Tuesday, June 2, 2020

गुलमोहर राईड 02.06.2020

गुलमोहर राईड

02.06.2020


आझाद पंछी सायकल परिवाराच्या सदस्यांसाठी आजची राईड होती.  चिराग, प्रशांत, राजेश यांची भेट गेल्या तीन महिन्यात झाली नव्हती. सर्वांना भेटण्याची ईच्छा अनावर झाल्यामुळे आज सकाळीच मुंबईवरून विजयसह निघालो. 

वातावरण ढगाळ परंतु आल्हाददायक होते. स्पीकर वर  "ऐसा लगता है, तुम बनके बादल, मेरे बदनको भिगोके मुझे छेड रहे हो" हे गाणे लागले होते.

 पाऊस पडण्याचे चिन्ह होते. बऱ्यापैकी गारवा होता. सव्वा सहाला ठाण्याला पोहोचायचे असल्यामुळे वेगातच राईड सुरू झाली. कुर्ल्याला पावसाचा शिडकावा सुरू झाला. येथे दहा मिनिटे हायड्रेशन ब्रेक घेतला आणि पुढची सफर सुरू केली.

सकाळी सव्वा सहा वाजता चिराग तीन हात नाक्यावर पोहोचला होता. आम्हाला पाच मिनिटे उशिर झाला. मागोमाग अभिजितचे आगमन झाले.  जब मिलते है चार यार तो  फोटो बनता ही है.

प्रशांत काही अडचणीमुळे आला नाही. राजेशचा फोन आला, तो बाळकुंम नाक्यावर आम्हाला भेटणार होता.

तीन हात नाक्यावरून घोडबंदर हायवेवरील ओवळे गावापर्यंत जायचे ठरले. अभिजित आणि चिरागला वर्क फ्रॉम होम असल्यामुळे वेळेत घरी पोहोचणे आवश्यक होते. भरपूर पाणी पिऊन पुढची राईड सुरू केली. 

आता आमचा लीडर चिराग होता. अभिजितची भेट  कार्ला एकविरा राईडला  विजय आणि अभिजित बरोबर झाली होती. ठाणे नाशिक हायवे वरून घोडबंदरकडे वळसा घेऊन ओवळे गावाकडे प्रस्थान  केले. बऱ्यापैकी रहदारी होती रस्त्याला. चाळीस मिनिटात ओवळे गावाजवळ पोहोचलो. 

येथे  चोखायचे छोटे छोटे आंबे, तोतापुरी कैरी, चिकू घेऊन माळीण बाई बसली होती.
 

परवा इथेच जांभळे घेतली होती. माळीण बाईकडून आंबे आणि चिकू घेतले.  तिच्याच बाजूला बसलेल्या कोळीण ताईकडे पापलेट, कुपा, शिंगाडा आणि काटेरी मासे होते. एक मोठा कुपा मासा हातात धरून फोटो काढला.

येथून परतीची राईड सुरू झाली. वीस मिनिटात ब्रह्मांड हायवे परिसरातील बोगनवेलीजवळच राजेशची भेट झाली. खूप आनंद झाला  कारण राजेश बऱ्याच दिवसांनी भेटला होता. तेथे ड्रायफ्रूट खाण्यासाठी हायड्रेशन ब्रेक घेतला.


येथून बाळकुंम पाईप लाईनकडे सफर सुरू झाली. 

बाळकुंम जवळील कशेळी पाईप लाईन मधून सफर सुरू झाली. दोन भल्या मोठ्या पाईप लाईन मधून सायकलिंग करताना मन हरकून गेले.
 

दोन्ही बाजूला गुलमोहराची झाडे फुलली होती. गुलमोहराच्या फुलांचा सडा रस्त्यावर पसरला होता. स्वप्नात पाहिलेला फुलांचा मार्ग आज प्रत्यक्षात अवतीर्ण झाला होता.

 पोपट, बुलबुल, भारद्वाज, खंड्या पक्षांचा किलबिलाट मनात आनंदाचे झंकार निर्माण करत होते. निसर्गाचे हे अदभुत रूप पाहून मन मोहरून गेले. निसर्गाच्या या विविध रंगांच्या, संगीताच्या छटा अनुभवणे हा आजच्या सफरीचा क्लायमॅक्स होता.

पाच मिनिटात पाईप लाईनच्या शेवटाला पोहोचलो. पाईपवर बांधलेल्या मोठ्या चौथऱ्यावर चढलो. तेथून दिसणारा हिरवागार आणि गुलमोहरांनी बहरलेला परिसर म्हणजे निसर्गाचा परमावधी होता. 

त्या पाईप लाईन वरील अजस्र गेट व्हॉल्व जवळ फोटो काढले. निसर्ग दर्शन तर झकास झाले होते. 

हायवेला आल्यावर राजेशला टाटा केला. पुढे तीन हात नाक्यावर चिरागला बाय केले.  मुलुंड विक्रोळी हायवेला पाणी ब्रेक घेतला. येथे सुद्धा गुलमोहराच्या झाडाखालीच थांबलो. समोरील रस्त्याच्या मध्ये गुलाबी बोगनवेल फुलली होती. फुलांच्या धुंदीत घरी कधी पोहोचलो हे समजले ही नाही.

आजची गुलमोहर सफर फुलांनी बहरून गेली होती.

सतीश  विष्णू जाधव

2 comments:

  1. मित्राचा मेसेज,

    मनच ते ....

    बाह्य आलंबनामुळे कधी डोलते, आनंदते
    आजही त्याला निसर्गाने मोहविले ,मित्र प्रेमाने आनंदविले

    पक्षी रवाने गुंगविले ,फुलांनी मोहरविले ....

    गुलमोहराने पायघड्या घालून निसर्ग मित्राचे जंगी स्वागत केले ,खूप आनंदी आनंद गडे !!

    प्रदूषणाच्या विळख्यातून त्याला सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सतीशच्या मित्रासाठी असं स्वागत करणे ह्या शिवाय अधिक आनंददायी काय असेल मित्रा !!

    ReplyDelete