Wednesday, June 24, 2020

राणीचा रत्नहार राईड

राणीचा रत्नहार राईड

२२, जून २०२०

आज संध्याकाळी विजयसह राईड वर निघालो. खूप दिवसांनी विजयसह रात्रीची राईड करत होतो. विजयने मिशा काढल्यामुळे एकदम तरुण दिसत होता.
दूरदर्शन, वरळी नाका, महालक्ष्मी, जसलोक, वाळकेश्वर करीत मारिन लाईन्स चौपाटीला पोहोचलो. आज सुद्धा चौपाटीवर कोणालाही बसण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे मारिन लाईन्स वरील गोलाकार बस स्टॉपचा आसरा घेतला आणि संध्याकाळी दिसणारा राणीचा रत्नहार न्याहाळू लागलो. 

मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसर...
मुंबईचा दिमाख मिरवणारा....
मुंबई आणि समुद्र यांचे अतूट नाते...
हा परिसर  गोलाकार असल्यामुळे तो समुद्राची गळाभेट घेताना दिसतो...
तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा.!!!

खरोखरच समुद्राच्या लाटा या किनाऱ्याला भेटताना मौल्यवान मौक्तिक अर्पण करतात....
हे पाहात असताना, सर्व समर्पणात केलेल्या त्यागाची प्रचिती येते... 
आजही ते अनुभवले...
घरोघरी देवघरात तेजाची निरांजने उजळत असताना...
या ठिकाणी संध्यासमयी, तेजोनिधी गोल आपल्या किरणांचा तेजस्वी प्रकाशाची तीव्रता कमी करून अस्ताचली निघत होता...
आकाशी काळ्या पांढऱ्या ढगांची दाटी झाली होती...
चुकार किरणे ढगाआडून समुद्र लाटांशी खेळत होती...
समुद्रलाटा सोनसळी होऊन लहरत होत्या... घराकडे उडणारे पक्षी उडता उडता त्यांच्या खेळाची मज्जा घेत होते...
मंद मंद वारे काळ्या पांढऱ्या ढगांशी खेळण्यात रमले होते...
आपल्या सोबत त्यांना पळायला लावत होते... पळताना त्यांच्या बदलणाऱ्या आकाराची नक्षी माझे चित्त सुखवित होती... 
काळ्या ढगांची  समुद्राशी असलेली सलगी शास्त्रीय दृष्ट्या योग्य आहे...
या विचारात मन रममाण झाले...
शाळेत शिकविलेल्या जलचक्राची महती पुन्हा अधोरेखित झाली...
ढग आणि समुद्राच्या पाण्याला असे नक्कीच वाटत असेल की काही काळापूर्वी आपण एकमेकांच्या जागी होतो...
आणि आतासारखे तेव्हाही परस्परांना न्याहाळत होतो...
या सूर्याच्या उष्णतेने समुद्र पाण्याची वाफ होऊन ढग झालो आणि पावसाच्या रूपाने पुन्हा समुद्राचे पाणी!!!
ह्या सूर्यशिवाय हे काही शक्य नसते झाले...
ह्या विचाराने आपल्या जीवनातील "मित्राचे" महत्त्व मनोमन पटले...
आणि म्हणूनच सूर्याला मित्र हे नामाभिधान  का पडले असावे ह्याचा उलगडा ही झाला...
     
अंधार पडू लागताच मानवी आविष्काराचे  डोळ्यांना सुखावणारे विलोभनीय दृश्य दिसू लागले...
समुद्राला वेढलेल्या गोलाकार रस्त्यावरील विजेचे दिवे पाहून ती रत्नजडीत हारातील दैदिप्यमान रत्नेच भासली...
एव्हढा मौल्यवान हार राणीच्या गळ्या व्यतिरिक्त आणखी कोठे बरं असू शकेल!! 
ही मुंबई  महानगरी भारताची राणी...
आणि  ह्या विजेच्या दिव्यांची रोषणाई म्हणजे तिच्या गळ्यातला हा अमोलिक रत्नहार !!!

 सर्व मित्रांच्या आठवणीमध्ये...
 तसेच मुंबई महानगरीचा सुज्ञ नागरिक असण्याचा रास्त अभिमान बाळगत  परतीचा प्रवास सुरु झाला....

सतीश जाधव

10 comments:

  1. वाह!!! जाधव साहेब फारच छान. विलोभनीय वर्णन वाचून मी सुध्दा तुमच्या सोबत राईड करत आहे असा भास झाला.खरोखरच आपण एक असामान्य व्यक्ती आहात.all the best ...

    ReplyDelete
  2. अप्रतिम शब्दरचना छान सफर. मस्तच

    ReplyDelete
  3. मित्र भगवान विचारे याचे अभिप्राय,

    राणीच्या रत्नहारातील मोत्यांपेक्षा तुझ्या या वर्णनात पेरलेले शाब्दिक हिरे आणि मौक्तिकच मला जास्तच मौल्यवान वाटले. खूपच सुंदर शब्द संपदा भरभरून विखुरलेली.

    ReplyDelete
  4. मित्र सखाराम कुडतरकर याचे अभिप्राय,


    Tu Rani che aani tichya galyatil haarache apratim varnan kele aahes, Kavi chya manala lajvel asech aahe.wah ! Mitra,keep it up.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सखाराम!!!

      अजून खूप पहायचे आहे, शिकायचे आहे !!!

      Delete
  5. मनमोहक मुंबईचे अतिशय सुरेख वर्णन व त्याबरोबर मराठी भाषेची अवीट गोडी तुमच्या प्रवासवर्णनामध्ये वाचण्यास मिळते. असेच लिहीत रहा ज्यामुळे आमचा उत्साह द्विगुणित होईल.
    -स्वप्निल धनाजी नागरे

    ReplyDelete
  6. स्वप्नील धन्यवाद!!!

    माझ्या प्रवास वर्णनाचा मुख्य उद्देश सायकलिंग करा, आणि भरभरून निसर्गाचा आस्वाद घ्या!!!

    ReplyDelete