Showing posts with label लडाख सायकलिंग.... Show all posts
Showing posts with label लडाख सायकलिंग.... Show all posts

Monday, January 24, 2022

लडाख सायकलिंग भाग ७ दि. १० आणि ११ ऑगस्ट २०२१

लडाख सायकलिंग भाग  ७
दि. १० आणि ११ ऑगस्ट २०२१

कंटेनर जवळ नेट नसल्यामुळे घरी संपर्क झाला नाही. कालच्या मोठ्या राईडमुळे रात्री नऊ वाजताच झोपी गेलो. रात्रभर थंडगार वारे वाहत होते. 

सकाळी अलीने आमलेट बनविले... त्याबरोबर सोबतचा चिवडा खाल्ला... आता सो मोरीरीच्या उत्तरेकडे म्हणजेच चुमार गावच्या रस्त्यावरून व्हीव पॉईंटकडे निघालो.

अलीने सांगितल्या प्रमाणे,   बाहेरील टार रोड ऐवजी मधल्या सोमोरीरीच्या खाजणातून निघालो... हा शॉर्ट कट रस्ता होता... ऑफ रोडिंग असला तरी सरळ वाट होती.  तासाभरात व्हीव पॉईंट वर आलो... 

वरच्या टेकाडावरून निळाशार सो मोरीरी लेक स्थितप्रज्ञ साधू सारखा वाटला... येथून प्रत्यक्ष किनाऱ्यावर जाण्यासाठी  सायकल एक किमी ड्रॅग करावी लागणार होती. समर्पयामिच्या आदित्यच्या टिप्स आठवून सरोवराच्या गोल गोल सरकत्या दगडांवरून सायकलिंग केले. मध्ये मध्ये सायकल सरकत होती पण घसरली नाही. संजयने ड्रॅग करत सायकल खाली किनाऱ्याजवळ आणली. 

आता फक्त आम्ही, सो मोरीरी तलाव आणि अथांग निसर्ग होतो... सायकल तलावाजवळ पार्क केली... ती पण तलावाला डोळे भरून पहात होती...
 

विस्तीर्ण पसरलेला तलाव.. लांबवर हिमालयाच्या माथ्यावर रेंगाळणारा बर्फ आणि त्याच्याशी मस्ती करणारे पांढरे शुभ्र ढग.... त्यांचे प्रतिबिंब पाण्यात पडलेले... संपूर्ण जलचक्र समोर भिरभिरत होते... 

शांत एकांतात सो मोरीरीच्या किनाऱ्यावर बसलो...
 

 सो मोरीरीला मनात साठवत होतो... लांबवर संजय बसला होता... साथसोबत  दिलेल्या मेरिडा सायकलला संजय न्याहळत होता...
 
तलाव आणि ढगांच्या बॅक ड्रॉपवर  वाळूत उभी राहिलेली सखी आपले रूप पाण्यात निरखत होती...
 
सूर्य नारायणाने तिला किरणांचा आशीर्वाद दिला होता... आज सो मोरीरी लेकवर सखी सोबत नवनवीन पोज देत होतो...

  निवांतपणे दोन तास व्यतीत केले सो मोरीरी तलावा सोबत... आणलेल्या खाऊचा आस्वाद घेणे पण सुरू होते...  "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" या पाडगावकरांच्या गाण्याचे सूर मनपटलावर आपसूक उमटले... 

संजयला तर शायरी सुचत होती,  "आसमासे जमिपे उतारा हुवा यह पानीका खजाना है, जैसे की अंगुठीने नगीना है..." 


आता कारझोक गावात जायचे होते. पुन्हा लेकच्या किनाऱ्याने दक्षिणेकडे जाऊ लागलो... त्यामुळे लांबचा वळसा टळणार होता... एका ठिकाणी दलदल लागली... म्हणून थोडा दुरवरून फेरा मारला. मुख्य रस्त्यावर आल्यावर पुन्हा ऑफ रोडिंग सुरू झाले. 

सो मोरिरी लेकच्या निळ्याशार पाण्यात पडलेले ढगांचे प्रतिबिंब पाहून... ज्ञानदेव माऊलींचा अभंग आठवला...

रूप पाहतां लोचनीं ।
सुख जालें वो साजणी ॥

दुपारचे साडेतीन वाजले कारझोक गावात पोहोचायला. 

चहा नास्ता केला. सो मोरीरी वरून लेह पर्यंत परतीच्या प्रवास बसने करायचे ठरले होते. परंतु आलेल्या बसला टपावरचे कॅरीयर नव्हते म्हणून महिंद्रा कॅम्पर नक्की केली. त्याच कॅम्पर मध्ये सायकल टाकून अलीच्या कंटेनरकडे आलो. 

अंडा करी राईस रात्रीच्या भोजनासाठी अलीने बनविले होते... आमच्या कडचा खाऊ अलीला भेट दिला...

अलीने दोन रात्र राहण्याची आणि जेवणाची सोय केली होती. त्याच्या बरोबर आता कायमची  दोस्ती झाली होती. दुसरा मित्र रवी मात्र अबोल होता.  

सकाळी बळेबळे अलीच्या हातात पैसे कोंबले.. सो मोरीरीला टाटा करून लेहकडे परतीचा प्रवास सुरू केला. संध्याकाळी पाच वाजले लेहला पोहोचायला. शेरिंग भाईच्या सायकल शॉपीमध्ये सायकल सर्व्हिससाठी दिल्या आणि शैलेशच्या हॉटेल खारडूंगमध्ये विश्राम घेतला.

अशा प्रकारे चार दिवस अगोदरच लडाख सर्किट पूर्ण झाले होते. या चार दिवसांचा सदुपयोग करण्याचे प्लॅनिंग रात्री झाले सुद्धा...

लडाखच्या तरुणांना घडविणारे सोनम वांगचुक यांना  भेटण्याचा प्रयत्न करणार होतो. 

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

Friday, January 14, 2022

लडाख सायकलिंग भाग ५ दि. ०६ ते ०८ऑगस्ट २०२१

लडाख सायकलिंग भाग ५
दि. ०६ ते ०८ऑगस्ट २०२१

सकाळी साडेसहा वाजता स्पंगमीक गावातील बस स्टँड जवळ पोहोचलो. येथे दोन बायकर्सची ओळख झाली दाहोद गुजरात वरून फिरोज आणि केरळ वरून आलेला दिबु हे सोलो बायकर होते.

एकमेकांना वाटेत भेटले.. आता मित्र होऊन एकत्र बायकिंग करत आहेत. संपूर्ण लडाख फिरून ते श्रीनगरला जाणार आहेत. आणखी तीन सोलो ट्रेकर भेटले. विशेष म्हणजे स्थानिक बसने हे तिघे लडाख फिरत आहेत.


  एक मुंबईचा, दुसरा त्रिवेंद्रमचा, तिसरा जम्मूचा... समविचारी एकत्र आले आणि निसर्गभ्रमणाला निघाले... कधी बसने, कधी लिफ़्ट मागून, कधी ट्रेक करत... त्यांची सफर सुरू आहे. जेमतेम बावीस-पंचवीस वर्षाचे हे तरुण... जीवन जगण्याची कला शिकत आहेत... स्पंगमीक गावात हे तीन दिवस राहिले होते... पेंगोंगला  लेकला मनात, हृदयात  साठविण्यासाठी... यालाच टुरिंग म्हणतात... जे आवडले त्याचा भरभरून आस्वाद घेणे... 


 आठवण झाली एव्हरेस्ट बेस कॅम्प (EBC) ट्रेक मध्ये भेटलेल्या सुएझ या जगभ्रमणासाठी  निघालेल्या इस्रायली तरुणाची...  एकवीस वर्ष वय झाल्यावर इस्रायलमधल्या प्रत्येक तरुण तरुणीला आर्मी मध्ये तीन वर्षे सेवा द्यावी लागते. मग हीच मंडळी पुढील वर्षभर जगभ्रमण करतात... केवढा प्रचंड जीवनानुभव येतो यांच्या गाठीला...  या तीन भारतीय तरुणांत तीच ऊर्जा दिसली.  यांनीच हानलेच्या परमिट साठी लेह मधील फिरोजचा नंबर दिला. तीन वेगळ्या ठिकाणचे वेगळ्या संस्कृतीचे तरुण एकत्र येऊन प्रवास करतात तेव्हा त्याच्या अनुभवाच्या कक्षा अतिविशाल होत जातात...

आठ वाजता येणारी बस साडेनऊ वाजता आली. सायकल टपावर बांधून सुरू झाली बस सफर खारूकडे... 

बसच्या टपावर सायकल कशी बांधायची हे आदित्य काका कडून शिकलो होतो. पेंगोंगचा थ्री ईडीयट  विव्ह पॉईंट पाहायला बस थांबली. परंतु रस्त्यापासून व्हीव पॉईंट  एक किमी अंतरावर होता. बसमधील बरेच प्रवासी तिकडे गेले. परंतु टपावर सायकल आणि सोबत समान असल्यामुळे आम्ही बसमध्येच थांबलो. पेेंगोंग परिसरातील आकाशाची निळाई आणि हिमालयाचे रंग बसच्या खिडकी मधून पाहताना भान हरपून गेले.

बस फुल्ल भरलेली होती. ट्रेकिंग करणारी भली मोठी गॅंग बस मध्ये होती. कर्नाटक मधील हे तरुण नॉन स्टॉप गप्पा मारत होते. सकाळी भेटलेल्या तीन तरुणांमधल्या मालाडच्या हिकेत वीराची मुलाखत घेतली.

 इंजिनिअरींग केलेला हिकेत म्हणतो, "वाटलं आणि सुटलो फिरायला... काहीही न ठरवता... प्रवासातच नवीन मित्र भेटले आणि  सुरू झाली सफर लडाखची... आणखी चार पाच दिवस एकत्र असू... मग माहीत नाही कधी यांची पुन्हा भेट होईल... पण ही साथ जीवनभर आठवणीत राहील..." "जिंदगी के सफर मे लोग मिलते है... पलभर के लिये... और दे जाते है जीवनभर की खुशीया" हिकेत चांगला वक्ता होता. 
 
दुसरा जम्मू मधील खटूआ जिल्ह्यातील अंकुश राजपूतला बोलते केले. ग्रॅज्युएशन पूर्ण करून हा यु ट्युबर एक देश ते दुसरा देश असे भ्रमण करतोय. गेल्या महिन्यात तो अफगाणिस्थानात होता. पण युद्ध परिस्थिती तसेच वॅक्सिन घ्यायला त्याला भारतात परतावे लागले. त्याचे वैशिट्य म्हणजे जगातील जो प्रदेश अनएक्सप्लोअर आहे, अशा ठिकाणी भेटी देऊन त्याची सर्व माहिती यु ट्यूबवर टाकणे... आता त्याचा भारत भ्रमणाचा कार्यक्रम  आहे. संपूर्ण लडाख फिरल्यावर.. काश्मीर मधील खेड्यापाड्यातून फिरणार आहे. तेथून तो नॉर्थ ईस्ट सेव्हन सिस्टर्स करणार आहे. फिरणे आणि युट्युब द्वारे कमाई करणे... आवडीच्या क्षेत्रातून पैसे कमावण्याची कला छान आत्मसात केली आहे अंकुशने...

अंकुश नवीन मित्रांबद्दल भरभरून बोलत होता... चार दिवस तिघेही केलॉंगला लँड स्लाईडिंगमुळे अडकून पडले होते.  तिथेच तिघे सोलो रायडर एकत्र आले. आलेले नवीन अनुभव शेअर करण्याची संधी  मित्रांमुळे मिळली... नवीन गोष्टी, नवीन भाषा, वेगळी संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळली. फिरण्याच्या एका समान धाग्यामुळे तिघे एकत्र आले होते. 

केरळीयन डेसल बरोबर बोलताना उच्चारांची गडबड होत होती. त्याचे मल्याळम उच्चाराचे इंग्लिश डोक्यावरून जात होते. कॉम्प्युटर प्रोग्रामर असलेला डेसल सहा महिन्यांपूर्वी BMS या कंपनीत जॉईन झाला आहे. कोणताही प्लॅन न करता घराबाहेर पडलेला डेसल कोणा बरोबर ही सफर करू शकतो. वर्क फ्रॉम होममुळे प्रवास करता करता कंपनीचे काम सुद्धा सुरू आहे. नोकरी आणि सफरीची छान सांगड घातली आहे डेसलने...

असे हे भटके मित्र... इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत. हे भेटलेले तरुण खूप काही शिकवून गेले होते...

डुरबुकला बस जेवणासाठी थांबली. तेथे आमलेट पराठा खाऊन पुढचा प्रवास सुरु झाला.  ४५ किमीचा "चांगला पासचा" घाट खूपच वेडावाकडा आणि दगडांचा होता. 


ऑफ रोडिंग रस्त्यामुळे बस सावकाश चालली होती. वातावरण थंड व्हायला लागल्यामुळे जाकीट आणि कानटोपी चढवली. रस्त्याच्या आजूबाजूला ग्लेशियर दिसू लागले. हायवे असल्यामुळे ट्रक आणि टँकरची सतत वाहतूक सुरू होती. दोन्ही बाजूला गाड्या असल्यामुळे अतिशय संथ गतीने वाहतूक सुरू होती. "चांगला" टॉपवर   सायंकाळी सव्वाचार वाजता पोहोचलो.
 

१७६८८ फूट उंचीवरचा हा पास गारठलेला होता. ट्राफिक खूपच असल्यामुळे पाच मिनिटातच बस सुरू झाली.

उताराचा रस्ता सुद्धा ऑफ रोडिंग होता थेट खारू पर्यंत..  खारूला पोहोचायला सव्वा सहा  वाजले. हे गाव मनाली लेह हायवे वर आहे.  नाक्यावरच्या सुकू गेस्ट हाऊस मध्ये पडाव टाकला.


तेथेच मनाली ते लेह सायकलिंग करणारे चार मराठी सायकलिस्ट भेटले. आठव्या दिवशी ते खारूला पोहोचले होते. या गावाचे वैशिट्य म्हणजे येथे मांसाहार वर्ज आहे. पंजाबी धाबे सुद्धा शुद्ध वैष्णव धाबे आहेत.

सिंधू नदीच्या किनारी वसलेल्या खारू गावावरून सकाळी सो मोरीरी साठी पेडलिंग सुरू केले. वाटेत त्रिशूल वॉर मेमोरील लागले. शाहिद जवानांना मानवंदना करून पुढे प्रस्थान केले. 

लेह मनाली हायवे वरून १४ किमी वरच्या उपशी गावात पहिला पडाव होता. या गावापासून हायवे सोडून डाव्या बाजूला वळायचे होते. सिंधूच्या किनाऱ्यानेच ही सफर होती. एका सायकलिस्ट मित्राने, एक किमी माईल्स स्टोनचे फोटो शेअर करायला सांगितले होते.

त्या साठी खास उपशी एक किमीचा फोटो काढला. उपशीला चेक पोस्ट वर परमिट दाखवले आणि दहा मिनिटांचा हायड्रेशन ब्रेक घेतला. या प्रदेशात तासाला १२ ते १४ किमी पेडलिंग करणे अतिशय योग्य आहे. 
डाव्या बाजूला वाळल्यावर मोठा माईल्स स्टोन लागला. सोमोरीरी आणि हानले एकाच दिशेला होते. परंतु आमच्याकडे हानलेचे परमिट नव्हते. त्यामुळे सो मोरीरी लेक करूनच मागे परतावे लागणार होते. 

हेमीया गावाजवळ सिंधू नदीवर छान पैकी लाकडी झुलता पूल होता. सायकल अलीकडे ठेऊन झुलत्या पुलावरून सिंधू नदी ओलांडून पलीकडे गेलो.
  सिंधू नदीला येथे "सिंघे खबाब" (सिहाच्या तोंडातून येणारी) म्हणतात.  अतिशय सुंदर कॅम्प साईट होती. छोटसं हॉटेल सुद्धा होतं. एका कोपऱ्यात हिरवळीवर टेंट लावले होते.


लहान मुले खेळत होती.  दुपारचे दिड वाजले होते आणि आणखी पुढे जायचे होते, म्हणून येथे राहायचे टाळले. चहाचा स्वाद घेता घेता सर्व निसर्ग सौंदर्य न्याहाळत होतो. 

ऊन वाढले होते. हेमीया गावजवळच्या प्रेयर व्हील जवळ सायकलने थोडी विश्रांती घेतली.
  

अतिशय छान डांबरी रस्ता होता. वळणे आणि चढ उतार याची आता सवय झाली होती. सर्व सामान सायकलवर लादून या रस्त्यावर विशिष्ट गतीने सायकल चालवावी लागते. परंतु दोन मोठी वाहने जवळ आली असता, थांबण्याशिवाय पर्याय नसतो. 

टेरी स्कुडुंग गावाजवळ पोहोचलो. येथे मुक्काम करण्यासाठी नदीपालिकडे जाऊन संपूर्ण गावात फिरलो. एकही घर उघडे नव्हते.


एका होम स्टे चा दरवाजा जोरजोरात खटखटवून सुद्धा कोणी ओ देईना. काही कळेना काय झालंय ते. गावाच्या टोकाला एक गाडी उभी होती तेथे जाऊन घराजवळ हाक मारल्यावर एक गावकरी बाहेर आला... "गावातील सर्व माणसे बाजाराला गेली आहेत, इथे राहायची व्यवस्था होणार नाही. पुढे पाच किमीवर "गायक" गावात राहायची व्यवस्था होईल."

वाटेत कुठेही साधी चहाची टपरी सुद्धा लागली नाही. सायकलिंग करत होतो पण "गायक" गाव सुद्धा सापडले नाही. आता आम्हीच गात होतो... सायंकाळचे साडेसहा वाजले "केरी" गावात पोहोचायला... खूप दमछाक झाली होती. आर्मी कॅम्प च्या बाजूलाच एक नवीन होम स्टे झाला होता, तेथे पडाव टाकला.


आजी आजोबा घरात होते. त्यांनीच एक रूम उघडून दिली. या होम स्टे चे ओपनिंग आमच्या हस्ते झाले होते. वातावरण अतिशय थंड झाले होते, त्यामुळे सोलरच्या पाण्याने हातपाय तोड धुतले.  रात्रीच्या जेवणानंतर लवकरच झोपी गेलो. आज ८५ किमी राईड झाली होती. 

सकाळी चहा नास्ता करून माहे गावाकडे सायकल सफर सुरू झाली. या लडाख परिसरात व्यवस्थित जेवणखाण आणि आराम असला की येणारा दिवस एकदम नवा असतो. येथून माहे ६० किमी होते. दोन तास सफर झाल्यावर, वाटेत चुशूल १०० किमी बोर्ड लागला.
  

पेंगोंग वरून चुशूल मार्गेच सो मुरीरीला येणार होतो, याची आठवण झाली. 

चुमाथांग गावात पोहोचलो. येथे सिंधू नदी किनारी गरम पाण्याची कुंड आहेत.


कडकडीत उकळतं पाणी कुंडात साठवून तेथे बरेच गावकरी आणि रस्त्यावर काम करणारे मजूर कपडे धूत होते. काही आंघोळ करत होते.  थंड प्रदेशात नैसर्गिक गरम पाणी ही सर्वसामान्यांना परमेश्वराची देणगीच असते. "हॉट स्प्रिंग कॅफे" मध्ये सब्जी रोटी दही जेऊन पुढची सफर सुरू झाली...

 संपूर्ण प्रवास सिंधू नदीच्या किनाऱ्यानेच चालला होता. आमच्या उलट्या दिशेला सिंधू वाहत होती त्यामुळेच प्रवास चढाच्या दिशेने सुरू होता. माहे सात किमी असताना सिंधू नदीकिनारी सुंदर हिरवळीचा पट्टा लागला. तेथे थांबून हिरवळीवर मस्त ताणून दिली. आता प्रत्येक वैशिट्यपूर्ण पाट्यांजवळ फोटो काढायची चढाओढ लागली.
 
माहे ब्रिज जवळ पोलीस चेक पोस्ट आहे.


तेथे मोबाईल वरचे परमिट दाखविले. खाटेवर आडवे झालेले पोलीस महाशय म्हणाले, "झेरॉक्स कॉपी किधर है, नही है तो वापस जावं". काहीही विनवण्या करून तो ऐकेना. चक्क दोन्ही हात जोडले, तेव्हा त्यानेच आम्हाला रजिस्टर मध्ये एन्ट्री घ्यायला सांगितले.  पठ्ठ्या चष्मा घरी विसरून आला होता...  

संध्याकाळ झाली होती वातावरण थंड व्हायला लागले होते.  मुख्य माहे गाव अजून तीन किमी पुढे होते. परंतु माहे ब्रिज वरूनच सो मोरीरीकडे जायचा रस्ता होता, त्यामुळे पुढे गावात जाणे आवश्यक नव्हते. पोलिसाला राहण्याबद्दल विचारल्यावर, नव्या ब्रिजच्या कामासाठी आलेल्या कामगारांचे टेंट बाजूच्या मैदानात लागले आहेत, तेथे बघा काय जमते का. 

BRO चा एक जवान कामगारांवर सुपरवायझर होता. त्याची तसेच कामगारांची परवानगी घेऊन सिंधू नदीच्या किनारी टेंट स्थानापन्न झाला.


विष्णू आणि लक्ष्मण यांची ओळख झाली. त्यांना सायकल चालवायची इच्छा होती, ती पूर्ण होताच पुढ्यात गरमागरम काळा चहा आला. सुपरवायझर शंकर रात्री आठ वाजता वरणभात खायला बोलावणार होता.  रात्री पाऊस सुरू झाला त्यात थंड वारे सुद्धा वाहू लागले. शंकरचा मेसेज येईल म्हणून वाट पाहत होतो... रात्रीचे नऊ वाजले शेवटी खजूर खाऊन झोपी गेलो.

लडाख सफरीत काही खाण्याच्या वस्तू सोबत असणे फार महत्वाचे आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला... 

एक गोष्ट शिकलो... विपरीत परिस्थितीत सुद्धा तग धरणे... त्यामुळे या प्रदेशात उंच उंच शिखरावर पहारा देणाऱ्या भारतीय सैनिकांचे मनोबल किती उच्च असेल याची जाणीव झाली... 

सॅल्युट तरुणांना आणि जवानांना...



सतीश जाधव
मुक्त पाखरे...

Monday, September 20, 2021

लडाख सायकलिंग भाग ०२ दि. २७ जुलै ते ३० जुलै २०२१

लडाख सायकलिंग भाग ०२

दि. २७ जुलै  ते ३० जुलै २०२१

    खारडूंग गावात पोहोचायला रात्रीचे सात वाजले. येथे शेलॉक होम स्टे मध्ये राहण्याची व्यवस्था झाली. रात्री हिरव्या शाक-सलाकची पालेभाजी, मसुरची डाळ, चपाती आणि भात असा मस्त शाकाहारी बेत होता. घरातील डायनींग हॉल मध्ये जेवणासाठी छोटे नक्षीदार लाकडी टेबल होते. जमिनीवरच्या रजईवर मांडी घालून बसून जेवणाची पद्धती लडाखी संस्कृती दाखवीत होती. हे घर एकत्र कुटुंब पद्धतीचे होते. आई वडील दोन मुले त्यांच्या बायका आणि दोन लहान मुले... घरात  झोपण्यासाठी बेड आणि ब्लॅंकेट्स होते... त्यामुळे रात्रीच्या थंडीसाठी गरम कपडे घालण्याची आवश्यकता वाटली नाही.

जवळपास दोनशे घरे असलेलं हे गाव... समृद्ध जाणवले...  हिमालयाच्या कुशीत ११००० फुटावर वसलेले खारडूंग हे अतिशय निसर्गरम्य गाव होते. गावात एकत्र कुटुंब पद्धती आहे. प्राथमिक आरोग्यकेंद्र गावात आहे. तसेच आठवी पर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी डिस्किटच्या विद्यालयात जावे लागते. गावातील बरेच तरुण तरुणी लडाख बाहेर देशभरात उच्च शिक्षण घेत होते. विशेष म्हणजे सरकारी नोकरी आणि आर्मी मध्ये सेवा देण्याकडे या मुलांचा ओढा आहे.

 मुख्य रस्त्यावर असलेल्या या गावातून दररोज लेह पर्यंत बस सेवा आहे. प्रामुख्याने येथे गव्हाची शेती केली जाते. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली... घरातील सर्व मंडळी खूप आपुलकीने चौकशी करीत होते. लहान मुलगी "सिकल" सुद्धा आम्हाला मदत करीत होती. सकाळी लडाखी लोकल चहा "गुडीगुडी" पिताना बहार आली. एका विशिष्ट गुलाबी फुलाचा उकळवून तयार केलेल्या अर्कामध्ये मस्का आणि स्थानिक वनस्पती घालून हा गुलाबी चहा बनविला जातो. येथे  न्याहारीला किंवा जेवणात गोड पदार्थ नसतात. हेच लडाख मधील व्यक्तींच्या दीर्घायुष्याचे रहस्य आहे. 
सकाळी नास्ता करून सायकलवर सर्व सामान व्यवस्थित बांधले आणि खालसारकडे श्योक नदीच्या किनाऱ्याने सायकल सफर सुरू झाली. रस्ता उताराचा होता परंतू समोरून हेडविंड असल्यामुळे वेगाने पुढे जाता येत नव्हते. टुरिस्ट गाड्यांची रहदारी वाढली होती. हा संपूर्ण परिसर अकरा हजार फुट उंचीवर असल्यामुळे सतत दीर्घ श्वसन करावे लागत होते.. लडाख मधील सायकलिंग हे खऱ्या अर्थाने एक आव्हान असते. हे आव्हान स्वीकारून  आनंदाच्या रथावर स्वार होण्यासाठी अदम्य धैर्य असणे फार आवश्यक आहे. 
वाटेत लागणारे BRO चे बोर्ड खूपच ऊर्जा देत होते.. "Fear is reaction  Courage is Direction" ; " Kashmir to Kanyakumari Bharat is One" " Strength will not come from Physical Capacity , It Comes from Indomitable Will"   ही स्लोगन वाचल्यावर BRO च्या कल्पकतेला दाद दिली. 

या परिसरातील हिमालयाला "बडा हिमालय" म्हणतात... हिरवळ विरहीत रंगीबेरंगी पर्वत रांगा आणि बर्फाच्छाद्दीत शिखरे,  तसेच येथे प्राणवायूचे  प्रमाण सुध्दा कमी असते...  कातडी जाळणारा कडक सूर्यप्रकाश... सतत बदलणारे वातावरण यामुळे एक प्रकारचे नैराश्य येते... आणि त्यावर मात करण्यासाठी मनाला दुर्दम्य आत्मविश्वासाची जोड द्यावी लागते... हाच माईंड गेम आहे... म्हणूनच ज्यांना BRM सारख्या स्पर्धात भाग घ्यायचा असेल तर त्यांनी लडाख परिसरात सायकलिंग करावे... 

 खालसर पर्यंतच्या बावीस किमी सायकलिंगसाठी तब्बल दोन तास लागले होते... या सफरीत परमप्रिय  मित्र संजयची जोड असल्यामुळे,  गाणी... गप्पा... फोटोग्राफी... व्हिडीओग्राफी या विविध कलाकारीला बहर आला होता...जेव्हा दोस्तांची साथ असते तेव्हा रस्ते पण लहान होतात... 
नुब्रा व्हॅलीतील खालसरच्या वांगटाक हॉटेलात मॅगी आणि चहा घेतला... येथून सरळ जाणारा रस्ता सियाचीन बेस कॅम्पकडे जातो तसेच डावीकडे वळले  की रस्ता दिस्किटकडे आणि पुढे हुंडरकडे जातो. येथे बरेच टुरिस्ट आणि मोटरसायकलिस्ट विश्रांती घेत होते. मोटरसायकलिस्ट आपुलकीने आश्चर्यमिश्रित भावाने आमची चौकशी करत होते. पेडलिंग करत खारडूंगला टॉप चढलो याचे सर्वांना अप्रूप वाटत होते. येथे श्योक नदीत रिव्हर राफ्टिंग केले जाते. 
नेट असल्याने, सर्व मित्र मंडळींना फोन करून खुशाली दिली. आता नुब्रा व्हॅलीतील दिस्किट गावात जायचा रस्ता चढाचा होता... वाटेत बौद्ध स्तूप लागले... नुकतीच रंगरंगोटी केल्यामुळे पांढरे चकचकीत दिसत होते... वाळवंटात जसे ओयासिस असतात तसे हिमालयातील पास जवळ अथवा चौरस्त्यावर असे स्तूप असतात... पुढे मोटरसायकलिस्टचा गृप लागला. त्यांच्या बरोबर "भारत माताकी जय" चा उद्घोष केला.  यामुळे अंगात ऊर्जा  सळसळते आणि कठीण मार्ग सहज सोपा होतो...
सुरू झाली दिस्किटची चढाई... वेडीवाकडी वळणे... उंच चढत जाणारे रस्ते... शार्प हेअर पिन बेंड... थंड वारे आणि कडक ऊन... हळूहळू शिखराकडे जाणारा २१ किमी रस्ता पार करायचा होता... मध्येच हेड विंड सुद्धा अंगावर घेत मार्गक्रमण सुरू होते... जुक बॉक्स वरील थिरकत्या गाण्यावर पेडलिंगचा ठेका धरत धीराने पुढे पुढे जात होतो... 
सायंकाळी चार वाजता दिस्किट मॉनेस्ट्रीच्या पायथ्याला पोहोचलो. गाव मोठे होते.  हॉटेल्स आणि होम स्टे यांनी गजबजलेले गाव... पेंडामीक मुळे मलूल वाटले..  फौजी दोरजे नामग्यालच्या "इकोटेल गेस्ट हाऊस" मध्ये आजचा पडाव टाकला. आजची ४३ किमी राईड मुंबईतील १५० किमी पेक्षा भारी होती. 

मस्त फ्रेश झालो आणि गेस्ट हाऊस वर चहा घेऊन सायकलसह दिस्किट गावात फेरफटका मारला. गावात सोनमजीच्या सायकल शॉपीला भेट दिली. सोनम यांचे एक दुकान लेह मध्ये सुद्धा आहे. आमच्या सायकल तपासून सोनमने ओके प्रमाणपत्र दिले. अतिशय लाघवी आणि मोजके बोलणारा सोनम एकदम भावला. 

गावात फिरताना केरळचे मोटरसायकलिस्ट भेटले... फाटलेले बूट आणि सॅक शिवायला चांभाराकडे बसले होते... एक लक्षात आले लडाख सफरीत जाड सुई आणि न तुटणारा दोरा असणे खूप आवश्यक आहे... जेणे करून वेळे प्रसंगाला शिवण्याचे काम स्वतः करू शकू... केरळ ते लडाख असा संपूर्ण प्रवास या चार जणांनी मोटरसायकलवर केला होता. पुढे श्रीनगर मार्गे ते परतीचा प्रवास करणार होते... 

रस्त्यावरच्या फुटपाथवर भाजीवाल्या लडाखी महिला बसल्या होत्या. हिरव्या भाज्या एकदम रसरशीत होत्या... पालक, मुळा, बिट, कोबी, वाटाणा, सेलरीच आणि बऱ्याच हिरव्या रानभाज्या होत्या. एव्हढ्या तजेलदार भाज्या पाहूनच मन उल्हसित झाले. दिस्किट मार्केट मधील सायंकाळची रपेट आनंददायी झाली. 

सकाळीच दिस्किट टेकडी वरील ताशी मॉनेस्ट्री जवळच्या मैत्रेय बुद्धाला भेट देण्यासाठी  सायकल सफर सुरू झाली.  अर्ध्या तासातच टेकडीवरील १०६ फूट उंचीच्या बसलेल्या बुद्ध मूर्तिजवळ पोहोचलो. नुकतेच उजाडले होते. मंद स्मित करीत असलेला बुद्ध पुतळा सुवर्ण प्रकाशात चमकत होता. आसनावर बसलेल्या बुद्ध मूर्तीच्या चेहऱ्यावरील हास्यमुद्रा आणि दोन्ही हाताची मुद्रा पाहून आनंदाच्या अथांग सागरात रममाण झालो. सर्व जगाला मैत्रीचा संदेश देणारे भाव बुद्ध मूर्तीच्या रोमरोमातून प्रकट होत होते. या उंच टेकडीवरून संपूर्ण दिस्किट गावचे दर्शन झाले. हिमालयाच्या कुशीत श्योक नदीच्या किनारी वसलेल्या दिस्किट गावाचा विहंगम परिसर पाहताना मन मोहून गेले.  
पंधराव्या शतकात (सन १४२०) बांधलेल्या ताशी मॉनेस्ट्री मध्ये आलो. पूर्वी हा दिस्किट राजाचा राजवाडा होता. चीन आणि पाकिस्तानच्या आक्रमणापासून संरक्षणासाठी बाजूच्या उंच टेकडीवर मैत्रेय बुद्धाची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. या मॉनेस्ट्रीमधील एका मंदिरात हिंदू देवदेवतांच्या मूर्ती आहेत. येथे फोटोग्राफिला मनाई आहे. मॉनेस्ट्री मध्ये ध्यानधारणा केली. मॉनेस्ट्रीच्या गॅलरी मधून संपूर्ण नुब्रा व्हॅलीचा अथांग परिसर डोळ्यांत साठवून घेतला. प्रत्येक टुरिस्टने मैत्रेयबुद्ध आणि ताशी मॉनेस्ट्री जरूर पहावी. 

इकोटेल गेस्ट हाऊस मध्ये नास्ता करून हुंडरकडे सायकलने प्रस्थान केले. श्योक नदीच्या किनाऱ्याने आता रस्ता पुढे चालला होता. हिमालयात चढ उताराचे आणि वेडेवाकडे रस्ते आपल्याला जीवनगाणे सांगतात. जीवनाची वाटचाल सुद्धा अशीच असते. रस्त्यालगतच्या नदीच्या एका बाजूला हिमालयाच्या पर्वत रांगा आणि त्यावर डोलणारे पांढरेशुभ्र ढग पाहून आम्ही सुद्धा मार्गात सायकल थांबवून गाण्याच्या ठेक्यावर डान्स करू लागलो.
सायकलिंगसह निसर्गात रममाण होणे याचा अनुभव घेत होतो. हुंडरकडे जाणाऱ्या बायपास वर लिहिले होते... "Life is Like Photograph; You Need the Negatives to Develop"  आपल्या सुप्त गुणांना विकसित करून जीवनानंद भरभरून लुटणे... हेच तर आनंदाचे गमक आहे.

हुंडरच्या वाळवंटात पोहोचलो. वाळवंटाच्या सुरुवातीलाच श्योक नदीचा एक प्रवाह वहात होता. तेथे माउंटअबूचे बंदुकवाले सरदारजी हरविंदर सिंग यांनी भेट झाली. स्वतः सायकलिस्ट असल्यामुळे जवळ येऊन आपुलकीने चौकशी केली. माउंटअबुला सायकलिंग करत या, अशी विनंती त्यांनी केली. 

हुंडरचे वैशिट्य म्हणजे;  नदी आहे, वाळवंट आहे, दोन मदारवाले उंट आहेत, हिमालय आहे आणि शिखरावर दिसणारा पांढराशुभ्र बर्फ सुदधा आहे. एकाच ठिकाणी संपूर्ण निसर्गचक्र एकवटले होते.

 दोन मदार असलेले उंट (Double Hump Camel) यांचे तांडे येथे वाळवंटाच्या सफरीसाठी तयार होते. परंतु उंटांची जेवणाची वेळ झाली होती. त्यामुळे  वाळवंट सफारी ऐवजी उंटावर बसून... जवळच एक फेरी मारून फोटोची हौस भागविली. येथील उंट सफर दुपारी १ ते ४ बंद असते. 

पुढे प्रस्थान केले. नदीच्या किनाऱ्याने पेडलिंग सुरू होते. संपूक गावाजवळच्या बौद्ध मंदिराला भेट दिली. नव्या मंदिराचे बांधकाम सुरू होते. दुपारचे ऊन खूपच वाढले होते. त्यामुळे गावात मुक्काम करायचे ठरले. तहसील नोरबे यांनी त्यांच्या खळ्यात टेंट लावायला परवानगी दिली. आज पहिल्यांदा टेंटचा उपयोग आम्ही करणार होतो. टेंट तयार झाला आणि तहसील नोरबे आमच्यासाठी प्यायचे पाणी घेऊन हजर झाले. त्यांना खूप आनंद झाला होता. घरी मुंबईचे पाहुणे आले म्हणून... चहाचे आमंत्रण द्यायला ते आले होते. 
घराजवळच्या ओढ्यात जाऊन मस्त फ्रेश झालो. गुडगुड चहा आणि छोट्या रोटल्या त्यावर अमूल बटर, याचा आस्वाद घेताना  सुरू झाली गप्पांची मैफिल... वयस्क नोरबे आणि त्याची पत्नी, दोन मुले त्यातील एक लामा झालाय...  उच्च शिक्षित मुलगी घर आणि शेती सांभाळते तर जावई टुरिस्ट व्यवसाय करणारा... एक लहान मूलगा... घर अतिशय स्वच्छ आणि टापटीप... 

गावात फेरफटका मारताना तेंजिंग नोरबे दिदीने टोपलीमध्ये  हिरवटलेली गव्हाची रोपे आणली होती. ती गच्च भरलेली टोपली संजयने पाठीवर घेतली.
मेहनतीची कामे येथील स्त्रिया अतिशय सहजपणे करत होत्या. 

 गावात प्रामुख्याने गव्हाचे शेती केली जाते. कोबी, फुलकोबी,कारली,सलगम ह्या फळभाज्या पण मुबलक प्रमाणात होत्या. हिरव्या पालेभाज्या आणि कंद सुद्धा पिकविले जाते. सायंकाळच्या जेवणात मोमो आणि लाल चटणी होती. नोरबे कुटुंबासह जेवताना, गावाची बरीच माहिती मिळाली.
 
 नोव्हेंबर ते मार्च या थंडीच्या महिन्यात बर्फ पडत असल्यामुळे त्यांचा खुपच कठीण काळ असतो. सुकवून ठेवलेले कांदे, बटाटे, भाज्या यांचा वापर केला जातो. घर उबदार राहण्यासाठी बुआर (लाकडे पेटविण्याचा मोठा बंब) लावतात. घराबाहेर पडताना निखारे असलेली शेगडी ढगळ अंगरख्यामध्ये ठेवावी लागते.  बऱ्याच वेळा लेहची रहदारी सुद्धा बंद असते.  निसर्गाशी जुळवून घेऊन, दररोजची कामे करणे किती कठीण होत असेल याची जाणीव झाली.  त्या वातावरणाची नुसती कल्पना केली तरी अंगावर शहारे येतात.

येथील संडास सुद्धा युनिक होता. मुख्य घराबाहेर, खाली भुयार असलेला संडास होता. विधीसाठी त्यात एक खड्डा होता. बाजूलाच वाळूचा ढिगारा आणि फावडे ही सामुग्री. सोबत पाणी घेऊन जायचे. प्रातर्विधी झाल्यावर त्या खड्डयात बाजूला ठेवलेली वाळू लोटायची. कालांतराने खालचा खड्डा भरला की वाळू मिश्रित मलबा खत म्हणून शेतात वापरला जातो. विशेष म्हणजे या प्रकारात कोणतेही गॅसेस वातावरण प्रदूषित करीत नाहीत. 

सकाळी खळ्यात लावलेला टेंट डिसमेंटल करून सामानाची बांधाबांध करीत होतो, तेव्हढ्यात नोरबे दादांचा जावई किटलीतून चहा घेऊन आला. चहा घेतला आणि नास्त्यासाठी नोरबे दादांच्या घरी आलो. सकाळच्या नास्त्याला वाडगाभर हर्बल पास्ता आणि अमूल बटर मिश्रित गुडगुड चहा होता. आजचा सकाळचा नास्ता म्हणजे जेवणच होते, त्यामुळे दुपारपर्यंत निवांत राईड करणे सोपे झाले. नोरबे कुटुंबियाने निरपेक्षपणे आदरातिथ्य केले होते.

सुरू झाली राईड तुरतुक कडे... सम्पूक गावाबाहेर आर्मीचा कॅम्प लागला होता. या भागात प्रचंड पिकणाऱ्या एप्रिकोट ज्यूसच्या कॅनचा स्टॉल आर्मीच्या जवानांनी लावला होता. येथील गावकऱ्यांना रोजगार मिळावा म्हणून आर्मीने पुढाकार घेऊन तुरतूक येथे एप्रिकोट पासून ज्यूस बनवून सीलबंद डबे बनविण्याची फॅक्टरी काढली आहे. या डब्यांचे प्रमोशन करण्याची संधी आम्हाला मिळाली. तेथील जवानांसह फोटो काढले. 

पुढे सियाचीन भागात देशासाठी धारातीर्थी पडलेल्या जवानांसाठी शाहिद स्मारक होते. त्या सर्व जवानांना वंदन करून मार्गस्थ झालो. अतिशय प्रशस्त रस्ता बाजूने वाहणारी श्योक नदी  हिरव्यागार सफरचंद आणि जरदाळूच्या बागा, पुंजक्या पुंजक्याने आकाशात बागडणारे ढग आणि गारठलेला, मंद वाहणारा वारा या सर्व वातावरणात मनात ऊमलणारे निसर्ग संगीत... या मदहोशीत सायकलिंग सुरू होते. अशा वातावरणात तासाभराची सायकल सफर पाच मिनिटांची वाटली. 

स्कुरू गावातील बौद्ध मंदिराकडे कधी पोहोचलो समजले ही नाही. वेली-फुलांनी नटलेला अतिशय स्वच्छ परिसर... मंदिर सुद्धा नुकतीच रंग रंगोटी करून चकचकीत केले होते. मंदिर बंद असल्यामुळे बाहेरून दर्शन घेऊन मार्गस्थ झालो.
वाटेत चेन्नई रॉयल रायडर्सची मोटरसायकल गॅंग भेटली. त्यांच्या समवेत भारतमाता की जय गर्जना करतांना संजयने "गणपती बाप्पा" म्हणताच सर्व मद्रासी रायडर्सच्या मुखातून "मोरया" असा जयघोष झाला... बाप्पा सर्वांचा लाडका आहे याची अनुभूती आली. 

चांगमार गावाकडे कूच केले... अचानक वातावरण बदलले... पावसाचा वर्षाव सुरू झाला. पोंचू घालायची पण उसंत मिळाली नाही... थंड वारे वाहू लागले... समोर पाहतो ते काय... पुढे जबरदस्त लॅंड स्लाईड झाली होती. श्योक नदीने आपले पात्रच बदलले होते... BRO चे बरेच कामगार युद्ध पातळीवर काम करत होते. मोठमोठ्या बोल्डर्स मधून रस्ता काढत पेडलिंग करत होतो. चढाचा रस्ता होता... न थांबता पेडलिंग करत होतो... पुढे व्हॅली मध्ये उतार सुरू झाला... वेग वाढविणार एव्हढ्यात मागील चाकातून खाड खाड आवाज आला. तातडीने सायकल थांबविली. पाहतो तर काय... मागील चाकाच्या गियरमध्ये पॅनियर बॅगेचा पट्टा अडकला होता... बॅगेला बांधलेली बंजी कॉर्ड तुटली होती... ऑफ रोडिंग मध्ये सायकलला झालेल्या खडखडाटामुळे  बंजी कॉर्ड तुटून बॅगेचा पट्टा सैल होऊन तो चाकात अडकला होता... पट्टा ताणल्यामुळे बॅग फाटली होती. बॅग काढून सायकल उलटी केली आणि अडकलेला पट्टा काढून सायकल ठिकठाक केली... पावसाळी वाऱ्याच्या झोतांमुळे अंग थंड पडत चालले होते... अश्या परिस्थितीत सायकल चालवणे अवघड होते... परंतु पर्याय नव्हता... सायकलिंगचा सर्व अनुभव पणाला लावून पेडलिंग सुरू केले... चढ उतार, दगड माती यातून  एक बाय एक गियरवर सायकल सुरू होती... चालण्यापेक्षा धीम्या वेगाने, मुंगीच्या गतीने सायकल पुढे जात होती... 

कसेबसे चांगमार गावात पोहोचलो... तेथे BRO चा कॅम्प होता. प्रचंड भूक लागली होती... पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता... पुढे जाणे अशक्य होते... BRO मध्ये चौकशी केली... दोन जवान आले... जवान रावत यांना  सर्व परिस्थिती सांगितली...  कॅप्टनच्या परवानगी शिवाय आम्ही काहीच करू शकणार नाही... बाहेरच्या व्हरांड्यात बसून ओले कपडे बदलले... एका जवानाने विचारले, "आपने खाना खाया है क्या" जसे काही आमची भूक त्यांनी जाणली होती. किचन मध्ये नेऊन भात वरण आणि भाजी सर्व एकत्र कालवून  निवांत जेवलो... तेव्हा ऊर्जा आली... 

चिखलाने बरबटलेली सायकल साफ करून तिला सुद्धा तेलपणी केले... सायकलची चमक सुखावून गेली... तिचे सुद्धा पोट भरले होते... पाच वाजता इंजिनियर कॅप्टन अंकित वर्मा आले, यांनी आम्हाला परवानगी दिली.. याचा जास्त आनंद तेथील जवानांना झाला... मग आमची जी बडदास्त केली त्याला तोड नव्हती. खाट.. जाड माट्रेस... स्लीपिंग बॅग... दोन दोन रजया... सर्व राजेशाही थाट होता...

शिपाई रावत; जो खानसामा पण होता त्याने चटपटीत चना चाट बनवून आणले... प्रत्येक जवान आमच्या सायकलिंग बद्दल जाणून घेण्यास उत्सुक होता... जवान रावतला माझ्या जुक बॉक्स मधील गाणी खुप आवडली. महिनो नि महिने घराला पारखे असलेले हे जवान घरातल्याच जवळच्या नातलागप्रमाणे  आमची उठबस करीत होते.. रात्री सामिष अंड्याचे जेवण मिळाले... रात्री उशिरापर्यंत गप्पा मारीत बसलो होतो... 

बोगडांग येथे मोठ्या प्रमाणात लँड स्लाईड झाल्यामुळे दोन दिवस वाहतूक बंद होती... दिवस रात्र काम करून  अडकलेल्या जवळपास तीनशे गाड्यांना रहदारी मोकळी करून दिली होती... विपरीत परिस्थितीत... दिवस रात्र एक करून अत्यंत कष्टाची कामे करणे... यासाठी सर्व BRO सैनिकांना कडक सॅल्युट ठोकला... आणलेला एप्रिकोट पल्प त्यांना भेट दिला... त्या सर्वांशी झालेली एका रात्रीची संगत.. आयुष्यभराच्या आनंदाचा, सुखाचा, अभिमानाचा ठेवा झाला आहे... 

खरंच जीवनाचा प्रवाह आणि प्रवास असाच चालत राहावा हीच प्रार्थना परमेश्वराकडे केली आणि निद्रादेवीच्या कुशीत विसावलो...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...