Thursday, January 20, 2022

लडाख सायकलिंग भाग ६ दि. ०९ ऑगस्ट २०२१

लडाख सायकलिंग भाग ६

दि. ०९ ऑगस्ट २०२१

  सकाळी सिंधू नदीच्या प्रवाहात आन्हिके उरकली. टेंट डिसमेंटल करून, सुरू झाली पुढची सायकल सफर. माहे ब्रिज ओलांडून सिंधू नदी सोडली आणि सुमडो गावांकडे पेडलिंग सुरू झाले. आता  सिंधुला मिळणाऱ्या एका नाल्याच्या किनाऱ्याने पुढे जात होतो. पूर्णतः ऑफ रोडिंग रस्ता; मध्ये मध्ये पुलाचे काम सुरू असल्यामुळे चिखलातून, खड्ड्यातून जाणारा तसेच नवीन पूलाच्या  बांधकामा ठिकाणी; बाजूने वळविलेला रस्ता होता.  हा सुद्धा चढाचाच रस्ता  होता. त्यात पुन्हा हेडविंड... त्यामुळे सुमडो गावात पोहोचायला सव्वा दोन तास लागले.  
वाटेत नाशिकच्या मोटरसायकलिस्ट मंडळींची गॅंग भेटली. मग काय... झाला भारताचा जोरदार जयजयकार आणि बाप्पाचा गजर... ही मंडळी श्रीनगर लेह करून आज सो मोरीरी पाहून मनाली कडे निघाली होती. मराठी माणसे जेव्हा अशा पहाडात भेटतात तेव्हा सह्याद्रीचा कणखरपणा हिमालयात घुमतो...

सुमडो गाव तिबेटीयन लोकांचे आहे. येथून मनाली साठी बायपास रस्ता आहे. साधारण ऐंशी घरांच्या गावात साडेतीन हजार लोकवस्ती आहे. सरकारने गावासाठी तिबेटी शाळा तसेच स्वास्थ्य केंद्र याची व्यवस्था केली आहे. बरेच होम स्टे सुद्धा गावात होते. गावातूनच मोठा ओढा वाहात असल्यामुळे शेती पण होती. नावांग काकांच्या जसु होम स्टे मध्ये मॅगी खाल्ली आणि पुढे निघालो.

सो मोरीरी आणि सुमडो मध्ये एकही गाव नाही. त्यामुळे येथे राहायचा विचार करत होतो. पण दुपारचे बारा वाजले होते आणि येथून सोमोरीरी जवळचे कारझोक  गाव ४५ किमी होते तसेच सोमोरीरीचा "नामाशांग पास" हा मोठा घाट पण पुढे लागणार होता... म्हणून आणखी २० किमी  पुढे जाऊन वाटेत एखाद्या बुगियालवर किंवा नाल्या शेजारी  अथवा पहाडात खानाबदोश (चरवाहे) लोकांचे दगडाचे बंकर पण असतात.. त्याच्या शेजारी  टेंट लावता येईल... म्हणून पुढे निघालो. 

प्रत्यक्ष सुमडो गावातूनच चढाचा रस्ता सुरू झाला होता. दोन किमी वर एक चहाचे हॉटेल लागले. तेथे दिल्लीवरून कारने आलेल्या एका कुटुंबाने थांबवले... आमची चौकशी करून चिवड्याचे पाकीट भेट देताना तो गृहस्थ म्हणाला मी पण सायकलिस्ट आहे... तुम्हाला पाहून मला सुद्धा लडाख मध्ये सायकलिंग करायची इच्छा झाली आहे.  त्याला सदिच्छा देऊन पुढे निघालो. 

आता हिरवळीचा प्रदेश संपून घाट रस्ता सुरू झाला... रिदम मिळाला होता,  घाट संपल्यावर थांबुया म्हणून दमदारपणे घाट चढत होता. "नामशांग पास" चढायला तब्बल तीन तास लागले. पास वर थोडी विश्रांती घेऊन भरपूर फोटोग्राफी केली. प्रचंड वारे सुटले होते. त्यामुळे जास्त वेळ थांबता येणार नव्हते.

 येथून सोमोरीरी लेक वरील कारझोक गाव २५ किमी होते.  आता उताराचा रस्ता असल्याने आपण कारझोक गावात पोहोचू असा आत्मविश्वास बळावला. सोबत असलेला खाऊ खाऊन नव्या दमाने उतार उतरू लागलो. थोड्याच वेळात भ्रमनिरास झाला. हेडविंड एव्हढे जोरदार होते की पेडलिंग करून सुद्धा सायकल वाऱ्यावर लटपटत होती. बरीच दमछाक होत होती.  सोसाट्याच्या वाऱ्याचा मारा झेलत पुढे चाललो होतो. 
 
अचानक तलावाचे टोक दिसले. खूप हायस वाटलं ... खूप पुढे आल्यावर लक्षात आलं ... हा सो मुरीरी लेक नाही. हा "खजांग करू" लेक आहे. अजून सो मुरीरी खूप लांब होता...  जोरदार वारे वाहत होते त्यामुळे तलावाजवळ थांबणे अशक्य होते. तरी सुद्धा सायकल थांबवून  प्रोटेक्शन म्हणून विडचिटर अंगात चढविले. या तलावाला वळसा मारून पुढे आलो... तलावाजवळ सायकलींनी पण थोडी विश्रांती घेतली... थंडीने गारठल्या होत्या...

तलावा भोवती ढगांचा चाललेला लपंडाव अनिमिष नजरेने पहात होत्या.

रस्ता उताराचा असून सुद्धा वाऱ्यामुळे पेडलिंग करणे कठीण होत होते. संजय थोडा पुढे होता... संजयला जोरदार हाक मारून दोन्ही हात कैची सारखे वर केले. संजयच्या लक्षात आले माझा स्टॅमिना संपला आहे... तो थांबला... हळू हळू त्याच्या जवळ गेलो ... आता इथेच पडाव टाकूया... जवळच दगडाचे कुंपण दिसत होते... वारे वाहत असून सुद्धा कुंपणाच्या आत तंबू लावण्यासाठी पुढे झालो... आणि काय... त्या दगडाच्या कुंपणाच्या आतील संपूर्ण परिसर शेळ्या मेंढ्याच्या लेंड्यांनी खचाखच भरलेला होता. थोडावेळ थांबलो... चार खजूर खाल्ले... संजय म्हणाला, "थोडे पुढे जाऊया... एखादा चांगला आडोसा पाहून टेंट लावूया" 

 थोडी राईड करून पुढे आलो तेव्हा वारा किंचित कमी झाला होता... परंतु आता  स्टिफ उतार चढाचा  रस्ता सुरू झाला... अक्षरश यु आकाराचा सरळ रस्ता... भन्नाट सायकल उतरत जायची आणि चढ सुरू झाला की पेडलिंगचा कस निघायचा... खजुरामुळे ऊर्जा मिळाली होती आणि ह्या सिसॉ रस्त्यावर मस्त रिदम मिळाला होता... भन्नाटत संजयच्या पुढे गेलो... पुढे जोरदार उतार सुरू झाला पण डांबरी रस्ता संपून दगडांचा... मातीचा रस्ता सुरू झाला होता... टेंट लावायचे विचार दूर पाळले.. वारे थोडे कमी झाले... त्याचा फायदा घेऊन ऑफ रोडिंग मध्ये जोरदार पेडलिंग सुरू केले. सायकल रॉकेट सारखी पळू लागली... सायकल थडथडत होती. पण  हँडल वरची ग्रीप अतिशय पक्की होती... मोठ्या हँडल मुळे हाताला अतिशय कमी गचके बसत होते...  
 
खूप खाली उतरलो होतो... लांबवर सोमुरीरी लेक दिसू लागला... संजयसाठी रस्त्याच्या बाजूला थांबलो. सायंकाळचे पावणे सहा वाजले होते... उताराच्या ऑफ रोडिंगवर संजयला खूपच काळजी घ्यावी लागत होती... 

पुढे प्रस्थान केले... वातावरण अचानक बदलू लागले वाऱ्याचा जोर वाढला... पावसाची चिन्हे दिसू लागली... आणखी जोरात पेडलिंग सुरु केले. सोमुरीरीच्या पहिल्या किनाऱ्या जवळ पोहोचलो येथून एक रस्ता सोमुरीरीच्या पूर्वेला चुमार गावाकडे जातो तर दुसरा पश्चिमेला कारझोककडे जातो ...
येथून कारझोक आठ किमी वर होते.. ढग गडगडू लागले आकाश भरून आले होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडण्याची चिंन्हे होती... अर्धा किमी अंतरावर एक कंटेनर दिसला... संजयला सांगितले त्या कंटेनर जवळ जाऊया... बघू जवळपास काही व्यवस्था होते काय... कंटेनरचा दरवाजा वाजवला .. एक तरुण बाहेर आला... त्याला बाहेरची परिस्थिती सांगितली.. त्याने तातडीने  आत घेतले...

तो कंटेनर म्हणजे बंक बेड असलेल घर होत.. सायकल वरचे समान काढून आत घेतले... रस्त्याचे काम करणाऱ्या काँट्रॅक्टरचे हे दोघे सुपरवायझर होते... बाकी कामगार सुमडो गावाजवळ रस्त्याचे काम करत होते. 'अली' कुक पण होता.. त्याने गरमागरम चहा बनवून दिला.. हळूच त्याला विचारले अलीभाई, "आज यहा रह सकते है क्या" अली दिलखुलास हसला... आणि म्हणाला  "अभी आप हमारे मेहमान है, बिनधास्त रहो"  खूप मोठं काम झालं होतं... अली म्हणाला, "बहोत मोटारसायकलवाले, कारवाले यहासे आते-जाते है, लेकीन कंटेनरतक कोई नही आता... भगवाननेही आपको हमारे लिये भेजा है..."

खरं तर अली आणि रवी च्या  रूपाने आम्हालाच भगवंताचे दर्शन झाले होते... " जे का रंजले गांजले... त्यासी म्हणे जो आपुले... देव तेथेचि जाणावा..." ही तुकोबांची वाणी आठवली.

बाहेरचे वातावरण आणखी उग्र झाले सोसाट्याच्या वाऱ्या बरोबर पाऊस सुरू झाला... वातावरण आणखी थंड झाले... अशा परिस्थितीत कारझोक पर्यंत पोहोचणे अशक्यच होते... कंटेनरच्या आत प्लायवूड लावला असल्यामुळे बाहेरची कडकडीत थंडी फारशी  जाणवत नव्हती. या कंटेनर मध्ये तीन बंक बेड होते.. म्हणजे  सहा जण झोपू शकत होते... त्यातील खालचे दोन बेड मिळाले... 

कपडे बदलले आणि अली-रवी बरोबर गप्पा सुरु झाल्या... "आज आप क्या खाना खाओगे" इति अली...
"अलीभाई मै सबके लिये टमाटर चटनी बनाता हु, आप सबजी बनाव"  कांदा टोमॅटो कापले, अलीने मसाला हळद वगैरे दिले... खूप दिवसांनी टोम्याटो चटणी बनवीत होतो... अलीने बिन्सची चमचमीत भाजी, भात आणि पोळ्या बनविल्या.. जेवताना लक्षात आले टोम्याटोची चटणी बेचव झालीय... कोणीही काहीही न बोलता जेवण संपविले... 

थोडासा भात, एक चपाती, भाजी आणि बरीचशी टोम्याटो चटणी शिल्लक राहिली होती... अलीभाईने सर्व एकत्र करून...  त्याचे दोन दोस्त जेवणाची वाट पाहत होते... त्यांना घातले... अली म्हणाला, कोई कामगार या नया आदमी यहा आता है;  तो ये दो कुत्ते भौककर कंटेनर के पास आने नही देते... लेकीन आज वो आप पर कैसे नही भौके, ये अचरज की बात है...

प्राण्यांनासुद्धा रंजल्या गांजल्यांची जाणीव होत असावी... 

चराचरात परमेश्वर आहे याची अनुभूती आली...

सतीश जाधव
मुक्त पाखरे....

2 comments:

  1. मित्र डॉ रामेश्वर चे अभिप्राय
    खुप छान लिखाण.
    कट्ट्यार काळजात घुसली या चित्रपटात खान साहेब यशवंता ला म्हणतात "गाते राहो, गाते रहो', मी खान साहेब नसलो तरी म्हणतो ' सतीश जी, लिखते रहो, निरंतर लीखते रहो'
    छान लिखाण.

    ReplyDelete
  2. परममैत्रीण अभिप्राय...

    निसर्गावरील नि:सिम प्रेमामुळे त्याच्या सोबतचा तनामनाचा
    कस लागणारा सायकल प्रवास वाचताना अचंबित करतो .
    प्रत्येक क्षणी ,प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा अनुभव घेत केलेला प्रवास,मग तो अनुभव निसर्गाचा असो अथवा भेटलेल्या व्यक्तींचा असो, वाचकास प्रत्यक्ष प्रवास केल्याची अनुभूती देतो. याचे नेमके कारण म्हणजे मोजक्या आणि योग्य शब्दांत व्यक्त केलेले वर्णन..

    ReplyDelete