Sunday, December 26, 2021

सायकल राईड... मित्राचा प्रसाद... दि. २४.१२.२०२१

सायकल राईड... मित्राचा प्रसाद...
 दि. २४.१२.२०२१

चिपळूणचा रायडर प्रसाद आलेकर बरोबर सायकलिंग करत शिरगाव पर्यंत जायचे ठरले होते... सकाळी फोन आला; प्रसाद म्हणाला, "चिपळूण मधील नगरपालिकेजवळील  चिंचनाक्यावर भेटा"...

चिंचनाक्यावरून  अंधारलेली थंडी आणि धुक्यात भुरकटलेल्या हेडलाईट मध्ये गुहागरकडे राईड सुरू झाली... नवीन रस्त्यावरून राईड होणार याचा आनंद होता. गणेश खिंडीतून गुहागर रस्ता सोडून दहिवलीकडे वळलो... धुक्यातील चढउताराचा रस्ता पार करून. दहिवली बुद्रुक मधील ग्रामदेवतेच्या मंदिरात पोहोचलो.

मंदिर परिसरात विविध फुलांच्या झाडांनी आपले अनेकविध रंग पसरले होते. आजूबाजूचा निसर्ग धुक्याच्या दुलाईने झाकला गेला होता. या निसर्गाच्या कॅनव्हासवर मंदिराची दगडी वास्तू  आणि त्या वरील पांढऱ्या रंगात रंगविलेली गोपुरे तसेच सुवर्ण कळस एकदम भक्तिमय वातावरणात घेऊन गेले...

दोन भव्य गजराज मंदिराच्या प्रवेशद्वारावर स्वागतासाठी सिद्ध होते... तसेच गाभाऱ्याकडे तोंड करून सुवर्णलंकृत नंदी महाराज सुद्धा बसले होते...

गाभाऱ्यात वरदान माता, वाघजाई माता, बाजी माता, आणि गुडाई माता या ग्रामदेवता विराजमान झाल्या होत्या.


समोरच्या बाजूला मानाई आणि भैरी माता यांचा गाभारा होता... मंदिराच्या चौथऱ्याच्या दगडी कलाकुसरीमध्ये  रथाच्या दहा चाकांच्या समावेश होता.

ओरिसामधील कोणार्क सुर्य मंदिराची आठवण झाली. कोकणात रथाची चाके असलेले मंदिर पहिल्यांदाच पाहत होतो. तीन वर्षापूर्वीच या मंदिराचा जीर्णोद्धार ग्रामस्थांनी केला होता. नवरात्रीमध्ये येथे मोठा उत्सव असतो.

मंदिराचा हिरवागार परिसर आणि तेथील स्वच्छता मंदिराच्या पवित्र्यात भर टाकीत होते. प्रसादने अतिशय प्रसन्न ठिकाणी आणल्याबद्दल मनोमन त्याला अभिवादन केले...

तुरळक रहदारी आणि रोलिंग रस्ता याची मजा घेत घेत; राईड करत सावर्डे गावातील  प्रसादचा सायकलिस्ट मित्र पृथ्वी पाटील याच्या घरी आलो... अतिशय मनमोहक "मधूस्नेह" वास्तू...


बंगल्यासमोर तुळशी वृंदावन, हिरवेगार लॉन, कंपाउंडच्या कडेने लावलेली नारळाची झाडे... सारे काही सुखावणारे...


प्रवेशालाच भवानी मातेच्या दर्शनाने नतमस्तक झालो...
घरात येताच प्रेमळ सदस्य लिओने उड्या मारून आणि मस्ती करून केलेले स्वागत एकदम आनंददायी होते... क्षणार्धात लिओ मित्र झाला होता...

पृथ्वीचे वडील डॉ कृष्णकांत पाटील आई बाबांच्या पन्नासाव्या विवाह वाढदिवसाच्या तयारीत होते... जनरल प्रॅक्टिस करणारे डॉ. कृष्णकांत यांना दवाखान्यात जायचे होते... तरीही मुलाच्या सायकलिस्ट मित्रांना त्यांनी वेळ दिला... त्यांचे वडील निवृत्त मुख्याध्यापक श्री एम के पाटील आणि आई यांचे आशीर्वाद मिळाले... चहापान झाल्यावर आनंदी आणि हसतमुख कुटुंबाबरोबर प्रसादने सेल्फी काढला...


एका आनंदी कुटुंबाची भेट झाल्यामुळे मित्रपरिवारामध्ये वृद्धी झाली होती...

सावर्डे येथून चिपळूणकडे निघालो... कामथे घाट उतरलो आणि टेरव गावाकडे जाणारी छोटी पण अवघड घाटी चढायला सुरुवात केली... चिपळूण परिसरातील सर्वात जास्त ग्रॅडियंट असणाऱ्या या घाटीचा प्रथम अंदाज न आल्यामुळे सखी (सायकल) चेन अडकून एकदम थांबली.  खाली उतरून गियर १-३ वर सेट केले. आता सखी अतिशय हळू परंतु दमदारपणे घाटी चढू लागली. तडफदार प्रसाद भराभर पुढे जाऊन येण्याची वाट पाहत होता.  संपूर्ण घाटी न थांबता चढून गेलो. दोन दिवसांपूर्वीच आकाश दर्शनासाठी टेरव परिसरातच रोशन भुरणच्या गाडीने आलो होतो. तेव्हाच ठरविले होते.  ही घाटी सायकलने पादाक्रांत करायची. आज ही इच्छा प्रसादने पूर्ण केली होती...

टेरव गावातील सुप्रसिद्ध वाघजाई मंदिरात आलो. उंच पठारावर असलेले हे भव्य मंदिर सुद्धा अतिशय सुंदर होते...


पेव्हर ब्लॉक लावलेला मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाच्या दोन्ही बाजूला शोभेची लाल झाडे लावली होती. संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला होता...

काळ्या पाषाणातील वाघजाई मातेच्या हातात सोन्याचा त्रिशूळ होता... क्रूर राक्षसाला पायाखाली चिरडून; त्रिशूळाने त्याच्या छातीवर वार केला होता...


परंतु माता रौद्र रुपात नव्हती तर जगदकल्याणी शांत रुपात होती... मातेचे डोळे अधोन्मीलीत होते... मातेचे हे आगळे वेगळे रूप मनात ठाव करून गेले...
या मंदिराच्या पायरीवर मुंग्यांच्या एकजुटीचे दर्शन झाले... एक बिळात लपून बसलेल्या पाली वर काळ्या मुंग्यांनी एव्हढा जबरदस्त हल्ला केला की दहा सेकंदात पाल गतप्राण झाली... त्या पालीची पालखी करून सर्व मुंग्या घेऊन जाताना, मुंग्यांची एकजूट आणि शिस्तबद्धता डोळ्यात भरणारी होती...
प्रसादमुळे आज चढ उताराची ५५ किमी राईड  झाली होती ... तसेच दोन मंदिरे आणि एक आनंदी घर याचा परिचय झाला होता... तसेच एकजुटीने कोणतेही कार्य सहज शक्य होते; हे मुंग्यांनी शिकविले होते...

हा तर परमेश्वराचा कृपा प्रसादच म्हणायला हवा...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

1 comment:

  1. Tumchyasobat mla cycling karayla bhetli he mi maje bhagyach manto

    ReplyDelete