Saturday, June 13, 2020

सेंच्युरी राईड १३, जून २०२०

सेंच्युरी राईड
१३, जून २०२०

सकाळी ४.५० ला घर सोडले. बिल्डिंगच्या बाहेर दूधवाला बसला होता. त्याच्या रेडिओवर " जिंदगी भर नही  भुलेंगे वो बरसात की रात" हे गाणे लागले होते.  रस्ते ओलसर होते पण पहाटे  पाऊस पडून गेला होता. परेलचा पूल उतरलो तर समोरच्या रस्त्यावर पिवळ्या फुलांचा सडा पडला होता. 

सायन पुलावर पोहोचलो, सकाळची रहदारी कमी होती. गम्मत म्हणजे माझ्या स्पीकरवर "सुखके सब साथी, दुख मे ना कोई" हे गाणे लागले होते. परंतु माझ्या राईडमध्ये तर सर्वांचीच साथ होती. मुख्य म्हणजे निसर्ग माझा जोडीदार होता.

साडेपाच वाजता घाटकोपर पार केले आणि कोकीळ स्वर कानावर पडले. हवेतील मंद गारवा हवाहवासा वाटत होता. गोदरेज गार्डन जवळ पोहोचलो. समोर दिसणाऱ्या झाडांनी धुक्याची चादर ओढली होती, उंच सुरुची झाडे हटयोगी साधू सारखी उभी राहून वाऱ्याच्या झोतावर डुलत डुलत मंत्रजाप करीत आहेत असा भास झाला. रस्त्यावरचे डेरेदार वृक्ष ध्यानस्थ बसलेल्या ऋषी सारखे दिसत होते.

सव्वा सहा वाजता तीन हात नाक्यावर पोहोचलो सकाळीच बाहेर पडताना गृपवर लाईव्ह लोकेशन टाकले होते. तसेच माझी राईड गायमुख पर्यंत आहे याची सुद्धा कल्पना दिली होती.  तीन हात नाक्यावर थांबल्यावर गृपवर मेसेज तपासले. कोणाचाही रिस्पॉन्स आला नव्हता. तेव्हढ्यात किशोरीचा मेसेज आला.  "सर, मी राईडला जॉईन होतेय".
पुढील कॅडबरी जंक्शनवर किशोरीची भेट झाली. घोडबंदर नाक्यावर वळसा मारून गायमुखकडे राईड सुरू झाली.
अर्ध्या तासातच गायमुख जवळ पोहोचलो. किशोरीला आणखी राईड करायची होती. फाउंटन हॉटेल पर्यंत जाऊया ह्या तिचा प्रस्तावाप्रमाणे चेना घाट चढणे सुरू झाले. ठाण्याच्या बाजूने या घाटाची चढाई जास्त आहे. 2-5 गियर लावून एका दमात घाट चढून गेलो. पुढील चेना क्रीक जवळ थांबलो. समोर नॅशनल पार्कचा रम्य परिसर दिसत होता.

 समोरील जुना ब्रिज त्याच्या खालून वाहणारे खाडीचे पाणी आणि त्याच्या पलीकडे गर्द वनराई मन मोहून टाकत होती. या खाडीत दोन महिला मासे पकडत होत्या. समोरील जुन्या पुलावर बऱ्याच सिनेमाचे शूटिंग झाले आहे, किशोरी म्हणाली.
या रस्त्याने बऱ्याच वेळा गेलो पण आज दिसणारी हिरवीगर्द वनराई अतिशय जिवंत वाटली. फोटोग्राफी करून दहा मिनिटातच फाउंटन हॉटेल जवळ पोहोचलो. 
सव्वा सात वाजले होते. अडीच तासात  51 किमी राईड झाली होती. दहा मिनिटांचा हायड्रेशन ब्रेक घेतला. 

आता परतीची सफर सुरू झाली. पुन्हा गायमुख गावाच्या हायवेला असलेल्या बगीच्या जवळ थांबलो. 
शांत असलेली ठाण्याची खाडी आणि तिच्या समोरच्या किनाऱ्याला  दिसणारा हिरवागार डोंगर तसेच त्या डोंगरामागे असलेले डोंगर ढगांच्या नीळाईत विरळ झाले होते. निसर्गाची एक खासियत आहे. प्रत्येक ठिकाणी तो वेगळा भासतो. तसेच निसर्गाच्या नवनवीन छटांची जाणीव होते. पण त्यासाठी निसर्गात एकरूप व्हावे लागते.

पुढे ओवळे गावाजवळ आलो. "कोरल" ची गावरान भाजी ( ही फक्त पावसात मिळते), तसेच चोखायचे  बिटकुळे आंबे, तोतापुरी कैऱ्या आणि अळूची भाजी खरेदी केली. सायकल सफरीसह घराची कामे सुद्धा सहज होऊन जातात. 

परतीची राईड सुद्धा अडीच तासात पूर्ण करायची होती. त्यामुळे घोडबंदर ठाणे हायवेवर लागणाऱ्या ब्रिजवरुन राईड केली. अर्ध्या तासात कॅडबरी जंक्शनला पोहोचलो. किशोरीची खूप दिवसांनी 40 किमीची मोठी राईड झाली होती.  तीला  सीऑफ केले. तसेच नियमित राईड करावी, हे पण सांगितले. 

ठाण्यातून आता जोमदारपणे मुंबईकडे राईड सुरू केली. मधे दोन ठिकाणी पाणी प्यायला थांबलो. हायड्रेशन ब्रेक पकडून साडेपाच तासात आजची 102 किमी राईड पूर्ण झाली होती. गेल्या तीन दिवसात माझ्या बऱ्याच मित्रांनी सेंच्युऱ्या मारल्या होत्या. त्यांचा आदर्श माझ्या पुढे होता. 
आजच्या राईडचे एक स्लोगन होते, 

*जे येतील त्यांच्या सह आणि नाही येणार त्यांच्या शिवाय सफरीचा आनंद घेणे*

सतीश जाधव

12 comments:

  1. मस्त ������

    ReplyDelete
  2. झकास! - नमिता दामले

    ReplyDelete
  3. 'सेंचूरी राईड'

    सकाळी ४.५० ला घर सोडून बरोबर साडे पाच तासांनी १०२ किलोमीटर सायकल सफर झोकत पूर्ण करुन घरी पोहोचलात सुद्धा. लाजवाब !!!!!

    सुरवात अकेले चलो रे, निसर्गाच्या साथीने, निसर्गाचाच आणि सायकलींगचा आनंद घेत 'घाटकोपर - गोद्रेज' मार्गे तीन हात नाका गाठणे, पुढे कॅडबरी जंक्शनवर किशोरी ताई सायकल सफरीला एकत्र भेटणे, फाउंटन हॉटेल पर्यंत एकत्र राईड करुन परतीच्या प्रवासाला सुरुवात, नंतर घरच्या कामाला सुद्धा हातभार म्हणून on the way भाजीपाला खरेदीसह पुन्हा कॅडबरी जंक्शनवर पोहचणे, किशोरी ताईंना टाटा बाय बाय करुन पुन्हा तेव्हड्याच जोमाने Cycling करत घराकडचा रस्ता काबीज करुन १०२ किलोमीटरची सायकल सफर साडे पाच तासात पूर्ण करून घरी पोहोचणे.
    "Full of Energy" !!!!!

    आणि नेहमी प्रमाणे सर्वसमावेशक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपमांचा वापर करून संपूर्ण 'सायकल सफर' वर्णन हे एक अतिशय छान मेजवाणी म्हणून आहेच !!!!

    सर्वच फोटो खूप छान.
    वर्णनाक्रमाने फोटोंची मांडणी सुद्धा खूप छान वाटली.

    एकूणच खूप छान.

    अभिनंदन !!!!

    .... लक्ष्मण गणपत नवले

    ReplyDelete
  4. लक्ष्मण भाऊ,

    अतिशय सुंदर आणि खुमासदार समीक्षा.

    असेच प्रोत्साहन मिळत राहो!!!

    ReplyDelete
  5. मित्राचे अभिप्राय,

    यथायोग्य संपन्न झाली आहे. ऋषींची आठवण ,जगाचे खरोखरच कल्याण करण्याचे व्रत घेतलेल्या डेरेदार वृक्षांना पाहून येणे सजग मनाचेच प्रत्यंतर देते.
    निसर्ग प्रत्येक ठिकाणी आणि वेळी वेगळा ,विविध छटा असलेला असा असतो याचा प्रत्यय आला.आजच्या सफरीत निसर्गाची ही खासियत जाणवली.
    निसर्गाचे रूप हे त्याच्या वरील प्रेमाने की त्याच्या विविधांगी छ्टांमुळे आनंददायी होते हे कळणे फारच गहन आहे. यापेक्षा त्या आनंदाचा एक भाग होणे जास्त च श्रेयस्कर नाही का???
    निसर्गासारखा सच्चा साथी, कोणत्याही विचारांना थारा न देता सर्वांवर आनंदाची उधळण करणारा असो !!!!
    सेंच्युरी मारणाऱ्या मित्रांचा आदर्श ठेवून आजची
    सफर यथायोग्य संपन्न झाली आहे.
    नेहमीच दिसणाऱ्या गर्द हिरवाई ने मात्र आज जिवंत होऊन मनाशी हितगुज करणे हे सर्व कशाचे बरे द्योतक आहे!!!!
    ह्या विचारात निसर्ग भेटीने सायकल सफरीचा परतीचा प्रवास नक्कीच अधिक आनंददायी झाला आहे.

    ReplyDelete