Wednesday, January 19, 2022

"मल्हार मिसळ" "येळकोट येळकोट जयमल्हार" दि. १९ जानेवारी २०२२

मल्हार मिसळ
येळकोट येळकोट जयमल्हार
दि. १९ जानेवारी २०२२

महाराष्ट्राच कुलदैवत जेजुरीचा खंडोबा... त्याचा जयजयकार म्हणजे "येळकोट येळकोट जयमल्हार" आणि याच मार्तंडाच्या नावानं एक सणसणीत खाद्य संस्कृती बहरात आलीय... "मल्हार मिसळ"

अलिबागच्या पार नाक्यावर मल्हार मिसळ जन्माला आलीय... ती अनिता आणि मंगेश निगडे यांच्या अथक प्रयत्नातून...

फिरायला बाहेर पडल्यावर... खाद्यपदार्थामध्ये नवीन काय याचा सतत शोध चालू असतो... आणि  निगडे कुटुंबासारखी कल्पक माणसे सापडतात ती या शोधला आयाम देण्यासाठीच... 

मिसळ ही महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली... सजलेली...आणि लहान थोरांच्या जिव्हाळ्याची संस्कृती आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रदेशातील खाद्य संस्कृतीची सळमिसळ "मिसळ" मध्ये पाहायला मिळते... 

पुणेरी, कोल्हापुरी, नाशिकची, भीमाशंकरी अशा वेगवेगळ्या प्रांतातील मिसळीची चव आणि गोडी वेगवेगळी... पण एक गोष्ट सर्वात सारखी ती म्हणजे पाव... हा पाव या मिसळ मध्ये कसा घुसला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला... अस्सल महाराष्ट्राच्या मिसळ मध्ये पाव हे समीकरण जुळत नव्हते... तेव्हाच मनात आले ... ह्या मिसळीने पावाची संगत सोडून पुरी बरोबर दोस्ती का करू नये...

हीच किमया साधली मल्हार मिसळने...


मटकीच्या सुक्या भाजी मध्ये फरसाण, त्याबरोबर चमचमीत तर्री... सुकी बुंदी, दही, गुलाब जाम आणि रसरशीत फुगलेल्या पुऱ्या त्या सोबत फर्मास मसाले ताक... कांदा लिंबू आणि अतिरिक्त मटकी... ताटात खच्चून भरलेले हे पदार्थ पाहिल्यावर... पोटातले कावळे फडफडू लागले तर नवल नाही... 

मनात असलेले पुढ्यात आले की रसनेला आवर घालणे अतिशय कठीण असते...  हा मटकी मिसळीचा थाट पहिला की पोटावर हात फिरवत... सर्व पदार्थ उदरात विसावले जातात... पोट भरलं तरी पण मन भरत नाही... आणि हेच हॉटेलच्या दरवाजावर लिहिले होते... स्पेशल मल्हार पुरी मिसळ बरोबर स्पेशल बटर आणि स्पेशल चीज मिसळ सुद्धा होती...  या वर कडी म्हणजे ओल्या नारळाची करंजी आणि सोबत सेंद्रिय गुळाचा आमदार चहा... या सर्व पदार्थांची निवांत चव चाखली.

      आणखी एक गोष्ट प्रकर्षाने नजरेत भरली... ती म्हणजे स्वच्छ आणि टापटीप असलेला सर्व कर्मचारी वर्ग... विशेष म्हणजे त्यांचे हसतमुख चेहरे पाहिल्यावर... त्यांनी बनविलेले पदार्थ आणखी बहारदार झाले होते... अनिता ताई सर्व  कामगिरीवर काळजीपूर्वक लक्ष पुरवत होत्या...

हॉटेल मधील देव्हारा म्हणजे सर्व देवांचे आणि सनातन धर्माचे वसतीस्थान होते...


प्रथम गणेश,  त्याच्या एका बाजूला गुढी आणि राधाकृष्ण तर दुसऱ्या बाजूला दिवा आणि डमरू...खालच्या खणात विठठल रखुमाई आणि दत्तगुरूंच्या साथीने स्वामी विवेकानंदांना स्थान मिळाले होते...संत मीराबाई सोबत वाद्यसंगीतक आणि बछड्यासह गोमता विराजमान झाली होती... 

कल्पकतेचा कळस म्हणजे हॉटेलच्या  भिंतीवर लावलेल्या पाट्या...


यांत भावलेलं वाक्य म्हणजे "इथे तुम्हाला मेहुण्यापेक्षा  तिखट आणि बायकोपेक्षा झणझणीत मिसळ मिळेल"... मिसळीला सुद्धा माणसाळवण्याचे काम या पाटीने केले होते...

मिसळ खाण्याबरोबर शब्दांतील कहाण्या वाचणे म्हणजे पोटाबरोबर मन आनंदाच्या लहरीवर तरंगणे होते...

पोटातून निघणाऱ्या या आनंद लहरी मनाच्या पटलावर स्वार होऊन चौफेर उधळल्या होत्या...

अशा या अलिबागच्या पार नाक्या जवळील मल्हार मिसळ हॉटेलला भेट देणे ... म्हणजे खवय्येगिरील चालना देणे आहे...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

अनिता आणि मंगेश निगडे
मल्हार मिसळ
7719822522

7 comments:

  1. खूपच छान वर्णन केलं आहेस

    अगदी स्वतः जाऊन खाऊन आलो असे वाटले

    तुसी ग्रेट हो

    ReplyDelete
  2. परममित्र काशिनाथचे अभिप्राय

    वा!!! कया बात है!!!

    हे एक सुख आयुष्यातलं
    अगदी अतुलनीय
    अमृतासारख.
    एक अवर्णनीय आनंद
    साऱ्या रोमारोमात
    उफाळणारा
    मित्रांसोबत,
    गोतावळयात
    अधिकच खुलणारा.
    घ्यावा, द्यावा
    मनाचया कुपीत
    कायम जपून ठेवावा
    असा…

    ReplyDelete
  3. मित्र रामेश्वरचे अभिप्राय


    खुप छान लिखाण.
    लिहित रहा व लोकांना आनंद देत रहा.

    ReplyDelete
  4. मिसळ महती ऐकून मिसळ चाखल्याची अनुभूती मिळाली. सुरेख अलिबाग गेल्यानंतर नक्की चव चाखणार ....सुरेख वर्णन 👌

    ReplyDelete
  5. खुप छान. एकदा भेट द्यावीच लागेल. लिखाण अप्रतिम आहे.

    ReplyDelete
  6. 👍👌🌹पुढील पार्टी जय मल्हारला ,

    ReplyDelete