Saturday, August 29, 2020

ढगांच्या दुनियेत... तळेरे राईड

ढगांच्या दुनियेत... तळेरे राईड 

२७ ऑगस्ट, २०२०

आज गौरी विसर्जन, त्यामुळे दुपारपर्यंत घरी यायचे होते. तळेरेमार्गे विजयदुर्गला जाऊन येऊन १३० किमी अंतर होते. त्यामुळे विजयदुर्ग ऐवजी तळेरे फाट्यापर्यंत जाऊन मागे फिरायचे नक्की केले. 

शेजवली  गावानंतर  मुंबई  गोवा हायवे सुरु होतो.  शेजवली पर्यंतचा मार्ग चढ उताराचा आणि बऱ्याच ठिकाणी ऑफ रोडिंग आहे. त्यामुळे वेगावर नियंत्रण ठेऊन सावधगिरीने सायकलिंग करावे लागत होते. 

छोटासा रस्ता... दोन्ही बाजूला हिरवळ... बागडणारी फुलपाखरे... पक्षांचा किलबिलाट... ओढ्या, झऱ्यातून वाहणाऱ्या जलाचा खळखळाट... छोट्या छोट्या लव्ह बर्डसचे सायकलच्या मागेपुढे कसरती करणे... अशा निसर्गरम्य वातावरणात सायकल सहल सहजगत्या सुरू होती. खूप दिवसांनी कोबड्याचे आरवणे कानावर पडले होते. 
पक्षांचे, प्राण्यांचे घड्याळ सूर्यावर असते. खुल्या वातावरणात प्रकाशकिरणांची चाहूल पक्षांना ऊर्जा देते. काल "ईकागाई" हे पुस्तक वाचनात आले. जपानमध्ये वयाची शंभरी गाठलेले सर्वात जास्त लोक आहेत.   दीर्घायुषी व्यक्तीच्या 'जीवनाचे रहस्य' या पुस्तकात दिले आहे. त्यातील एक रहस्य म्हणजे सकाळी लवकर उठून आपले आवडते काम करणे. सकाळी होणारा  किलबिलाट हे पक्षांचे आवडते काम असावे का? यालाच उस्फुर्त जगणे म्हणावे काय?

बालकवींची कविता आपसूक ओठावर आली.

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे...

कवितेच्या रंगात रंगलो असतानाच... क्षणभर सायकल थबकली... समोरच्या वाटेवरून गुबगुबीत मुंगूस मामा ऐटीत चालले होते. करडा काळपट रंग, झुबकेदार शेपटी आणि चालण्याची ऐट पाहिल्यावर त्याला कडक सॅल्युट ठोकला. प्राणी दर्शन, पक्षी निरीक्षण यामुळे न आटणारा, न संपणारा, चिरंतन आनंदाचा ठेवा मला मिळत होता.
या धुंदीतच शेजवली गाव मागे सोडून हायवेला आलो. आता सुरू झाली ढगांबरोबर सायकल सहल. निवांत हायवे... व्यक्तींची वर्दळ नाही... वाहनांची रहदारी नाही... जणूकाही हा हायवे मलाच आंदण दिला होता. रस्त्याकडेच्या पांढऱ्या पट्ट्याच्या आतून सायकलिंग सुरू होती. साथीला ओठावरील गाण्याची बरसात होती. 

आज माझ्या सायकल सोबत ढगसुद्धा मार्गक्रमण करीत होते. कालिदासांचे मेघदूत आज माझी संगत करीत होते. सायकलशी हितगुज करीत होते. नुकताच पावसाचा शिडकावा झाला होता. सूर्य ढगांना दूर सारून  किरणांचा संदेश धरणीच्या भेटीसाठी पाठवीत होता. परंतु वाऱ्याला साथीला घेऊन ते गलेलठ्ठ ढग, किरणांची वाट अडवून उभे होते. ढगांची गम्मत वाटली... माझ्यासह पुढे सरकताना... किरणांना अडविण्यासाठी त्यांची त्रेधातिरपीट होत होती. लबाड किरणे ढगांना चकवून धरणीची गाठ घेत होते.
 हिरवेगार आणि ओलेचिंब वातावरण मनाला उभारी देत होते. शेजवली जवळच्या उंच टेकडीवर निनादेवीच्या मंदिरातील घंटेचा आवाज कानी पडत होता. ढगांच्या दुनियेत, मंद धुंद निसर्गात सायकल सफर करणे पर्वणी होती.
 
खारेपाटण मागे पडले, त्या नंतर नाडगीवे गाव लागले. या हायवेवर ज्या ज्या ठिकाणी मार्गात गाव लागते तेथे फ्लाय ओव्हर बांधण्याचे काम जोरात चालू आहे. नडगीवेची घाटी सुरू झाली.  घाटीमधून जाणारे पूर्वीचे मार्ग आता प्रशस्त केले आहेत. पावसाला सुरुवात झाली. चढावाला अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. चष्म्यावर पडत असलेल्या थेंबाने अस्पष्ट दिसू लागले. सायकल थांबवून चष्मा पाठपिशवीत टाकला. 

घाटी संपताच बांबरवाडी आणि मांडवकरवाडी गावे लागली.  तळेरेमध्ये सुद्धा फ्लाय ओव्हरचे काम सुरू होते. त्यामुळे छोट्या मार्गिकेने तळेरेमध्ये सायकलने प्रवेश केला. 

सपाटून भूक लागली होती. रोडवर छोटेसेच टपरीवजा हॉटेल, पण त्याचे नाव "राज हॉटेल" होते. हसतमुख वयस्क आजोबा  गल्ल्यावर बसले होते. मिसळीच्या तर्रीचा घमघमाट सुटला होता. काम करणाऱ्या मुलाला विचारले, 'मला सूप मिळेल काय' मुलगा म्हणाला, 'आमच्याकडे चायनीज मिळत नाही' गल्ल्यावरच्या आजोबांना मला काय हवे ते बरोबर कळले होते. ते म्हणाले, 'मुंबईकरांना मिसळची तिखट तर्री दे'. आजोबांच्या निरीक्षण शक्तीचे अप्रूप वाटले. 

चिंब भिजलेल्या दशेत चमच्याने मिसळचा तेज तिखट रस्सा ओरपण्याची मज्जा काही औरच होती.  आणखी दोन वाट्या रस्सा प्यायल्यावर मन तृप्त झाले. मिसळ सोबत मेथीचा लाडू आणि शेंगदाण्याच्या कूट आणि गुळ घालून बनविलेल्या लाडूची ऑर्डर दिली.  प्रत्येक पदार्थाची चव अवीट होती. मेथी आणि शेंगदाणा  लाडू म्हणजे कोकणचा मेवा होता. सागरसंगीत न्याहारी झाल्यावर कडक स्पेशल चहाचा आस्वाद घेतला.

परवाचा जैतापूर ब्लॉग अपलोड करून पुढची सफर सुरू केली. अर्ध्या किलोमीटरवर उजव्या बाजूला विजयदुर्ग फाटा लागला तर डाव्या बाजूचा फाटा वैभववाडी मार्गे, फोंडा घाटाकडे जात होता. विजयदुर्ग फाट्यावर फोटो काढला. तेव्हढ्यात जोरदार पाऊस सुरू झाला म्हणून बाजूच्या टपरीवर थांबलो.
पाऊस थांबताच परतीची सफर सुरू झाली. ढगांनी आसमंत व्यापला होता. दूरवर दिसणाऱ्या डोंगरावर खाली उतरून मेघांचा वर्षाव सुरू होता. जलभारीत ढग त्यांच्या मर्जीप्रमाणे रंग बदलत होते.
 जोरदार वारा  नारळ, पोफळींच्या झावळ्या बरोबर पिंगा खेळत होता. खुरट्या झाडांची सळसळ नादमय संगीत साथ देत होती. जोरदार हेडविंडमुळे सायकल सुद्धा डोलत होती. स्पीकरवरच्या  रेडिओ संगीतापेक्षा निसर्गाचे संगीत ब्रह्मनंदी टाळी लावत होते.

 वाटेत अदिस्टी मातेचे मंदिर लागले. या मंदिरात असंख्य छोट्या छोट्या घंट्या लावल्या होत्या. 
कोकणात अशी खूप श्रद्धास्थाने आहेत.  जगाच्या पाठीवर कुठेही राहात असलेला कोकणी माणूस अशा देवळांच्या ओढीनेच कोकणच्या मातीशी नाळ जोडून आहे. इतरत्र पर्यटनापेक्षा आपल्या कोकणातल्या गावी जाणे त्याला खूप आवडते. गणपती, होळी, दहीकाला, पालखी, गोंधळ अशा प्रत्येक सणाला कोकणात येणारा चाकरमानी म्हणूनच खूप ऊर्जावान असतो. थोड्या साधनसामग्री मध्ये सुद्धा समाधानी असतो. 
कोकणातल्या वास्तव्यात निसर्ग सौंदर्याबरोबर येथील जनजीवनाची सुद्धा खूप जवळून ओळख झाली. 

ढगांच्या साथीने आजची ६५ किमी सफरीची सांगता करताना बालकवींच्या कवितेच्या चार ओळी मनपटलावर आल्या. 

अशी झेप घ्यावी, असे सूर गावे,

घुसावे ढगामाजि बाणापरी,

ढगांचे अबोली भुरे केशरी रंग

माखून घ्यावेत पंखावरी.


सतीश जाधव
आझाद पंछी...

9 comments: