Friday, December 24, 2021

मुंबई ते दिल्ली सायकल सफर दि. ०३ ते १२ नोव्हेंबर २०२१

मुंबई ते दिल्ली सायकल सफर

  दि. ०३ ते १२ नोव्हेंबर २०२१

दोन वर्षांपूर्वी मुंबई ते कन्याकुमारी ही  १७६० किमी सायकल यात्रा "प्रदूषणमुक्त भारत" ही संकल्पना घेऊन १२ दिवसात पूर्ण केली होती. आता कोविडचा कहर ओसरल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत होते. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत मुंबई ते दिल्ली सायकल वारी करण्याचे नक्की झाले.

या वेळी नियोजन करताना टीम मधील प्रत्येक सदस्याला जबाबदारी देण्यात आली होती. दिपक निचितने मुंबई ते दिल्ली रूट प्लान केला. तसेच वाटेत थांबण्याची शहरे नक्की केली. अभिजित गुंजाळने वाटेतील हॉटेल बुक करण्याची जबाबदारी स्वीकारली. नामदेव नलावडेने आर्थिक हिशेब ठेवण्याचे काम स्वीकारले. विकास भोर सायकलींचा तज्ञ... त्याने प्रवासात सर्वांच्या सायकल व्यवस्थित राहतील तसेच सायकलचे काही काम निघाले तर त्याच्या दुरुस्तीची कामगिरी स्वीकारली. सोपान नलावडे यांनी दररोजचे प्लानिंग तसेच सकाळी किती वाजता उठून सायकलिंग सुरू करायचे तसेच जेवणाच्या, नाश्त्याच्या वेळा नक्की करण्याचे काम घेतले. सतीश जाधवने प्रत्येकाच्या पोटाची काळजी घेतली. वाटेत नाश्ता आणि जेवण काय घ्यायचे; त्यातून सर्वांना जास्तीत जास्त प्रोटीन मिळून;  तेलकट तिखट पदार्थ वर्ज्य करण्याची कामगिरी घेतली.

या वेळी सुद्धा, "प्रदूषणमुक्त भारत" हीच संकल्पना घेवून गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) ते इंडिया गेट (दिल्ली) पर्यंत १३९५ किमी अंतर ९ दिवसात पार करण्याचे साहसी आव्हान स्वीकारले होते. दररोज साधारण १५० किमी सायकलिंग करत; कोणताही विश्रांतीचा दिवस न ठेवता हे अंतर पार करणे म्हणजे शारीरिक आणि मानसिक कस लागण्याची परिसीमा होती. MTB आणि हायब्रीड सायकलचा परफॉर्मन्स सुद्धा कळणार होता.

०३.११.२०२१ दिवस पहिला

गेट वे ऑफ इंडिया येथून दिवाळीच्या पहिल्या दिवशी सायकल वारी सुरू झाली. विक्रोळीला छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. सर्वांचे औक्षण झाले. सोबत विक्रोळी, वरळी, ठाणे गोरेगाव, दहिसर परिसरातील बरेच रायडर्स आम्हाला साथ देणार होते.  मित्रमंडळीसुद्धा आम्हाला चिअर अप करायला आली होती.

वापीचा पहिला टप्पा १७७ किमी होता. घोडबंदर नंतर लागणारा मुंबई अहमदाबाद रस्ता अतिशय बहारदार होता. चढ उतार सतत लागत असल्यामुळे दमछाक करणारा सुद्धा होता. सकाळी दहा नंतर गाड्यांची रहदारी खूपच वाढली. एक कठीण स्थिती म्हणजे उलट्या बाजूने समोरून येणाऱ्या गाड्या... या गाड्या ओलांडताना हायवेला अतिशय सावधगिरी बाळगावी लागत होती. तलासरीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलावडे साहेबांची भेट झाली.
तलासरी सोडल्यावर रहदारी थोडी कमी झाली. परंतू उन्हे वाढल्यामुळे सायकली स्लो झाल्या...

वापी पर्यंत पोहोचायला सायंकाळचे ७ वाजले. खूप दमछाक झाली होती. परंतु येथे दिपकच्या दोन मित्रांनी दोन हॉटेल्स बुक केली होती. म्हणून तिघेजण एका हॉटेल मध्ये आणि बाकीचे दुसऱ्या हॉटेल मध्ये राहिले. येथे आयर्न मॅन श्री ठाकूर सर आम्हाला भेटून प्रोत्साहन द्यायला आले होते.. 

०४.११.२०२१ दिवस दुसरा

सकाळी चार वाजता उठून आन्हिके आटपून साडेपाच वाजता भरुचकडे कूच केले. आजचा पल्ला सुद्धा  १६५ किमी होता.

सकाळी दहा वाजल्या नंतर हेड विंड सुरू झाले; त्यामुळे रस्ता सरळ असून सुद्धा दम लावून पेडलिंग करावे लागत होते. वाटेत गुजरातचा फेमस ढोकळा खायला मिळाला... तसेच बिना बर्फ घातलेला उसाचा थंड रस मिळाला.गुऱ्हाळाचे मालक जयंती भाई यांनी उसाच्या कांड्या रात्रभर डीप फ्रीज मध्ये ठेऊन त्याचा थंडगार स्वादिष्ट रस पाजला. त्यांच्या कल्पकतेला दाद दिली...
रस्त्यात दिपकच्या सायकलचे पंचर काढण्यासाठी तासभर थांबावे लागले. अंकलेश्वर वरून भरुच मध्ये प्रवेश करता नर्मदा मैयेचे दर्शन झाले. संध्याप्रकाशात पुलावर सर्वांनी थांबून नर्मदा मैंयेची मानस पूजा केली. तुझ्या भेटीला आम्ही सर्व सायकल स्वार लवकरच येणार आहोत; असं साकडं घातलं.  सायंकाळी आठ वाजता भरुचमध्ये विश्रांती घेतली.

०५.११.२०२१ दिवस तिसरा
आज पेडलिंग सुरू करायला सकाळचे साडेसहा वाजले होते.

गोध्रा पर्यंत १६० किमी अंतर पार करायचे होते. वडोदराच्या दिशेने पेडलिंग सुरू झाले.. वडोदरा  बायपास वरून पुढे जाताना गुजरात स्पेशल फापडा खायला मिळाला.उन्हाच्या कडाक्याबरोबर आता हेड विंड सुद्धा सुरू झाले होते. गोध्राकडे वळलो आणि राष्ट्रीय महामार्गावरून राज्य महामार्गावर आलो. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड होता. वाटेत प्रसिद्ध देवस्थान पावागड लागले... चालत जाणारे श्रद्धाळू भेटले. शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांची आठवण झाली...  रस्त्याच्या कडेला भंगारच्या दुकानात बऱ्याच सायकल पडल्या होत्या... या सायकल पाहून खूप वाईट वाटले... बरेच दिवस न चालविल्यामूळे ही अवस्था झाली होती.
रस्त्यावरील झाडांमुळे दुपारच्या उन्हाचा चटका सुसह्य वाटत होता. दुपारी जारोड गावात जेवायला थांबलो तेव्हा ९० किमी राईड झाली होती... पनीर अंगारा आणि मिक्स व्हेजिटेबल ह्या भाज्या कमी तिखट बनविल्यामुळे सर्वांनी आवडीने खाल्ल्या.

जेवणानंतर सायकलींचा वेग कमी झाला होता. वाहणारे वारे आणि डोक्यावरचे ऊन हे शरीराचा कस लावत होते. दहा दहा किमीवर हायड्रेशन ब्रेक घ्यावे लागत होते.

गोध्राला पोहोचायला साडेसात वाजले...  सलग तिसऱ्या दिवशी १५० किमी पेक्षा जास्त राईड झाली होती. विशेष म्हणजे आज सोपानरावांची १०,००० किमी सायकल राईड पूर्ण झाली होती...  दिपक आज खुशमीजाज मूड मध्ये होता. दिपकचा आज वाढदिवस होता. दोघांच्या या आनंदाच्या दिवसाचे जोरदार सेलिब्रेशन झाले...
०६.११.२०२१ दिवस चौथा
आज गोध्रा ते खेरवारा अशी १६४ किमी राईड होती. चहासाठी पहिला ब्रेक सेहरा गावात घेतला. तेथे गावाचे मुखीया पठाण आणि निवृत्त सहाय्यक  आयुक्त विक्रीकर श्री खान यांची भेट झाली. मुंबई ते दिल्ली या प्रदूषण मुक्त भारत वारीला त्यांनी खूप शुभेच्छा दिल्या तसेच सेहरा गावात सायकलिंगचा प्रचार प्रसार करू असे आश्वासन दिले. वाटेतील लुनावडा गावात बांबूपासून बनविलेल्या खुर्च्या आणि बैठका अतिशय सुबक पद्धतीने मांडल्या होत्या... ग्रामीण कुटीरोद्योगाचा हा एक उत्कृष्ट नमुना होता. राज्य महामार्गाने राजस्थानच्या हद्दीकडे चाललो होतो. सज्जनपूर येथील प्रसिद्ध बालाजी हनुमानाचे दर्शन झाले. टिसकी गावाजवळ श्री नागेश्वर महादेवाचे मंदिर लागले... देशाटनाला निघणाऱ्या यात्रेकरूंची राहण्याची सोय व्हावी म्हणूनच मुख्य रस्त्यावर अशा मंदिरांची उभारणी झाली आहे.

दुपारचे बारा वाजून गेले. उन्हाचा चटका जाणवू लागला... त्यामुळे मालपूर गावाजवळ एका शेड खाली ब्रेक घेतला. दिपकच्या लक्षात आले सायकलच्या मागील चाकातील हवा फूस झाली होती.


थोडासा नाराज झाला होता दिपक; पण विकास एकदम पट्टीचा मॅकेनिक. पंधरा मिनिटात सायकल रेडी... हाच असतो गृपचा फायदा... "एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ"

सर्वात मागे राहून नामदेवला पुश करण्याचे काम स्वीकारले. सर्वजण पुढे गेल्यावर नामदेवचा वेग कमी व्हायचा. आता त्याच्या मागे राहून त्याला चिअर अप करण्यामुळे सर्वांच्या संगतीत राहू लागला. मला सुद्धा फोटो काढायला उसंत मिळू लागली.

शिवनगर गावाजवळ नाशिकच्या अमोल दायमा यांनी गाडी थांबवून आमची भेट घेतली. सायकलिस्ट असलेला अमोल सहकुटुंब आई आणि आत्याला घेऊन राजस्थान टूर वर निघाला होता.

आदराने विचारपूस केली. अमोलच्या आईने दिवाळीचा फराळ आणि फळे माझ्या पाठपिशवीत बळेबळे कोंबली. आईचा प्रेमळ आग्रह नाकारू शकलो नाही. दायमा कुटुंबासमवेत फोटो काढले. तेव्हढ्यात जवळच्या रामदेवजी मंदिरातून छोटी छोटी मुले धावत आली. त्या निरागस मुलांना खाऊ दिला. आनंदी मुलांच्या समवेत फोटो काढून पुढे प्रस्थान केले.
गुजरात बॉर्डर क्रॉस करून राजस्थान मधील रतनपूरला पोहोचायला सायंकाळी सात वाजले. हॉटेलवाल्याने त्याच्या गोडाऊन मध्ये सायकल ठेवण्याची परवानगी दिल्यामुळे आम्ही निश्चिन्त झालो होतो.

०७.११.२०२१ दिवस पाचवा
सकाळी सायकलींना तेलपाणी देऊन सज्ज केले आणि राईड सुरू केली. वाटेत खेरवारा जवळ दिल्लीच्या पर्यावरण प्रेमी अर्जुन पंडितची भेट झाली.


दिल्ली परिसरात पाचशे झाडे लावून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी अर्जुन अतिशय काळजीपूर्वक पार पाडत होता. आमच्या पर्यावरण पूरक सायकल यात्रेला त्याने शुभेच्छा दिल्या.
नामदेवाने आघाडी घेतल्यामुळे आज शेवटी राहून विकासच्या बरोबर सायकलिंग करत होतो.
 

दहा वाजता पेपली गावात हायड्रेशन ब्रेक घेतला. येथून जयपूर फक्त ४८० किमी होते. आजचा रस्ता रोलर कोस्टर सारखा वर खाली वर खाली चढ उताराचा होता.


हा विंध्याचल पर्वत रांगातून पुढे सरकणार रस्ता होता. उदयपूर जेमतेम ८० किमी होते. राजस्थानातील एक मोठ्या आणि समृद्ध शहराकडे मार्गक्रमण करताना रहदारी वाढत असल्याची जाणीव झाली.  उदयपूर; तलाव आणि राजवाड्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे.  तीन पदरी रस्ते असले तरी दोनमोठ्या गाड्या एकमेकांना ओव्हरटेक करताना सायकल नुसत्या वाऱ्याच्या झोताने होलपटत होती.
उन्हाचा कडाका, रोलिंग रस्ता, रहदारी आणि वाहणारे वारे यामुळे आज अपेक्षित अंतर गाठता आले नाही. दुपारी अडीच पर्यंत ९० किमी अंतर पार झाले होते. गिरवा गावातील मोती महल हॉटेलमध्ये राजस्थानी जेवण जेवलो. येथे गुजरात मधून आलेले टुरिस्ट भेटले. आमच्या पोल्युशन फ्री इंडिया कॅम्पेनला त्यांनी सपोर्ट दाखवला.

सायंकाळ होता होता उदयपूरचे मुख्य द्वार  सुरपलाया येथे पोहोचलो होतो.

उदयपूर पार करून अजून तीस किमीचा पल्ला गाठायचा होता. उदयपूर शहरात घुसल्यामुळे वेग खूपच कमी झाला. हॉटेल मंगल मध्ये आमचे बुकिंग होते.  शेवटचे १५ किमी अंतर जाताना खूपच दमछाक झाली. शेवटी शेवटी सीटवर बसणे सुद्धा कठीण वाटत होते. सायंकाळी सात वाजता मंगल हॉटेल गाठले. रात्रीच्या मिटिंगमध्ये चर्चा झाली. राईड करताना अपेक्षित अंतर न गेल्यामुळे, पुढच्या दिवसात वाढत जाणाऱ्या अंतराबद्दल विचार विनिमय झाला. आणखी लवकर म्हणजे सकाळी चार वाजता राईड सुरू करण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

०८.११.२०२१ दिवस सहावा
सकाळी पावणे तीन वाजता उठून प्रातर्विधी आटपले आणि बरोबर सव्वाचार वाजता राईड सुरू केली. ताबडतोब घाटाचा रस्ता सुरू झाला. रस्त्याला अंधार आणि तुरळक वाहतूक असल्यामुळे सायकलींना वेग आला होता. पहाटेच्या राईडची मजा काही औरच असते. राजस्थानातील थंडावा जाणवत होता. घाट चढून वर आलो आणि "भेलो का बेदला" हा प्रकाशमान बोगदा लागला.

तासभर राईड झाली होती. शरीर गरम झाल्यामुळे थंडी कमी झाली होती. मोहनपुरा जवळील एका चहाच्या टपरीवर थांबलो. पहाटे शेकोटीची ऊब घेताना गरम गरम चहाचे घोट घेणे आणि आकाशातील तारे पाहणे. हा निसर्गाचा असीम आनंद भरभरून घेत  होतो. हे सर्व सायकलिंग मुळेच शक्य होते.
नाथद्वारा शहरात पोहोचलो. मुख्य रस्त्यावरून मंदिर चार किमी आत होते.

त्यामुळे श्रीनाथजी महाराजांचे लांबूनच मनोमन दर्शन घेतले आणि पुढची राईड सुरू केली. श्रीनाथजी मंदिर हे वैष्णव संप्रदायाचे प्रधान पीठ आहे. १७ व्या शतकात या मंदिराचे निर्माण मेवाडचे महाराजा महाराणा राजसिंह यांनी केले. मंदिरातील श्रीनाथजींची मूर्ती वृंदावन वरून आणलेली आहे. या पवित्र तीर्थाचे देवदर्शन न झाल्यामुळे थोडी रुखरुख लागली.
नाथद्वारा मध्येच एक टेकडीवर भगवान शिवशंकर महाराजांची भव्य मूर्ती आहे. शहराच्या सर्व बाजूने त्याचे दर्शन होते. सकाळच्या दोन तासात ३५ किमी राईड झाली होती.नाथद्वारा शहरातील मुख्य चौकाचे सुंदर सुशोभिकरण केले होते.

दौलतपुर गावाजवळ रेडियम स्टिकरवाला अब्दुलभाईची भेट झाली. त्याने सखीला झालर लावून सजविले. सायकलने दिल्लीपर्यंत प्रदूषण मुक्त पर्यावरणाचा संदेश देण्याबद्दल त्याने शुभेच्छा दिल्या.

वाटेत परासली गावाजवळ सीताफळ कट्टा (भरलेले पोते) शंभर रुपयात विक्रीला ठेवले होते. त्या विक्रीत सामील झालो.


जवळच देवगढ गाव लागले. पण या देवगढमध्ये हापूस आंबे नसून रसदार मधुर सीताफळ विक्रीला ठेवले होते.

आज भेटीगाठी दिवस होता. सायकल बाबाजी श्री रामदेवजी महाराज यांची भेट झाली.


सर्व विश्व कल्याणासाठी आणि आनंदमय जगासाठी ते भारतभर सायकल भ्रमंती करत होते.

सकाळच्या अकरा वाजेपर्यंत नव्वद किमीचा धडाका मारला होता. जबरदस्त कामगिरी होती दिपक आणि नामदेव यांची. ऊन वाढले म्हणून वाटेतील एका डेरेदार वडाच्या झाडाखाली क्षणभर विश्रांती घेतली.


हायवे वरून सायकल सफर करताना उलट्या बाजूने येणाऱ्या वाहनांपासून खूप सावध राहावे लागते. समोरून जोरजोरात हॉर्न वाजवत आणि समोरचे लाईट लावून वाहने अंगावर येत असतात. त्यांना कोणत्या बाजूने मार्ग द्यावा हेच कळत नाही. याचा उत्तम उपाय म्हणजे सायकल थांबवणे. जेव्हा जोरात पेडलिंग करतो तेव्हा सायकलच्या पुढच्या चाकाजवळील रस्त्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे फार दूर लक्ष नसते. तेव्हा या समोरून येणाऱ्या गाड्या लक्ष विचलीत करतात. यामुळेच सायकलिंग स्किल मध्ये भर पडत असते.

भीम जवळील राधाकृष्ण हॉटेल मध्ये पोहोचायला सायंकाळचे सव्वा पाच वाजले होते. आज १७७ किमी राईड झाली होती. आजच्या राईडच वैशिष्ट्य म्हणजे पहाटेच्या सुवर्ण तासांमध्ये राईड सुरू केल्यामुळे लांबचा पल्ला सुद्धा आवाक्यात आला होता.

०९.११.२०२१ दिवस सातवा
कालचाच परिपाठ आज सुद्धा राबविला. सकाळीच साडेचार वाजता राईड सुरू झाली. अंधारलेल्या एक तासात १८ किमी पार पडले होते. बाली गावाजवळ शेकोटीवाली टपरी लागताच थांबलो. सकाळच्या थंडीत शेकोटीसह चहा म्हणजे आतून बाहेरून अंग शेकण्याचा फॉर्म्युला होता.


सकाळी आठ वाजता भोजपुरा गावाजवळ पोहोचलो. आता पोटाला भोग देण्याची वेळ आली होती. म्हणून खाटवाल्या वैष्णव धाब्यावर थांबलो. मस्त पैकी आलू पराठ्यावर ताव मारला.


दही आणि लोणच साथीला होतंच. पेटपूजा झाली. आज दिपकने ताकावर धडाका मारला होता. घरून ऑर्डर आली होती. जास्तीत जास्त ताक प्या म्हणून.

आणखी दोन तास राईड झाल्यावर दिल्ली ४२० हा मैलाचा दगड लागला. "दिल्लीका ठग" चित्रपटाची आठवण झाली. या ४२० दगडावर सर्वांनी पाय ठेऊन फोटो काढला.


शेराला सव्वा शेर असेच सुचवायचे होते सर्वांना. मुंबई-पुण्याचे  शेर दिल्लीवर चाल करून निघाले होते. 

वाटेत गजक शेंगदाणा चिक्की मिळाली. गुळाचा पाक करून वेलची घातलेली चिक्की या परिसराची खासियत होती. राष्ट्रीय महामार्गाचा हा परिसर हिरवाईने नटलेला होता. अजमेर शहराला बायपास करून हायवे पुढे चालला होता.  दुपारचे जेवण झाल्यावर सायकलचा वेग कमी झाला. दुपार नंतर हेडविंड पण सुटते त्यामुळे गियर कमी करून स्पिनिंग पेडलिंग करणे योग्य ठरते. लॉंग रन मध्ये दमछाक होत नाही.

राजस्थान मध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. दर दहा मिनिटाच्या अंतरावर दारूचे दुकान होते.


काही ठिकाणी रस्त्यालगत लोखंडी कंटेनरमध्ये दारूचे दुकान बनविलेले होते.  गुजरात मधून राजस्थानमध्ये घुसल्यावर हायवेला अशी मुबलक दुकाने पाहिल्यावर खूप आश्चर्य वाटले. गोव्यात सुद्धा हायवेला अशी दुकान दिसत नाही.

सूर्य मावळतीला लागल्यावर सखीने थोडीशी विश्रांती घेतली.


चहापान धाब्यावर थ्री ईडियट स्टाईलमध्ये आमच्या चार कलाकारांनी पोज दिली. जणूकाही दिल्ली आता त्यांच्या खिशातच आली होती.

सायंकाळ झाली आणि घंत्री गावाजवळ दिपकचा मित्र राम चौधरीचे बंधू  दिनेश आमच्या स्वागतासाठी हायवेवर हजर झाले. त्याच्या सोबत गावात प्रवेश केला. आमचे ढोल ताशा वाजवून सहर्ष स्वागत झाले. संपूर्ण चौधरी कुटुंब वाड्यातून खाली उतरले होते. पंचवीस जणांच्या या कुटुंबाने पंचारतीने ओवाळले... हार घालून... पारंपरिक साफा डोक्याला बांधून... हृद्य सन्मान केला... 

दिपकचा मित्र राम कामानिमित्त बाहेर गेला होता. त्याच्या अनुपस्थितीत असे स्वागत झाले. आम्ही सर्व भारावून गेलो होतो.
चहा कॉफी प्याल्यावर गप्पा झाल्या. घरातील सर्व मंडळी राहण्याचा आग्रह करू लागली. परंतु पहाटे खूप लवकर राईड सुरू करायची असल्यामुळे तेथे राहणे प्रशस्त वाटले नाही.
जेवणाचा खासा राजस्थानी बेत होता. बाजरीच्या भाकरीवर घरगुती साजूक तूप... कढी पकोडे... चमचमीत मिरची लसूण चटणी आणि बासमती भात.

खूप दिवसांनी घरगुती जेवणाचा स्वाद चाखला... त्यानंतर गोड पदार्थ म्हणून काजू कतली सुद्धा आली.
चौधरीवाड्यात गावकरी सुद्धा जमले होते. मुंबई ते दिल्ली वारी प्रदूषण मुक्त भारतासाठी करतोय; यात तुम्ही सुद्धा सहभागी व्हावे; असा संदेश सर्वांना दिला... चौधरी कुटुंब आणि गावकरी यांनी मोटारसायकलचा वापर कमी करून पर्यावरणाचे प्रदूषण कमी करण्याचे आश्वासन दिले. रामच्या आजी बरोबर फोटो काढले.

आपलेपणा व घरची आठवण करून देणारा असा एकंदरीत भावुक प्रसंग होता. आजीचे आशीर्वाद घेऊन हॉटेलकडे प्रस्थान केले. रामचा भाऊ दिनेशने हायवे जवळील हॉटेल मध्ये राहण्याची व्यवस्था केली होती.

१०.११.२०२१ दिवस आठवा
आज सकाळी पाच वाजता राईड सुरू झाली. हा उदयपूर जयपूर हायवे रहदारीचा होता. परंतु सहा पदरी हायवेमुळे मोठया गाड्याच्या लाईट्सचा उपयोग रस्ता दिसण्यासाठी होत होता. पेडलिंग एकामागे एक अशा पद्धतीने करत होतो. वाटेत दुदू गाव लागले... लहानपणची आठवण झाली...


धाकटा भाऊ मला लहानपणी दुदू हाक मारायचा... माझं दूध पिऊन; त्याच्या दुधाची बाटली पण फस्त करायचो... काय गम्मत आहे ना... सायकलिंग बालपणात पण घेऊन जात होते... शब्दांचा एक ट्रिगर अंतर्मनातील सुप्त आठवणींना मनपटलावर आणून आनंदमय ऊर्जेचा अखंड स्रोत पेडलिंगसाठी बहाल करत होता... मंगलमय सायकलिंगचा आस्वाद घेत होतो...
येथून जयपूर ६७ किमी होते... परंतु गुलाबी शहर जयपूरला भेट न देता बायपास हायवेने मार्गक्रमण करणार होतो. टार्गेटेड बायकिंगमुळे एक्सप्लोअर करता येत नाही. महलान गावाजवळ कान्हा हॉटेलमध्ये आलुपराठे हादडले. आता जयपूर छत्तीस आणि दिल्ली तीनशे किमी होते.


चुलत बहिणीची आठवण झाली. लाडाने मला छत्तीस म्हणायची. आठवणींची शिदोरी उघडत उघडत दिल्ली कडे मार्गाक्रमण सुरू होते. खरंच सायकलिंग म्हणजे मेडिटेशन होते.

जसे जसे जयपूर जवळ येऊ लागले तशी गाड्यांची रहदारी वाढू लागली. मोटरसायकल एकदम जवळून कट मारू लागल्या. उन्हाबरोबर हेडविंड सुद्धा मार्गात दमछाक करीत होते. आता जेवणा ऐवजी ताकावर भर दिला होता.
सर्व्हिस रोड हायवेच्या खाली त्यामुळे हायवेला सायकल ठेऊन पाणी किंवा नास्त्यासाठी खाली जावे लागले. एक ट्रॅक्टर टायर पाहून सायकल थांबविल्या. कचोरी खाऊन त्या टायरला, प्रवासाच्या प्रतिकाला फोटो लोकेशन बनविले.


सोपान ट्रॅक्टर टायर मध्ये बसला आणि दिपक त्या टायरला धक्का मारत होता. उन्हात थोडा विरंगुळा.

उत्तरेकडे निघालो होता. आणि दक्षिणेकडे झुकलेल्या सुर्यामुळे, हायवेला  सायकलच्या पुढे सावल्या धावत होत्या.

जयपूर पास केले आणि घाटाचा रस्ता सुरू झाला. विकास, दिपक आणि सोपान यांचा घाटात वेग वाढला. एका दमात घाट चढून जायचा त्यांनी संकल्प केला होता. घाट संपला आणि वाटेत सेवाद गावाजवळ  दुर्गामातेचे भव्य मंदिर लागले. मंदिर पलीकडच्या बाजुला असल्यामुळे लांबूनच फोटो काढले. ताज्या दमाचा गडी अभिजित आता सर्वांना लीड करू लागला.


एका टपरीवर कर्नाटक मधून  काश्मीर पर्यंत जाणारे दोन सायकलिस्ट भेटले. वाढलेल्या पेट्रोलच्या किमती आणि शेतकऱ्यावरील अन्यायासाठी ते प्रोटेस्ट म्हणून सायकलिंग करत होते. एखाद्या राजकीय पक्षाने त्यांना स्पॉन्सर केले असावे... आज पाच जुन्नरकर आज जोशात होते.

वाटेत सायकल पंक्चर होण्याचे प्रकार घडले. त्यामुळे शहापुरा येथील सनफ्लॉवर हॉटेल मध्ये मुक्काम करावा लागला. येथून दिल्ली मधील इंडिया गेट २०३ किमी होते. आजची राईड निमराना पर्यंत होती. तेथपर्यंत ८० किमी अंतर प्रचंड ट्राफिक आणि धुळीमुळे अशक्यप्राय होते. परंतु उद्या दिल्ली पर्यंत अंतर पार करण्याचा निर्धार होता. दिल्ली आता आवाक्यात आली होती. सर्वजण लॉंग राईडला निर्ढावले होते.

११.११.२०२१ दिवस नववा
सकाळी पाच वाजता कडाक्याच्या थंडीत सायकल राईड सुरू झाली. पहाटेच्या सुवर्ण तासात जास्त वेगात जायचे ठरले होते. त्याचे दोन फायदे होते. एक तर थंडी गुल होते आणि तुरळक रहदारीमुळे जास्तीत जास्त अंतर कापता येते.  पावणे दोन तासात नॉनस्टॉप ३७ किमी अंतर पार केल्यामुळे सपाटून भूक लागली होती.

पनीयाला येथील राजेश शर्मा यांच्या निळकंठ धाबा मध्ये मॅगी, पनीर पराठे, दही आणि लोणचे चापून खाल्ले. मालक राजेश शर्मा हुबेहुब देव आनंदची प्रतिकृती होते.

अंगकाठी, पेहराव आणि बोलणे यामुळे ७० वर्षाचे शर्माजी एकदम तरुण दिसत होते. प्रती देव आनंद बरोबर फोटो काढले ...

मुंबई-पुण्याचे सहा वीर आता दिल्ली भरारी मारायला सज्ज झाले होते. हे वीर दिल्लीच्या गल्लो गल्ली प्रदूषणमुक्तीचा डंका वाजवणार होते.

दुपारी देवधाई येथील प्रेमभोग हॉटेलमध्ये भोजनासाठी थांबलो.  हॉटेलमध्ये वाढदिवसाचे डेकोरेशन केले होते. उद्या असलेल्या वाढदिवसाची झलक आजच सर्वांना दिली.


जेवण तर उत्कृष्ट होतेच... त्या बरोबर आईस्क्रीमची ट्रीट सुद्धा मिळाली.. दिल्ली आता नव्वद किमी अंतरावर होती... हरयाणात शिरताच धुळमिश्रित वातावरण  जाणवू लागले. त्यामुळे मास्क लावून सायकल चालविण्याशिवाय पर्याय नव्हता.

हरयाणातील मनेसर येथे पोहोचायला सायंकाळचे पाच वाजले होते. प्रचंड राहादरी आणि दूषित वातावरण यामुळे दिल्ली पासून ५२ किमी अलीकडेच थांबण्याचे सर्वांनी ठरविले. हॉटेलचे नाव सुद्धा मनेसर होते.
खरं तर योग जुळून आला होता... उद्या माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच दिल्लीच्या इंडिया गेटला पोहोचणार होतो... प्रदूषण मुक्त भारत या मुंबई ते दिल्ली सायकल वारीची सांगता वाढदिवसाच्या दिवशी होणे ही माझ्यासाठी अपूर्वाई होती...

१२.११.२०२१ दिवस दहावा
पहाटेच सोबतच्या सर्व सायकल दोस्तांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या... व्हाट्सअप, फेसबुक वर शुभेच्छांचा पूर आला होता... दिल्ली सर केल्यावर सर्वांना फोन करायचे ठरले...


आजची पहाट खास होती. सकाळी साडेपाच वाजता दिल्लीकडे राईड सुरू झाली. सर्वांच्या उत्साहाला उधाण आले होते...   नेतृत्वाचा झेंडा माझ्या खांद्यावर होता... दिल्लीकडे जाणारा मुख्य महामार्ग असल्यामुळे सकाळ पासूनच रहदारी सुरू होती. हायवेला सायकल मात्र तुरळकच दिसत होत्या. पावणे दोन तासात तीस किमी अंतर पार करून गुरुग्राम टोल नाक्याकडे पोहोचलो. येथून इंडिया गेटचे अंतर ३२ किमी होते...

दिल्लीकडे जाणारी रहदारी आणखी वाढण्याआधी दिल्ली पार करायची होती... कॉर्नरच्या टपरीवर चहा नानखटाई खाऊन सर्वांनी जोरदार स्प्रिंट मारली... धूळ आणि धूर याची लेअर वातावरणात पसरली होती...

त्यामुळे सकाळचा सूर्य सुद्धा मलूल झाला होता... दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात या प्रदूषित वातावरणामुळे काळोखी पसरली होती... एक बाजूचा चार लेनचा रस्तासुद्धा  घनदाट रहदारीमुळे अपुरा वाटत होतं.  तासाभरात इंडिया गेट कडे पोहोचलो.

इंडिया गेट परिसराचे सुशोभीकरण सुरू असल्यामुळे सर्वत्र बॅरिकेट लावले होते. त्यामुळे लांबूनच फोटो काढले. दिल्लीने धुराच्या प्रदूषणा विरुद्ध युद्ध पुकारले आहे...


त्यातच प्रदूषण मुक्तीचा संदेश घेऊन आम्ही दिल्लीत पोहोचलो होतो... मिडियावाल्यांना बाईट्स दिले...

सर्वांबरोबर इंडिया गेट लोकेशनवर भरपूर फोटो काढले. अक्षरशः उड्या मारत सुद्धा...

नवी दिल्लीच्या पहाडगंज भागात राहण्याची व्यवस्था झाली... सायंकाळी  खासदार श्री विनय सहस्रबुद्धेजी आणि प्रकाशजी जावडेकर यांची भेट घेतली...


राज्यसभेचे खासदार श्री विनयजी सहस्रबुद्धे  व माजी पर्यावरण आणि मनुष्यबळ विकास मंत्री श्री प्रकाशजी जावडेकर यांनी खास सत्कार आणि कौतुक करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात दिपकचा भाऊ सुुुभेदार निचीत आवर्जून उपस्थित होता. 

भारताच्या प्रदूषणमुक्तीसाठी  खूप मोठे काम तुम्ही करत आहात; असेच  हे काम अविरत चालू ठेवा असा प्रोत्साहनपर सल्ला श्री जावडेकरजी यांनी दिला. जनमानसात सायकलिंग संस्कृती रुजवा असा संदेश दिला... श्री जावडेकरजी यांच्या उपस्थितीत वाढदिवस सुद्धा साजरा करून त्यांचे आशीर्वाद मिळाले.

सायंकाळी दिल्लीचा मित्र दिव्यांक वाढदिवसा निमित्त केक घेऊन आला होता... आजची वाढदिवसाची रात्र मित्रांसोबत तसेच कुटुंबासोबत ऑनलाईन धुमधडाक्यात नाचून गाऊन साजरी केली...

अजि सोनियाचा दिनु  वर्षे अमृताचा धनु... खरंच आज खूप मोठा दिवस आला जीवनात...
६४ व्या वाढदिवसाच्या दिवशी गेट वे ऑफ इंडिया  ते इंडिया गेट ही १३९५ किमी सायकल सफर पूर्ण  झाली या बद्दल खूप आनंद झाला होता. 

तुम्हा सर्वांच्या सदिच्छा आणि आशिर्वाद ह्या मुळेच ही सायकल वारी पूर्णत्वाला गेली होती. सोबत असलेल्या सायकलिस्ट मित्रांचा या यशात मोठा वाटा होता.


वाढदिवसाच्या दिवशी पूर्ण झालेली ही सायकल सफर इंडिया गेट जवळील शाहिद स्मारकाला अर्पण केली.

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

4 comments:

  1. मित्राचे अभिप्राय:-
    ९ दिवसाचा साहसी, धडाकेबाज ,दमछाक करणारा ९ दिवसांत पूर्ण केलेला सायकल प्रवास, वाचताना अचंबित करतो...
    प्रत्येक दिवसाचे महत्वाचे तपशील समर्पक शब्दांत वर्णन केल्यामुळे वाचनीय झाले आहे..
    सर्व वाचकांना आणि सायकल सफरी करणाऱ्या सायकल स्वारांसाठी उपयुक्त माहिती ...
    आव्हाने स्वीकारून ध्येयपूर्तीसाठी मनोबलाच्या वापराचा उत्तम नमुना आहे हा लेख ...

    ReplyDelete
  2. 🙏🙏
    एकदम झकास !!!!
    सर्वांचेच मनापासून अभिनंदन !!!!
    Keep it up !!!!
    And plan for another thrilling ride with some additional motoes and thims.
    All the Very Best for future Rides.

    ReplyDelete