Friday, August 9, 2024

हानले ते चिशूमुले व्हाया फोटीला पास...उमलिंगला पासची रंगीत तालीम...२४ जुलै २०२४...

हानले ते चिशूमुले व्हाया फोटीला पास...
उमलिंगला पासची रंगीत तालीम...
२४ जुलै २०२४...


हानले मधील माझा मित्र दोरजे याच्या पद्मा होम स्टे मध्ये राहिलो होतो... त्या रात्री आकाशगंगा दर्शन झाले... अगणित तारे पाहिले... पृथ्वी भोवती फिरणारे सेटलाईट पाहिले, उल्कापात पाहिले... शनी भोवती असणारे कंकण आणि त्याच्या भोवती फिरणारे चंद्र पाहिले...

लडाख मधील हानले हे गाव आकाशातील तारे दर्शनासाठी विख्यात आहे. येथे बंगलोर खगोल विज्ञान केंद्राची मोठी वेधशाळा आहे... तसेच BARC  च्या सात मोठ्या दुर्बीण येथे आहेत... देशविदेशातून खगोल शास्त्रज्ञ हानले गावात आकाश दर्शनासाठी येतात... परंतु येथे प्राणवायूची कमतरता जाणवते... ज्यांना श्वसनाचे विकार नाहीत त्यांनी जरूर हानलेला भेट द्यावी...

आता खऱ्या अर्थाने अपहिल सायकलिंगला सुरुवात झाली  हानले वरून... हानले आहे १५३०० फुटावर... उमलिंगला पास सर करण्याआधी... पहिले चॅलेंज होते फोटीला पास सर करण्याचे...  फोटीला पास आहे १८१२४ फुटावर... ह्या फोटीला टॉपचे हानले पासून अंतर आहे २९ किमी... तेथून ४० किमी अंतरावरील  चिशुमुले गावात १६२०० फुटावर खाली उतरायचे... आणि तेथून १९०२४ फूटावरील उमलिंगला पास पादाक्रांत करायचे... हानले गाव ते उमलिंगला पासचे अंतर आहे ९४ किमी... 

ही माहिती एवढ्याच साठीच की... धेय्य किती कठीण आहे याची कल्पना यावी...  एक पास सर करून खाली यायचे आणि दुसरा पास सर करायचा... पण हे चॅलेंज स्विकारले होते... परेशने सुद्धा...

सकाळी चार वाजता उठून प्रातर्विधी आटपल्यावर मेडीटेशन झाले... त्यानंतर दोन्ही सायकलींची तपासणी झाली... चेन व्यवस्थित साफ करून त्यामध्ये सिलिकॉन लुब टाकले. सायकलचे सर्व पार्ट व्यवस्थित काम करत आहेत याची खात्री केली... पुढील मुख्य सफरीसाठी लागणारे आवश्यक तेवढे सामान घेऊन उर्वरित सामान पद्मा गेस्ट हाऊस मध्ये ठेवले... 

पद्मा दिदीने आम्हा दोघांसाठी सकाळी सहा वाजता नाष्टा तयार केला होता... भरपूर कॉर्नफ्लेक्स दूध आणि ब्रेड आमलेट खाऊन हानले गावातून सायकल सफरीला सुरुवात झाली फोटीला पासकडे.. सोबत दोघांकडे तीन तीन लिटर पाणी आणि ड्रायफ्रूट लाडू, प्रोटीन बार, तसेच खजूर वड्या होत्या...

पद्मा होम स्टेच्या मालकीण बाई पद्मा दिदीने सायकल सफरीला शुभेच्छा दिल्या... तिच्या मुलांनी आम्हा भोवती त्यांच्या छोट्या सायकली चालवून  रिंगण केले...
तेव्हा पंढरीच्या वारीच्या रींगणाची आठवण झाली... .. पद्मा दिदीचा नवरा सोनम दोरजे यानेच मागील लडाख सफरीत जेव्हा संजय आणि मी हनलेला आलो होतो तेव्हा खगोल वेधशाळा आणि हबल दुर्बीण दाखविली होती...

सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली सायकल सफरीला... हानले नाल्या पर्यंतचा दोन किमी रस्ता ऑफ रोडींग होता... सकाळीच सुरुवात झाली होती खडतरतेने... आणि हीच पुढील कष्टदायक सायकल सफरीची नांदी होती...

फोटीला पासच्या मुख्य रस्त्यावर आलो... हा रस्ता चकचकीत डांबरी रस्ता होता... येथून चढाला सुरुवात झाली... फोटिला टॉप होते २७ किमी अंतरावर आणि एलिव्हेशन  होते २८२४ फूट...तेथ पर्यंत वर वर चढत जायचे... म्हणजेच पाव एव्हरेस्टींग पेक्षा जास्त... आणि येथील विरळ वातावरणामुळे ते आणखी कठीण होते...

प्रत्येक दोनशे फुटावर विश्रांतीसाठी आणि गाड्या पास होण्यासाठी  बायपास कॅरिडॉर बनविला होता... तेथे आम्हा दोघांना थांबून दम घेण्यासाठी सोईचे झाले होते... प्राणवायूची कमतरता... त्यामुळे कोठेही मोठी झाडे नाहीत... अतिशय धीम्या गतीने पण दमदार पद्धतीने सायकलिंग सुरू होती...

वर चढत जाणाऱ्या वळणावळणाच्या रस्त्यामुळे दोन तासात फक्त आठ किमी अंतर कापले होते... पाणी संपत आले होते... आणि आणखी वर चढल्यावर कोठेही पाणी मिळण्याची शक्यता नव्हती... पुढच्या वळणावर तंबू दिसत होता... परेशला सांगितले... तेथे पाणी मिळेल... आपल्या बाटल्या टॉपअप करून घेऊया... 

सायकल रस्त्याच्या कडेला आडव्या करून ठेवल्या... तंबुकडे जाण्यासाठी एक चर पार केला... तेवढ्यात पलिकडच्या कुंपणात बांधलेला कुत्रा भुंकू लागला... परंतु कोणीही माणसं दिसत नव्हती... मोठ्याने जुले-जूले म्हणून ओरडलो (जुले-जूले म्हणजे लडाखी नमस्कार)... तरीही कोणाचा प्रतिसाद मिळेना... लक्षात आले हा तंबू बकरवाल लोकांचा आहे... आपल्या भेडबकऱ्या घेऊन ते कुरणाच्या दिशेला गेले होते... परंतु त्यांना माहीत होते... या मार्गाने वर चढणाऱ्या गाडीवाल्यांना पाण्याची गरज लागणार आहे... तेव्हा त्या तंबू बाहेर दहा लिटरचा पाण्याचा ड्रम भरून ठेवला होता... अपरोक्ष मदतीचे  हे जिवंत उदाहरण होते... बाटल्या टॉपअप केल्या... त्या बकरवाल माणुसकीला मनापासून शुभेच्छा दिल्या आणि पुन्हा फोटीला टॉप कडे चढाई सुरु झाली...

वर चढत जाणारा वळणावळणाचा रस्ता सुरू झाला... पंधरा किमी अंतर पार केले होते... दमछाक व्हायला सुरुवात झाली होती... दोघे एकमेकांना फॉलो करत होतो... कडक ऊन आणि वाहणारे थंड वारे... अशी विपरीत परिस्थिती... तोंडाने श्वास घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते... वळणे संपत नव्हती आणि टॉप सुद्धा दिसत नव्हता... कोणत्याही गाडीचा मागमूस नाही... खरचं आम्ही योग्य दिशेने जातो आहोत काय... याचा संभ्रम निर्माण व्हावा... 

वर चढत जाणारी जवळ जवळ सोळा वळणे पार केली ... पण वळणे संपण्याचे नाव नव्हते... गियर्स एक एक वर ठेऊन सुद्धा सायकल झिक झ्याक करावी लागत होती... एका ठिकाणी पाणी प्यायला थांबलो असताना... एक सेल्फ सपोर्ट, सोलो ब्रिटिश सायकलिस्ट आम्हाला ओव्हर टेक करून पुढे गेला... त्याला लाडू ऑफर केला... परंतु टॉपला पोहोचायची त्याला घाई होती...

टॉप यायला शेवटचे एक किमी राहिले होते... दोघांचा स्टामिना संपत आला होता... वाटेत कुठेही ढाबा किंवा चहा टपरी नाही... सुकामेवा लाडू खजूर वडी खाऊन एनर्जी वाढविण्याचे प्रयत्न सुरू होते... 

वातावरण ढगाळ होत चाललेले... दुपारचे दिड वाजले होते... जसे जसे टॉप कडे चढत होतो... तसे तसे वाऱ्याचे जोरदार वाहणे सुरू झाले... हेड विंड उलट सुलट दिशेने वाहू लागली... निसर्ग जणूकाही आमची परीक्षाच पाहत होता...

 तेव्हढ्यात एक पीक अप व्हॅन मागून येताना दिसली... परेशने तिला हात दाखवला... व्हॅन थांबली... आम्ही गाडीचा आसरा घेतला... जणूकाही परमेश्वरानेच तिला पाठवले असावे... पण खरी परीक्षा पुढे होती... 

त्या गाडीत लोखंडी सळ्या... जाड टोकदार तारेने बांधून... त्याच्या मोठ्या फ्रेम करून गाडीत खाली टाकल्या होत्या... त्यावर दोघांच्या सायकल चढविल्या... गाडीवान आम्हाला फोटीला टॉप पर्यंत सोडायला तयार झाला...

गाडी वळणे घेत घाट चढू लागली तेव्हढ्यात एका वळणावर मागे भेटलेला ब्रिटिश सायकलिस्ट धापा टाकत थांबला होता... त्याला पाण्याची गरज होती... पाणी दिले... सायकल ढकलत तो चढ चढत होता...

 पुढे... काल भेटलेली बंगलोरची सोलो सायकलिस्ट सोनल अग्रवाल भेटली... पाणी संपल्यामुळे तीच्या कमरेत क्रॅंप आला होता... हातात सायकल धरून अतिशय रडवेल्या चेहऱ्याने रस्त्यात बसली होती...

सायकलसह तीला गाडीत घेतले... भरपूर पाणी प्यायल्यावर ती स्थिरस्थावर झाली... अजून तीन लूप गाडी वर चढणार होती... दोन लूप झाले आणि फुसफुस असा आवाज कोणत्या तरी सायकल मधून आला... परेश म्हणाला कोणाची तरी सायकल पंचर झाली आहे... माझ्या सायकलचे पुढचे चाक पंचर झाले होते...

गाडी फोटीला टॉप वर आली... तिघेही सायकल सकट खाली उतरलो... गाडीवाल्याला बिदागी दिली... तो नको म्हणत होता... पण देवासारखा तो आमच्या मदतीला धाऊन आला होता... 

टॉप वर प्रचंड वारे सुरू झाले होते... तातडीने सायकलचे पुढचे चाक काढून पाहिले...  तिचा टायर बाजूने पूर्ण फाटला होता... आणि ट्यूबला चार ठिकाणी होल पडले होते... दुसरी ट्युब सोबत होती पण नवीन टायर कुठून आणणार... गाडीत असलेल्या लोखंडी सळ्यांना बांधलेल्या टोकदार तारांनी आपले काम चोखपणे केले होते... 
तेव्हढ्यात परेशने आपल्या पोतडीतून रबर पॅच काढला... सोनलने रबर सोल्युशन काढले... टायरला आतून मोठा आणि बाहेरून छोटा पॅच लावला... नवीन ट्यूब टाकली... थंडी वाढली होती... पंपने ट्यूब मध्ये हवा भरताना... धाप लागली... मग परेशने हवा भरली... सर्ली पुन्हा सज्ज झाली राईड साठी... हे सर्व कामकाज संपेपर्यंत सव्वा तीन वाजले होते...

१८१२४ उंचीवराच्या फोटीला टॉपला फोटो सेशन झाले...

विशेष म्हणजे या टॉपवर शंकराचे मंदिर होते... देवदर्शन करून उताराची राईड सुरू झाली फोटीले गावाकडे... मध्ये मध्ये ऑफ रोडींग रस्ता होता.. सर्लीची काळजी घेणे अतिशय आवश्यक होते... ऑफ रोडींग उतारावर धिम्या गतीने सर्ली उतरत होती... नागमोडी वळणे घेत...  २९ किमी खाली उतरलो... फोटीले हे गाव अतिशय लहान असून तेथे होम स्टे ची व्यवस्था नव्हती... सायंकाळचे पाच वाजले होते... ऊन कमी झाल्यामुळे थंडी वाढायला लागली होती... 

आता  येथून बारा किमी अंतरावरील चिशुमुले गावात टेन्ट स्टे व्यवस्था होती... नदीच्या उगमच्या दिशेने जाणारा रस्ता असल्यामुळे पुन्हा चढ सुरू झाला होता... तिघांची ही खूपच दमछाक झाली होती...

चार किमी चढ चढून एका लोखंडी पुलावर आलो... तेव्हढ्यात खालच्या नाल्यातून एक कँपर नाला ओलांडताना दिसला... जोरात ओरडून कँपरला हात केला... तो मुख्य रस्त्यावर येई पर्यंत त्याच्या जवळ पोहोचलो... आणि ड्रायव्हरला चिशुमुले गावापर्यंत सोडण्याची विनंती केली... किसन ड्रायव्हरने विनंती मान्य केली... पुन्हा तीनही सायकल लोड करून चीशुमुले गाव गाठले... हे गाव नसून मिलिटरी कॅम्प होता... आणि नदीच्या किनारी टेन्ट स्टे ची व्यवस्था होती...

 आमच्या सोबत असलेली सोनल मोटार सायकलने येथे येऊन गेली होती...  तिच्या ओळखीमुळे आमची अतिशय स्वस्तात  राहण्याची व्यवस्था झाली... येथे नेट किंवा वायफाय व्यवस्था नव्हती... एक विशेष गोष्ट घडली माझ्या मोबाईलचा टाईम बदलला होता... सायंकाळचे आठ वाजले असताना माझा मोबाईल रात्रीचे दहा वाजून वीस मिनिटे वेळ दाखवत होता... चीनचा टाईम झोन मोबाईल दाखवत होता... म्हणजेच चीनचे नेटवर्क येथे चालत होते...

क्षणाक्षणाला बदलणाऱ्या वातावरणामुळे... तसेच आलेल्या सर्व अडचणींना सामोरे जाऊन त्या सोडवत... उमलींगला पासचा पहिला टप्पा पार केला होता...

मनाचा आणि शरीराचा कस लावणारी आजची राईड होती... आता १६३०० फुटावर पोहोचलो होतो... उद्या यापेक्षा खडतर टप्पा होता... 

रात्री राजमा राईस खाऊन झोपेच्या अधीन झालो... आज ६९ किमी राईड झाली होती... 

फोटीला टॉप वर  फाटलेला फुटलेला टायर पाहिला तेव्हा क्षणभर असे वाटले की ही सायकल वारी आता सोडावी लागते की काय... ही सुद्धा परीक्षा होती... परेश आणि सोनलच्या साथीनं त्यात उत्तीर्ण झालो होतो... 

देवाजीच्या मनात आणखी काय काय आहे याचा थांग उद्या लागणार होता...

क्लायमॅक्स पुढच्या पोष्ट मध्ये...

जय श्री राम...

Tuesday, August 6, 2024

रोंगो ते हानले सायकल वारी. २३.०७.२०२४

रोंगो ते हानले सायकल वारी... २३.०७.२०२४

सकाळी रोंगोच्या कुंझांग स्पल होम स्टे मधून प्रस्थान केले... 


कुंझा दिदीने सकाळी नाश्त्याला ब्रेड आमलेट आणि चहा दिला... रात्रीचे जेवण सकाळचा नाष्टा आणि राहण्याचे दिदीने  दोन हजार रुपये घेतले... विशेष म्हणजे रात्रीच्या जेवणात लडाखी साक भाजी वरण भात आणि चपात्या दिल्या होत्या... खुप दिवसांनी चपात्या खायला मिळाल्याने रात्री चापून जेवलो...

आजची हानले पर्यंतची सफर होती... ४३ किमीची... पण चढत जाणारा रस्ता... आणि हेडविंड यामुळे ही सफर थोडी खडतर होती...

विस्तीर्ण पसरलेले पठार त्यातून संथ गतीने वाहणारी सिंधू नदी आणि आजूबाजूचा खुरट्या हिरवळीचा प्रदेश... त्याच्या आजूबाजूला परतलेली वाळू... आणि विविध रंगी डोंगरांच्या रांगा... त्या वरील निळ्या आसमंतात पुंजक्या पुंजक्याने विहरणारे पांढरे ढग... एक अनामिक ओढ लावत होते... विचारांना... जाणिवेला... असीम, अगणित, अनंत अशा या विधात्याने किती निसर्ग संपन्न बनवला आहे... माझा भारत देश... विविध भाषा, विविध संस्कृती, विविध प्रदेश, विविध वातावरण परंतु एका सूत्राने एकमेकात गुंफलेला माझा भारत ... ते सूत्र म्हणजे प्रेमाचे, बंधुभावाचे सूत्र... त्यामुळेच सायकलिंग साठी भारताच्या कानाकोपऱ्यात हक्काने जाऊ शकत होतो...

सायकलने फिरताना ते सूत्र ठाई ठाई जाणवते... स्थानिकांच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि सेवेतून तो भाव जाणवतो... म्हणूनच माझा भारत वेगवेगळ्या रंगांनी नटलेला... पण एकवटलेला देश आहे... 

हानलेकडे जाणारा रस्ता जरी चढाचा असला तरी अतिशय व्यवस्थित आणि मस्त होता... या एकपदरी रस्त्यावर प्रत्येक दोनशे मीटरवर समोरील गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण केले होते... रस्ता निर्मनुष्य असला तरी गाड्यांच्या रहदारीची रेलचेल होती... वाटेत कुठेही गाव नाही की ढाबा नाही.... जेवण नाही की पाणी नाही...

परेश म्हणाला... या रस्त्यावर आर्मीची कॅन्टीन असती तर किती बरे झाले असते... पेडलिंग करून गरम झालेले अंग... आणि वाऱ्यामुळे वरून लागणारी थंडी... दोन विरुद्ध दिशेचे वातावरण... दुपारच्या उन्हाचा चटका सुद्धा थंडाळलेला... तीव्र सूर्याची किरणे... त्यासाठी डोळ्यावर गॉगल आवश्यक... 

वीस किमी राईड झाली होती... तेव्हढ्यात सायकलने भारत परिक्रमा करणारा... मिझोरामचा एंझल बाटे भेटला...


'मिशन लाईफ' अंतर्गत सायकलिंगद्वारे वायू प्रदूषण कमी करण्याची मोहीम त्याने हाती घेतली होती...  तीन महिन्यापासून त्याची सायकल भ्रमंती सुरू होती... उमलिंगला पास करुन तो आता लेहला निघाला होता... एंझलच्या धाडसाचे खरोखरच कौतुक वाटले... तरुण वयातच भारत परिक्रमा करायला निघालेला एंझल भारताचा शांतीदूत भासला...  

सतत वर चढत जाणारा रस्ता असला तरी मागून येणाऱ्या वाऱ्यामुळे चढ सुसह्य झाला होता... पंधरा हजार फुटांवरून सामानासह सायकलिंग सुरू असल्यामुळे दीर्घ श्वास घेऊन दमदारपणे पेडलींग सुरू होते... विस्तीर्ण प्रदेश... डोंगरांच्या रांगा आणि संथ गतीने वाहणारी  सिंधू नदी आणि तिच्यात प्रतिबिंबित होणारे शुभ्र मेघ... म्हणजे परेशसाठी फोटोग्राफीची पर्वणी होती...
 
तो DSLR कॅमेऱ्याने  फोटो घेत होता... तर माझे... मनचक्क्षू द्वारे सर्व निसर्ग हृदयात साठवण्याचे काम सुरू होते...


या वातावरणात जोरजोरात पेडलिंग करणे म्हणजे स्वतःला दमवणे असते... येथे श्वास आणि पेडल यांचा ताळमेळ लागतो...  एक श्वास एक पेडल... असे गणित जुळले की विरळ वातावरणामुळे येणारा फटिकनेस कमी होतो... तसेच पाय चालत असले की शरीर गरम राहते आणि वाहणारे थंड वारे सुद्धा सुसह्य होतात...

हानले पंधरा किमी राहिले असताना त्याचे भव्य गेट लागले... तेथे मोठी कमान उभारण्याचे काम सुरू असल्याने रस्ता डायव्हर्ट केला होता... जगातील सर्वात उंच रस्ता उमलिंगला पासमुळे हानले जास्त प्रकाशझोतात आले होते... 

दुपारचे दोन वाजले होते आणि हानले आता फक्त दोन किमी अंतरावर राहिले होते... आणि पुढे पेडलिंग करणारा परेश सायकल थांबवून अचानक नाचू लागला...


क्षणभर काय झाले ते कळलेच नाही... समोर एक बोर्ड होता... आणि त्याच्याकडे हातवारे करून परेश नाचत होते... पुढे दोन किमी अंतरावर... मिलिटरी कॅफे होता... जेवणाबरोबर फ्री वायफाय पण उपलब्ध होणार होते... म्हणूनच परेश आनंदला होता... जणूकाही वाळवंटात त्याला ओयासिस  मिळाले होते...

हानले मिलिटरी स्टेशनच्या बाजूलाच मिल्की वे कॅफे शॉपी होती... शॉपी परिसरत शिरताच... समोरच I Love Hanlye चा मोठा बोर्ड होता...


कॅन्टीनच्या समोर सायकल लावली... तेथे एका भल्यामोठ्या टायरवर तुम्ही 15300 फुटावर आहात... असे लिहिले होते... येथील विरळ वातावरणात माझ्या बरोबर परेश रुळला होता... किंबहुना उमलिंगला पास सर करण्याचे प्रयत्न सफल होण्याकडे आमची वाटचाल सुरू होती...

तासभरात त्या कॅफे शॉपी मध्ये मस्त जेवण घेतले... बरेच फोन केले आणि व्हॉट्स ॲप वर फोटो शेअर केले... आम्ही तेथून हानले गावात निघणार इतक्यात एक महिला सायकल रायडर आली... रॉक रायडर एमटीबी सायकल आणि सर्व सामानासहीत ती सेल्फ सपोर्ट राईड करत होती... 'सोनल अग्रवाल' मनाली ते लेह सोलो सायकलिंग करून... लेह वरून सायकलिंग करत हानलेला पोहोचली होती... विशेष म्हणजे तिला फोटीला पास मार्गे उमलिंगला पास करायचा होता... आम्हाला सुद्धा त्याच मार्गाने उमलिंगला पास करायचा असल्यामुळे... आम्ही हानले मध्ये पद्मा होम स्टे मध्ये राहणार आहे हे तिला सांगितले... तिचा मुक्काम खुलदो गावात होता... 

सकाळी भेटण्याचे नक्की करून हानले गावातील पद्मा होम स्टे गाठले... हा होम स्टे सोनम दोरजे या माझ्या मित्राचा आहे... (ज्याने दोन वर्षापूर्वी आम्हाला टेकडीवर असलेली खगोलीय ऑबझरवेटरी दुर्बीण दाखवली होती)  येथे रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाष्टा आणि सेल्फकंटेन रूमचे २५०० रू नक्की झाले... जेवणाची उत्तम व्यवस्था होती...  रात्री आकाशगंगा दर्शन झाले... या होम स्टे मधील ऑप्टिकल दुर्बिणीद्वारे बरेच ग्रह आणि नक्षत्र बघता आले...

सकाळी फोटीला पासचा पहिला टप्पा पार करायचा होता... म्हणून कुडकुडत्या थंडीत झोपेच्या अधीन झालो...

उद्या उमलिंगला पासची रंगीत तालीम होती... ती म्हणजे १८१२४ फूटावरील फोटिला पास सर करणे...


आम्ही केलेले परिश्रम आणि घेतलेली मेहनत... उद्या कामाला येणार होती... आता पर्यंतच्या लडाख सफरी वरून एक खात्री झाली होती... ती म्हणजे उमलिंगला पास आवाक्यात आहे याची...

जय श्री राम...



Wednesday, July 31, 2024

चिशुमले ते उमलिंगला पास (जगातील सर्वात उंच रस्ता... १९०२४ फूट...) येथील सायकल थरार... २५ जुलै २०२४

चिशुमले ते उमलिंगला पास (जगातील सर्वात उंच रस्ता... १९०२४ फूट...) येथील  सायकल थरार... २५ जुलै २०२४

 चिशुमले मधील टॉंगस्पन टेन्ट स्टे मध्ये सकाळी ब्रेडआम्लेट आणि मॅगीचा नाष्टा मिळाला... परमेश्वराची प्रार्थना करून राईडला सुरुवात झाली...

आज २५  किमीची खडी चढाई सर करायची होती... १६३०० फुटांवरील चिशूमले वरून  १९०२४ फूट उंचीवरील उमलिंगला टॉप हा जगातील सर्वात उंच रस्ता सायकलने सर करायचा होता...

सुरुवातीलाच बोर्ड लागला... Best View Comes After Highest Climb... Umaling La...

परेश आणि  साथीला होती सोनल... लहान चणीची पण महान कर्तृत्ववान सोनल... दिल्ली ते कन्याकुमारी सेल्फ सपोर्ट सोलो सायकलिंग करणारी सोनल...  आमच्यासह उमलिंगला पास पादाक्रांत करण्यासाठी आतुर होती... 

"हे राम हे राम" नामाची धून वाजत वारी सुरू झाली... मनात एकच निर्धार... आज उमलिंगला पार करायचे... सुरुवाती पासूनच  रस्ता हळू हळू वर वर चढत जाणारा  होता... 

जवळपास पंधरा मिनिटांची राईड झाली... एक बाय एक गियर लावून सर्ली चढत होती... अचानक काय झाले कळले नाही... आणि खाड खाड आवाज करत सर्ली जागेवर थांबली... परेश मागेच होता... पाहतो तो काय... मागील गियर मधून चेन पडली होती... खाली उतरून चेन लावण्याचा प्रयत्न केला... तर चेन कॅसेट मागील प्लॅस्टिक रिंगमध्ये अडकली होती... 

थोडासा ताण निर्माण झाला... सायकल उलटी करून चेन लावण्याशिवाय गत्यंतर नव्हते... सायकल उलटी केली... गडबडीत पुढच्या चाकाला लावलेल्या पाण्याच्या बाटल्या उलट्या झाल्या... एका बाटलीचे बुच तुटले आणि अर्धी बाटली रिकामी झाली... पाण्यापेक्षा सायकल चेन व्यवस्थित लावणे ही प्रार्थमिकता होती...  अडकलेली चेन काढण्याचे प्रयत्न केले... तर चेन आणखी फसली... 

इतक्यात दहा बारा जवानांची परेड साठी पुढे चालत जाणारी एक तुकडी मदत करायला थांबली... त्यातील सिनियर अधिकारी काठीने चेन जागेवर आणण्याचा प्रयत्न करू लागला... हात काळे होतील म्हणून तो चेनला हात लावत नव्हता... तातडीने त्याला लाल पंचा दिला... त्याचे प्रयत्न असफल झाले... 

अडचणीची पातळी वाढू लागली होती... दुसरा एक पिळदार शरियष्टीचा जवान पुढे आला... त्याच्या ताकदीच्या प्रयोगापुढे सर्ली बधली नाही... सकाळच्या थंडीत घामाघूम होऊन तो बाजूला झाला... मध्ये मध्ये माझे प्रयत्न चालूच होते... डोक्यात आले... तसे क्विक रिलीज खोलून चाक बाहेर काढण्याचे प्रयत्न केले... क्विक रीलज सैल केले पण चाक सुद्धा बाहेर येईना... 

आता आणखी दोन जवान त्यांना काही जमते काय ते पाहू लागले... खेचाखेची प्रकरणात चेन तुटली तर... असा प्रश्न मनात प्रकटला... चटकन सावध झालो... दोन्ही जवांनाना बाजूला केले...  

दोन क्षण डोळे मिटले... पेडलिंग करताना चेन अडकली होती... मग पेडल रिव्हर्स करून देवाचे नाव घेऊन  खालून चेन झटक्यात खेचली... आणि चेन गियर्स मधून बाहेर पडली होती...  चेन बाहेर पडताच मागील चाक काढले...  हबच्या आतील नट सैल झाला होता... त्याला व्यवस्थित टाईट करून...मागील चाक फिट केले... चाक व्यवस्थित फिरू लागले... मनाची स्थिरताच अडचणीं सोडवू शकते... याची प्रचिती आली...

त्या जवानांचा कप्तान "प्रताप" पुढे आला आणि म्हणाला... येथून गाडी करून टॉपला जा आणि तेथून राईड करत खाली या... आम्हा तिघांची जिद्द कमी करण्याचे हे प्रयत्न म्हणजे... परमेश्वराचे काही संकेत होते काय... का ही सुद्धा आमची परीक्षाच होती...  त्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणे... योग्य वाटले नाही...

 पुन्हा पेडलिंग सुरू झाले... या सर्व चेन प्रकरणात अर्धातास लागला होता... त्याचा परिणाम काय होणार हे लवकरच समजणार होते... चेन लागली पण पाणी वाया गेले होते... म्हणून वाटेत एखादा नाला किंवा ओढा लागला तर पाणी भरून घ्यायचे ठरले...

पहिल्या पाच किमीचा चढाव पार झाला होता...अर्धा झालेला पाण्याचा स्टॉक भरून घेणे आवश्यक होते... 

रस्ता आणि बाजूची दरी यातील खोली कमी झाली आणि एक खळखळाट करत जाणारा ओढा दृष्टिक्षेपात आला... सायकल रस्त्याच्या किनारी आडव्या केल्या...

 परेश सायकली जवळ थांबला तर मी आणि सोनल  बाटल्या घेऊन  दगडांमधून सावधतेने  पाण्याजवळ गेलो.... बर्फसारखे थंड पाणी बाटल्यांत भरून घेतले.... आता पाण्याचा स्टॉक पुरेपूर झाला होता...  

अतिशय नितांत सुंदर असा तो परिसर... जणू काही या दऱ्याखोऱ्यात विरघळून जावे... परंतु आस होती शिखरावर पोहोचण्याची... म्हणून वेळ न दवडता... पुन्हा सायकल जवळ आलो...  परेश  शरीर गरम राहावे म्हणून एका जागेवर कवायत करत होता...

आता ऊन वाढत होते... वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर लागणारी थंडी बोचरी होत चालली होती... त्यामुळे पुढच्या पाच किमी साठी काठीण्याची पातळी वाढली होती... 

वाटेत कोणतीही गाडी नाही...घाटात  कसलीही रहदारी नाही... आता पर्यंत फक्त तीन मोटार सायकलचे जत्थे टॉपला जाताना भेटले होते... आम्हाला चीयर अप करत डोळ्यासमोरून पसार झाले होते...

 ज्युक बॉक्स वर लावलेल्या गाण्यांच्या धून वर स्वार होऊन पुढे पुढे सरकत होतो... परेशच्या पाठीवर DSLR कॅमेरा बॅग होती... म्हणजे जवळपास तीन किलोचे सामान तो खांद्यावर बाळगत होता.... फोटोग्राफीची आवडच त्याला अचाट काम करण्याचं बळ देत असावी...

दहा किमीचा टप्पा पार केला होता.. ग्रॅज्युअल चढ आता संपले होते... लूप सुरू झाले होते... हळू हळू तोंडाने श्वास  घेणे सुरू झाले होते... सायकलचे गियर एक एक वर लाऊन सुद्धा सायकल होलपाटे खात होती... दर पंधरा मिनिटांनी थांबून दम खात मुंगीच्या गतीले आम्ही तिघेही वर चढत होतो... आता सोनलने लीड घेतला होता... ती सतत परेशला मोटिव्हेट करत होती... 

पुढचे पाच किमी आमच्या सायकलिंग अनुभवाचा कस पाहणारे ठरले... माझी सुद्धा दमछाक होत होती... परेश माझ्या मागून अतिशय धिम्या गतीने पेडलींग करत होता... तर आता सोनल आणि माझ्या पेडलिंगमध्ये सुद्धा फरक पडू लागला... वळण आले की एकदम चढ येत होता... परेश अशा वळणावर   सायकल वरून उतरून चक्क धक्का मारत होता...  या ठिकाणी पेडलिंग करणे परेशला अवघड जात होते.

नारीशक्तीचा वेगळा आविष्कार आता पाहत होतो... थोडी पुढे गेल्यावर सोनल थांबून मला आणि परेशला चिअर अप करत होती... हि सोनल अग्रवाल मनाली ते  लेह... सेल्फ सपोर्ट सोलो राईड करत... लेह वरून हानलेला आली होती आणि फोटीला टॉप चढताना अनपेक्षितपणे तिची भेट झाली होती...  प्रचंड ऊर्जेचा स्त्रोत असलेली सोनल एखाद्या अदभुत शक्ती सारखी आमच्या मदतीला आली होती... किंबहुना या मागे काही ईश्वरी संकेतच असावेत... 

आता हेअर  पिन बेंड रस्ता सुरू झाला... ह्या चार किमी मध्ये मला सुद्धा पेडल करणे अवघड वाटू लागले... तोंडाने श्वास घेण्याशिवाय पर्याय उरला नव्हता... दर पंचवीस पावलावर थांबून पाण्याचा एक घोट घेऊन... थोडावेळ पाणी तोंडात ठेऊन हळूच गिळत होतो... मागे परेश माझ्या दृष्टीक्षेपात होता... सोनलला सांगितले त्याला टॉपला घेऊन जायचे माझे धेय्य आहे... या साठी तुझी मदत लागणार आहे...

थोडावेळ थांबल्यावर परेश सायकलला धक्का मारत  आमच्या जवळ पोहोचला... परेश म्हणू लागला... आता उन्हाचे जोरदार चटके जाणवत आहेत... तोंडावर मास्क ठेऊन श्वास घेणे कठीण होत आहे... आणि मास्क खाली केला की ओठ, कपाळ आणि गाल भाजून निघत आहेत... मध्येच सूर्याआड ढग आला की जोरदार वारे थंडीचा मारा करीत आहेत...

त्याच्या पोटऱ्या बोलू लागल्या होत्या...  क्रॅंप येण्याची शक्यता टाळण्यासाठी त्याला जबरदस्ती पाणी प्यायला लावले... खजूर वडी, लाडू हा प्रोटीन इंटेक घेतला... तिघांना तरतरी आली होती... कसे बसे हे चार किमी अंतर तिघांनी पार केले होते... 

सोबत जेवण नव्हते... फक्त ड्रायफ्रूट होते... शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी जेवणाची कमतरता जाणवली...

आता पेडलींग करणे कठीण झाले होते...  श्वास घेताना... थंड गरम वारे नाकात तोंडात शिरत होते... नाकपुड्या चोंदल्या होत्या... नाकात बोट घातले की बोटांना रक्त लागत होते... 

खोल आवाजात परेश म्हणाला...सायकल चालवणे आता शक्य नाही...  सायकल ढकलणे सुद्धा अंगावर येत आहे... एका जागेवर थांबले तरी सुद्धा  अंगात हुडहुडी  भरते... त्याला धीर दिला... आता फक्त तीन किमी अंतर राहिले आहे... लवकरच एव्हरेस्ट बेस कॅम्पची उंची आपण गाठणार आहोत... याची जाणीव करून दिली...

आता तेघेही सायकल ढकलू लागलो... रिदम ठेवला होता... पन्नास पावले सायकल ढकलली की दोन मिनिटे थांबायचे एक घोट पाणी प्यायचे प्रोटीन बारचा एक तुकडा अथवा चॉकलेट खायचे....आणि पुन्हा धक्का मारायचा... डोक्यात किणकिण सुरू झाली होती... प्राणवायूची कमतरता जाणवू लागली... ह्या तीन किमी अंतरात शरीराची क्षमता संपली होती...  

 सोनल तत्परतेने पुढे जात होती... आणि तिच्या पावलावर पाऊल ठेऊन आम्ही पुढे सरकत होतो... 

ही पूर्णपणे  खडी चढाई होती... दुपारचा दीड वाजला होता... आम्ही एव्हरेस्ट बेस कँपच्या उंचीवर म्हणजे १७६०० फुटावर पोहोचलो होतो... 

शेवटचे तीन किमी आणि आणखी १४२४ फूट वर चढायचे होते... विरळ वातावरणामुळे आता एकमेकांशी बोलणे सुद्धा कष्टदायक वाटत होते... रस्ता अतिशय चांगला असल्यामुळे सायकल ढकलायला कमी कष्ट पडत होते... आता फक्त रुहानी ताकद काम करत होती... ध्यास होता टॉप गाठण्याचा... १९०२४ फूट गाठण्याचा...

पन्नास पावले सायकल ढकलली की एक थांबा घेत होतो... एक किमी सायकल ड्रॅग करायला अर्धा तास लागत होता... मध्येच वावटळ उठत होती... सूर्याने सुद्धा आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली होती... सायकलला मागे अडकवलेले लॉक सुद्धा आता जड झाले होते... अती उष्णतेने डोळे बिलबिलत  होते... थंड वाऱ्याच्या प्रचंड झोतापासून वाचण्यासाठी टीशर्ट वर जाकीट आणि त्यावर रेनकोट घातला होता... पुढून येणारे वारे मागे ढकलत होते... पावसाने गाठण्याआधी घाट माथा गाठणे आवश्यक होते... 

आता हार नव्हती... माघार नव्हती... एकमेकांना बुस्ट करत उस पार जाण्याची जिद्द होती... शरीर साथ देत नव्हते पण मन  उभारी देत होते... एक से भले दो... दो से भले तीन... एकमेकांना ऊर्जा देत... तोंडाने दीर्घ स्वास घेत अतिशय घिम्या गतीने  एक एक पाऊल टाकत होतो... 

शेवटचा एक  किमी राहिला... अचानक थोडा उतार आला... त्या उताराचा फायदा घेत... सायकलला फक्त पाच पेडल मारू शकलो... मी आणि परेश अक्षरशः होलपटत होतो...  स्थिर वृत्तीने सोनालच सायकल ढकलत होती... 

अखेर तो क्षण आला... तिघेही उमलिंगला टॉपला पोहोचलो होतो... डोळ्यात अश्रू उभे राहिले... सायंकाळचे साडेचार वाजले होते...  घेतलेले प्रचंड परिश्रम फळाला आले होते... आनंदाच्या बेहोशिने उड्या मारत होतो... अतोनात वाऱ्याच्या माऱ्यापुढे सुद्धा परेश आनंदाने मदहोश झाला होता... उन्हाचे चटके बसून काळा झालेला त्याच्या नाकाचा शेंडा चमकत होता...

माझ्या नाकातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या होत्या... निव्वळ आणि निव्वळ सोनलची प्रचंड ऊर्जा आमच्या कामी आली होती... 

उमलिंगला टॉप... जगातील सर्वात उंचावराचा रस्ता... १९०२४ फुट... आज कवेत आला होता... त्या धरणीला आणि सर्लीला साष्टांग दंडवत घातला... 

दहा मिनिटात तिघेही चार्ज झाले... फोटो काय... उड्या काय... रिळ काय... सॅल्युट काय... तो टॉप आणि आम्ही फक्त तिघेजण... जवळचे लाडू, प्रोटीन बार, सुकामेवा फस्त केला... त्या वाहणाऱ्या वाऱ्यात सुद्धा जवळपास अर्धा तास  टॉप वरील प्रत्येक बोर्डा बरोबर फोटो काढत होतो... 

येथील कॉफी शॉप, ऑक्सीजन चेंबर दुपारी चार वाजताच बंद झाले होते... जगातील उंचावरील कॉफी शॉप, जगातील सर्वात उंचावरील पार्किंग एरिया... जगातील सर्वात उंचावरील मोटरेबल रस्ता... अशा वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध पावलेला तो परिसर माझ्या भारतात आहे... याचा अभिमान ओतप्रोत दाटून आला होता... 

उमलिंगला टॉप वरून पुढे डेमचूक २८ किमी होते... पण डेमचुक हा मिलिटरी कॅम्प आहे... कोणतेही गाव नव्हते... पुढे तर तिबेट सीमा होती... त्यामुळे पलिकडून सुद्धा वाहने येत नव्हती...

ऊन कमी व्हायच्या आत पुन्हा खाली उतरणे आवश्यक होते... सर्व विपरीत परिस्थितीवर मात करत... निव्वळ मानसिक बळाने आणि तिघांच्या एकत्रित साथीनं अशक्य ते शक्य झाले होते... उमलिंगलाच्या प्रेमात पडलो होतो...

परतीच्या प्रवासात ब्रिटिश सायकलिस्ट विकी भेटला... पंधरा किमीवर रस्त्याच्या आडोशाला त्याने टेन्ट लावला होता...

उद्या तो उमलिंगला पासचे उर्वरित अंतर पार करणार होता... त्याला ड्रायफ्रूट आणि पाणी दिले... सर्व सामानासहित तो घाट चढल्यामुळे एका दिवसात टॉपला पोहोचणे त्याला अशक्य झाले होते...

आजची राईड ही आतापर्यंत केलेल्या परिश्रमाची परिणीती ठरली होती... इप्सित साध्य करण्यासाठी केलेल्या खडतर मेहनतीची आज पूर्तता झाली होती... येथे तिरंगा फडकविताना भारताच्या उन्नतीचे आम्ही साक्षीदार आहोत... याचा अभिमान वाटला...

जीवनातली एक स्वप्नवत गोष्ट आज पूर्ण झाली होती... त्यासाठी केलेला सराव आणि अथक परिश्रम फळाला आले होते... बकेट लिस्ट मधील एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यासाठी तुम्हा सर्वांच्या सदिच्छा आणि आशिर्वाद  कामाला आले होते... परेश आणि सोनलची साथ उमलिंगला पार करण्यासाठी लॅंडमार्क  ठरले होते... 

वयाच्या ६७ व्या वर्षात पदार्पण करताना... मी उमलिंगला  पार केले नव्हते तर... पाठीशी असलेल्या परमेश्वराने ते करवून घेतले होते...

उमलिंगला पास पादाक्रांत करताना घ्यायची खबरदारी...

१.   उमलिंगला पास दोन रस्त्यांनी करता येतो... एक आहे फोटीला पास आणि दुसरा आहे निरबुला पास...

२.  यातील निरबुला पास आहे १७३८०  फूटावर तर फोटीला पास आहे १८१२४ फुटावर... निरबुला पास चढताना ऑफ रोडींग आणि मातीचा रस्ता आहे फोटीला पासचा रस्ता एकदम टकाटक पण प्रचंड लूप आणि प्राणवायूच्या कमतरते मुळे अवघड आहे...

३.  फोटीला पास केल्यावर उमलिंगला पास करणे सोपे वाटते...

४. हानले पासून निरबुलापास करून चिशुमलेचा ४५ किमीचा रस्ता आहे... तर हानले पासून फोटिला पास मार्गे चिशुमलेचा रस्ता  ६६ किमी... आणि चिशुमले पासून उमलिंगला टॉपचा २५ किमी रस्ता आहे.... यामध्ये कोठेही चहा पाण्याची टपरी किंवा ढाबा नाही...  तेव्हा सोबत पॅक लंच... सुकामेवा, चिक्की, खजूर आणि भरपूर पाणी घ्यावे...

५. कोणी गृपने ही राईड करत असेल तर जेवणखाण पाणी यासाठी हानले वरून सपोर्ट गाडी घ्यावी... 

६. हानले पासूनच्या उमलिंगला पास पर्यंतच्या पुढील राईड सकाळी पाच वाजता सुरू कराव्यात... जेणे करून टॉपवर दूपारी चार पूर्वी पोहोचणे शक्य होते...

८.  हानले ते उमलिंगला या तीन दिवसाच्या सफरीत थर्मल, जाकीट गरम कपडे आणि  एक्स्ट्रा सायकल ट्यूब, पंप आणि पंचर साहित्य बरोबर ठेवावे.

९. उमलिंगला पास सर केल्यावर चिशुमले पर्यंत उताराची राईड केल्यावर चिशुमले येथेच थांबावे..  पुन्हा तडक हानलेकडे प्रस्थान करू नये... ते खूप अंगावर येते...

१०. हे रस्ते अतिशय कमी वाहतुकीचे आणि कमी रहदारीचे आहेत.. तेव्हा मध्ये वाटेत पीक अप व्हॅन अथवा गाडी मिळणे अशक्य आहे.

११. उमलिंगला पासची  राईड करायची असेल तर दररोज घाट चढण्याची प्रॅक्टिस आणि प्राणायाम, ध्यानधारणा...  शारीरिक आणि मानसिक बळ वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते...

१२. ह्या रस्त्यावर MTB सायकलला पर्याय नाही...

सर्ली तयार झाली होती... पुढील नव्या सफरी साठी...

जय श्री राम...