Friday, January 14, 2022

मुंबई सिक्कीम - दार्जिलिंग टूर..... ३ जानेवारी २०२१

मुंबई  सिक्कीम-दार्जिलिंग टूर

३ जानेवारी २०२१

सकाळीच गंगटोकच्या ड्रीफ्ट हॉटेल मधून मॉर्निंग वॉकला निघालो.



शहरातील वळणावळणाच्या आणि चढत जाणाऱ्या रस्त्यावरून फेरफटका मारणे म्हणजे इथल्या थंड वातावरणाशी एकरूप होणे होते.
  

गुरुद्वारा आणि बौद्ध मंदिर (गुरू कुंभ टाकलुंग मॉंनेस्ट्री)  समोरासमोरच होते. 
  

वळणावर मिलिटरी गंजू लावा द्वार होते. आणखी वर चढून गेल्यावर भोलेबाबा सिद्धेश्वर शिव मंदिर लागले. या कौटुंबिक सहलीसाठी तीनही देवतांचे आशीर्वाद मिळाले होते.

 साधारण ४ किमी चढून गेल्यावर महात्मा गांधी मार्केट परिसर लागला. मार्केट बंद होते. खास टुरिस्टना फिरण्यासाठी तसेच खरेदीसाठी हा परिसर आहे. येथे गाड्याची रहदारी नाही. पुन्हा खाली उतरायला सुरुवात केली. आता अक्षरशः धावतच खाली उतरू लागलो. वेगळा मार्ग अवलंबला... पायऱ्याने खाली उतरू लागलो. वाटेत सिलिगुडी बस स्टँड लागला. स्थानिकांची खूप गर्दी होती या स्टँड जवळ...

 सरकारी बस स्टँड MG मार्केटच्या वर आहे. सिक्कीमची राजधानी गंगटोक हे शहर पूर्व हिमालयाच्या कुशीत वसलेले अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे.  येथे विनाकारण कोणीही हॉर्न वाजवत नाही. तसेच नागरिक स्वच्छतेची विशेष काळजी घेतात. शहराच्या मुख्य परिसरात फिरताना कोठेही कचरा आढळला नाही. महत्वाचे म्हणजे येथे प्लास्टिक बॅन तर आहेच, तसेच बिसलेरीच्या प्लास्टिक बाटल्या सुद्धा निषिद्ध आहेत.  येथील नळाला येणारे पाणी शुद्ध आहे आणि सर्वजण त्याचाच वापर करतात. हे खूपच भावले. 


सकाळचा नास्ता हॉटेलवर करून साडेदहा वाजता दोन ईनोव्हा गाडीने लाचुंगकडे सफर सुरू झाली.
दोन दिवस लाचुंगला राहणार होतो. त्यामुळे आवश्यक तेवढे कपडे घेऊन; एक्सट्रा लगेज हॉटेल वर ठेऊन दिले. येथून लाचुंग ११० किमी आहे. या मिलिटरीच्या नियंत्रणात असणाऱ्या टुरिस्ट गावासाठी लागणाऱ्या परमिटची व्यवस्था टूर ऑपरेटर चंद्राने आधीच करून ठेवली होती. आज ५५०० फूट उंची वरून ९००० फुटावरील लाचुंगला जाणार होतो... 

गाड्या डोंगरातील वळणावळणाच्या रस्त्याने वर वर चढू लागल्या...


डोंगर माथा पांढऱ्या शुभ्र बर्फाने झाकला गेला होता... थंडीत खास बर्फाची मजा घेण्यासाठीच ही सहल होती. छोट्या रस्त्यावरून एकदम हळूहळू गाड्या पुढे जात होत्या. रस्त्यात लागणारी प्रेक्षणीय स्थळे पाहणार होतो. 

दिड तासात बटरफ्लाय धबधब्याकडे पोहोचलो... अतिशय मनमोहक स्थळ...


बर्फाचं थंडगार दुधाळ जलप्रपात वातावरणातील थंडावा आणखी वाढवत होता. चारही बाजूला हिरवी टच्च झाडी आणि हुरहूरणारी थंडी ... धबधब्या समोरच्या व्हीव पॉईंटवर चढून गेलो. झोम्बणाऱ्या वाऱ्याला अंगावर घेत धबधब्याच्या लोकेशन वर फोटो काढले...


आमचे महिला मंडळ एकदम खुश होते. अशा स्थळावर फोटोग्राफीला बहर येतो. या परिसरसतील विविध रंगसंगतीच्या फुलपाखरांमुळे धबधब्याला बटरफ्लाय नाव पडले होते.

आता थंडी वाढू लागली होती. ढगाळ वातावरणामुळे  सूर्यदर्शन नव्हते. तिस्ता नदीच्या धिखू खोला पुलावर आलो... पुढे बांधलेल्या धरणामुळे नदी एकदम स्तब्ध झाली होती.


हिरव्यागार पाण्यात पडलेल्या डोंगर, ढगांचे प्रतिबिंब म्हणजे निसर्ग स्वतःला स्वतःच्या आरशात न्याहाळलो आहे, असे भासले...

मंगशिला गावाजवळील हॉटेल तिमोन मध्ये ऑथेंटीक सिक्कीमी जेवण मिळाले.  येथील पुलके पुरी एव्हढे बारीक होते. सिक्कीम मधील मुख्य अन्न भात असल्यामुळे पोळी हे येथील पक्वान्न आहे. परंतू चायनीज पदार्थ सर्रास मिळतात.

चुमाथांग कडे पुढील सफर सुरू झाली. सायंकाळच्या सूर्याची सोनेरी किरणे ढगांना सुवर्ण साज चढवत होती.

डोंगराच्या कपारी कपारीतून जाणारा रस्ता बऱ्यापैकी दुतर्फा होता. डोंगर चढायचा आणि उतरून परत दुसरा डोंगर चढायचा अशी सफर सुरू असताना मियांचू नाल्याजवळ पोहोचलो.

डोंगराच्या कपारी कपारीतुन खाली कोसळणाऱ्या ह्या धबधब्या जवळ जाताच थंडीची लहर धावून आली. याच्या थंडगार पाण्याचे थेंब अंगावर शिरशिरी आणत होते... परंतु नात शबरी या वातावरणाशी एव्हढी एकरूप झाली होती की तीला थंडी जाणवतच नव्हती. 
         अर्ध्या तासात चुंगथांग गावात पोहोचलो... गावाच्या वेशीवर रंगीबेरंगी पताका फडकत होत्या. ६००० फुटावर वसलेले हे गाव स्ट्रीट लाईट ने सजलेले होते.


गावात देवीचा वार्षिक उत्सव सुरू असल्यामुळे पंचक्रोशीतील बऱ्याच भाविकांच्या गाड्या डोंगराच्या  कडेला उभ्या होत्या... हळू हळू या गर्दीतून वाट काढत बाहेर पडलो... 

अंधार पडायला सुरुवात झाली आणि गाडीचा वेग आणखी कमी झाला... चुंगथांग ते लाचुंग  फक्त २१ किमी राहिले होते... रस्त्याच्या दोन्ही बाजूला आता ग्लेशियर दिसू लागले होते...काही ठिकाणी आजूबाजूची झाडे झुडपे, दरीच्या कडेला असलेले रेलिंग सुद्धा बर्फाने आच्छादले होते... सायंकाळच्या संधीप्रकाशातील धुक्याची चादर रस्तासुद्धा भुरकट करत होती... वर चढत जाणरा   खडबडीत रस्ता... चमकणारा बर्फ, धुक्यातील वाट, गाडीच्या काचा बंद करून सुद्धा बोचणारी थंडी... यात गाण्यांच्या मस्तीत चालणारी सावध गाडी... मानलं पाहिजे दोन्ही सारथ्यांना... तेव्हाच दोघांना पायलट ही उपाधी दिली... विमान चालविणे सुद्धा एव्हढे खडतर नसावे...

थोडा वेळ मार्गक्रमण केल्यावर एका वळणावर गाडी थांबली. एका मागोमाग एक बऱ्याच गाड्या थांबल्या होत्या. वाहतुकीच्या शिस्तीचे काटेकोरपणे पालन करत होत्या... हॉर्न नाही की गाड्यांच्या दोन रांगा नाही... भारताचा भाग असलेल्या सिक्कीममध्ये रहादरीची ही शिस्त पाहून खूप अभिमान वाटला... जवळपास पाऊण तास एकाच जागेवर उभे होतो.

 भूस्खलनामुळे बराच मोठा ढिगारा रस्त्यावर पडला होता...तो हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. वाहतूक सुरू झाली तरी कोणीही हॉर्न वाजवत नव्हते... स्वयंशिस्त हा सिक्कीमच्या टुरिझमचा पाया आहे... विशेष म्हणजे  गाडीतील कोणाला नैसर्गिक विधीसाठी जायचे असेल तर... जंगलात.. झाडाजवळ.. रस्त्यात कुठेही ड्रायव्हर गाडी थांबवत नाहीत... तर जेथे टॉयलेटची व्यवस्था आहे तेथेच थांबवतात... अर्जुन ड्रायव्हर म्हणाला, 'वर्षातून एकदा आमचे सेमिनार होते'. तेव्हा टुरिस्टशी कसे वागायचे तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण कसे करायचे आणि पर्यावरण प्रेम या बाबत माहिती दिली जाते. विनाकारण कोणताही ड्रायव्हर हॉर्न वाजवत नाही. पर्यावरण प्रदूषित होऊ न देण्याचे महत्व सिक्कीमच्या प्रत्येक नागरिकाने जाणले आहे.  हे भारताचे भाग्यच म्हटले पाहिजे...

सात वाजता लाचुंग हेरिटेज हॉटेल वर पोहोचलो. हॉटेल अंधारात गुडूप झाले होते... हॉटेलची लाईट गेली होती... प्रचंड गारठा पडला होता... जनरेटर पण नव्हते. कन्हय्या ट्रॅव्हलला सांगून बाजूला असलेल्या  ताशी गारहिल हॉटेल मध्ये व्यवस्था झाली... हिटर पण मिळाले.  त्यावेळी  -१ तापमान होते. सर्वांसाठी हिटरची व्यवस्था झाल्यामुळे रात्रीचे -८ तापमान सुध्दा सुसह्य झाले होते... 

दोन जानेवारीला सकाळी ७ वाजता समुद्र सपाटीवरील मुंबईत होतो आणि आज तीन तारखेला रात्री सात वाजता (३६ तासात)  ९००० फुटावरच्या लाचुंग गावात पोहोचलो होतो... वातावरणातील प्रचंड बदल शरीराने स्वीकारण्यासाठी मनाची शक्ती कामी येणार होती...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

No comments:

Post a Comment