Sunday, December 19, 2021

भेलसई भेट... सैनिक हो तुमच्यासाठी ... १९ डिसेंबर २०२१

भेलसई भेट... सैनिक हो तुमच्यासाठी...
१९ डिसेंबर २०२१

काल मुंबईचा मित्र गजानन भेलसई गावातून भेटायला खेर्डीला आला होता.  सकाळी मेडिटेशन करताना विचार आला; त्याच्या आईला भेटायला भेलसई गावात  सायकल राईड करत जायचे...

हे गाव आंबडस रस्त्यावर आहे... सकाळी उन्हे आली तरी धुके कमी झाले नव्हते... बहाद्दूर शेख नाक्यावरून पुढे जाऊन वाशिष्ठी नदीवरील पूल ओलांडल्यावर आंबडस बायपास रस्ता लागतो... रेल्वे क्रॉसिंग पार केल्यावर नवीन कोळकेवाडी गाव लागले... आंबडस पर्यंतचा पुढचा रस्ता  गावागावातून जाणारा; वर चढणारा तसेच खाली ओघळणारा; झाडाझुडपांच्या हिरवाईतून मार्गक्रमण करणारा होता... 

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले भेलसई गाव बऱ्यापैकी मोठे आहे... कदमांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले... ह्या गावातील बरेच तरुण भारतीय सेनेत देशसेवा करीत आहेत... बारणे वाडीतील राजुशेठ पालकर (गजाननचा मावस भाऊ) यांच्या घरी गेलो... त्यांचे मुंबईतील परेल भागात सोन्याचे दुकान आहे... 

लहानचणीच्या हसतमुख राजुशेठ यांनी सहर्ष स्वागत केले... ताईंनी फराळासाठी दिलेली चकली आणि सिल्क पोहे चिवडा एकदम फर्मास झाला होता... पालकरांनी वजन कसे कमी केले त्याची सुरस कथा सांगितली... त्यांनी नर्मदा परिक्रमेचे आध्यत्मिक महत्व जाणून घेतले...
गावातील टुमदार कौलारू घर तीन बाजुंनी हिरवाईने व्यापले होते... कलमी आंबा, फणस, केळी, पपई तसेच बांधाच्या कडेने लावलेली नारळ पोफळीची झाडे घराची श्रीमंती दाखवत होते... वर्षभर कोकम आणि अगुळ देणारे रातांब्याचे झाड बहरले होते. दालचिनी, तमालपत्र, नागवेलीची पाने ह्या मसाल्यांच्या पदार्थांचा वापर गावाच्या आणि मुंबईच्या घरासाठी होत होता. जास्वंद आणि तगरची फुले म्हणजे देवांचे लेणे होती... 

प्रसन्न घरात... प्रसन्न आणि हसरी व्यक्तिमत्वे वावरत होती... गजाननच्या आईने प्रथम ओळखले नाही... तिने दाढीवला सतीश पहिला होता... वाडीत राजीव बरोबर आणि अंगणात सर्व कुटुंबियांसोबत फोटो काढले... 

सर्वजण साखरपुड्याला निघाले होते... गाडी बाहेर तयार होती... त्यांच्या सोबतच सखीवर स्वार झालो... 

मुख्य गावात येताच शाहिद स्मारक दिसले... एक काळ्या रंगाचा उंच चबुतरा त्याच्या बाजूला उलटी स्टेनगन आणि त्यावर आर्मीची टोपी याचे स्मारक होते... एकदम नतमस्तक झालो... 

शहीद सुभेदार रघुनाथ विठ्ठल कदम यांचे स्मारक होते...  हिंदुस्थान पाकिस्तान युद्धात मायभूमीचे रक्षण करताना १११ इंजिनियरिंग रेजमेंटचे वीर सुभेदार रघुनाथ कदम राजस्थान सीमेवर २६ डिसेंबर २००१ रोजी अवघ्या ४३ व्या वर्षी धारातीर्थी पडले होते... . भारत सरकारने सेवा मेडल देऊन त्यांचा मरणोत्तर सन्मान केला आहे... नेमका आठवड्याने त्यांचा २० वा स्मृतिदिवस आहे..

कोकणच्या  सुपुत्राने देशाच्या रक्षणासाठी आपले बलिदान दिले आहे याचा खूप अभिमान वाटला...

 सुभेदार रघुनाथ  विठ्ठल कदम यांच्या विरमरणासाठी मनात वीरश्रीचे आणि देशाप्रेमाचे तरंग उमटले...

आओ झुककर नमन करे जिनके हिस्से ये मुकाम आया है...

खुश नसीब है वो खून; जो देश के काम आया है...

भेलसई गावाची भेट सार्थकी लागली होती...

भारत देशाच्या संरक्षणासाठी बलिदान करणारे  सैनिकच देशाचे खरे हिरो आहेत...

आजची ३६ किमीची राईड शहीद सुभेदार रघुनाथ कदम यांच्या पावन भूमीला अर्पण...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

5 comments:

  1. सतीश, तुझं लिखाणही सुपरच आहे. मला भेलसईची सफर घडवून आणलीस. ( डबल सीट )

    ReplyDelete
  2. सुंदर लिखाण भेलसई ला गेल्यासारखे वाटते. अप्रतिम

    ReplyDelete
  3. भन्नाट नेहमी प्रमाणेच

    ReplyDelete