Monday, April 29, 2024

दापोली सागरी सायकल सफर आणि चिपळूण उन्हाळी सायकलिंग... २८.०४.२०२४

दापोली सागरी सायकल सफर आणि चिपळूण उन्हाळी सायकलिंग... २८.०४.२०२४

मोटारकारच्या  मागे सायकल लावून... मुंबई वरून पहाटे साडेचार वाजता सहकुटुंब दापोलीला पोहोचलो...

सायकल उतरवून घेतली... कुटुंबिय चिपळूण येथील खेर्डी गावात गेले... पहाटे दापोली सायकल क्लबचा सक्रिय कार्यकर्ता अंबरीश गुरव स्वागताला तयारच होता... सायकल असेंबल करायला त्याने मदत केली... 

ताबडतोब फ्रेश  होऊन पहाटे साडेपाच वाजता सुरू होणाऱ्या  दापोली समर  सायक्लोथॉन साठी तयार झालो....

हळूहळू या सायकल वारीत भाग घेणारे सदस्य येऊ लागले...  मुंबई वरून डॉ. चिमा, प्रवीण कुलथे, महेश दाभोळकर, छत्रपती संभाजीनगरचा  अनंत सहस्त्रबुध्ये, खेडचा विनायक वैद्य, मुंबई वरून सायकलिंग करत आलेला चिन्मय फोंडबा, तसेच धनंजय, सुवर्णा आणि हर्षदा यांच्या भेटी झाल्या... जेव्हा  घनिष्ट मित्र वेगळ्या प्रदेशात सायकलिंग साठी एकत्र येतात तेव्हा आनंदाला पारावर रहात नाही...

दापोली वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर चमू आमच्या सेवेला हजर झाला...  बघता बघता जवळपास २०० सदस्य... या सायकल वारीसाठी एकत्र आले होते... 

दापोलीच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांनी गणपती बाप्पा मोरया घोषणा देऊन सकाळी साडेपाच वाजता वारीची  सुरुवात करून दिली... 

पहाटेच्या वेळी दापोली ते हर्णे पर्यंत वळणावळणाचा आणि उताराचा रस्ता भन्नाट वेगाचा होता... सायकल कंट्रोल करत या मार्गावर सायकलिंग करणे अतिशय कुशल काम होते... जुक बॉक्स वर "हरहर शंभोचा" नारा देत...  हा पल्ला सफाईदारपणें पार झाला होता...


पाजपंढरी येथील राम मंदिरातील ... रामधुन ऐकून मन एकदम प्रसन्न झाले... तेथून पुढे जाणारा  घाट रस्ता टाळुन जुईकर गावाच्या समुद्र किनाऱ्याने जोग नदीवरील अंजर्ले पुलावर आलो... 

सव्वा सहा वाजता छान उजाडले होते... जोग नदीच्या खाडीत समुद्रातून आलेल्या मासेमारी नौका विसावल्या होत्या... अशा सुंदर लोकेशनवर फोटो काढणे क्रमप्राप्त होते...


सोबत धनंजय, सुवर्णा आणि हसरी हर्षल होती... अंबरीशने लवकर पुढे यायच्या सूचना दिल्या...

अर्ध्या तासात आंजर्ले ताडाचाकोंड येथील समुद्र किनाऱ्यावर पोहोचलो... येथून डॉल्फिन दर्शन होते... अतिशय सुंदर अशा धुकाळलेल्या वातावरणात सागराची गाज ऐकणे ही पर्वणी होती...

पूर्वेकडून आसमंतात उगवणाऱ्या सूर्याला... सागर लाटांच्या गाजेने खुणावत होता ... मित्राला साद घालत होता... आंजर्ले द्वीपगृहाच्या मागून उदयाला येणारा सूर्य आपल्या तांबूस सोनेरी किरणांनी सागराला प्रतिसाद देत होता...

आपल्या प्रभा किरणांचा वर्षाव आसमंतात करत होता...  निसर्गाच्या या विविधरंगी लपंडावाने... मनाची सूरमयी सतार झांकरत होती... ऊर्जेचा स्रोत रोमरोमात ठासून भरत होती...

अशा वेळी हर्षलचे बालपण एकदम खुलत होते... लहानपणी सायकल बरोबर केलेली मस्ती... ती पुन्हा जगत होती... 

आता आंजर्ले ते आडे सायकल सफर सागरी किनाऱ्याने सुरू होती... चढ उताराच्या नितांत सुंदर अशा  आंजर्ले समुद्र किनाऱ्यावरून हर्षल आणि सुवर्णा प्रथमच राईड करत होत्या... पहाटेची ओहटी जुक बॉक्सवर लागलेल्या गाण्यांना... दूरवर आवाज करत पसरणाऱ्या लाटांनी पार्श्वसंगीत देत होत्या...  प्रभात वाऱ्यातून संगीताचे तराणे झुळझुळत होते... विहंगांचे चिवचिव गाणे... सायकलवर तरंगणाऱ्या जिवाला मदहोश करत होते...

याच बोहोषीमध्ये आडे पुलावर पोहोचलो... 

पुलावर हायड्रेशन पॉइंटवर अल्पोपहार आणि सरबत होते... तब्बेतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टर टीम हजर होती... डोक्यावर सरबताचे ग्लास ठेऊन जाखडी नृत्य केले...


तरुण डॉक्टर मंडळी एकदम भारावून गेली होती... "आम्ही अँब्युलन्स घेऊन येण्या ऐवजी तुमच्या बरोबर सायकलिंग करायला हवे होते... असे उद्गार डॉ. मारकड यांनी काढले... सायकलिंगसाठी तरुणांना प्रेरित करणे हा आम्हा वरिष्ठ तरुणांचा उद्देश सफल होत होता... येथे तीस किमीची सफर पूर्ण झाली होती...  परममित्र संजय सावंत भेटण्यासाठी खास केळशी वरून आला होता...

परतीच्या सफरीत आंजर्ले पुलावरून घाटाच्या रस्त्याने गेलो... चिपळूण जवळील कुंभार्ली घाट सायकल वारीची तयारी त्यामुळे होणार होती... सर्वांना एका दमात... न थांबता तो घाट चढायला सांगितला... आणि सर्वांनी तो पूर्ण पण केला...

त्यानंतर आंजर्ले मधील व्हीसलिंग व्हेवज आणि साई सावली रिसॉर्टवर अल्पोपहाराची व्यवस्था होती...

येथील खडकाळ किनाऱ्यावरून  सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या लोकेशन वर मनमुराद फोटग्राफी केली...

सालदुरे गावावरून दापोली घाट सुरु झाला... हा नऊ किमीचा घाट न  थांबता न थकता चढायचा होता... सर्व साथीदारांनी हे आव्हान तासाभरात सहज पार केले...  

सकाळी साडेपाच वाजता सुरू झालेली ६० किमीची दापोली सायकल वारी  पावणे दहा वाजता... सव्वाचार तासात सुफळ संपूर्ण झाली होती... सर्वांनी झोकात ही वारी पूर्ण केली होती... 

उपमा, केळी, चहाचा अल्पोहार घेतल्यावर सन्माननीय पाहुण्यांना मेडल आणि प्रशस्ती पत्रकासह दापोली सायकल क्लबचे सन्मानचिन्ह सुध्दा देण्यात आले... सर्वांचे फोटो सेशन सुरू झाले...  

पुढील  सायकल वारीसाठी दापोली सायकल क्लबला भरगोस शुभेच्छा दिल्या आणि अंबरीश गुरवला जादुकी झप्पी दिली... आणि चिपळूण जवळील खेर्डीकडे खडतर सायकल सफर सुरू झाली... 

दापोली ते चिपळूण ही पुढील ६२ किमीची राईड भर उन्हात करायची होती..

बऱ्याच जणांनी अशा उन्हात सायकलिंग करू नका असा सल्ला दिला होता...

जगातील सर्वात उंचावराचा रस्ता... लडाख मधील उमलींगला पास  (१९०४५ फूट)...  येथे सायकल सफर करणार आहे जुलै महिन्यात... त्याच्या पूर्व तयारी साठी विपरीत परिस्थितीत सायकलिंग करण्याची मानसिकता अजमावण्यासाठी... रखरखत्या उन्हात ४० अंश सेल्सिअस मध्ये सायकलिंग करण्याचे स्वतःलाच आव्हान दिले होते...

सोबत भरपूर पाणी होते... चॉकलेट आणि केळी होती... 

दापोली ते खेड भरणा नाका पर्यंतचा रस्ता चढ उताराचा आणि  झाडाझुडपातून जाणारा  होता... उन्हाचा तडाखा सुसह्य वाटत होता... खेड बस स्टँड जवळील भूषण सूर्वेच्या हॉटेल मध्ये थंडगार सोलकढी  तर भरणा नाक्यावर स्मार्ट बाजारात अमुल ताक आणि लस्सी प्यायलो... भरणा नाक्यावरून वळल्यावर मुंबई गोवा हायवेवर आता खरा कस लागणार होता... 

दुपारचा एक वाजला होता... भोस्ते घाट सुरु झाला... वेडीवाकडी वळणे, सिमेंटचा रस्ता... कठीण चढ आणि उन्हाचा भर... यात घाट चढण्याचे आव्हान होते... दर दहा मिनिटांनी थांबून केळी, चॉकलेट, पाणी खात-पित होतो...


अर्ध्या तासात घाट पार करून एका राजस्थानी धाब्यावर थांबलो... नेमका त्याच्याकडे अर्धा लिटर ताकाचा सॅचे होता.. मालक दिनेशने स्वतःसाठी आणलेला सॅचे मला दिला... आपण जेव्हा एखादं काम मनापासून करतो...  तेव्हा सर्व सृष्टी तुम्हाला मदत करते... याची प्रचिती आली... सर्व पाणी संपले होते... ब्लॅडर भरून घेतला... हात पाय डोके पाण्याने ओले केले... आणि पंधरा मिनिटे विश्रांती घेऊन पुढील सफर सुरू झाली...

हायवे सुद्धा चढ उताराचा होता... ऊन एकदम बहरात आले होते... वाफाळलेले वारे वहात होते... घामाच्या धारा ओसंडून वहात होत्या... काचा बंद करून गाड्यानीं जाणारी माणसे... काच खाली करून स्तिमित नजरेने न्याहाळत होती...  पुढच्या पेट्रोल पंपावर पुन्हा ब्लॅडर पाण्याने भरून घेतले...संपूर्ण अंग ओले केले...  अतिशय धीम्या गतीने  पेडलींग सुरू केले... 

लोटे परशुराम घाटाच्या पायथ्याला शिरकाई गुळाचा चहा मिळाला...


टप्पा आवाक्यात आल्यामुळे ऊन आनंददायी झाले होते... वारे गुलाबी झाले होते... 

लोटे गावातून परशुराम घाट चढणे सोपे होते... परंतु उतारावर सायकल कंट्रोल करणे जिकरीचे होते... पुढे बहाद्दूर शेख नाक्यापर्यंत धुळीच्या रस्त्यातून मार्गक्रमण करावे लागले... दुपारी साडेचार वाजता घामाने आंघोळलेल्या परिस्थितीत खेर्डीला भाचे जावई सुनीलच्या घरी पोहोचलो... 

आज दिवसभरात १२१ किमी राईड झाली होती...

आदल्या रात्रभर मोटारकारने सफर करून पहाटे पासून सायंकाळपर्यंत सायकलिंग करताना वातावरणातील बदल आनंदाने अनुभवले होते... 

स्वतःला दिलेले एक अवघड आव्हान... सहज पेलले होते...

विपरीत परिस्थितीत... आणि प्रचंड उन्हात सायकलिंग करू शकतो... याची तपासणी झाली होती...त्यात पूर्ण यशस्वी झालो होतो...

मन कणखर असेल तर सर्व शक्य आहे...

जिंदगी एक सफर है सुहाना...

जय श्री राम* 🚩🚩

Wednesday, April 24, 2024

बोईसर फ्लायर्स सायकल संमेलन... आणि मुंबई-ठाणे ते बोईसर सायकल वारी... दि. २० एप्रिल २०२४

बोईसर सायकल संमेलन... आणि मुंबई-ठाणे ते बोईसर सायकल वारी... दि. २० एप्रिल २०२४

सायकल संमेलनासाठी... बोईसर पर्यंत राईड करत येणार... हे ऐकूनच बोईसर फ्लायर्सच्या सदस्यांना आनंद झाला होता... आम्हा पाच जणांच्या टीम मध्ये दोन महिला आहेत... हे समजल्यावर त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही...

सुवर्णा, हर्षदा आणि संभाजी या तीन जणांच्या टीमने पहाटे चार वाजता ठाण्यावरुन तर माझ्यासह नवनीतने  पहाटे साडेतीन वाजता मुंबईच्या सिध्दीविनायक मंदिराकडून सुरुवात केली... ते निव्वळ दुपारच्या उन्हाचा तडखा  लागू नये या साठीच... सर्वजण बरोब्बर साडेपाच वाजता घोडबंदर येथील फाऊंटन हॉटेल जवळ एकत्र आले...

प्रचंड ट्रॅफिक मध्ये पुढील राईड सुरू झाली... एकमेकांना फॉलो करत... तासातासाने हायड्रेशन घेत राईड सुरू होती... दहा वाजायच्या आधी हायवे पार करायचा असा निर्धार होता...

सुवर्णा आणि हर्षदा आता पट्टीच्या रायडर झाल्या होत्या... सुवर्णाची तर ही पहिलीच शतकी राईड होती... उन्हातान्हात कशी राईड करणार याची घरच्यांना चिंता होती... त्यावर महिलांनी तोडगा काढला होता... काही अडचण आली तर ट्रेनमध्ये सायकल टाकू आणि पुढे जाऊ... परंतु राईड पूर्ण करायची हाच मनोमन  निर्धार होता... 

प्रचंड धूळ आणि ट्रॅफिक यांचा सामना करत पावणेनऊ वाजताच सकवार येथील रामकृष्ण मिशन केंद्रात गेलो... अतिशय शांत, निर्मळ आणि अध्यात्मिक वातावरणात सर्वजण एकदम प्रसन्न झाले... नवनीतच्या ओळखीमुळे केंद्रामध्ये अल्पोपहाराची व्यवस्था झाली... कांदापोह्या सोबत फलाहार आणि चहा मिळाला...

येथील बाबाजी आणि माताजींची भेट झाली...

हे केंद्र पंचक्रोशीतील गावकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवते... तसेच गावातील आदिवासी आणि गरीब मुलांना व्यवसायभिमुख प्रशिक्षण देते... मुलांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करते... सर्व उपक्रम मोफत चालविले जातात... मुलांसोबत फोटो काढले... विशेष म्हणजे या सर्व मुलांना सायकल चालवता येत होती...

माताजी पद्मा ताई यांनी विवेकानंद केंद्र संचालित नालासोपारा येथील शारदा शिशु निकेतनला भेट देण्याचे निमंत्रण दिले... सायकलने बोईसरला निघालोय यांचे त्यांना खूप अप्रूप वाटत होते...

स्वामी विवेकानंदांच्या कर्मयोगाचे प्रत्यक्षिकच पाहायला मिळाले...  रामकृष्ण मिशन केंद्रात सेवा देण्याचे मनी ठरविले...  बाबाजी आणि माताजींचे  आशीर्वाद घेऊन पुढे मार्गक्रमण केले...

नंतर हायवे सोडून वरई येथे पालघर रस्त्याकडे वळसा घेतला... .. वैतरणा नदीवरील अरुंद पुलावर पोहोचायला साडेदहा वाजले होते... जेमतेम एक गाडी जाईल एव्हढाच हा पूल आहे... त्यामुळे सिग्नल होते...  पुलाच्या  दोन्ही बाजूला असलेल्या पाईपच्या लोकेशन वर मस्त फोटोग्राफी केली...

पुढे दोन दोन ग्लास उसाचा रस प्यायलो....

ऊन वाढत होते... अंग घामाने भिजून चिंब झाले होते... आणि आता आले सूर्या धरण... धरणातून ओसंडणारे फेसाळलेले पाणी पाहूनच मन आनंदाने बेभान झाले... सायकल कठड्याला लाऊन झोकून दिले सर्वांनी धरणाच्या पाण्यात...

अंगावर पडणाऱ्या जलधारा... संपूर्ण शरीराला मसाज करत होत्या... नाचणे, बागडणे, हुंदडणे, मस्ती करणे, ओरड घालणे... सर्वजण अक्षरश: बालपणात गेले होते... बेहोश झाले होते...


जवळपास पाऊण तास पाण्यात खेळत होतो... कशानेही कोमेजू नये असे एक सुंदर शैशव, बालमन  सर्वांना  लाभले होते... 

तीच बालपणीची प्रचंड ऊर्जा घेऊन ओल्या कपड्यांनीच सर्वजण एका दमात घाट चढले ... वाघोबा मंदिरात पोहोचायला भर दुपारचा एक वाजला होता... पाण्यात भिजल्यामुळे उन्हाचा दाह कोणालाच जाणवला नाही... सुवर्णा आणि हर्षलमध्ये तर आता सायकलिंग करतच बोईसरला पोहोचायचे हा आत्मविश्वास दृढ झाला होता... वाघोबा मंदिराजवळ खूप माकडे असल्यामुळे येथे काहीही खाण्याचे टाळले... 

सोबत घेतलेले ताडगोळे, कलिंगड, आणि रानमेवा जाम शेलवाडी गावाजवळच्या  गर्द वनराईत बसून हडप केले...  बालपण अजूनही ताजे होते... त्यामुळेच झाडाच्या एका फांदीवर सुवर्णा आणि हर्षल उभ्या राहिल्या होत्या...

येथून बोईसर चौदा किमी होते... टप्पा आवाक्यात आला होता... पालघर जवळील शिवाजी चौकाला  वळसा मारून बोईसर गाठले... 

स्टेशनजवळ हसतमुख अक्की उर्फ  आकाश रुपटक्के आम्हाला घ्यायला आला होता... 


तेथून सायकल दुकानाजवळ आलो...   सायकल दुकानदार आणि सायकलिस्ट प्रियेश बरनवाल बोईसरच्या सर्व सायकलींचा डॉक्टर आहे... त्याने फक्कड चहा पाजला... त्याचा भाऊ वरुणकुमार  IAS अधिकारी आहे.

बोईसर फ्लायर्सचे अतिशय आगळे वेगळे व्यक्तिमत्त्व सायकलपटू रामदास जाधव यांनी सर्वांचे जंगी स्वागत केले... शाल आणि आंबा सरबत देऊन सन्मान केला...

आदल्या दिवशीच रामदासने बोईसर ते मुंबई आणि परत बोईसर अशी दोनशे पंच्याहत्तर किमी सायकलवारी अनवाणी केली होती... विकास कोळीसह बोईसर फ्लायर्सचे बरेच सदस्य आमच्या स्वागताला तत्पर होते...  प्रचंड सायकलिंग केल्यामुळे आता काहीही पचणार होते...

सुवर्णाचे बॅचमेट बोईसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि मॅरेथॉनपटू  श्री पवार साहेब यांना भेटायला  पोलीस स्टेशनला गेलो... सुवर्णा भर उन्हात सायकलिंग करत बोईसरला आली याचं त्यांना खूप आश्चर्य वाटले... सर्वांचे त्यांनी कौतुक केले...


आणि झकास लस्सीचा पाहुणचार केला... पवार साहेबांचा निरोप घेताना पोलीस स्टेशनच्या गेट जवळ गृप फोटो काढला...

BARC च्या गेस्ट हाऊस मध्ये राहण्याची व्यवस्था केली होती... विकास म्हणाला...चिंचणी बीच वर जायचे काय... सर्वांनी एकसाथ होकार दिला...सायकलपटू सरिता जारोली हिने डबा भरून कलिंगड काप आणले होते... ते फस्त करून आणि पाऊण तासात तयार होऊन सर्वजण निघाले चिंचणी समुद्रकिनारी... 

सोबत सायकलिंग करत... सरिता, रामदास आणि विकास होते... वाटेत रामदास सोबत गप्पा रंगल्या... एक आगळे वेगळे व्यक्तिमत्त्व संपर्कात आले होते... त्याच्याकडे खच्चून सकारात्मक भाव भरभरून आहे... कमीत कमी खर्चात सायकलने मोठे पल्ले कसे गाठायचे... हे समजले... आपल्या मुलाला राष्ट्रीय पातळीवर बॉक्सिंग मध्ये सुवर्ण पदक मिळेपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असे व्रत आहे रामदासचे... आणि दररोज पन्नास किमी सायकलिंग करतोय पठ्ठ्या... दोन चार दिवस कामामुळे सायकलिंग करता आली नाही तर... एकदम दोन तीनशे किमीचा टप्पा एका दिवसात पार करतो... आहे की नाही ध्येय वेडा... निव्वळ आणि निव्वळ मुलाला प्रोत्साहन मिळावे आणि "तुझ्या मेहनती सोबत मी सुद्धा इप्सित ठेवले आहे" याचीच सतत मुलाला जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न आहे... खरंच या सायकलिंगमुळे  प्रचंड व्यक्तिमत्त्वाची भेट झाली होती... रामदास बरोबरच त्याची नत्थुलाल जैसी मिशी खूप भावली...

वाटेत तारापुरचे अणुवीज केंद्र पाहिले...


जवळपास पंधरा किमी राईड करून चिंचणी बीचवर पोहोचलो... तेथे भेट झाली सहकुटुंब विशाल आणि पूनम राऊतची... 


सूर्यास्ताचे विहंगम दृश्य डोळ्याच्या कॅमेऱ्यात साठवले... भलामोठा लाल तांबूस गोळा हळूहळू सागरात विसर्जित होताना डोळ्याचे पारणे फिटले... 

समुद्रावर खूप वेळ बसून राहिलो... सृष्टीचे मुक संगीत ऐकत.....अगदी मंत्रमुग्ध होऊन... सर्व सायकल मित्रांच्या गराड्यात सुद्धा एकांतात गेलो होतो... कुठल्यातरी एका अगदी अज्ञात अपार्थिव अशा प्रदेशात वावरत होतो...


जिथे मी आणि सागरात डुंबणारा रवी यांखेरीज दुसरे काहीही नव्हते... त्या क्षणाचा कृतार्थतेचा आनंद डोळ्याच्या झरोक्यातून ओसंडून वाहत होता...


चमचमीत आणि चटणीदार वडापावमुळे...
एकांतवास संपवून जनसागरात दाखल झालो... आणि मारला ताव गरमागरम वडापाव वर... 

कृतार्थ मनाने परतीची राईड सुरू झाली... सरिताच्या साथीने भन्नाट वेगात BARC गेस्ट हाऊस मध्ये  पोहोचलो... 

आजच्या दिवसाचा हाय लाईट अजून शिल्लक होता...

रात्रीच्या जेवणात विकास कोळीचा घरातून आलेले पदार्थ रसनेच्या राज्यात घेऊन गेले... भरलेले पापलेट आणि सुरमई फ्राय, घोळीचे कालवण, सुके चिकन, तांदळाची लुसलुशीत भाकरी आणि भात... त्याच्या वर विकासच्या मित्राने... राहुल पाटीलने आणलेली जायकेदार पुरणपोळी या सर्व पदार्थांनी भुकेची तारांबळ उडाली होती... हे खाऊ की ते... असेच काहीसे झाले होते... सर्वांनी जेवणाचा फर्मास आस्वाद घेतला...

बोईसर फ्लायरच्या प्रचंड आदरतिथ्याने  आम्ही सर्वजण स्तिमित झालो होतो... त्यात आजची १४० किमीची सायकल राईड कुठल्याकुठे विरून गेली होती... 

तऱ्हेतऱ्हेच्या सुगंधी फुलांनी भरलेल्या परडीसारखे हे बोईसर फ्लायर्स होते... प्राजक्ताचे झाड हलवल्यावर फुलांचा टपटप सडा पाडवा तसा या बोईसर फ्लायर्सचे सदस्य आमच्या सेवेला तत्पर होते...

सायकल आणि निसर्गावरच्या उत्कट प्रेमाचा साक्षात्कार घडला होता... आणि अकृत्रिम जिव्हाळ्याचे बंध निर्माण झाले होते...

उद्याच्या बोईसर पालघर ड्रीम राईडसाठी निद्रादेवीच्या अधीन झालो...

Friday, April 12, 2024

टकलू टकली की पाठशाला सायकल राईड...

टकलू टकली की पाठशाला सायकल राईड...

 आज घरातली कामे आटपायची असल्यामुळे... सकाळी राईड न करता मेडीटेशन नंतर चोवीस सूर्यनमस्कार केले...

न्याहरी झाल्यावर निघालो बाजारहाट आणि बँकेची कामे करण्यासाठी सायकल घेऊन...

कांदे बटाटे आणणे, ज्वारी बाजरी आणि बेसनचे पीठ आणणे, परिसच्या सायकलची सीट बदलणे, हळू फिरणाऱ्या पंख्यासाठी कपॅसिटर आणणे... ही बाजाराची कामे... तसेच बँक पास बुक अपडेट करणे, लोन स्टेटमेंट घेणे, जुने बँक खाते बंद करणे... ही बँकेची कामे आटपली...

वाटेत परममित्र विकास कोळीचा फोन आला...  परेल येथील कॅनशाळा मुंबई पब्लिक स्कूल  (कॅन्सरग्रस्त मुलांची शाळा) येथून मेडल आणि ट्रॉफी स्विकारण्याचे काम मिळाले... कॅन्सर झालेल्या मुलांची वेगळी शाळा आहे हे पहिल्यांदा कळले... टकलू टकली की पाठशाला असे या शाळेचे विशेष नाव आहे... ४ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्यान ५०० किमी पेक्षा जास्त अंतर सायकलिंग करून विकासला मेडल आणि ट्रॉफी मिळाली होती... याच दिवसात विकासने मुंबई ते अयोध्या सायकल वारी पूर्ण केली होती... त्यामुळे Super Hiros Fighting the Cancer हा बहुमान त्याला मिळाला होता...

विकासच्यावतीनं एखाद्या कॅन्सरग्रस्त मुलाकडून मेडल स्वीकारायचे योजले होते...

 उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे मुलांची भेट झाली नाही... त्यामुळे या सायकल वारीचे संयोजक आणि रिजनल हेड डॉ सचिन तावरे  यांच्या हस्ते पदक आणि ट्रॉफी स्वीकारली..


तसेच  उन्हाळ्याची सुट्टी संपल्यावर  कॅनकिड्स सुपर होरोंना  भेटायचे ठरविले...

लहान वयातच कॅन्सरग्रस्त झालेल्या या मुलांसाठी मनाचा एक कोना अतिशय हळवा झाला होता... आजची वीस किमी राईड या लहान सुपर हिरोंना अर्पण...

मंगल हो... !!! 






Monday, April 1, 2024

अयोध्या वारी...दिवस पहिला... २६ फेब्रुवारी २०२४

अयोध्या वारी...

दिवस पहिला... २६ फेब्रुवारी २०२४

सकाळीच नागपूर स्टेशनमध्ये आगमन झाले. येथील परममित्र दिलीप वरकड आणि प्रदीप देशपांडे यांनी इतर सायकलिस्ट मित्रांसोबत रेल्वे स्टेशनमध्येच गुलाबपुष्प देऊन सर्वांचे स्वागत केले... अरुण नेवसेच्या नागपूरच्या मित्रांनी शुभेच्छासह सुकामेवा पाकीटे  दिली.

नागपूर शहर सायकल वारी सुरू झाली... वाटेत प्रथम नागपूरचे ग्रामदैवत श्री रामाचे दर्शन घेतले...

तेथून झीरो पॉइंटकडे आलो... भारताचा केंद्रबिंदू किंवा मध्य ह्या स्थळाला म्हणतात... 

तेथून हायकोर्ट इमारत आणि  विधानभवन पाहिले... येथील विधानभवनात महाराष्ट्र सरकारचे हिवाळी अधिवेशन भरते... 

वाटेत दक्षिण दावणगिरी लोणी स्पंज डोसाची ट्रीट मिळाली... अतिशय स्वादिष्ट आणि लुसलुशीत स्पंज डोसा जिभेवर ठेवताच विरघळून जात होता...


बाजूलाच असलेल्या चहावाल्या दादांनी चहाचे पैसे घ्यायला नकार दिला... नागपूरची नवीन ओळख मिळाली...

अयोध्या वारी सुरू झाली नागपूरच्या  स्वातंत्रवीर सावरकर चौकातून...  तेथे भेट झालेल्या सेलिब्रिटी आणि जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी DD TV साठी  मुलाखत घेतली...


आणि अयोध्या वारीला शुभेच्छा दिल्या... येथेच नर्मदा परिक्रमा पायी करणारे समाजसेवक श्री संजय कठाळे यांची ओळख झाली...

तेथून सर्वजण दिलीपच्या वरकडच्या घरी निघालो. दिलीपच्या घरचा पाहुणचार एकदम फर्मास होता... त्याच्या घरातील कलात्मकता एकदम भावली... मेडल्स ट्रॉफी आणि प्रमाणपत्रांनी घराचा एक कोनाडा व्यापला होता...


तसेच घराला घरपण देणारे कुटुंबीय आणि त्यांनी केलेला पाहुणचार एकदम फर्मास होता... टुमदार मोठ्या माडीपेक्षा दिलीपचे मन खूप मोठे आहे... याचा प्रत्यय आला...

नागपूर दर्शनासाठी स्थानिक सायकलिस्ट संजय आणि अर्चना बोंगीलवार, विश्वास चाटी, जयंत मेंधी आणि उदय पानवलकर यांनी सायकल साथ दिली... यावेळी खूप गप्पा झाल्या... सर्व सायकलिस्ट मित्रांना मुंबई वारी करण्याचे आमंत्रण दिले...

तेथून जागतिक विक्रमवीर आणि अल्ट्रा सायकलिस्ट डॉ. अमित समर्थाच्या घरी गेलो... एव्हढा मोठा माणूस... नागपूरची शान... आम्हाला "कूछ मिठा हो जाय" ची ट्रीट दिली...

सर्वांना सह्या दिल्या... आणि   झेंडा फडकवून नागपूर ते अयोध्या सायकल वारीसाठी शुभेच्छा दिल्या...

स्वातंत्रवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्तानं... नागपुरात वीर सावरकरांना आदरांजली वाहताना... सेलिब्रिटी आणि प्रतिथयश शेफ विष्णू मनोहर यांची भेट... तसेच अल्ट्रा सायकलिस्ट डॉ. अमित समर्थ यांनी केलेला फ्लॅग ऑफ आणि नागपूरचे सायकलिस्ट यांनी केलेले स्वागत... तसेच दिलीप वरकड व प्रदीप देशपांडे यांनी केलेला पाहुणचार... अरुण नेवसेच्या नागपूरच्या मित्रांनी शुभेच्छासह सुकामेवा पाकीट देणे... या सर्व गोष्टी वारीच्या आरंभाचा शुभसंकेत होता...

दुपारचे बारा वाजले नागपूर वरून पुढे प्रस्थान करायला... देवलापार गावापर्यंत जवळपास पासष्ट किमी सायकल सफर करायची होती... रामसेनेची  अयोध्यावारी एकदम झोकात सुरू झाली होती...

उन्हे चढली होती... त्यामुळे पेडलींगचा वेग अंमळ कमी झाला होता... दर दहा किमी अंतरावर हायड्रेशन साठी थांबावे लागत होते...

  चाळीस किमीवर एका ट्रक मधून दोन रामभक्त उतरले... आणि चहापान घेण्यासाठी आग्रह करू लागले... खंडाळा गावाजवळच्या  धाब्यावर थांबल्यावर... दोघांतील एकजण मालिशवाला निघाला...  राजेश नागपुरे... त्याने सर्वांच्या पायाला ऍक्युप्रेशर करून जबरदस्त मालिश केली...  छोट्या पेन्सिलच्या साहाय्याने पायाच्या बोटांच्या नसा दाबून संपूर्ण पायाचे मसल रिलॅक्स केले होते राजेशने... 

"ज्याची आपण इच्छा करतो... तेच आपल्याकडे चालत येते" या उक्तीचे प्रत्यंतर आले ... रात्रभराचा प्रवास आणि सकाळी नागपूर फिरून सायकलिंगला सुरुवात... यामुळे आलेल्या शिथिलतेला ऊर्जेत परिवर्तित करण्यासाठीच या मर्कटसेनेला हनुमंताच्या रूपाने भेटला होता राजेश... जवळपास पाऊण तासाचा ब्रेक झाला होता...

अंधार पडायच्या आधी थांबणे आवश्यक होते... त्यामुळेच पन्नास किमी अंतरावरील मनसर येथे थांबण्याचा निर्णय झाला...  मनसर येथील सरपंच कैलास नरुळे यांनी गावातील राम मंदिरात राहण्याची व्यवस्था केली .. तसेच जवळील पांडेजीच्या मेसमध्ये जेवणाची सुद्धा व्यवस्था केली... आज नागपूर दर्शनासह एकूण ७५ किमी राईड झाली होती...

वातावरणात गारवा होता... राममंदिर परिसरातील हनुमान मंदिराच्या व्हारांड्यावर झोपण्यासाठी पुजाऱ्याने भलेमोठे जाजम टाकले... अयोध्येला निघालेली वानरसेना महाबली हनुमंताच्या देखरेखीखाली होती... वारीच्या पहिल्याच दिवशी भेटलेल्या प्रत्येक रामभक्ताने आमची काळजी घेतली होती... 

ज्या वाटेने आम्ही निघालो होतो... तीच्यावरचा प्रवास हा स्वतःच स्वतःचे सार्थक होता... 

कृतार्थ मनाने झोपेच्या अधीन झालो...

जय श्री राम...