Wednesday, June 3, 2020

निसर्ग वादळ आणि नाबाद 101 दि. 03.06.2020

निसर्ग वादळ आणि नाबाद 101

03.06.2020

चार दिवसांपूर्वी तरुण मित्र मंडळाच्या अंकीतचा मेसेज आला, तीन जूनला रक्तदान शिबीर भरविले आहे. सोशल डिस्टनसिंगमुळे रजिस्ट्रेशन करावे लागेल.  मला सकाळी 11 वाजताची वेळ मिळाली.

गेले दोन दिवस निसर्ग वादळाच्या बातम्यांचा सोशल नेटवर्कवर भडिमार होऊ लागला आणि आज रक्तदान करू शकू काय असा संभ्रम मला पडला.

आज,  3 जून, जागतिक सायकलिंग दिवस. परंतु आप्तस्वकीय, मित्रमंडळी यांच्याकडून सायकलिंगला बाहेर पडायचे नाही असा प्रेमाचा इशारा सुद्धा देण्यात आला होता.

सकाळी सहा वाजता उठल्यावर खिडकीतून निसर्गाकडे पाहिले. आभाळ भरून आलेले, हलका हलका वारा वाहत होता. झाडांची सळसळ,  बारीक बारीक पावसाच्या थेंबांचा पत्र्यावर होणारा तडतड आवाज, पक्षांचा किलकीलाट, दुरून येणाऱ्या मालगाडीचा खडखडाट, रेल्वे क्वार्टस मधून ऐकू येणारी कोबड्याची बांग, समोर दिसणाऱ्या गगनचुंबी इमारती या सर्व वातावरणात मन तल्लीन झाले. आठ कधी वाजले कळलेच नाही.

नास्ता आटपल्यावर अंकितला फोन केला. त्याने रक्तदान शिबीर चालू झाल्याचे सांगितले. माझा फोन घरातली मंडळी ऐकत असल्यामुळे बाहेर पडायला वेगळी परवानगी मागण्याची आवश्यकता लागली नाही.

सकाळी पावणे अकरा वाजता सायकल बाहेर काढली. विंडचिटर, हेल्मेट, हॅन्डग्लोज, मास्क इत्यादी सर्व सेफ्टी गियरसह लोअर परळ वरून लालबागला सायकल सहल सुरू झाली. पंधरा मिनिटात पोहोचायचे असल्यामुळे लोअर परळ स्टेशन मार्गे जायचे ठरविले. मुख्य पूल पाडल्यामुळे स्टेशनच्या दादरावर सायकल उचलून घ्यावी लागली. 
स्टेशनच्या पूर्वेला जाऊन राईड सुरू झाली. वारे वाहत होते पण वादळी जोर नव्हता. त्यामुळे पंधरा मिनिटात लालबागच्या जैन मंदिरातील रक्तदान केंद्रात पोहोचलो. 

सोशल डिस्टनसिंगची अतिशय काटेकोर खबरदारी घेण्यात आली होती. रजिस्ट्रेशन केल्यामुळे माझा फॉर्म तयार होता. सर हरकिसनदास रुग्णालयाच्या रक्तपेढीचे सहकार्य होते.  
आज पहिल्यांदा हिमोग्लोबिन टेस्ट करण्याची मशीन पहिली. नॉर्मल हिमोग्लोबिन 12.5 ग्राम पर डेसीलिटर असते माझे 13.5 ग्राम पर डेसीलिटर होते. बिपी नॉर्मल होता. त्यांनी तात्काळ रक्तगट सुद्धा तपासला. सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. सर्व टेस्ट नॉर्मल आल्या.

हरकिसनदास रुग्णालयाचे टेक्निशियन महेश पेडणेकर आणि डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी  कोविड प्रोटेक्शन गाऊन घातले होते. त्यानंतर सुरू झाले माझे रक्तदान. तीन मिनिटे आणि एक सेकंदात 350 मिलीची बॅग भरली. माझी ही रक्तदानाची नाबाद 101 वी वेळ होती. 
हे महेशला समजल्यावर त्याला खूप आनंद झाला. डॉ कुलकर्णी यांनी हसत हसत  मला धन्यवाद दिले आणि रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र दिले.
आजच्या जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल वरून रक्तदानाला जाणे, ही माझ्यासाठी पर्वणी होती.

 रक्तदान आटपल्यावर लालबाग वरून के इ एम रुग्णालयातील फार्मसीकडे प्रस्थान केले. वाटेतील आय टी सी हॉटेल जवळील रस्त्यावर झाडांच्या पानांचा खच पडला होता. रिमझिम पाऊस सुरू होता. हवेचा जोर वाढला होता.
 
 तेथून दादर मंडईत गेलो. मंडईतील वर्दळ कमी झाली होती. भवानीशंकर मार्गावरील मोठमोठी झाडे वाऱ्याच्या तालावर डोलत होती. ब्राम्हण सेवा मंडळ हॉल समोरील झाडावरची पांढरी फुले फुटपाथ आणि रस्त्यावर विसावली होती. निसर्ग वादळाचे वेगळे रूप येथे पाहायला मिळाले.
रिमझिम पडणाऱ्या पावसाचा आणि वाहणाऱ्या वाऱ्याचा आस्वाद घेत, दुपारी दीड वाजता घरी पोहोचलो. आज 15 किमी राईड झाली होती.

जागतिक सायकल दिना निमित्ताने आज सायकल सफर तर झालीच, पण त्याच बरोबर रक्तदान (नाबाद 101) करण्याचा योग आला आणि निसर्ग वादळात निसर्ग विहार सुद्धा करता आला.

आज माझ्यासाठी ट्रिपल ट्रीट होती.

सतीश विष्णू जाधव

20 comments:

  1. जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून आपण स्वतः सायकल वरून जावून व निसर्ग वादळाला न जुमानता १०१ वे रक्तदान केले त्यानिमित्त त्रिवार अभिनदन!! खरोखर रक्तदान म्हणजे जीवनदान व यासाठी आपले करावे तेवढे कौतुक कमीच साहेब आपण रेकॉर्ड सेटर आहात, आपण जीवनात अशीच नवनवीन रेकॉर्ड सेट करण्यास ईश्र्वर आपणास उदंड आयुष्य देवो हीच सदिच्छा!!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद शिवाजी

      असेच प्रोत्साहन मिळो!!!

      Delete
  2. सर, आपण उत्साहपूर्ण, प्रोत्साहन व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहात. आपले हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

    ReplyDelete
  3. छान उपक्रम सतीश सर we are proud of you.

    ReplyDelete
  4. मामा सायकल दिनाच्या दिवशी रक्तदान शिबीर मध्ये भाग घेतला. दोन्ही योग जुळून आले. छान मस्त. नाबाद 101

    ReplyDelete
  5. मित्राचा संदेश,

    सतीश वादळाला भेटायला निसर्ग वादळ सुसाट वेगाने आले पण कुर्निसात करताना नतमस्तक झाले🙏🏼🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
    Replies
    1. निसर्ग वादळाला भेटायला गेलो, आणि वादळ पळून गेले.

      Delete
  6. तुम्ही करत असलेली प्रत्येक कृती ही इश्वरी सेवा असते.
    101 वेळा रक्तदाना सारखी सेवा सायकल या निसर्गाशी समर्पित वाहनांचा वापर करून निसर्ग या वादळाला न जुमानता करण्याचे साहस करणारा कोण असेल तर तो फक्त आणि फक्त सतिश आणि सतिश जाधव हा एकमेव व्यक्ती असेल.पुण्यक्षेञी दानधर्म करत बसण्यापेक्षा 101 वेळा रक्तदान करून आपल्या शरीराला मंदिर बनविणारया या भगवंताला (सतिश जाधव)
    माझें शतशः प्रणाम 🙏💐
    आपण करत असलेलं कार्य अनमोल आणि महान आहे. मला वाटते 101वेळा केलेलया रक्तदानाने आजपर्यंत नक्कीच 101जणांना जिवदान मिळाले.
    सर आपणास आरोग्यमय व निरोगी आयुष्य लाभो ही सदिच्छा व आपल्या कार्याला माझा सलाम 💐🙏
    (सौ.अरुणा भास्कर)

    ReplyDelete
    Replies
    1. अरुणा,

      तुमच्या अभिप्रायाने मी भारावून गेलो.

      एक निसर्गप्रेमी वादळावर सुद्धा प्रेम करतो.

      कुसुमाग्रजांची कविता आहे.

      प्रेम कुणावर करावं....

      कुणावरही करावं.....

      या मुळेच सर्व खूप सोपं वाटत....

      जीवनात अशक्य काहीच नसत.…


      फक्त परिश्रम हवेत.…

      पुन्हा एकदा धन्यवाद!!!

      Delete
  7. तुम्ही करत असलेली प्रत्येक कृती ही इश्वरी सेवा असते.
    101 वेळा रक्तदाना सारखी सेवा सायकल या निसर्गाशी समर्पित वाहनांचा वापर करून निसर्ग या वादळाला न जुमानता करण्याचे साहस करणारा कोण असेल तर तो फक्त आणि फक्त सतिश आणि सतिश जाधव हा एकमेव व्यक्ती असेल.पुण्यक्षेञी दानधर्म करत बसण्यापेक्षा 101 वेळा रक्तदान करून आपल्या शरीराला मंदिर बनविणारया या भगवंताला (सतिश जाधव)
    माझें शतशः प्रणाम 🙏💐
    आपण करत असलेलं कार्य अनमोल आणि महान आहे. मला वाटते 101वेळा केलेलया रक्तदानाने आजपर्यंत नक्कीच 101जणांना जिवदान मिळाले.
    सर आपणास आरोग्यमय व निरोगी आयुष्य लाभो ही सदिच्छा व आपल्या कार्याला माझा सलाम 💐🙏
    (सौ.अरुणा भास्कर)

    ReplyDelete
  8. खोरोखर तुसी gr8 सर् जी ,नॉट आउट 101 खूप मोठी अचीवमेंट

    ReplyDelete
  9. माणूस एक असा विलक्षण आणि सर्वश्रेष्ठ प्राणी जो श्रुष्टीवर अधिराज्य गाजवू पाहण्याच्या नादात विज्ञानाच्या विळख्यात केव्हा जखडला गेला हे त्याला स्वतः लाच कळलं नाही,किंबहुना कळणं तर दूरच पण त्या गुलामीची जाणीवही त्याला अन त्याच्या भ्रमित मनाला झाली नाही.त्या द्वारा त्याला प्राप्त झालेली अनेक बंधनं त्याला आजही कैदच करून आहेत.त्यात काही नियतीची ,काही दैवाची,काही मनाची,समाजाची,संस्कृतीची तर काही अचानक उद्भवणाऱ्या भयाण रोगांची अन महत्वाचं म्हणजे वाढत्या वयानुसार निर्माण होणारी शारीरिक बंधनं तर प्रत्येकावरच लादलेली असतात.पण या सर्व बंधनांचा सन्मान करत आदरपूर्वक त्यातून आपली सुटका करून घेणारा आणि *तरी झडझडूनी वहिला निघ* या ज्ञानेश्वरीतील ज्ञानोक्ती प्रमाणे जीवन यशस्वी आणि स्वच्छंदी बनवणारा एक जिगरबाज अवलिया म्हणजेच आमचे साहेब आदरणीय *सतिषजी जाधव* सावरकरांची *ती* समुद्रमुसंडी ज्या प्रमाणे अद्वितीय ठरली त्याप्रमाणेच आपली जीवनप्रणाली. *असाध्यातील साध्य* या न्यायाप्रमाणे आपली अथक परिश्रमासोबतच शारीरिक आणि मानसिक कसरतीतील सातत्यपूर्णता मला तुकोबांचा एक अभंग आठवण्यास भाग पाडते.
    *असाध्य ते साध्य करता सायास।कारण अभ्यास तुका म्हणे।।* संपूर्ण जग पुस्तकाचा अभ्यास करण्यात दंग असताना आपण पुस्तकासोबतच जीवनाचाही सखोल अभ्यास केलात ,तोही अगदी आदर्शवत .पुस्तकाच्या अभ्यासासाठी काही ठराविक कालावधी असतो ,पण आपण आजीवन केलेला जीवनाभ्यास जगाच्या पटलावर दिग्दर्शित करण्यासाठी कोण साक्षीदार असेल तर ती फक्त आपली आदर्शवत जीवनशैली ,संबंध जीवन आपण घेतलेला सहमित्र सायकलिंगचा वसा, आणि व्यक्तिगत जीवनात केलेला एक महा संकल्प अर्थात नाबाद *१०१रक्तदान(जीवनदान)* तसे आपण उच्चशिक्षित आणि उच्च विद्याविभूषित पण यातूनही जनाला भावणारा कोणता गुण जर आपणात असेल तर तो म्हणजे या विद्वात्तेचा,या पराक्रमाचा, आणि या महायज्ञाचा स्वाभिमानरुप अभिमान मनाच्या गाभाऱ्यात दडवून सुहास्य चेहऱ्यासह स्वभावात सहजविहार करत असलेला साधेपणा .आपल्या या स्वभावानं प्रत्येक जण आपणाकडे आकर्षित होऊन आपणास अभिन्नहृदय होतो यावर घेतलेली शंका म्हणजे मूर्खपणा . *योग्य क्षेम वाहाम्यहं* या देववाक्याप्रमाणे आपणास ईश्वराशीर्वाद प्राप्त आहेच .तरी आपल्या या समोहक आणि धाडसी जीवनशैलीस आम्हा *मित्रपरिवराचा मनाचा मुजरा तसेच या दिलखुलास जीवनशैलीसह आपल्या चैतन्यमय वाटचालीस अंतःकरण पूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा*


    * हरेश गगे, मुरबाड

    ReplyDelete
  10. हरेश🙏,

    भारावून गेलो तुझ्या अभिप्रायाने!!!

    ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या अभंगाचे दाखले देऊन मला खूपच उंचावर नेऊन ठेवलस.

    निसर्गावरच्या प्रेमानेच मी या मार्गात आलो.

    आणि या जीवन सफरीत तुझ्या सारखे मित्र मला खूप काही देऊन गेले आहेत.

    हीच माझी संपदा आहे🙏🙏🙏


    धन्यवाद पुन्हा एकदा

    🙏🙏💐🙏🙏

    ReplyDelete