Tuesday, January 4, 2022

मुंबई सिक्कीम दार्जिलिंग सफर... 2 जानेवारी २०२२

मुंबई सिक्कीम दार्जिलिंग सफर...
2 जानेवारी 2022

नवीन वर्षातली पहिल्या सफरीला सुरुवात झाली होती... पहाटे साडेपाच वाजता जाधव, तावडे आणि काळे कुटुंब तसेच सावंत, साळसकर आणि गीते वहिनी विमानतळावर हजर झाले...

सकाळी मुंबई बागडोगरा विमान प्रवास एकदम मस्त झाला.
  

जवळपास अर्धे विमान खाली होते. एअर आशियाच्या आंतरराज्य विमान प्रवासात प्रथमच ब्रेकफास्ट  मिळाला. कचोरी, ठेपला, चिवडा आणि बलवर्धक डिंक लाडू चेक इन करताच सर्वांना वाटले होते. त्यामुळे बागडोगराला पोहोचेपर्यंत सर्वजण निवांत होते.

एअरपोर्ट बाहेर दोन इनोव्हा गाड्या तयार होत्या. टूर गाईड ललिता मॅडम यांनी सिक्कीम संस्कृती प्रमाणे सर्वांच्या गळ्यात खदा (सिक्कीम शाल) घालून  स्वागत केले. सफर सुरू झाली


सिलिगुडीच्या बागडोगरा विमानतळावरून गंगटोककडे... सकाळी अकरा वाजता सुद्धा हवेत गारवा जाणवत होता... सिलीगुड़ी बाहेर चहासाठी लड्डू गोपाल हॉटेल मध्ये आलो. चहा सोबत मालकीस्ट बिस्किटे खाणे म्हणजे स्वप्नात जाणे असते.

वाटेत सेवक अभयारण्य लागले... दोन्ही बाजूला गर्द रान पसरले होते. त्याच्या मधून पुढे पुढे जाणारा वळणावळणाचा रस्ता... एखाद्या अवखळ नदीप्रमाणे भासत होता.

तासाभरात तिस्ता गावात पोहोचलो... तिस्ता नदीच्या अलीकडून  एक रस्ता दार्जिलिंगला तर पलीकडून दुसरा रस्ता गंगटोकला जातो. 

मंगथांगला जेवायला थांबलो... येथे जेवण सांगितल्यावर ज्या डिश मध्ये पदार्थ आले ते सर्वांना पुरेसे नव्हते. पुन्हा ऑर्डर दिल्यावर ती यायला बराच उशीर लागला. त्यामुळे जेवणासाठी पावणे दोन तास  लागले. ऑर्डर देताना डिशचे प्रमाण किती हे पाहणे क्रमप्राप्त होते. प्रवास माणसाला सतत काहीतरी शिकवत असतो; याचा प्रत्यय आला.

आता हळू हळू थंडी वाढत होती... गाडी डिझेल भरण्यासाठी माजितर गावात थांबली येथे सर्वांसाठी कॅपचिनो कॉफी घेतली... बाहेर थंड वातावरण असताना गाडीत बसून बंद कपातली कॉफी पिणे आणि निसर्गाचा आस्वाद घेणे... या सारख्या दुसरा आनंद काय असू शकतो...

  सिंगतम गाव सोडल्यावर एक मोठा टनेल लागला... पहाडातून जाणारा रस्ता लँड स्लाइडिंग मुळे वाहून गेल्यामुळे BRO ने  युद्ध पातळीवर हा बोगदा तयार केला होता... साडेपाच वाजताच अंधाराला सुरुवात झाली. आता अंधारातून सफर सुरू झाली... गंगटोकच्या ड्रीफ्ट हॉटेल मध्ये पोहोचलो... कन्हय्या ट्रॅव्हल्सने लग्झरी हॉटेल मध्ये व्यवस्था केली होती...

हॉटेलच्या रेड हॉट चिली पिपर रेस्टॉरंट मध्ये रात्रीचे शाकाहारी आणि मांसाहारी जेवण आले. मनसोक्त जेवणाचा स्वाद घेतल्यावर, स्वीट डिश म्हणून शेवची खीर होती... हॉटेलमध्ये भरपूर फोटोग्राफी केली. 

आजच्या संपूर्ण दिवसाचा प्रवास म्हणजे एका दिवसात भारताच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे केलेली भटकंती होती...

 समुद्रकिनाऱ्यावरून तडक हिमालयात पोहोचलो होतो...  आता भटकणे किती सोपे झाले आहे...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

7 comments:

  1. आता मस्त प्रवास वर्णन वाचायला मिळणार आम्हाला.शुभेच्छा तुमच्या भटकंतीला

    ReplyDelete
  2. अरे वा, छान की....

    ReplyDelete
  3. अप्रतिम प्रवास वर्णन, प्रत्यक्षात सहलीत सहभागी आहोत असे भासते.

    ReplyDelete
  4. खूप छान प्रवास वर्णन स्वतः प्रवास केल्या सारखे वाटत

    ReplyDelete
  5. मामा,मामी एकदम छान दिसत आहेत खूप मस्त मज्जा आली असेल तुम्हाला.आम्हाला हे बघून असे वाटते की आम्ही पण तिथे असू... खूप खूप सुंदर.

    ReplyDelete
  6. धन्य झालो सतीश तूझ्या या अफाट प्रवासाची आवड पाहून ,
    जगभर कारोना नावाची राक्षस राज्य करतं असताना तू त्याचावर मात करून लोकांना कसे जगायचे ह्याचा paya घालत चाललेला आहेस , really you are undefeatable person. God bless you and all your family members.

    ReplyDelete