Saturday, December 18, 2021

संस्मरणीय लोटे सायकल राईड१८ डिसेंबर २०२१

संस्मरणीय लोटे सायकल राईड
१८ डिसेंबर २०२१

आज खेर्डीतून सकाळी सहा वाजता राईड सुरू केली.. लोटे परशुराम घाटापर्यंत धुक्याच्या चादरीतून सायकल सफर झाली... लोटे गावाजवळ  सायकलिस्ट भटक्या खेडवाला विनायक वैद्य यांची भेट झाली...

आज खरं तर आज गप्पाटप्पांची राईड होती... थोड्याच वेळात खेडचे सायकलिस्ट मित्र शैलेश पेठे आणि सुमित बेडेकर हे भेटायला आले... 

मिसळप्रेमी सुमितने शोधलेल्या होटेलमध्ये कांदापोहे,  स्पेशल कळंबा मिसळ यांचा स्वाद घेतला...
 

या हॉटेलमध्ये नर्मदा परिक्रमा, मुंबई दिल्ली राईड तसेच लडाख सायकल सफर येथील सुखद अनुभव शेअर केले... 

थोड्याच वेळात चिपळूनचा सायकलिस्ट प्रसादने सुद्धा हजेरी लावली... गप्पा मध्ये तासभर कसा गेला समजलेच नाही...

तेथून लोटे येथील डाउ निर्मित अगस्त्या फाउंडेशन संचालित स्टेम एज्युकेशन सेंटरला भेट दिली... येथील प्रमुख श्री कुलकर्णी यांनी 
अगस्त्या फाउंडेशन आणि त्यांचे उपक्रम याची अतिशय समग्र माहिती दिली...


विमान कसे लँड होते तो प्रयोग करून पाहिला...
जवळच असलेल्या ज्ञानदीप शाळेतील मुलांबरोबर पर्यावरणाचे प्रदूषण या बाबत सुसंवाद झाला... 

तेथून बोरज जवळील टोल नाका पार करून शिवफाटा येथील ऊसाच्या रसवाल्याकडे विनायक सोबत गप्पांचा फड पुन्हा रंगला... पर्यावरण प्रेमी दिलीप कुलकर्णी यांची माहिती मिळाली... वहिनीने बनविलेले नाचणीच्या पौष्टीक लाडूंचा आस्वाद घेतला.. आज एक भटक्या दुसऱ्या भटक्याला भेटला होता... सायकलिंग सोबत समविचारी मित्र जेव्हा भेटतात तेव्हा आनंदाचा अगणित साठा गवसतो... 

परतीच्या मार्गाला लागलो ते या सर्व सुखद आठवणींचे गाठोडे घेऊनच... 

लोटे येथे सायकलिस्ट मित्रांची झालेली भेट... आणि त्यांच्या सोबत झालेल्या गप्पा मर्मबंधातली ठेव झाली आहे...


सतीश जाधव
मुक्त पाखरे....

5 comments:

  1. सतिशजी,
    तुमच्या भेटीची आस होती तुमचा संदेश आला तेव्हा पासुनच. खर आहे आमच्यासाठी ही आनंदाची ठेव आहे पुन्हा भेटुया लवकरच

    ReplyDelete
  2. सतीशजी तुमचे लेख नेहमी वाचताे आता लवकरात लवकर आपणास भेटायची ईच्घा आहे.तुमच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे आहे

    ReplyDelete
  3. दोन चार भटके एकत्र भेटलेत आणि गप्पा-टप्पा, गाणी, अनुभवांची देवाण-घेवाण, आठवणी यांना उत नाही आला तर नवलंच.
    कळंबा नावाचं गांव आहे की एखादी खाद्य पदार्थ वस्तू आहे ? उत्सुकता लागून राहिलीये की स्पेशल कळंबा मिसळ म्हणजे नक्की कसली मिसळ ?
    सतिशजी, तुमच्या या लेखा मुळे माझीपण सायकल सफर झाली. नाचणीचे लाडू स्मिता वहिनीच्या हातचे असतील तर क्या बात है, ती मुळातच सुगरण आहे.

    ReplyDelete
  4. परममित्र विनायक वैद्य उर्फ भटक्या खेडवाला यांनी लिहिलेला वरील भेटीचा ब्लॉग:-
    भारावलेले सात तास*
    एखादा क्षण भारावुन गेलो तर काय आनंद होतो ते आपण सर्वच जण जाणतो.
    मी इथे गोष्ट सांगतोय ती भारावलेल्या सात तासांची. आनंदाच्या खात्यात किती जमा झाले असतिल ते मोजा तुम्हीच आता.
    *जाउ तेथे खाउ* च्या राज्यात *जाउ तेथे आनंद उधळत जाउ* असा वेडाचार गेली कित्येक वर्षे करणारा एक अवलिया आज भेटला आणी माझे सात तास भारावल्या अवस्थेत गेले आज. अजुनही त्याचा हॅंगओव्हर आहेच हा लेख लिहिताना.
    १३ डीसेंबर ला एक संदेश आला,
    *विनायक वैद्य भाऊ🙏

    चिपळूणला येतोय सायकल घेऊन..
    तुम्हाला भेटायची इच्छा आहे...

    सतीश जाधव
    😊🙏😊*
    तेव्हापासुनच या अवलियाला भेटायची इच्छा तीव्र होत गेली ती आज पहाटे पर्यंत.
    ती आज थोडीशी शमली.
    पहाटे सहाला सतीशजी चिपळूण हून व मी खेडहून निघालो आपापल्या सख्यांना 🚲🚲
    घेउन. लोट्याच्या माळावर,नव्या हाय वे वर दुभाजकाच्या दोन बाजूना एकमेकाना सामोरे गेलो व एकाच बाजूला आलो ते पूढचे सहा तास एकाच बाजूला होतो. विलग झालो तेव्हा मनाने पूर्ण एकाच बाजूचे झालो होतो.
    सतीश जाधव. उत्तम ट्रेकर,उत्तम सायकलिस्ट,उत्तम वाचक,उत्तम लेखक,उत्तम साधक.
    जे करायचे ते उत्तमच असा ध्यास घेतलेला फक्त ६४ वर्षांचा तरुण.
    आता सांगा असा कोणी भेटला तर भारावुन जायला होणार नाही का ?
    लोट्याच्या माळावर *कळंबा मिसळ* मिळत्ये अशी खबर कालच सुमित ने दिलेली. मग तेथेच भेटायचे सतीशजीना असे ठरवलेले शैलेश,सुमित,मी तिघांनीही.
    सोने पे सुहागा म्हणतात तसा चिपळूण सायकलिंग क्लब चा प्रसाद आलेकर ही आम्हाला सामिल झाला, मग गप्पांचा फड असा रंगला कि कळंबा मिसळीच्या रश्याचा रंग ही फिका पडावा.
    अर्थात मिसळ मस्तच आहे, गोल ताटात एका वाटीत मटकी,एकात रस्सा,एकात चिवडा/फरसाण,कांदा लिंबू,पाव हे पूर्णब्रह्म जेव्हा समोर येते व पहील्या घासालाच *वाह* उमटतो तो क्षण खास असतो.
    तर अशा फक्कड मिसळीबरोबर रंगलेल्या गप्पा त्यात नर्मदा परिक्रमा, मुंबई दील्ली,लेह लडाख, अशा एक सो एक सायकल सफरींची वर्णने तीही एका रसिक अवलियाच्या मुखातुन व स्वानुभवाच्या जोरावर, मग करा कल्पना भारावलेल्या तासांची श्रीमंती काय असेल आमची आजची.
    *वक्त कि कैद में जिंदगी है मगर*
    *चंद घडीया है जो आजाद है*
    अशा आजाद घडीया संपत आल्या तेव्हा भानावर आलो. सुमित,शैलेश,प्रसाद आपापल्या चंद घडीयां संपल्या म्हणून घाण्याला जुंपुन घ्यायला गेले. सतीश व मी दोघेच उरलो. मग गेलो एका टेकडीवरच्या शाळेत. तेथील विज्ञान केंद्राला भेट दिली,शाळेतल्या मुलांशी संवाद साधला.
    सायकल चे महत्व व कौतुक सांगितले/शमवले व मार्गस्थ झालो खेडच्या दिशेने.आमच्या ही *आजाद घडीयां* संपत आलेल्या,मग एका फणसाच्या झाडाखाली विसावलो. एक ग्लास उसाच्या रसाच्या गोडीमध्ये, अख्या वावराच्या उसाच्या गोडीतही मावणार नाहीत अशा गोड गप्पा रंगल्या.
    विपश्यना,ब्लॉगलेखन,सायकलिंग,ट्रेकिंग,वाचन,खवय्येगिरी अशा एक ना अनेक विषयांवर प्रभुत्व असलेल्या सतीशजींच्या सहवासातला क्षण क्षण जगलो आज.
    सायकलिंग मधुन नक्की काय मिळवायचं,ते कसं उधळायचं व कसं मुक्त व्हायचं याचे मार्गदर्शन मिळाले आज. *वक्त कि कैद* चे भान आले व आपापला मार्ग धरला, सतीशजी चिपळूण ला व मी खेड ला.
    येताना रुक्ष भोस्ते घाट टाळून मस्त हिरवाईचा शीव कोंडीवली मार्ग निवडला.
    समर्थ नगरच्या साई मंदिरापर्यंत आलो.
    दत्तजयंती निमित्त असलेल्या प्रसादाचा लाभ घेत क्षुधाशांती केली. जागुष्टे लस्सीचाही समाचार घेतला फारादिवसांनी व घरी येउन मस्त सुटीच्या आनंदाची परमावधी असलेली वामकुक्षी घेतली. जागा झालो तरीही अजुनही *भारावल्याची* जाणीव होत आहे.
    ६४ वर्षांच्या तरुणाच्या भेटीसाठी केलेली ६७ किमीची राईड एखाद्या शतका पेक्षाही भारी वाटली.
    *भटक्या खेडवाला*
    *१८ डीसेंबर २०२१*

    ReplyDelete
    Replies
    1. विनायक...

      त्या भारावलेल्या तासांचा लेख वाचताना खरंच हरखून गेलो...

      प्रचंड शब्द सामर्थ्य असलेल्या एका भटक्याला भेटण्याची खूप इच्छा होती... भेटीचा प्रसंग इतक्या कल्पकतेने शब्दबद्ध केला आहे की कालची भेट आज पहाटे पुन्हा जगलो...

      विनायक भाऊ तुमच्या सृजनातेला तोड नाही... असेच लिहीत राहा... आणि आनंद वाटत रहा...

      मंगल हो...

      Delete