. सकाळ सकाळीच ताव मारत होते मेलेल्या उंदरावर. 

रहदारी कमी असल्यामुळे राईड मस्त मजेत चालू होती. आज कोणत्याही पुलावरुन राईड करायचे टाळले. त्याचे मुख्य कारण, पडून गेलेल्या पावसात पुलावरच्या पाण्याच्या आउटलेट मध्ये पावसाचे पाणी तुंबून राहते, त्यामुळे पुलावरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही.

चित्रा सिनेमागृहाच्या होर्डिंगवर एकही चित्र दिसत नव्हते. वाऱ्यामधल्या मातीमध्ये दरवळणारे हेच का माझे शहर आहे, हा संभ्रम मला पडला. पहाटे पासून पळणारे माझे मुंबई शहर, स्तब्ध झाले होते. उभ्या आयुष्यात एवढी स्तब्धता, शांतपणा कधीही अनुभवला नव्हता. मला खात्री आहे पुन्हा ती उभारी, तो जनमाणसांचा दरवळ लवकर सर्व संकटावर मात करून मुंबईला प्राप्त होणार आहे.

फाईव्ह गार्डनच्या सिग्नलचे, लाला, हिरवा, पिवळा सर्व सिग्नल एकाच वेळी चालू होते. नक्की काय सांगायचे होते या सिग्नलला, सगळे रंग एकाच वेळेला दाखवून?

सायन हॉस्पिटल पुढे आलो आणि मनात गाणे तरळले, खास मुंबईसाठी ....

 "धड़कनों में तू .....
धुंदलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू ...

हळव्या दवात भिजली पहाट तू....

हळूवार सांज की चांदरात तू ....

शब्दाविना बोलणारा .....

स्पर्शातूनि सांगणारा .....

मुका गोड अनुराग तू ....

आता कुर्ल्याला पोहोचलो आणि तेथील "ही गुलाबी हवा..... वेड लावी जिवा..." या भाव अवस्थेत रममाण झालो.

गोदरेज गार्डनकडे पोहोचलो, रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती.  हिरवी गर्द झाडे त्याच्यावरून खाली येणाऱ्या वेली, त्या वेलीवरून ठिबकणारे पावसाचे थेंब मोत्यासारखे चमकत होते. 


"मै जिंदगीका साथ निभाता चला गया" या गाण्याची साथ, ओलसर रस्त्यावर गाड्यांच्या चाकाचे होणारे आवाज हे अतिशय सुमधुर संगीत या निसर्गात बहरलेले आणि भरलेले होते.  सगळीकडे हिरवेगार वातावरण, ढगांनी आच्छादलेले आकाश, अतिशय अप्रतिम निसर्ग सौंदर्य मी डोळ्यात साठवत होतो.
ठाण्याच्या तीन हात नाक्यावर सायकलपटू प्रियांका भेटली. रोडिओ सायकल घेऊन तिने संथ सुरुवात केली होती. तिला बाय करून पुढे निघालो.

उपवनच्या मुख्य गेट जवळ आलो. येथे पूजा,कौस्थुभ, आदित्य, बलजीत, बलवंत, मयुरेश, कुलथे दादा, शेट्टी, अतुल, राजेश, अरुणा यांची भेट झाली. वातावरण अतिशय मस्त होते. येऊरच्या डोंगरावर धुकं पसरलं होतं.
बलवंतने चहा बिस्कीट, आदित्य काकाने अमृततूल्य काढा, कुलथे दादांनी खजूर आणले होते. आज खूप दिवसांनी सर्वांची  भेट झाली होती. आदित्य काकाने (YBC शंभर टक्के) वॉटर प्रूफ बॅग आणली होती. खास पावसाळ्यात वापरात आणण्यासाठी उपयुक्त बॅग होती.

येथून आम्ही ब्रिजेशाला भेटायला गेलो. तेथून आदित्य काका आम्हाला वसंत विहार येथील गौरव स्वीट मध्ये घेऊन आला.  येथे समोसा, कचोरी, पट्टी समोसा आणि रसमलाई  आदित्यने आग्रहाने खाऊ घातली. 

अतुल म्हणाला, ' मी घोडबंदर वरून जाणार आहे. मी त्याला होकार दिला. सर्वांना सी ऑफ करून अतुलच्या नेतृत्वाखाली घोडबंदरकडे राईड सुरू झाली.
आज पुन्हा गायमुख येथे थांबलो, खाडीच्या पाण्यात उतरलो. एका बाजूला मोठी होडी उभी होती, तेथे खुपशे आझाद कावळे फिरत होते. 
येथेच दशक्रिया विधिसाठी घाट बांधण्यात आला आहे. येथील खाडीच्या  किनाऱ्याला बांधलेल्या चौपाटीला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे.
 तेथून पुढे चायना क्रीक जवळ आलो. अतुल जुन्या चायना ब्रिजवर घेऊन गेला. त्या ठिकाणी शूटिंग होते, असे अतुल म्हणाला. आज अतुल आणि मी स्टार होतो निसर्गाचे. 
फोटो काढून पुढे निघालो. पुढे "रिव्हर विव्ह हॉटेल" जवळ पाणी प्यायला थांबलो. हॉटेल मधील माठातील थंड पाणी बाटलीत भरून घेतले. सुंदर हिरवळीवर फोटो काढले. हॉटेलचे लॅन्डस्केप अतिशय सुंदर होते.  हात सॅनिटाईज करून पुढची राईड सुरू झाली
 घोडबंदर नाक्यावरच्या फाउंटन हॉटेल कडून मुंबईकडे वळलो. मीरा भायंदर पुलाकडे वळसा घेऊन मॅक्सअस मॉलकडे निघालो. नाक्यापासून सात किमी आत भायंदर गावात अतुलच्या मुलीच्या घरी पोहोचलो. अतुलचे व्याही घरी यायचा आग्रह करत होते, पण घरात जाणे टाळले. लिंबू सरबत पिऊन परतीचा प्रवास सुरू झाला.
 दुपारचे साडेबारा वाजले होते. येथून 45 किमी राईड करायची होती. ऊन चढले होते त्यामूळे राईड हळू झाली. गोरेगावला आल्यावर रत्ना हॉटेल जवळ हायड्रेशन ब्रेक घेतला. अतुलला येथेच रामराम करून पुढची सोलो साइड सुरू झाली. उन्हे वाढल्यामुळे सतत पाणी प्यावे लागत होते. खारच्या संत निरांकरी ब्यास आश्रमा समोर सायकल पार्क केली आणि चक्क पंधरा मिनिटे फूटपाथवर बसकण मारली. पाय बोलू लागले होते. सोबतची बिस्किटे पाण्याबरोबर खाल्ली. तरतरी आल्यावर शेवटची घरापर्यंतची राईड झोकात झाली.
आज अतुलमुळे घोडबंदर वरील दोन निसर्गरम्य ठिकाणे जवळून पाहता आली. तसेच 110 किमी राईड करता आली. 

गम्मत आहे... अतुलची ओळख जेमतेम वर्षभराची असेल... सायकलिंगच्या समान धाग्याने तो आझाद पंछी बरोबर जोडला गेला आहे. आज तो आझाद पंछीचा स्टार रायडर आहे.

आजची निसर्गाकडून निसर्गाकडे जाणारी राईड बहारदार झाली होती.

सतीश जाधव